Posts

Showing posts from November, 2024

वेड असावे.. व्यक्तता

 व्यक्तता...वेड असावे  राहुल लाळे  वेड असावे गाण्याचे वेड असावे ऐकण्याचे वेड असावे पाहण्याचे वेड असावे प्रतिसादाचे काहींना.... नाही जमत लिहायला नाही जमत गायला नाही जमत चितारायला नाही जमत व्यक्त व्हायला काहींना..... काहींनी लिहावे काहींनी वाचावे काहींनी गावे काहींनी ऐकावे चालू राहू द्यावे आदानप्रदान... कधी तरी  उलटे ही व्हावे... गाणाऱ्याने ऐकावे वाचणाऱ्याने लिहावे चालू राहू द्यावे आदानप्रदान... मनातले व्यक्त करावे इतरांचे जाणून घ्यावे.... सगळ्यांनी   © राहुल लाळे 

मन गुंतले एवढे

 ** *मनवाटा* ** राहुल मन गुंतले एवढे, जरा उसंत नाही देहास या माझ्या, विसावा म्हणून नाही जीवनी या माझ्या, संधी अनेक येती साधावयास त्यांना, वेळ अपुरा होई प्रवासात या माझ्या, अनंत वाटा काटेरी विश्वास, धैर्य अन् श्रध्दा, असती माझे सोबती प्रत्येक येणाऱ्या क्षणांत, भरपूर मी जगतो मिळणाऱ्या अनुभवांनी समृद्ध मी होतो भेटतात रस्त्यात या, माणसे वाईट चांगली मिसळून त्यांच्यात मला, साथ छान मिळाली स्वार्थ मनात कुठलाच बाळगला कधीच ना मी लाज वागण्याची, अन् मला वाटली नाही जीवासवे जन्मे मृत्यू, सत्य जाणले मी कुठल्याही संकटाला मग, सामोरा भिडलो मी जखमा उरातल्या खोल, भरल्या माझ्याच त्या मी इतरांच्या दुःखावरही हळूवार फुंकरतो मी मनुष्य देह म्हणे हा, मिळतो महत्प्रयासाने मिळालेले आयुष्य हे, मी जगेन आनंदाने                       - राहुल लाळे                      २ ऑक्टोबर २०२०.

जे तुझ्याचसाठी

 *जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले* ☝🏻३:०८ *जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले* पुण्याहून गोव्याला निघालो ड्राईव्ह करताना ब्लु टूथ वर गाणी ऐकत होतो , उषा मंगेशकरांचे *केळीचे सुकले बाग* ऐकत होतो तेव्हा बायको म्हणाली पाडगावकरांचे ते गाणे आहे का? कुठले कुठले तिलाही आठवत नव्हते, आठवण्याचा प्रयत्न करूनही ओठावर येत नव्हते. वाटेत कोल्हापूरला थांबलो, महालक्षमीचे दर्शन घेऊन बाहेर येताच आठवले. फारसे लागत नाही, ऐकले जात नाही पण तरीही प्रसिद्ध आहे ऐकणीय गुंग करणारे आहे, जरूर ऐका.. काव्य - गीत- आर्तता - विश्वनाथ मोऱ्यांचं संगीत- उषाताईंचा आवाज -सगळंच अवर्णनीय... राहुल लाळे जे तुझ्याचसाठी होते केवळ फुलले वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले रथ ऐश्वर्याचा या वाटेने गेला जयघोष तुझा मग सर्व जगाने केला मी दूर एकटी, माझे डोळे ओले त्या फुलासारखी अबोल माझी प्रीत ती अबोल पूजा या माझ्या हृदयात नच ओठांवरती नाव तुझे कधि आले तुज कसे कळावे ? देवा नाही कळले ! मी दूर अलक्षित तुजसाठी तळमळले त्या फुलात माझे हृदय ठेवुनी गेले गीत-मंगेश पाडगांवकर संगीत-विश्व नाथ मोरे स्वर-उषा मंगेशकर

कविता दिन

 कविता स्फुटते कधीतरी आपसूकच कधी कागदावर खरडून तर कधी संगणकावर बसून तर कधी मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वर कवितेत शब्द असतात गीत असते असतात हुंकार ...हुंदके... हासू...आसू मधूनच कधी चिमटे..थपडा..आघात अन सोबतीला काही विलक्षण शब्द फिरवतात पाठीवरून ते मायेचा हात.. तर कधी गालावरून हलकेच मोरपीस कविता माझी विचित्रच उफाळतो कधी तिच्यात लटका राग  तर कधी अवखळ प्रेम उमटते तिच्यात आईची अश्राप माया  अन कधी हेलावणारं बापाचं काळीज उलगडवते कधी अल्लड मैत्री भावाबहिणीतली कधी निर्व्याज नाती हळूवार फुलवते अलवार मोहक प्रीती कविता व्यक्त करते कोणाच्या दाहक वेदना कोणाचा प्रखर त्वेष कोणाच्या नाजूक भावना कविता संचारते अंतरंगी सुचते कधी.. प्रकटते कधी ओघावते कधी...मोहावते कधी विसरवून टाकते तनामनांना धुंदावते क्षणांना रिझवते जीवांना शब्दांना शब्द मिळत राहोत मनांशी मने जुळत राहोत कवितांची माळ गुंफत राहो आजच्या कविता दिनी ... आणि काय आपण मागणार? ©राहुल लाळे २१-०३-२०१८

कविता, चारोळ्या

 दोन पक्षी  झाडावर बसलेले  निःशब्द ... बराच वेळ मनातलं सांगायला अनेकदा शब्द लागत नाहीत... या हृदयीचे त्या हृदयी राहुल 🌈 †******?** 😊👌🏻 जेव्हां जे करायचं होतं तेव्हां ते आपण केलं... जे तेव्हां राहून गेलं  आता ते नक्की करायचं  वय काय वाढत राहील.. दिवस ते जात राहतील जे केलं ते आपलं म्हणायचं राहिलं ते सोडून द्यायचं 🌈 राहुल ---------- जमिनीला तहान नेहमीच या पावसाची पावसाला ही आता ओढ लागलीय जमिनीची 🌈राहुल –--------- उजेड थोडा ठेवू,  अंधार फार होतो पणती जपून ठेवू,  अंधार फार होतो सगळीकडेच आहे  संशयाचे वादळ वारु नाती जपून राहू शंकेस दूर सारु थंडीतल्या हवेने जरी गोठतील श्वास हृदये जागती ठेवू देतील ती विश्वास वास्तवाची येथे पेटते होळी रोज  स्वप्ने जपून ठेवणे हाच यत्न आज   काळ्या नभांतूनच  वीज पहा चमकते बरसणाऱ्या पावसातून भिती सर्व वाहून जाते मनातल्या जखमातून पणतीत तेल घालू अंधार होता कधी मग मनदीप लगेच लावू 🌈 राहुल [1/5, 18:48] Rahul Lale: 👌🏻👌🏻 अंधार दाटूनी येता मनदीप मी प्रज्वलतो मळभ मग कुठले लख्ख उजेड पडतो 🌈राहुल [1/5, 18:53] Ra...

कविता आणि कवी

 कविता आणि कवी राहुल  सर्वांच्या कविता वाचून मीही ठरवलं एखादी पहावी करुन  कसे बरं करतात पटापट, हे सगळे काव्य?  ट ला ट जोडतानाही मला, पार करावं लागतं दिव्य शब्द कधी जुळले, तर त्यात अर्थ लागत नाही  अर्थ साधला गेला,तर शब्दांची जोड जुळत नाही  ओळीमागे ओळी लिहून नुसतं काही चालत नाही वाचताना त्या मनाला भिडल्या नाहीत, तर काही खरं नाही तेंव्हा पासून झालो मी शहाणा कविता करण्याचा सोडला बहाणा मनाला आता जे भावतं, ते नजरेनं टिपतो शब्द स्फुरले कधी, तर शब्दांत उतरवितो लिहितं झालो त्याला आता ,कविता मी म्हणत नाही कवी आहे मी, म्हणायचं माझं धाडस नाही ©राहुल लाळे