रात्र काळी
रात्र काळी घागर काळी राहुल प्रसंग कसा नाट्यमय आहे बघा. काळोख्या रात्रीची वेळ निवडून, एक गोपी काळ्या यमुनेवर पाणी भरावयास निघाली. चांगली तयारी करून निघाली. म्हणजे चुंबळ, घागर आहेतच, पण बिलवर, गळ्यातील मोत्यांचा हार, हेही आवर्जून घेतले आहेत. अभिसारिका असल्याने सर्व गोष्टी निवडून काळ्या रंगाच्या घेतल्या. पण तरीही एक राहिलेच. ती स्वत: गोरीच होती. मग, मांजर डोळे मिटून दूध पिते, त्याप्रमाणे तिने ठणकावून सांगितले, "मी काळी". वाद मिटला. आतां जाण्यास अडचण काय? तीही तीने लगेच सांगितली. "मी भित्री. एकटी कशी काय जाणार? सोबत नको? सखे, त्या सावळ्याला बरोबर धाड ना !" आपण घरांतल्या लग्नाच्या मुलीला काळी असेल तर सावळी, सावळी असेल तर गहूवर्णी, गहूवर्णी असेल तर चक्क गोरी म्हणतो. पण येथे ही बिलंदर गोपी स्वत:ला गोरी असून काळी व बाहेरच्या 'कृष्णा'ला सावळी म्हणून मोकळी! विष्णुदास नाम्याला हा चावटपणा पसंद नाही. तो साफ सांगतो "माझी स्वामिनी काळी नाही बहूकाळीच आहे. या गाण्याबद्दल एक कथा अशीही - हे गाणे संत नामदेवांनी नव्हे तर विष्णुदास नामा यांनी लिहिले आहे असेही मानले जाते ...