द बंगाल फाईल्स

 द बंगाल फाईल्स ... इतिहासातून वर्तमानात

राहुल लाळे



" पन्द्रह अगस्त का दिन कहता- आज़ादी अभी अधूरी है" ही अटलजींची कविता अनेकदा ऐकली आणि अग्रेषितही केली. त्यातली "कलकत्ते के फुटपाथों पर जो आंधी-पानी सहते हैं...उनसे पूछो, पन्द्रह अगस्त के बारे में क्या कहते हैं॥" ही ओळ कायम खटकायची. त्यामुळे कलकत्ता आणि १५ ऑगस्टचं काय नातं आहे हे शोधण्याचा बराच प्रयत्न केला तेंव्हा भारताच्या स्वातंत्र्याआधी तेंव्हाच्या बंगालमध्ये कलकत्ता आणि नौखालीमध्ये दंगली झाल्या होत्या एवढीच थोडीशी माहिती कळाली होती.

पण परवा विवेक अग्निहोत्री-पल्लवी जोशी या जोडप्याचा " द बंगाल फाईल्स" हा चित्रपट पाहिला (विवेक-पल्लवीचे ताश्कन्द फाईल्स आणि काश्मीर फाईल्स नंतर हा चित्रपट पाहायची उत्सुकता होतीच)  आणि त्यातून सादर झालेल्या अनेक प्रसंगातून त्यावेळी काय भयंकर घडलं असेल याच्या नुसत्या कल्पनेनं अंगावर शहारा आला.

सिनेमाची अनेक परीक्षणं आली असतील - त्यामुळे परीक्षण नाही पण  काही लिहावंसं वाटलं म्हणून हा प्रपंच ...

हा सिनेमा आपल्याला सध्याच्या पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर  १९४६-४७ च्या वेळी तिथं झालेल्या अमानुष रक्तरंजित इतिहास सांगतो. संपूर्ण सिनेमा सध्याची बंगालची परिस्थिती आणि १९४६ चा अस्थिर बंगाल अशा दोन कालखंडांच्या समांतर प्रवाहात फ्लॅशबॅक आणि आत्ताची कहाणी यांची सांगड घालत पुढे सरकतो.  सीबीआय अधिकारी शिवा पंडित(दर्शन कुमार) याला बंगालमधील एक अपहृत दलित मुलीचा शोध लावण्याच्या केसच्या तपासासाठी पाठवलं जातं. तिथं त्याचा सामना होतो  तो सध्याच्या बंगालच्या राजकीय स्थितीशी साधर्म्य दाखवणाऱ्या सरदार हुसेन ( सास्वता  बॅनर्जी) या एका स्थानिक भ्रष्ट नेत्याशी आणि तपासाचे धागेदोरे शिवाची गाठ घालून देतात भारती बॅनर्जी - माँ भारती ( पल्लवी जोशी)  या  एका वृद्ध  स्वातंत्र्यसैनिकेशी. तपास करताना शिवाला एकीकडे स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा यांची कार्यशून्यता अडथळा आणते  तर दुसरीकडे पूर्वी स्थानिक जुलुमी राजकारण्यांना विरोध करताना अर्धी जीभ कापली गेलेल्या पोलीस इन्स्पेक्टर वेडगळ वाटणाऱ्या दारुड्या  म्हाताऱ्या चतुरकडे ( मिथुन चक्रवर्ती) पाहून तो उद्विग्न होतो. काश्मिरफाईल्स मधलं शिवि पंडित हे पात्र बंगाल फाईल्स मध्ये आणून विषयाची वीण जोडण्याचा विवेकचा प्रयत्न उत्तम.

भारती बॅनर्जी यांच्याशी होणाऱ्या संवादांतून चित्रपट आपल्याला १६ ऑगस्ट १९४६ साली कलकत्ता येथे " डायरेक्ट ऍक्शन डे " च्या निमित्तानं बंगाल - कलकत्ता आणि नौआखाली इथं झालेला भयंकर नरसंहारा आपल्यासमोर उभा करतो. डायरेक्ट ऍक्शन डेच्या दर्दनाक घटना चित्रपटात भारती बॅनर्जींच्या आठवणींतून जाग्या होतात. १९०५ साली हिंदू बंगाल आणि मुस्लिम बंगाल अशी बंगालची पहिली फाळणी लॉर्ड कर्झन या व्हाइसरॉयनं केली असं आपण इतिहासात वाचलं  होतं. त्यानंतर हिंदू बंगालमधलं औद्योगिक आणि आर्थिक केंद्र असलेल्या कलकत्त्यावर आपला कब्जा असावा या हेतूनं  "Butcher of Bengal"  म्हणजे बंगालचा कसाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्यावेळच्या बंगालच्या प्रधानमंत्री  हुसैन शाहिदी सुऱ्हावर्दी ( मोहन कपूर) याने  डायरेक्ट ऍक्शन डेचा आदेश दिला. त्यात हिंदुविरोधी भडकाऊ पत्रकं वाटली गेली. कोणत्याही स्पष्ट मार्गदर्शक सूचना न देता , पोलीस-प्रशासन यांना सुट्टी देऊन दहशतवादी गुलाम सरवर हुसैनी (नमाशी चक्रवर्ती) त्याच्या साथीदारांकरवी हिंदूंचं अत्यंत घृण हत्याकांड घडवून आणतो. त्यात तरुण भारती ( सिमरन कौर रंधावा) तिचे न्यायाधीश वडील (प्रियांशु चॅटर्जी) आणि आई यांना आपल्या डोळ्यासमोर गमावते. आसपास चाललेल्या दंग्यातून ती अमरजित अरोरा (एकलव्य सूद)च्या मदतीने वाचण्यासाठी प्रयत्न करते. ते करताना कलकत्त्यातील अनेक गल्ल्यात - घरात - गोदामात पडलेले छिन्नविछिन्न  मृतदेह, चौकाचौकात  मेलेल्या जनावरांप्रमाणे अडकवलेल्या  स्त्रिया , शवांचे लचके तोडणारी गिधाडं , जळणारी  घरं पाहून जीवाचा थरकाप होतो. कलकत्त्यात गोपालचंद्र मुखेंर्जी  उर्फ गोपाल पाठा ( सौरभ दास) हिंदूंना एकत्र आणतो - मारवाडी समाजाकडून पैसे-यादवांकडून लाठीधारी- पंजाब्यांकडून लढाऊ वृत्ती -आणि सैन्यातल्या लोकांकडून दारूबदल्यात शस्त्रे गोळा करून तो कलकत्ता वाचवतो. पण १५-२०% हिंदू लोकसंख्या असलेल्या नौआखाली वाचवण्याचा कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या राजेंद्रलाल रॉयचौधरी (दिबेंदू  भट्टाचार्य ) यांचा प्रतिकार मोडून काढताना अत्यंत क्रूरपणे हिंदूंची झालेली कत्तल पाहताना अंगावर काटा येतो. नशिबाने गोपाल पाठासारख्या माणसांमुळे कलकत्ता भारतात राहिला - मात्र  नौआखाली आज बांगला देशात आहे. अतिरेकी हिंसा आणि अतिरेकी अहिंसा या दोन टोकाच्या संघर्षाची परिणीती पाकिस्तान निर्मितीमध्ये झाली.

सिनेमात महात्मा गांधी ( अनुपम खेर) कलकत्ता येथे हिंदूंना शस्त्रत्याग करायला सांगतात त्याला अर्थात गोपाल पाठा विरोध करतो . गांधीजी जीव वाचवण्यासाठी हिंदूंना नौआखाली सोडून जायला सांगतात , तसंच स्त्रियांना आपली अब्रू वाचवण्यासाठी जीवन संपवून टाकण्याचा सल्ला देतात, ते पाहून धक्का बसतो.. विकृत आणि धर्मवेड्या समुदायाने पाकिस्तानच्या निर्मितीसाठी  हिंदूंची बंगालमधली  केलेली कत्तल पाहिल्यानंतर 'अहिंसेचा पुजारी'  असणारे महात्मा फक्त दुसऱ्या समुदायाकडून प्रेम, बंधुप्रेम यांची भाबडी अपेक्षा कशी ठेवायचे हा प्रश्न नक्कीच पडतो.

वर्तमानातल्या कथेत  बंगालमधील सरदार हुसेनी नावाचा एक सत्ताधारी आमदार पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, प्रशासन यांच्यावर वचक ठेवत एक साम्राज्य निर्माण करतो . त्याच्या साम्राज्याच्या विरोधात उभे राहणाऱ्या दलित पत्रकार  गीता मंडलचे अपहरण आणि नंतर पोलीस अधिकाऱ्यासमोरच तिची गोळ्या झाडून तो हत्या करवतो . त्याच्यावर साधा एफआयआर दाखल करण्याची हिम्मत देखील पोलीस यंत्रणा दाखवू शकत नाही. उलट त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या शिवा पंडित सारख्या  धाडसी सीबीआय अधिकाऱ्याला माफी मागण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रवृत्त करतात. संघटित धर्मवेड्या जमावाच्या भीतीपोटी बंगालमधील प्रशासकीय पोलीस यंत्रणा आजही कशी हतबल आहे हे हा चित्रपट दाखवतो .

विवेक अग्निहोत्रीचं  दिग्दर्शन एकदम परखड, साधं -सरळसोट आणि हिंदी सिनेमा दिग्दर्शनाच्या नेहमीच्या धाटणीला छाट देणारी आहे. देशाच्या फाळणीच्या बंगालमधील इतिहासाचा संदर्भ घेत सामूहिक प्रबोधन  करण्याचा प्रयत्न केला आहे. ते करताना  कोणतीही चाळणी न लावता  बंगालमधील त्या कालखंडातील धर्माच्या नावावर झालेल्या दहशतवादाचा उद्रेक आणि उन्माद,  रक्तपात आणि नरसंहार - त्यातून उत्पन्न झालेल्या  भावनांचा कल्लोळ आणि भयाचं वातावरण त्यानं दाहकतेनं उघडपणे दाखवलं आहे. शेवटी अमरजितच्या देहाची दोन शकलं होताना पाहून श्वास थांबतो . अशी दृश्य पाहताना प्रेक्षक पाशवी दृश्यांच्या भयाच्या शॉकमध्ये जातो , व्यथित - दुःखी - उद्विग्न होतो आणि त्याच वेळी त्यावेळच्या दोन्ही बाजूंच्या राजकारण्यांच्या वर्तनाने संतापतोही - यातच विवेकचं यश आहे. 

सिनेमाचं प्रॉडक्शन डिझाईन, १९४६ चा बंगाल - कलकत्ता -नौआखाली पडद्यावर उभं करतानाचे सेट्स आणि इतर डिटेलिंग, पार्श्वसंगीत यांचा मेळ असा  जमलाय की आपल्याला त्या भयानक वातावरणातच असल्याचा भास होतो. आणि सिनेमा संपला तरी त्याचा परिणाम अंतर्मनाच्या पटलावर राहतो. रोहित शर्माचं संगीतही प्रसंगानुरूप -  हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर  "किचूदिन  मोने मोने" हे गाणं भावनावेगाने मनाला चटका लावून जातं.सिनेमात पात्रांच्या कपड्यांकडे लक्षच जात नाही एवढं  स्वातंत्र्यपूर्वकालीन कॉस्च्युम डिझाईन उत्कृष्ट आहे

सिनेमाची गोष्ट इतिहासाचा पूर्ण अभ्यास आणि संशोधन करून बनवली असली तरी वर्तमान - भूतकाळाच्या पुढच्या-मागच्या प्रवासात एडिटिंगकडे दुर्लक्ष झाल्यासारखं  वाटलं. पटकथा रेंगाळते आणि सिनेमाची लांबी साडेतीन तासांपर्यंत वाढते. याकडे लक्ष द्यायला हवं होतं. त्यामुळे सिनेमा एक थरार भयाण नाट्य आणि एक डॉक्युमेंटरी यांचं मिश्रण झाल्याचा भास होतो.

सर्वच कलाकारांनी आपली कामं  सुंदर केली आहेत. तरुण भारती बॅनर्जी म्हणून सिमरत कौर दिसलीय गोड आणि  आपल्यासमोर हत्याकांडं  होताना पाहून होणारी भकास अवस्था - उद्वेग तिनं  खास सादर केलाय. वृद्धापकाळातील जर्जर - स्मृतिभंशानं  आणि जुन्या भयगंडानं ग्रासलेली मां  भारती बॅनर्जी पल्लवी जोशींनी सहज साकारलीय. मिथुन हल्ली आपला स्टारडम विसरुन खरोखर अभिनय करतो असं वाटत. दर्शन कुमारनं त्याचा काश्मीर फाईल्स चा परफॉर्मन्स फ्लूक नव्हता हे दाखवून दिलंय . अमरजितच्या भूमिकेत एकलव्य सूद अचानक खूप आक्रमक होतो. नामाशी चक्रवर्ती खुनशी गुलाम हुसैनी म्हणून थरारक वाटतो . बंगालमध्ये विशेषतः प्रशासनाकडून विरोध होत असला तरी चित्रपटात अनेक बंगाली कलाकार आहेत आणि त्यांनी जीव ओतून काम केली आहेत हे विशेष.  अनुपम खेर, मोहन कपूर , पुनीत इस्सार , बॅ  जीनांच्या भूमिकेतला राजेश खेरा आणि इतरांच्या भूमिकाही उत्तम. 

हा सिनेमा पाहून मन सैरभैर होत असताना  बाहेर पडल्यावरही अनेक प्रश्न मनात घोंघावत राहतात -

- फाळणी म्हणलं तर पंजाब आठवतो पण बंगाल का नाही ? बंगालचा इतिहास शिकवताना रामकृष्ण परमहंस- विवेकानंद- रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र- आझाद हिंद सेना - बंकिमचंद्र - बिपीनचंद्र पाल -खुदिराम बोस - चित्तरंजन दास काझी नझरुल इस्लाम - जन  गण  मन - वंदे मातरम - कला -संस्कृती  हे शिकवलं गेलं - मग बंगालचा हा रक्तरंजित इतिहास आपल्याला का सांगितला - शिकवला गेला नाही ?  "पुढच्यास ठेच- मागचा शहाणा" - इतिहास हा आपल्याला मागील चुकांमधून शिकायला सांगतो - पण तो आपल्यापासून लपवला गेला तर त्या चुकांतून आपण काय शिकणार?

- इतिहासामध्ये बंगालच्या फाळणी बद्दल फक्त  १९०५च्या कर्झन सायलीने केलेल्या फाळणीचा उल्लेख आहे पण.. " डायरेक्ट ऍक्शन डे-डिव्हाइड इंडिया और डिस्ट्रॉय इंडिया" हा १६ ऑगस्ट १९४६ - बॅटल ऑफ बद्रच्या आठवणीत मुस्लिम लीग पुरस्कृत बंगालमध्ये झालेल्या हत्याकांडाचा उल्लेख कुठेच का नाही?

-  स्वातंत्र्य आणि फाळणी या दोन्ही घटना एकाच वेळी झाल्या. त्यामुळे फाळणी जिने आपला महत्वाचा भूभाग बनवला - माणसं  गमावली अशा दुःखद घटनांवर  जास्त न बोलता,  चांगली गोष्ट म्हणजे  हातात पडलेलं स्वातंत्र्य याचवर आतापर्यंत फक्त बोललं गेलं आहे का?

- इतके वर्ष फाळणीवर अनेक सिनेमे बनले पण सगळे पंजाबच्या बाजूचे. पण ज्या बंगालमधील परिस्थितीमुळे फळी झाली जास्त करून बंगालच्या फाळणी वरती सिनेमे का नाही बनले?  आणि ते ही बंगाल मधून सत्यजित रे, बासू चटर्जी , ऋषिकेश मुखर्जी आणि  असे एकाहून एक उत्तम दिग्दर्शक झाले असताना?

-  ज्यूंवर झालेले अत्याचार दाखवणारे शिंडलर'स लिस्ट आणि अनेक सिनेमे झाले, आफ्रिकन (ब्लॅक) लोकांच्या गुलामीवर अनेक सिनेमे झाले, हिरोशिमा-नागासकीवर अनेक सिनेमे झाले मग काश्मीर - बंगाल मधील हत्याकांडांवर सिनेमा यायला इतका वेळ का लागला?

- देशाची फाळणी १९४७ मध्ये दोन भागात झाली - पण खरंच फक्त दोनच शकलं झाली का अजूनही जात-पात -धर्म- पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, डावे-उजवे आणि अजूनही अशी अनेक तुकडे पडावेत अशी अजूनही कोणाची सुप्त इच्छा आहे का? चित्रपटात गुलाम जेव्हा म्हणतो फाळणी आत्ता सुरु झाली आहे याचा अर्थ यातच आहे का?

- अनेकदा जखम आंधळी असते असं म्हणतात, कारण कितीही जपण्याचा प्रयत्न केला तरी आंधळ्या जखमेवरती पुन्हा पुन्हा जखम होत राहते. तिला डोळस बनवलं तर जखम पुन्हा होत नाही...  इतिहास लपवला तर चुका आपण परत परत करत राहू त्या चुका टाळण्यासाठी खरा इतिहास पुढे आला पाहिजे. एक तीव्र वेदना -दुःख याची जाणीव असेल तर तेच  त्या जखमेवरचं मलम बनू शकणार नाही का ?

- काश्मीर किंवा बंगाल फाईल्स सारखे सिनेमे माणुसकीच्या अभावातूनच खऱ्या माणुसकीचं महत्व  दाखवण्यासाठी निर्मात्यांनी बनवलाय का?

-  ग्रेट कलकत्ता किलिंग - यात किलिंग - मृत्यू झाले मग त्यात ग्रेट ते काय?

- "Dogs & Indians Not Allowed " अशा पाट्या वाचून तेंव्हाच्या लोकांचं रक्तं उसळत नसेल काय? - त्यातही भारतीयांच्या नावाआधी कुत्र्याचं नाव आधी – जगाच्या इतिहासात सर्वात जास्त पीडित समाज कोणता तर भारतीय - हिंदू - अगदी हजार वर्षांपासून १९४७ पर्यंत आपण परकीय आक्रमणामुळे पीडित आहोत आणि आता स्वातंत्र्यानंतर ८० वर्ष होत आली तरी आपण मान उंच करून कधी जगणार?  खाली मान घालून - उपेक्षा सहन करत आपण किती दिवस राहणार ?

- - इंग्रजांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं - पण मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात युद्ध होतं ना .. देश  एकत्र टिकवण्यासाठी  किंवा देश फोडण्यासाठी?  हिंसा एकाचं शस्त्र होतं आणि दुसऱ्याचं जास्तकरुन अहिंसा.  पण  अहिंसा हिंसेला रोखू शकली नाही , लोकांचे प्राण वाचू शकले नाही, तक्षशिलासारखं  विद्यापीठ वाचवू शकली नाही - लाखो लोकांची हत्या , हजारो इमारतींचं नुकसान वाचवू शकली नाही.  सिंधूसारखी नदीही आपल्याकडे राहिली नाही.  मग कोण जिंकलं?

-  महान व्यक्ती आणि महान नेते यामध्ये फरक आहे का?  महान नेते त्या वेळी होते तर  ते देश एकसंध राखण्यात अपयशी का ठरले?  त्या वेळी वरील सर्व नुकसान का झालं ?

- गोपाल पाठा, राजेंद्र राय चौधरी अशी रस्त्यावर उतरुन लढणाऱ्या प्राण वेचणाऱ्या माणसांचं नाव स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत कुठेच कसं नाही?  गोपाल पाठा ज्यांच्यामुळे कलकत्ता भारतात राहिला, ते तर २००५ पर्यंत जिवंत होते हे किती जणांना माहिती आहे?

- आपल्या अशोक स्तंभात तीन सिंह दिसतात दिसतात… पहिला सत्याचं प्रतीक,  दुसरा  न्यायाचं प्रतीक आणि तिसरा जगण्याचा अधिकाराचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. पण चौथा सिंह जो पहिल्या सिंहाच्या मागे असल्याने दिसत नाही तो म्हणजे कोण तर आपण भारतीय माणसं .. तो कुठंच का नाही ? त्याचा विचार कोण आणि कधी करणार?

८० वर्षांपूर्वी झालेल्या  घटना  - हिंदूंवर झालेले अत्याचार आता उकरून का दाखवत आहेत असं अनेक जण म्हणतील. पण जखम जर दिसली तर इलाज करता येतो ना !! तसंही  देशाची झालेली फाळणी हिंदू भारत (काँग्रेस) आणि मुस्लिम पाकिस्तान (लीग) याचमुळे झाली ना. मग गेली ८० वर्ष अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम तंटे-दंगली का होत आलेत ? हिंदू मुस्लिम राजकारण इतकी वर्ष का चालू आहे?  मुस्लिमही भारतीय आहेत पण म्हणून इस्लामिक राजकारण करणं किती योग्य आहे? पहलगाममध्ये धर्म बघून लोकांना का मारलं गेलं? मुर्शिदाबादच्या दंगली का झाल्या ?

- एकीकडे आपण गंगा-यमुना तहजीब - संस्कृती मानतो, पण यमुना जेंव्हा  गंगेला जाऊन मिळते, तेंव्हा पुढे गंगा म्हणूनच वाहते. मग भारतातले सारे  हिंदू - मुस्लिम न राहता एक भारतीय आहोत हे सगळ्यांना कधी वाटणार ? हिंदू मुस्लिम होण्यामध्ये आपण भारतीय म्हणून होणं विसरून गेलो आहोत ...का एक माणूस असणं?

असं होण्यासाठी मग अटलजी म्हणतात त्याप्रमाणे -


दिन दूर नहीं खंडित भारत को पुनः अखंड बनाएँगे

गिलगित से गारो पर्वत तक आजादी पर्व मनाएँगे॥

उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें बलिदान करें

जो पाया उसमें खो न जाएँ, जो खोया उसका ध्यान करें॥


© राहुल लाळे

9881404697


 

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका