पुत्र व्हावा ऐसा गुंडा
*पुत्र व्हावा ऐसा गुंडा* राहुल लाळे पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा तिही लोकी झेंडा। तुकारामांचे वडील बोल्होबा जे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते- दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायचे आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली विठोबाकडे काही तरी मागेल, म्हणून तिला बरोबर नेत नसत. अनेक वर्ष मागं लागल्यावर एकदा बोल्होबा कणकाईला बरोबर न्यायला तयार होतात पण मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचं नाही, या अटीवरच. कारण, इतके वर्ष बोल्होबांनी विठुरायाकडे काहीच मागितलं नव्हतं, केली होती ती फक्त भक्ती. बोल्होबांच्या निरपेक्ष भक्तीसमोर प्रत्यक्ष पांडुरंगच म्हणे नतमस्तक व्हायचा. देवळात जातेवेळी कणकाई मागे राहते आणि बोल्होबा दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर आत दर्शनाला जाते. आणि एकटक देवाकडे पाहून हात जोडते. बोल्होबा जवळ नाहीत हे पाहून विठुरायाही कणकाई काय हवे ते माग म्हणून विचारतात आणि आपण काहीच न मागता देव देतोय म्हणजे नवऱ्याची आज्ञा मोडत नाहीये हे जाणून पडत्या फळाची आज्ञा समजून कणकाई पोटी संतान नाही याची खंत व्यक्त करते आणि देव तथास्तु म्हणतात. आनंद...