कसबा पेठ
कसबा पेठ राहुल कसबा गणपती मंदिर : पुण्याचं प्राचीन ग्रामदैवत. जिजाऊ आईसाहेब बालशिवाजी राजांना घेऊन त्यावेळच्या पुनवडी म्हणजेच आजच्या पुण्यात रहायला आल्यानंतर जमीन नांगरताना मिळालेली श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती आणि तिची प्राणप्रतिष्ठा करुन स्थापित केलेलं हे शिवकालीन मंदिर !!! याच मंदिराच्या जवळ असलेल्या लाल महालात शिवाजीराजांचं बालपण गेलं.. पुण्यात श्रीगणेशाची अनेक मंदिरं आहेत पण एक दैवत म्हणून मला जास्त भावणारी दोनंच.. पहिलं कसबा गणपतीचं आणि दुसरं पेशव्यांनी स्थापन केलेला सारसबागेतल्या तळ्यातल्या गणपतीचं .. याच ऐतिहासिक महत्वामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचं पहिलं स्थानही कसबा गणपतीला आहे. आज कसबा गणपतीबद्दल लिहायचं कारण म्हणजे परवा दिवाळीच्या देवदर्शनासाठी घेतलेलं कसबा गणपतीचं दर्शन ! दर्शन घेतलं .. अथर्वशीर्षाचं आवर्तन केलं आणि बाहेर आलो व लहानपणच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या व डोळे पाणावले. कारण याच कसबा गणपतीजवळ असलेल्या पारखी शास्त्री वाड्यात..१३५ कसबा पेठेत मी लहानाचा मोठा झालो. याच वाड्यात आधी एका पत्र्यावरच्या खुराडेवजा खोलीत आणि न...