*ताश्कंद फाईल्स्....एक जबरदस्त आय ओपनर* © राहुल लाळे गेल्या काही दिवसांत अनेक सिनेमे पाहिले, मनोरंजनात्मक, सांगीतिक, राजकीय, सामाजिक , काही भावले. काहींवर लिहिलं , काहींवर राहिलं. पण हा सिनेमा पाहिला आणि लिहूनच व्यक्त झालं पाहिजे असं वाटलं. इतिहास हा शाळेपासून आवडीचा विषय... खरं म्हणजे शिवाजी महाराजांमुळे, त्यांच्या सुरस वाटणाऱ्या पण स्फुरण जागवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या , स्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाच्या पराक्रमामुळे. इतिहास शिकताना, नंतर महाराजांप्रमाणेच पारतंत्र्याविरुध्द लढून भारत स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दलही तेवढाच आदर आणि कुतूहल वाढत गेलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आझाद हिंद सेना स्थापन करणं, त्यासाठी देशाबाहेर जपान, जर्मनी मध्ये जाऊन मदत गोळा करणं आणि संशयास्पदरित्या विमान अपघातात मृत्यू होणं हे वाचून मन फारच अस्वस्थ व्हायचं. तीच गोष्ट *जय जवान जय किसान* हा नारा देणाऱ्या आणि *मूर्ती लहान कीर्ति महान* अशी ओळख असणाऱ्या भारताच्या दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. १९६५ चे पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकून देणारा ...