कसबा पेठ

 कसबा पेठ

राहुल

कसबा गणपती मंदिर : पुण्याचं प्राचीन ग्रामदैवत. जिजाऊ आईसाहेब बालशिवाजी राजांना घेऊन त्यावेळच्या पुनवडी म्हणजेच आजच्या पुण्यात रहायला आल्यानंतर जमीन नांगरताना मिळालेली श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती आणि तिची प्राणप्रतिष्ठा करुन स्थापित केलेलं हे शिवकालीन मंदिर !!! 


याच मंदिराच्या जवळ असलेल्या लाल महालात शिवाजीराजांचं बालपण गेलं.. 


पुण्यात श्रीगणेशाची अनेक मंदिरं आहेत पण एक दैवत म्हणून मला जास्त भावणारी दोनंच.. पहिलं

 कसबा गणपतीचं आणि दुसरं पेशव्यांनी स्थापन केलेला सारसबागेतल्या तळ्यातल्या गणपतीचं ..


याच ऐतिहासिक महत्वामुळे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचं पहिलं स्थानही कसबा गणपतीला आहे. 


आज कसबा गणपतीबद्दल लिहायचं कारण म्हणजे परवा दिवाळीच्या देवदर्शनासाठी घेतलेलं कसबा गणपतीचं दर्शन !


दर्शन घेतलं .. अथर्वशीर्षाचं आवर्तन केलं आणि बाहेर आलो व लहानपणच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या व डोळे पाणावले.


कारण याच कसबा गणपतीजवळ असलेल्या पारखी शास्त्री वाड्यात..१३५ कसबा पेठेत मी लहानाचा मोठा झालो. 


याच वाड्यात आधी एका पत्र्यावरच्या खुराडेवजा खोलीत आणि नंतर एका  दहा बाय बाराच्या खोलीत जन्मापासून अकरावीपर्यंत राहिलो. आईबापूंचे कष्ट पाहिले. दुसऱ्या मजल्यावर पाणी यायचं नाही, म्हणून बादल्या हातात घेऊन पाणी खालून भरलं. व्हरांड्यात सामूहिक पंक्तीत जेवलो. उन्हाळ्यात गच्चीवर झोपलो. गच्चीवर, शनवारवाड्यात, मंदिरात अभ्यास केला.


इथंच गमभन, पाढे, शुभंकरोती, मनाचे श्लोक, करुणाष्टके, अथर्वशीर्ष, रामरक्षा शिकलो. वाड्यात चालणारे वेदमंत्रपठण, भागवतसप्ताहं तसंच वाड्यात व मंदिरातली कीर्तनं ऐकत पुराणातल्या गोष्टींचे संस्कार झाले.. याच संस्कारांमुळे कसब्यात राहूनही कितीही भांडणं, मारामाऱ्यांची वेळ आली ( माझ्या बाबतीत फारशी वेळ आलीच नाही)  तरी तोंडातून अपशब्द आले नाहीत..येत नाहीत.. ती ही जागा..।

इथंच लंगडी, कबड्डी, विटीदांडू, अप्पारप्पी, लंडन लंडन, डबडंऐसपैस, लपंडाव पासून पत्ते,कॅरम, क्रिकेट , सगळे खेळ खेळलो. 


पतंग उडवण्यात, काटा काटी व लिंदोर टाकून पतंग पकडण्यात एक्सपर्ट झालो. काटलेले पतंग पकडण्यासाठी पत्र्यांवर उड्या मारत एका वाड्यातून दुसऱ्या वाड्यात जात अनेकदा बोलणी खाल्लीत.  ७वी नंतर तर मला पतंगकाट्या राहुल म्हणूनच ओळखायचे. पतंग उडवताना आसपासच्या किंवा मागच्या वाड्यातील पतंग उडवणारी  मुलं- माणसं दिसायची,पण आमच्या कडे किंवा एकमेकांकडे प्रत्यक्ष यायचा मार्ग कळायचा नाही, त्यामुळे फक्त आवाजी भांडणांवरंच भागायचं, हे नशीबच. 


या सगळ्या लोकांना मी दहावीत बोर्डात आल्यावर गणेशोत्सवात कसबा मंडळाने त्यावेळचे राज्यपाल एअर चीफ मार्शल आय एच लतीफ यांच्या हस्ते सत्कार झाला तेव्हा कौतुक वाटण्याऐवजी जबरदस्त धक्का बसला होता.


आमच्या वाड्यातही परवा चक्कर मारली... पूर्वी आपण इथंच रहायचो , आता राहू शकू का हा प्रश्न पडला. 


इतक्या वर्षात आमच्या वाड्यात फारसा फरक पडलेला दिसला नाही, उलट वाताहत झालीय ... पण आता मंदिराच्या आसपासचा परिसर मात्र बदललाय , अनेक वाड्यांचं नूतनीकरण होऊन अपार्टमेंटमध्ये रुपांतर झालंय, दोन तीन चौक सोडून पुढे मेट्रो स्टेशन झालंय.  जिजामाता बागेचा लाल महाल झालाय... अनेक जुन्या खुणा पुसल्या गेल्यात... 


पण आठवणी कशा पुसणार?


त्या हव्याच ... पाय जमिनीवर रहायला


©राहुल लाळे

9881404697


( खादाडीची आवड असणाऱ्यांसाठी.. 

कसबा गणपती मंदिराच्या शेजारीच पारसखाजा छान मिळतो.. हे दुकान पूर्वी  सोन्या मारुतीपाशी होतं


मंदिराच्या समोरच्या रस्त्यावरुन पुढे चालत गेलात तर शाळेत माझ्या वर्गात असलेल्या संतोष नगरकरच्या श्रीपाद इडली सेंटर चक्कर मारु शकता...  इडली बरोबरच मस्त साबुदाणावाडा मिळतो)

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका