आठवणी दिवाळीच्या
आठवणी दिवाळीच्या…. राहुल लाळे, मित्रांनो गणपती झाले, नवरात्र-दसरा साजरे झाले की नवा उत्साह घेऊन दिवाळी येते. काही दिवस टिव्ही वर कॅडबरी, मोठी साबण अशा अनेक खास दिवाळी स्पेशल जाहिराती सुरु होतात , त्या पाहून लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या अनेक प्रसंगांची मालिका डोळ्यासमोर उभी रहातेच. ……………… प्रत्येक दिवाळी ही वेगळ्या मजेची असायची , कधी आम्ही आजोळी मामाकडे जायचो किंवा कधी माझे - आते-मामे -मावस - चुलत भाऊ बहीण आमच्याकडे यायचे . आमची जागा छोटी - तर मामाकडे नाशिकला हे मोठे घर , आत्या - काकाकडे खेडेगावात जागेचा प्रश्नच नाही . जागा छोटी असो वा मोठी मजा मात्र तेवढीच असायची पहाटे ३-३:३० ला उठून.पहिल्या आंघोळीचा (अभ्यंग स्हान ) नंबर लागावा म्हणून आम्हा भावंडात स्पर्धा लागत असे कोण पहिलं उठून अंघोळ करतंय आणी अंगणात सुतळी बॉम्ब लावून दिवाळीची सुरुवात कोण करणार यात चढाओढ असायची. दिवाळीच्या पहाटेचा माहोल सुगंधी उटण्याने अधिक मोहक होत असे . बोचणाऱ्या थंडीत चुलीवर/ गॅसवर / बंबात तापणारे पाणी , पाट्यावर वाटलेला ओल्या खोबऱ्याचा रस/ सुवासिक तेल , न्हाणी...