धुरंधर

 

# Dhurandhar

#Facts and Fiction

धुरंधर ... अज्ञात वीरांची थरारक धैर्य गाथा

फॅक्ट आणि फिक्शन

राहुल लाळे



हल्ली मोबाईल - इन्स्टा - फेसबुकवर रील्स बघताना - किंवा OTT वर सिनेमा किंवा एखादी सिरीज स्किप बटन वापरून फास्ट फॉरवर्ड करत पहाण्याची सवय झालेली असताना साडेतीन तासापेक्षा जास्त लांबीचा असलेला आदित्य धीरचा " धुरंधर" हा सिनेमा  आठवडयात दुसऱ्यांदा  पुन्हा काल बघितला यातच हा सिनेमा एवढा का चाललाय हे कळतं ! 

एव्हांना  सर्वांना या सिनेमाची स्टोरी सर्वांना कळलीच असेलच त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यात आता हशील नाही. पण तरीही लिहिण्यासारखं बरंच आहे म्हणून हा प्रपंच !!

" Elephant in the Room!"  ही एक म्हण आम्ही कॉर्पोरेटमध्ये  सारखी वापरतो -  एखादा मोठा विषय असतो - पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. सत्य वेगळंच  असतं , पण ते काहींना अडचणीचं वाटतं - त्यामुळे त्यावर स्पष्टपणे न बोलता त्याबद्दल सगळं गुडीगुडी -- छानछान बोललं जातं. तसाच एक प्रश्न - विषय म्हणजे "भारताचा इतिहास" आणि गेल्या शतकातील  " भारत-पाकिस्तान " यांच्यातील संबंध !!!  आणि त्यावर निघालेले चित्रपट !!!

" धुरंधर" ही कोंडी फोडतो.

इतिहासात आपण चंगेज खान -अल्लाउद्दीन खिलजी- गजनीचा महंमद यांच्यापासून आदिलशाही- निजामशाही - मुघल आणि टिपू सुलतान पर्यंत सर्वांनी भारतीय जनतेवर - समाजावर केलेले हल्ले - अत्याचार, मंदिरं आणि अनेक स्मारकांची -वास्तूंची केलेली नासधूस, अनेक नष्ट केलेली राज्य -साम्राज्य ! पण आपल्या " जोधा-अकबर, मुघल-ए-आझम, सलीम-अनारकली" या सिनेमांत दाखवलं काय गेलं तर-  सर्व भव्य-दिव्य सेट्स, रेशमी पडदे- गुलाबी सौन्दर्य – कविता - गजलांनी  रंगवलेल्या   काल्पनिक प्रेमकथा.

 स्वातंत्र्यापासून पाकिस्ताननं घुसखोरी केली.  IC ८१४ सारखी विमान-अपहरणं, पार्लमेंटवर केलेला हल्ला, मुंबईत १९९३- ९८- २००२- २००३- २००६- २००७- २००८- २०११ साली झालेले बॉम्बस्फोट, तसंच २६ नोव्हेंबर २००८ ला कसाब आणि इतर अतिरेकी यांनी घडवून आणलेला अतिरेकी हल्ला - भारताचं नकली चलन बाजारात आणून भारतातच आणि जगात  इतर ठिकाणी दहशतवादी कारवायांना बळ देणं, काश्मीर-पंजाबमध्ये अतिरेकी घुसवणं आणि आत्ता -आत्तापर्यंत कारगिल--पठाणकोट-उरी-पुलवामा-पहलगाम अशा अनेक ठिकाणी घातपाती भारतविरोधी कृत्य पाकिस्तान करत होतं - आणि आपलं बॉलिवूड मात्र काय दाखवतंय  तर पाकिस्तान्यांचं सौहार्द (बजरंगी भाईजान), दोन देशांमधल्या युगुलाची प्रेमकथा ( वीर झारा ), भारतात कट्टर अतिरेकी हल्ले करणारी आयएसआय आणि भारताची गुप्तचर संघटना रॉ यांनी  अतिरेकीविरोधी एकत्र कारवाया करणं आणि दोन्ही संघटनांतील  गुप्तहेरांचं प्रेमप्रकरण ( पठाण, टायगर फ्रँचायझी ), मैं हूँ  ना मधली  "अमन की आशा". फिझा, मिशन काश्मीर, हैदर, माचीस आणि अशा अनेक सिनेमांत जे अतिरेकी दाखवलेत ते केवळ परिस्थितीची शिकार म्हणून दाखवले गेले. दाऊद इब्राहिमच्या पार्ट्यात अनेक  बॉलिवूड स्टार्स जायचे या बातम्या अनेक मासिकांत पूर्वी वाचल्यात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा मुखवटा फाडून खरा विद्रुप चेहरा समोर आणताना पाकिस्तानातील म्हणून कराची लयारी  मधील अंडरवर्ल्ड आणि अतिरेकी टोळ्यांचं  साम्राज्य - त्यांचं राजकारण, अंतर्देशीय घातपाती कारवाया आणि पोलीस- आयएसआय बरोबरचे संबंध " धुरंधर" मधून आदित्य धर विस्तृतपणे दाखवतो.   प्रत्येक दिवशी एक अप्रत्यक्ष युद्ध भारत कसा लढतोय,  फक्त दारुगोळा नाही तर इन्फर्मेशन - गुप्तहेरी यंत्रणा ही पण एक नवी युद्धप्रणाली  बनतेय हे तो फॅक्ट आणि फिक्शनच्या आधारे  दाखवतो. आणि हे करताना तो कुठेही धर्म आणत नाही -  सामान्य नागरिकांचं मनोधर्य कमी न करता फक्त पाकिस्तानी राजकारणी- आयएसआय - अतिरेकी आणि पठाण-बलाची टोळीयुद्ध यांचे एकमेकांचे संबंध उजागर करतो.  " हिन्दुस्तानियों का सबसे बड़ा दुश्मन हिंदुस्तानी ही है. पाकिस्तान तो दूसरे नंबर पर आता है.” हे अजय संन्याल या भारतीय गुप्तचर संस्थप्रमुखाच्या भूमिकेतल्या आर माधवन याची व्यथा व्यक्त करताना जुन्या " हम कभी भी ना हारे है दुश्मनके छलछंदोसे... हम तो सदा ही हारे हैं अपनेही घरके जयचंदोंसे " या युक्तीची आठवण करुन  देत आदित्य धर आपल्या डोळ्यात जळजळीत अंजनही घालतो.  एकीकडे आपले जवान प्रत्यक्ष सीमेवर आणि अनेक गुप्त सैनिक अप्रत्यक्षरित्या  वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असताना आपलेच घरभेदी कसे देशविरोधी काम करतात.. असंवेदनशील मीडिया जेंव्हा २६-११ च्या दहशतवादी हल्ला करताना जेंव्हा सैन्य- स्पेशल टास्क फोर्स यांच्या प्रतिहल्ल्याचं थेट प्रक्षेपण करुन एक प्रकारे अतिरेक्यांच्या हँडलर्सना मदत करत प्रतिकारासाठी सावध करण्याचंच  काम करतं  हे  चित्रपटात पाहून आपलं पित्त खवळल्याशिवाय राहत नाही.

डायलॉग्ज

या सिनेमातले संवाद ही नेमके आहेत... त्यातला अजय सन्यालच्या तोंडचा एक आधी उल्लेखला गेलाच आहे... उदाहरणादाखल हे आणखी काही..

"घायल हूं इसलिये घातक हूं, ", "मूंह तोडनेके लिये मुठ्ठी बंद करना जरुरी है", "अगर वो भारत के खिलाफ नींदमें भी सोचे ना, तो उनके ख्वाबमेंभी हम नजर आने चाहिये","रहमान डकैत की दी हुई मौत बडी कसाईनुमा होती है","अगर तुम लोगोंके पटाखे खत्म हो गये हो तो मैं धमाका शुरु करुं", " ये नया भारत है.. अंदर घुसेगा भी और मारेगा भी" ..हे आणि असे अनेक डायलॉग्ज सिनेमा पहाताना अंगावर काटा आणतात.

धमाकेदार संगीत

आदित्य धरने शाश्वत सचदेव या तरुण संगीतकाराला बरोबर घेऊन आपण पूर्वी ऐकल्याचं फेमस गाण्यांना एक आधुनिक साज चढवलाय . जुन्या गाण्यांना बीट्सची साथ देऊन रिमिक्स करणं वेगळं आणि या रेट्रो चालींना आधुनिक रुपात आणताना त्यांना मेटॅलिक साउंड आणि लोकसंगीताची फोडणी देताना एक खतरनाक इम्पॅक्ट सिनेमातील अनेक देऊन प्रेक्षकांना जबरदस्त अनुभव दिला आहे.

"ना तो कारवाँ की तलाश है, ना तो हमसफ़र की तलाश है.."  ही साहिरची कव्वाली ... सूफी ढंगातली रचना जी पाकिस्तानसारख्या परक्या आणि भयंकर मुलुखात वेषांतर करुन राहणाऱ्या गुप्तहेराच्या मनातली वादळं, त्याचं एकमेव ध्येय व्यक्त करायला एकदम परफेक्ट.  तीच गोष्ट पंचम-आशा जोडीच्या  'पिया तू अब तो आजा' ची -  हे गाणं  एका क्लबपार्टीमध्ये आणि नंतर एका चित्तथरारक पाठलागाच्यावेळी आदित्य धरने  अफलातून वापरलंय... आणि ' मोनिकाss' ही साद ज्याप्रकारे सामोरी येते ते तर अफलातून !!

संजय दत्तच्या एंट्रीच्या वेळचं -" हवा हवा ऐ  हवा .. खुशबू लुटा दे" आणि हिरोच्या लग्नातलं " 'रम्बा हो हो हो.. सम्बा हो हो हो" हे उषा उथ्थुप यांच्या आवाजातल्या गाण्यातली झिंग  आजही रसरशीत आहे हे जाणवलं. गुलाम अलींची " चुपके चुपके" ही गझलही हळूच एका प्रसंगात मिसळताना आदित्य धर आपली प्रतिभा आणि चातुर्य दाखवतो. नुसती जुनी गाणी नव्यानं पॉपमध्ये आणून नाविन्यता आणता  येत नाही - ती  आजच्या काळात - पडद्यावर सादर होणाऱ्या प्रसंगांना साजेल अशी कथानकात गुंफण्यात एक कल्पकता लागते - ती शाश्वत आणि आदित्य दाखवतात. अक्षय खन्नाच्या भन्नाट डान्स मूव्हवरचा  बलोची फोल्क म्युझिकच्या ढंगात सादर केलेला  फ्लिपराचीचा अरबी रॅप एवढ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरही  आपल्याला ठेका धरायला लावतो. बॅकग्राउंड म्युझिक आणि सिनेमातली इतर "ना दिल दे परदेसी नु ", " जहर हुआ " या गाण्यांबरोबर टायटल स्कोअर पण मस्तच झालंय.

कलाकारांची कमाल  

लेखन-दिग्दर्शन-निर्माता म्हणून आदित्य धरनं भारी काम केलंच आहे -  पण त्याच्या या कामांबरोबरच त्यानं  संगीत,  सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग  टीम्सबरोबर परफेक्ट ट्युनिंग करुन प्रॉडक्शन व्हॅल्यू वाढवलेल्या दिसतात - याचमुळे धुरंधरमधील ऍक्शन सिक्वेन्सेस आणि इतर नाट्यमय प्रसंगातून सिनेमाचा एक वेग कायम ठेवलाय - त्यामुळे साडेतीन तासाचा सिनेमा शेवटाला कधी येतो हे कळतंच  नाही. सिनेमातले द्रोण-शॉट्सही सुंदररित्या घेतलेत. पण केवळ तांत्रिक गोष्टी चांगल्या असून चालतं  का? या सर्व तंत्रांना पडद्यावर जिवंत करण्यासाठी  कलाकार ही तसेच हवेत. प्रत्येक पात्रासाठी केलेली कलाकाराची निवड ही एवढी परफेक्ट आहे की प्रत्येक रोल त्या त्या कलाकाराला समोर ठेवूनच लिहिला असावा. 

याचं  श्रेय आदित्यबरोबर कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राचंही आहे. संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन आणि सर्वच कलाकारांनी त्यांची कामं छानच केली आहेत. सारा अर्जुनला फारसा वाव नाही. राकेश बेदी हे एक सरप्राईज पॅकेज आहे - नेहमीच्या विनोदी बाजाला राजकारण्याचा कावेबाजपणा, धूर्तपणा , पलटूबाजी आणि देशानुरूप क्रूरता त्यानं मस्त साकारलीये. धुरंधरच्या भूमिकेतून रणवीरसिंगचं जबरदस्त कमबॅक झालंय - परदेशात वेषांतर करुन ओळख बदलून हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेराच्या भूमिकेत त्यानं मस्त जान  आणलीय.  ऍक्शन सीन्स त्यानं झकास केलेत  - आपल्यासमोरच दुसऱ्या हेराचे केलेले अनन्वित हाल , आपणंच दिलेल्या AK ४७ ने कसाबने केलेला नरसंहार स्क्रीनवर बघताना सुन्न होण्याचा प्रसंग सादर करण्याचा त्यानं कसोशीनं प्रयत्न केलाय. ( हमाज मिजारी - धुरंधरची भूमिका रणबीर कपूरनं कशी केली असती असा उगाचच प्रश्न पडला)

खरी कमाल केलीये अक्षय खन्नानं - छावामधील औरंगजेब नंतर रहमान डकैतची ही खलनायकी भूमिका त्याच्या करियरला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते हे नक्की. इतर सगळ्यांचीच कामं झकास झाली असतानाही अक्षय सगळ्यांना खाऊन टाकतो.. अगदी हीरोलाही... चेहऱ्यावरची मग्रुरी - हावभाव, चालण्यातला बाज -  मॅनरिझम, डोळ्यांतून ओकलेली आग तर मुलगा समोर मेलेला असताना हलून जाणं , बाप आणि शत्रू बाबू डकैतला भर बाजारात मारताना दाखवलेली क्रूरता , मोजके-नेमके भिडणारे भेदक संवाद आणि एवढं सगळं असूनही कुठंही लाऊड न होता, कोणताही पोकळ आव न जाणवता नैसर्गिक अभिनयाने खलनायक अक्षयने  साकारलाय. खरोखर एक शो स्टीलर , थरारक वादळ  म्हणून अक्षय सामोरा येतो.  त्यामुळे संजय दत्त-अस्लम चौधरी आणि धुरंधर-रणबीर सारख्या तगड्या माणसांशी एकाच वेळी दोन हात करताना किरकोळ शरीरयष्टीच्या अक्षय पाहताना वावगं वाटत नाही. पण भारी कपडे घालून, उंच्या गाड्या चालवणारी सारा अर्जुन बापाकडे पैसे मागताना पाहून मात्र थोडं खटकू शकतं . पण सिनेमाच्या वेगापुढे फारसं  तिकडं कोणाचं लक्ष जात नाही. फ्लिपराचीच्या रॅंपवर अक्षयनं धरलेला ठेका सध्या कल्ला करतोच आहे.

धुरंधर हे कोण पात्रं आहे हे माहित नाही - पण बाकीची बहुतेक मुख्य पात्रं  - रहमान डकैत , बाबू डकैत , अर्शद पप्पू, अस्लम चौधरी, खनानी ब्रदर्स, मेजर इकबाल ही पाकिस्तानात होऊन गेलेल्या माणसांवर आधारित आहेत. बडा साब म्हणून एका पात्राचं नाव अधून मधून ऐकायला मिळतं -  हा कोण ते पुढच्या भागात बहुतेक कळावं !

पुढचा भाग पाहायची उत्कंठा आहे -   त्यात बाकीची बहुतेक पात्रं परत दिसतील पण अक्षय खन्नाचा रहमान डकैत दिसणार नाही ही खंत मात्र राहील.

धुरंधर म्हणजे खरा जसकिरतसिंग रंगी, असा डिस्क्लेमर शेवटी दाखवलाय. हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटलं.. तेंव्हा आठवलं... आदित्य धरच्याच उरीमध्ये फ्लाइट लेफ्टनंट सीरत कौर ही भूमिका साकारलेली  कीर्ती कुल्हारी आपल्या दिवंगत पतीचं नाव मेजर विहान म्हणजे विकी कौशलला सांगताना दिसते..नौशेरा सेक्टर मधे शहीद झालेला "कॅप्टन जसकीरत सिंग रंगी".

असे अनेक अनामिक धुरंधर जसकिरतसिंग,  भारताची सुरक्षा व संविधानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी हमजा मजारी किंवा तत्सम नाव घेऊन आपला धर्म पंथ बाजूला ठेवून,  करोडो देशवासियांच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालत असतील  तर १५० कोटी भारतीयांपैकी प्रत्येकानंही जर कधी वेळ आलीच तर धर्म, पंथ, जात सोडून देशाची प्रतिष्ठा, घटना आणि देशप्रेम महत्त्वाचं मानावं... नाही का?

याचसाठी धुरंधर पार्ट २ यावा आणि असे इतर सिनेमेही यायला हवेत आणि चालायलाही हवेत ..

आणि हो... धुरंधर चा दुसरा पार्ट १९ मार्च २०२६ ला येतोय... सहज कालनिर्णय पाहिलं...  त्यादिवशी गुढीपाडवा आहे.. हिंदू वर्षारंभ !!

जयहिंद !!!

©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका