*विठ्ठल -एक ऊर्जास्रोत* तसा मी देवदेव करणारा नाही, पण नास्तिक ही नाही. कसब्यात वेदपाठशाळा चालत असलेल्या वाड्यात रहात असल्याने संस्कार आणि धारणा बनली पण कर्मकांडापेक्षा भाव आणि विश्वासच कायम महत्त्वाचे वाटले. लहानपणी आषाढी एकादशी म्हणलं की सुट्टी आणि साबुदाणा खिचडी, साबू वडे, दाण्याची आमटी, बटाटयाचे पापड, शिंगाड्याचा शिरा असे उपासाच्या फराळाचे पदार्थ डोळ्यापुढे यायचे. शाळा पासोड्या विठोबाजवळ असल्यामुळे पुण्यात पालखी येण्याच्या दिवशी शाळेला सुट्टी असायची पण घरी पालखी बनवून ग्यानबा-तुकाराम करत मित्रांबरोबर वारकरी व्हायचो . काका कुमठेकर रस्त्यावर रहायचे, त्यांच्या घरासमोरून पालखी जायची तिचे दर्शन घ्यायला जायचो. आठवी नववीनंतर आजोबांबरोबर दोन तीनदा आळंदी पुणे वारीही केली.. छान वाटायचं. पुढे विठ्ठलवाडीजवळ आनंदनगरला राहायला आल्यावर दरवर्षी आषाढीला विठ्ठलाचं दर्शन चुकवलं नाही... पण आजोबा गेल्यावर वारीला जाणं झालं नाही. मागच्या वर्षी कॉलेजमधल्या मित्र मैत्रिणींबरोबर आळंदी पुणे वारीचा टप्पा केला आणि ग्यानबा तुकारामाच्या गजरात न्हाऊन निघालो. यावर्षी ३० जूनला...