कविता दिन
कविता स्फुटते कधीतरी आपसूकच
कधी कागदावर खरडून
तर कधी संगणकावर बसून
तर कधी मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वर
कवितेत शब्द असतात गीत असते
असतात हुंकार ...हुंदके... हासू...आसू
मधूनच कधी चिमटे..थपडा..आघात
अन सोबतीला काही विलक्षण शब्द
फिरवतात पाठीवरून ते मायेचा हात..
तर कधी गालावरून हलकेच मोरपीस
कविता माझी विचित्रच
उफाळतो कधी तिच्यात लटका राग
तर कधी अवखळ प्रेम
उमटते तिच्यात आईची अश्राप माया
अन कधी हेलावणारं बापाचं काळीज
उलगडवते कधी अल्लड मैत्री
भावाबहिणीतली कधी निर्व्याज नाती
हळूवार फुलवते अलवार मोहक प्रीती
कविता व्यक्त करते कोणाच्या दाहक वेदना
कोणाचा प्रखर त्वेष कोणाच्या नाजूक भावना
कविता संचारते अंतरंगी
सुचते कधी.. प्रकटते कधी
ओघावते कधी...मोहावते कधी
विसरवून टाकते तनामनांना
धुंदावते क्षणांना रिझवते जीवांना
शब्दांना शब्द मिळत राहोत
मनांशी मने जुळत राहोत
कवितांची माळ गुंफत राहो
आजच्या कविता दिनी ...
आणि काय आपण मागणार?
©राहुल लाळे
२१-०३-२०१८
Comments
Post a Comment