नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका
नोव्हेंबरमधील
धार्मिक पर्यटन ..
गिरनार - सोमनाथ - द्वारका
*दिवस पहिला* १ - २ नोव्हेंबर
एखाद्या गोष्टीची ओढ लागणं म्हणजे काय ते ती ज्याला लागते, त्यालाच कळते.
शाळेत असताना मधल्या सुट्टीची - शाळा सुटल्यावर घरी जायची- अभ्यास संपल्यावर
खेळायला जायची -परिक्षा संपल्यावर मे महिन्याच्या - दिवाळीच्या सुट्टीची ओढ
असायची. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची ओढ प्रत्येकाला
लागतेच. आईला दूर असलेल्या मुलांच्या भेटीची, प्रियकराला प्रियेची,
मित्रांना
स्नेहसंमेलनाची, गरीबांना न्याय, समता - विकासाची, समृद्धीची.
आषाढ आली की वारकऱ्यांना वारीची.. भक्तांना आपापल्या श्रध्दास्थानांची... अशी ओढंच
माणसाला जगायचा मार्ग दाखवते..नवी उर्जा देते.
परिक्रमा करता येणार नाही यामुळे थोडंसं वाईट वाटलं खरं पण गिरनार गुरुशिखर - श्रीदत्तगुरुंचं दर्शन घेण्याची ओढ होतीच. त्यामुळे पुण्यातील आम्ही पूर्वनियोजन केल्याप्रमाणे पुण्याहून आम्ही अहमदाबाद मार्गे रेल्वेने वेरावळला पोचलो. वेरवळ - सोमनाथ ही गावं म्हणजे आपल्याकडील पिंपरी-चिंचवड. वेरावळ रेल्वे स्टेशन वरून रिक्षानं आम्ही माहेश्वरी अतिथी भवनात पोचलो आणि आवरून बारा ज्योतिर्लिंगातील पहिल्या सोमनाथ मंदिरात पोचलो. इथं पादत्राणं , मोबाईल - कोणतीही डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मंदिरात घेऊन जाता येत नाही - मंदिराच्या आवारात बाहेर विस्तीर्ण प्रांगणात त्या सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकर्सची सोय केली आहे. पण यावेळी त्यातील अनेक खिडक्यांपैकी एकच सुरु असल्यामुळे बराच वेळ गेला. पण सोमनाथ महादेवाचं अप्रतिम दर्शन झालं.. सर्व मंडळींनी " जय बाबा भोलेनाथ, हर हर महादेव, ओम नमः शिवाय " असा घोष करत मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतलं. आणि बाहेर येऊन प्रसाद घेतला - अभिषेकाचा संकल्प केला. गंमत म्हणजे संकल्प सांगणाऱ्या गुरुजींचं गोत्रंही कौंडिण्यच होतं .
आवार मोठं असल्यामुळे गर्दीचा त्रास नव्हता - सर्वांनी समोरील बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृतींचं दर्शन करून मंदिराच्या दक्षिण दिशेला असलेला "बाणस्तंभ " पाहायला गेलो. " आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत, अबाधित ज्योर्तिमार्ग।" असं कोरलेल्या या स्तंभावरील बाणाचं वैशिष्ट्य हे की या बाणाच्या टोकाकडून सरळ जाणारी जी सरळ रेघ दक्षिण ध्रुवापर्यंत जाते त्या रेषेत अखंड समुद्र आहे - कोठेही जमीन लागत नाही. प्राचीन विज्ञान आणि समृद्ध ज्ञानाचं हे मूर्तिमंत उदाहरण !!
असं म्हणतात की प्रभास पाटण म्हणजे सोमनाथ इथलं हे मंदिर मूळ चंद्रदेव सोम यानं सोन्याचं बांधलं होतं - म्हणून नाव सोमनाथ. पुढं हेच मंदिर रावणाने चांदीचं , श्रीकृष्णाने लाकडी आणि राजा भीमदेवाने पाषाणातून उभं केलं असंही मानलं जात. मैत्री , महिपाल यांनीही या मंदिराची पुनर्स्थापना केली होती असं म्हणतात.
गझनीचा महमूद, अल्लाउद्दीन खिलजी यांच्यापासून औरंगजेबापर्यंत अनेकांनी या
मंदिराची तोडफोड केली होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मूळ शिवलिंग जमिनीखाली लपवून ठेवलंल आहे असा दृष्टांत झाला आणि त्यांनी ज्योतिर्लिंगांतील या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असं मानलं जातं . मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी या मंदिराजवळ खूप अस्वच्छता होती पण यावेळी देवळाची डागडुजी झालेली होती आणि छान स्वच्छ, पवित्र आवार पाहून मन प्रसन्न झालं. याच जुन्या देवळाजवळ आज उभं असलेलं चालुक्य स्थापत्य शैलीतलं नवीन मंदिर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९५१ मध्ये देशाला अर्पण केलं. ही दोन्ही देवळं आणि शंभू शंकराचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं.
गिरनारची पायी परिक्रमा होणार नसल्याने आम्हांला एक दिवस मोकळा होताच - त्यामुळे आधीच ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आम्ही द्वारकेचा मार्ग धरला. आत्तापर्यंत गिरनार परिक्रमा आणि गुरुशिखर करताना सोमनाथाचं दर्शन झालं होतं - पण द्वारकेला जाणं झालं नव्हतं. त्यामुळे यावेळी द्वारकाधीशाचं दर्शन होणार हा एक वेगळा आनंद !!! सोमनाथ ते द्वारका हा रस्ता गुजरातमधील इतर हायवेंप्रमाणे एकदम छान होता आणि पोरबंदर व अनेक ठिकाणी तो समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने जात असल्यामुळे प्रेक्षणीयही होता. पाऊस असेल म्हणून छत्र्या - पोचो वगैरे घेतले होते पण गॉगल्स काहींनी घेतले नव्हते. गाडीतून उतरल्यावर सगळ्यांना उन्हाची जाणीव झाली आणि ज्यांच्याकडे गॉगल्स नव्हते त्यांनी रस्त्यातच ते घेतले. इथं बाहेरच्या गाड्यांना पार्किंगमध्येच सोडून पुढं स्थानिक रिक्षा करून किंवा चालत जावं लागतं.
श्री द्वारकाधीश मंदिर आणि आवार हे चारीबाजूंनी संरक्षण भिंतींनी वेढलेलं आहे. या आवारात मुख्य श्री रणछोडदास म्हणजे श्रीकृष्ण भगवानाचं मंदिर आहे. कृष्ण म्हणजे काळ्या पाषाणातली श्रीकृष्णांची चार फूट उंच असलेली आणि चांदीच्या चौकटीत - सिंहासनात वसलेली - पितांबर ल्यालेली मूर्ती हिरे-मोत्यांनी सजलेली दिसते .
मूर्तीवर दहा -अकरा सोन्याच्या माळा गळ्यात माळलेल्या दिसतात. सोन्याच्या मुकुटावर मोरपीस ल्यालेल्या भगवान श्रीकृष्णांच्या एका हातात -शंख , दुसऱ्यात सुदर्शन चक्र, आणि बाकी दोन हातात गदा व कमळफूल आहे असं वाटतं. दर्शनास प्रचंड गर्दी असूनही लोक फुलं आणि तुळशीच्या माळा देवाला अर्पण करत होते.
या देवळाच्या परिसरात मानवी स्वभावाची दोन अत्यंत परस्परविरोधी रूपं पाहायला
मिळाली. देवळात दर्शनासाठी खूप गर्दी होती आणि भगवान श्रीकृष्णाचं
दर्शन घ्यायला दोन तीन रांगा वेगवेगळ्या ठिकाणांहून एके ठिकाणी येऊन पुढे एकच रांग
होत होती. त्यामुळे त्याठिकाणी थोडी धक्काबुक्की व्हावी अशी परिस्थिती होती. तरीही
सारे जण गोविंदा- राधेकृष्णाचा गजर करत पुढे सरकत होते. तिथं एक स्वयंघोषित उच्च
मध्यमवर्गीय स्त्री उगाचच आसपासच्या - मागच्या स्त्रियांना धक्का देऊ नका म्हणून
हटकत होती- भांडण करत होती. रांगेत काही खेडूत स्त्रिया होत्या - त्यांच्याकडे
तुच्छ नजेरेने पाहत ओरडा करत होती. आता देवाकडे जाताना घाई करू
नये - मन शांत ठेवावं हे अशांना कोण सांगणार ?
" आपण कोण देणारे? देणं त्याचं असे, आपण तर दिवे, पण प्रकाश त्याचाच असे;
देवाचीच शक्ती, त्याचीच ओंजळ— आपल्यातून दानाचा सुगंध पसरे."
त्याशेजारीच शिवशंकराचं मोठं मंदिर आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी होती. पण शिस्तशीर रांग होती ..इथं रांगेत बाजूला एक छोटासा गोड मुलगा आईच्या कडेवर बसून आमच्याशी.. त्यात शशांक शी संवाद साधत होता.. आणि तासभर रांगेत उभं राहून आमचं सुंदर दर्शन झालं. “हर हर महादेव, बम बम भोलेनाथ , ओम नमः शिवाय” या जयघोषात एक तास रांगेत उभे आहोत असं वाटलंच नाही.
स्थानिक भाविकांत हे मंदिर दारुकावनातलं ज्योतिर्लिंग मानलं जातं .
दारुकावन
हे द्वारकेचं
अपभ्रंश आहे असंही बोललं जातं. आम्ही काही वर्षांपूर्वी उत्तराखंडातील अलमोडा जवळ
देवदार वृक्षांच्या अरण्यात असलेल्या जागेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं होतं . अनेक
जणांचं म्हणणं असं आहे की खरं आठवं नागेश्वर ज्योतिर्लिंग तेच आहे त्यासाठी ते
पुढील श्लोकाचा आधार देतात -
उज्जयिन्यां महाकालमोकांरममलेश्वरम् ।
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं *नागेशं दारूकावने* ।
वाराणस्यां तु विश्वेशं त्रयंम्बकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ।
ऐतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति । ...
शिवशंकराच्या भव्य मूर्ती च्या मागच्या बाजूला पोपटांचा थवा वास करत होता...
त्यातल्या एका जोडीचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.
भारतातला हा सर्वात लांबीचा केबल पूल आहे. प्राचीन भारताचं वैभव असलेल्या द्वारकेचं नवीन समृद्ध होऊ घातलेल्या भारतामधलं रुप आता पाहताना उर अभिमानाने भरून येतो. इथंही गाड्या पार्किंगमध्ये ठेवून चालत किंवा लोकल रिक्षाने मंदिराकडे जायला लागते.
पहाटे पाच वाजता सुरु झालेला दिवस बेट द्वारकेला लस्सी, लिंबू-सोडा आणि नंतर
रस्त्यात
"वासुदेव व्रज" इथं रात्रीचं भोजन करुन सोमनाथला माहेश्वरी अतिथी भवनात
रात्री एक वाजता संपला. सगळे थकले होते पण अगदी तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच
द्वारकेला श्रीकृष्ण, नागेश्वरला श्री महादेव आणि बेट द्वारकेला पुन्हा
श्रीकृष्णाचं असं " हरी ओम हरी " दर्शन झाल्यामुळे सर्वांना रात्री छान
प्रसन्न झोप लागली.
दिवस तिसरा व चौथा : ४ -५ नोव्हेंबर २०२५
सकाळी थोडं निवांत उठून माहेश्वरी निवास सोडलं आणि ब्रेकफास्ट करुन सोमनाथच्या स्थानिक ठिकाणांना भेटी देऊन जुनागढला गिरनार गुरुशिखर करण्यासाठी निघायचं होत. त्या प्रमाणे सकाळी " न्यू पार्थ रेस्टॉरंट" इथं ब्रेकफास्ट करुन भालका तीर्थावर पोचलो. हिराण नदीच्या किनाऱ्यावरच्या मंदिरात श्रीकृष्णाची टेकून पहुडलेली मूर्ती आहे . असं म्हणतात की यादवी युद्धानंतर कृष्ण इथं झाडाखाली पाय पसरुन बसलेला असताना , जारा नावाच्या पारधी शिकाऱ्याला भगवंताचं पाऊल हे हरीण आहे असं वाटतं.
आणि त्याने मारलेल्या
बाणाने जखमी होऊन त्यांचा प्राणत्याग होतो. हा शिकारी म्हणजे मागील राम अवतारातील
वाली असं समजलं जातं - आणि सुग्रीव -वाली युद्धात श्रीरामांनी झाडामागून मारलेल्या
बाणाने वालीचा जो मृत्यू झाला - त्याचं प्रतिपादन म्हणजे ही घटना असंही मानलं जातं . या जागेला महाप्रभूंची बैठक
असंही संबोधलं जातं. इथं श्रीकृष्णाच्या
मूर्तीसोबत त्या शिकाऱ्याचीही नमस्कार स्थितीतील मूर्ती आहे - तुळशीचं झाड आणि
परिसरात वडाची झाडं आहेत.
इथं समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांमध्ये दोन मोठी व इतर पाच सहा शिवलिंग पाहायला मिळतात. महाभारतात आपला शस्त्रसाठा पवित्र करण्यासाठी अर्जुनानं जमिनीत बाण मारून इथं गंगा अवतरवली म्हणून जागेचं नाव बाणगंगा अशी वदंता आहे. काही विक्रेते इथं शिंपल्यातले मोती विकताना दिसतात.
बाणगंगा करुन सोमनाथाच्या जुन्या मंदिरात शिवशंभूंचं दर्शन करुन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूर्तीला प्रणाम करुन आम्ही गीतामंदिराकडं कूच केलं.
सध्याच्या जागेवर इथं उभं असलेलं हे मंदिर बिर्ला समूहानं १९७० च्या आसपास बांधलं आहे. मंदिरातल्या १८ खांबांवर पवित्र अशा श्रीमद्भागवतगीतेतले अठरा अध्याय कोरलेले आहेत. या देवळात आणि इथे सगळीकडेच श्रीकृष्णाच्या उत्कट सुंदर प्रतिमा दिसतात. पुराणकथा असं सांगते की भालकातीर्थ येथून तीर लागून त्रिवेणी संगमाकडे वैकुंठ निजधामाला जाताना श्रीकृष्ण इथं थांबले होते.
त्यांमुळे
त्यांच्या पाऊलखुणा - पादुकांची इथं आहेत. हिरण नदीच्या या भागाला गोलोकधाम किंवा देहोत्सर्ग
तीर्थ असंही संबोधलं जातं . गीतामंदिराच्या बाजूलाच
बलरामाचं मंदिर एका गुहेत - शेषनाग गुफा (दौजी नी गुफा)आहे. पुढे
लक्ष्मीनारायणांचं सुंदर मंदिर आहे. आणि
आवारात शेवटी भीमानं स्थापन केलेलं शिवलिंगही आहे.
गीतामंदिरातलं दर्शन आटोपून आम्ही जवळच असलेल्या एका छोट्या
मंदिर समूहाकडे गेलो. इथं सूर्य मंदिर आहे. आणि थोड्या पायऱ्या उतरून सुर्यकुंडही
आहे. छान लिंबू सरबत पिऊन सूर्यमंदिरासमोर असलेल्या हिंगलाज माता गुफा किंवा पांडव
गुफेचं दर्शन घेतलं. अत्यंत चिंचोळी असलेल्या गुफेत अंगाची मुटकुळी करुनच जावं
लागलं.
या मंदिरासमोरच हिरण , कपिला आणि सरस्वती
नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. संगमावर प्रशस्त घाट बांधला आहे आणि घाटावरच श्री
त्रिवेणीमातेचं छोटं मंदिरही वसलं आहे.
त्रिवेणीसंगमाचं दर्शन घेऊन आम्ही सोमनाथचा निरोप घेतला आणि
जुनागढकडे प्रयाण केलं. आता दुपारी पोटात कावळे ओरडू लागले होते त्यामुळे -
रस्त्यातच काठियावाडी "माधव"
च्या एका फ्रॅन्चायजीमध्ये थांबलो. इथंही
काठियावाडी भाज्यांच्या थाळ्या,
तळण म्हणून फ्रायम्स आणि हो इथं खमंग गोल भजीही
होती - सोबत ताकाच्या बाटल्या येत होत्या. तृप्त ढेकर देऊन बाहेर येताना एक
व्यक्ती ओळखीची वाटली म्हणून सारे थांबले - ओळख पटल्यावर कळलं
की हे तर ज्येष्ठ परम दत्तभक्त श्री प्रमोद केणेकाका. तीव्र दत्त
भक्तीची कास धरलेल्या केणेकाकांनी अनामिक
प्रेरणा आणि अद्भुत संकेत मिळावी अशा प्रेरणेने दर पौर्णिमेस एक या प्रमाणे १०८
गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला होता. तो पुर्ण होऊनही आजही त्यांनी श्री दत्त कृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनार
वारी अखंडपणे सुरु ठेवली आहे. सर्वांनी श्री केणेकाकांना भारावून जाऊन वंदन केलं
आणि "आधी पोटोबा मग
विठोबा" ही म्हण का पडली हे खरंच
पटलं .
साडेतीन चारच्या सुमारास जुनागढला पोचलो - इथं रुद्र नावाच्या हॉटेलमध्ये उतरलो. मुंबईहून आमच्याबरोबर गुरुशिखर करणारी मंडळी आधीच तिथं पोचली होती. चहापाणी करुन दोनतीन तास विश्रांती घेतली. स्नान करुन शुचिर्भूत होऊन सर्वजण तलेठी - भवनाथ कडे निघालो.
तलेठीला खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला अलीकडेच उतरुन पुढं चालत यायला लागलं. गिरनार कड़े जाताना थोड़े अलीकडे उजव्या बाजूस पुराणप्रसिद्ध दामोदर कुंड लागते. येथील तलावाच्या पाण्यात अस्थि विरळघणारे गुणधर्म आहेत यामुळेच हिंदुंच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन येथे केल्यास मृत व्यक्तिस मोक्ष मिळतो असं मानलं जातं. तलेठीला पोचल्यावर सारेजण मंगलम यात्रिभवनात जमलो आणि तिथल्या सर्वात वरच्या मजल्यावर चालू असलेल्या श्री दत्तयागाचं दर्शन घेतलं. श्री केणेकाकांचंही दर्शन इथं पुन्हा झालं.
एरवी खरं तर रोजच्या पूजेव्यतिरिक्त काहीही देवाचं न करणारा मी अशा ठिकाणी मात्र पूर्ण भारावून जातो. रात्रीचे दहा वाजता सर्वांनी भवनाथला लंबे हनुमानाचं दर्शन घेतलं - पहिल्या पायरीपाशी नारळ वाढवला आणि गुरुशिखर चढण्याची शक्ती मिळो अशी दत्तमहाराजांना वंदन करुन आम्हाला घेऊन चला अशी आळवणी करत चढायला सुरुवात केली.
ही गिरनार चढण्याची चौथी वेळ - पहिल्यांदा चांगले कंफर्टेबल बूट घातले होते. त्यावेळी पूर्णपणे चढून उतरून पायी केलं होतं. पण बुटांमुळे पाय आंबून गेले होते. गिरनार चढणे हे कष्टाचं आणि पेशन्सचं काम असलं तरी हा ट्रेक नाही…छान बांधलेल्या पायऱ्या आहेत - त्यामुळे बूटच घातले पाहिजेत असंच काही नाही हे तेव्हां कळालं. नंतर चालण्यासाठी चांगली वापरातली स्पोर्ट्स सँडल्स १०-१५ दिवस चालण्याचा सराव करुन वापरायचं ठरवलं होतं - यावेळीही तेच केलं. तशीही मला थंडी कमी वाजते त्यामुळे पायात सॉक्स घालण्याचीही गरज राहत नाही. साधारण रात्री १० वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे परतताना उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे ५ तास लागतात, असा मागचा अनुभव. अर्थात अनेक जण सकाळी सुरु होणाऱ्या रोपवे ( उडन खटोला) ने जातात पण नंतरच्या ५००० पायऱ्या चढायला लागतातच. अर्थात रोपवेने आपण जिथं पोचतो तो अंबामाता पर्यंतचा पहिला टप्पाच परीक्षा पाहणारा असतो. चढताना सुटसुटीत पडतं म्हणून हलकी ट्रॅकसूटची पॅन्ट आणि टीशर्ट घातली होती, आणि हातात मी बरोबर आणलेली फोल्डिंग स्टिक. तलेठीला दंड ( काठी) भाड्याने मिळतेच ( ३० रुपये घेतात - त्यातले २० रु. काठी नंतर परत दिली की मिळतात). काठी बरोबर असली आणि तिच्यावर जोर देऊन प्रत्येक पाऊल टाकले तर दम लागत नाही हा अनुभव आहे. पाठीवर छोटी सॅक घेतली होती - तीत एक पाण्याची बाटली घेतली होती. यावेळी मेटलची बाटली घेतली होती कारण प्लॅस्टिकच्या बाटलीला आणि पिशव्यांना इथं यावर्षी बंदी आहे हे कळालं होतं. घाम येऊन डिहायड्रेशन होऊ नये म्हणून बरोबर इलेक्ट्राल, ग्लुकोज पावडर, खडीसाखर घेतली होती. पण तसं काहीच लागलं नाही कारण दोन-तीन ठिकाणी पाण्याचे लंगर होते आणि एकदोनदा लिंबू सरबत प्यायलं. रात्री चढण्याचा ऊन न लागण्याव्यतिरिक्त फायदा असाही आहे की, आपण किती चढतोय ते कळत नाही - कारण सकाळी त्याच वाटेने उतरताना मागे वळून पाहिलं की डोळे फिरतात. अधूनमधून पायऱ्यांवर नंबर टाकलेले आहेत पण त्याकडे लक्ष देऊ नये कारण उगाचच " अरे बापरे आत्तापर्यंत फक्त एवढंच आलो - अजून कितितरी चढायचंय " असं वाटून धस्स होऊ शकतं. आम्ही २०-२२ जणांनी जरी बरोबर चढायला सुरुवात केली होती तरी पुढं चार-पाच जणांचे असे ग्रुप चालण्याच्या स्पीडमुळे झाले. ही काही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसण्यापेक्षा जरा जागेवर उभे राहून दम घेतला. तारिणी, वैभव, आरती यांच्याशी गप्पा मारल्या. त्याने चालण्याचा उत्साह वाढला व श्रम परिहारही झाला. आपल्यापेक्षा बरेच वयस्कर आणि शारीरिक दृष्ट्या दुर्बळ लोक गिरनार पर्वत चढताना दिसतात. त्यामुळे आपलंही बळ वाढतं. चढताना " श्री गुरुदेव दत्त" , " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " असा घोष सुरु होता - शेवटच्या टप्प्यावर एक आजोबा "शंकर महाराजा माझी नौका किनारी लावा" हे भजन म्हणत होते - त्यांच्या सुरांत आम्ही आमचेही सूर मिसळले - चढताना लागलेल्या श्रमाला श्रद्धा आणि विश्वास जोडली गेली आणि एक वेगळीच आंतरिकशक्ती मिळाली आणि शीण निघून गेला.
चढताना वाटेत अनेक देवळं लागतात - त्यात राजा भर्तृहरी गोपीचंदाची गुफा दिसते-
२५००व्या पायरीपाशी माता रानकदेवीचा दगड दिसतो. नंतर लागतो तो जैन
मंदिर समूह - श्री भगवान नेमिनाथाची पहिली टुण्क लागते - आणि पुढे चढताना दोन्ही
बाजूना सुंदर अवाढव्य मंदिरांचं दर्शन होतं . एवढ्या उंचीवर ही मंदिर कशी बांधली
असतील हा प्रश्न पडतो. सुशोभित मोझॅकचे घुमट आणि स्तूप असलेल्या या
मंदिरात सर्वात जुनं म्हणजे १२ व्या शतकातलं बाविसाव्या तीर्थांकराचं
नेमिनाथांचं मंदिर. जैन मंदिराच्या नंतर उंचीवर आल्यामुळे आणि आसपास मोकळं
झाल्यामुळे गार वारा लागायला लागतो त्यामुळे काहीजण स्वेटर किंवा कानटोपी-मफलर
घालतात पण मला घाम येतो हे मागं अनुभवलं होतं - त्यामुळे मी ते बरोबर घेतले
नव्हते. यापुढे चढण जरा तीव्र आहे आणि मध्ये गोमुखी गंगेचं दर्शन घेतलं - तिथला प्रसाद
सेवन केला.
आणि आणखी थोडं चढून अंबा माता मंदिराच्या शिखरापाशी पोचलो. नवविवाहित जोडप्यांनी अंबा मातेचं दर्शन घ्यायला जाणं अशी इथं प्रथा आहे.
तलेठी मधून खालून वर रोप वेने येणारी मंडळी इथपर्यंत येतात. इथं काही पावलं चालत जाऊन गुजरातमधल्या सर्वात उंच - १११७ मी उंच असलेल्या गोरक्षनाथ मंदिराच्या शिखरावर चढायला लागतं. गुरु गोरक्षनाथांनी इथं तपश्चर्या केली होती असं मानलं जात असल्यामुळे नाथ संप्रदायाच्या लोकांसाठी ही जागा पवित्र आहे. इथपासून साधारण २००० पायऱ्या उतरुन एक कमान लागते - इथून एक साधारण २००० पायऱ्यांची चढण गुरुशिखराकडे जाते तर कमानीच्या दुसऱ्या बाजूची पायऱ्यांची उतरंड कमंडलू क्षेत्राकडे जाते. गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही, पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार, फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता आपल्या सॅकमध्ये मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवल्या. गोरक्षनाथ शिखराकडून खाली उतरताना खूप गर्दी होती. एकेका पायरीवर एक एक जण होता - त्यामुळे चालण्याची गती कमी झाली. रात्री साधारण साडेबारा वाजता आम्ही अंबा मातेपाशी होतो पण गर्दीमुळे आम्हांला गुरुशिखरापाशी पोचायला ब्रम्हमुहूर्त म्हणजे पहाटेचे ३:३० झाले.
त्रिपुरी पौर्णिमेची रात्र
असल्यामुळे चंद्राच्या वेगवेगळ्या कला आणि शीतल चंद्रप्रकाशात चालताना
तिथपर्यंत
पोचण्याचा वेळ कसा गेला हे कळलंच नाही आणि थकवाही जाणवला नाही. आणि चढताना बराच
वेळ गुरुशिखराच्या माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र विराजलेला बसतानाचं विलोभनीय दृश्य
बराच वेळ पाहता आलं. 
कमंडलूक्षेत्र हे नाव का पडलं यावर एक आख्यायिका पूर्वी ऐकली होती - गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या करत . एकदा अशा वेळी गिरनारमध्ये बराच काळ प्रचंड दुष्काळ पडला. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होताना माता अनसूयेला पाहवेना . त्या गिरनारवर तपस्येत लीन झालेल्या श्रीदत्तगुरूंना जागृत करायला आल्या. दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि कमंडलू खाली पडला. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला.
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे असं समजून त्या जागेवर छोटासा छान आश्रम आहे .. ते कमंडलू क्षेत्र. ही अखंड धुनी सतत चालू असते. दर सोमवारी सकाळी ६ वाजता त्या धुनीवर पिंपळाची लाकडं ठेवण्यात येतात. कापूर, रॉकेल, काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते.
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. आश्रमाच्या वतीने
सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. पौर्णिमेला ते रात्रभर चालू
असल्यामुळे आम्ही प्रसाद घेतला - प्रसादात शिरा, खिचडी आणि चहा मिळाला. या
पूर्वी इथं ढोकळासुद्धा प्रसादात होता. खरं म्हणजे
१००००
पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे किती जिकिरीचं काम आहे,
तेही प्रचंड
वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत आणि विनामोबदला.
इथं सेवा देणारे सेवेकरी किती कष्टाचं असेल - अन्नधान्य, धुनिवर
ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड, गिरनार पायथ्यापासून वर आणणं सोपं नाही. यासाठी बराच
पैसा लागतो. या कष्टांमुळेच इथं हवं तेवढं घेण्याचा आग्रह सेवेकरी हसतमुखानं
करतात, प्रसाद भक्षण
झाल्यावर हातावर पाणीही घालतात- पण ताटात टाकू नये अशा कडक सूचना आणि आग्रहही
करतात. एवढे कष्ट करुन बनवलेलं अन्न वाया न घालवणं हे योग्यच आहे की !!! त्यामुळे
इथं आलो की सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करायची . याला 'दान'
म्हणण्यापेक्षा
सेवा देण्यासाठी खारीचा वाटा हा शब्द बरोबर आहे. इथं धान्य, चहा, साखर, दूध असे
पदार्थही स्वीकारले जातात. समर्पणानंतर आपल्याला धुनीचा फोटो व प्रसाद दिला जातो.

जातायेता पाणी जरा जपूनच प्यावे - कारण हे लक्षात घ्यावे के संपूर्ण चढण्यात - उतरण्याच्या वाटेत कुठंही टॉयलेट नाहीत.
सात वाजेपर्यंत अंबामातेपाशीच थांबून - भयंकर गर्दीत रोपवेने खाली आलो.
आम्हाला पायी उतरुनंच यायचं होतं. पण दुपारी रस्त्यावरुन गाडीनं परिक्रमा करायची
असल्यामुळे रोपवे वापरला.


गिरनारचे श्री दत्तात्रेय गुरुसंस्थान, तसेच जुनागढचे भूतनाथ महादेव मंदिर या दोन्हीचे महंत श्री महेश गिरी महाराजच इथलेही
प्रमुख विश्वस्त आहेत असं कळालं. इथल्या मंदिरात मुख्य पिंडीच्या बाजूला
१३+४ अशा १७
पिंडी आहेत .. त्या इथं पूर्वी ब्रम्हलीन झालेल्या महंत गुरु शिष्यांच्या समाध्या
आहेत असं कळालं. इथंही एक अखंड धुनी आहे आणि गिरनार कमंडलू क्षेत्रापासून इथपर्यंत
एक भुयारी मार्ग आहे असं कळलं. गमतीची गोष्ट म्हणजे इथले सर्व सेवेकरी आकुर्डी-
चिंचवड-पिंपरी इथले होते. त्यांनीच इथली माहिती आम्हाला दिली. पूर्वीपासून इथं
चहाचा प्रसाद दिला जातो - पूर्वी इथं चहात जो मिळेल तो झाडीपाला, जडीबुटी,
मीठ-साखर घालत
असत. इथं एक विस्तीर्ण रान असं नाव असलेलं झाड आहे - हे झाड म्हणे इथं गेली २५००
वर्ष आहे. त्या झाडावरुनच या गावाचं नाव राणपूर - राणेश्वर असं पडलं. या झाडाची
पानं कायम हिरवी गार राहतात असं कळालं . गंमत म्हणजे झाडाच्या खोडाच्या एका भागात
मला गोमुख असल्याचा भास झाला. बाजूला कालिका मातेचं मंदिर , एक वृंदावन आणि
महालक्ष्मीचंही देऊळ आहे. या महालक्ष्मी देवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे डोळे सोनेरी
वाटतात.

इथून बाहेर पडल्यावर गिरनार पर्वताच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचं विलक्षण सुंदर दृश्य सर्वांनी पाहिलं. अंबाजी, गोरक्ष, गुरुशिखर अशी तिन्ही शिखरं विलक्षण दिसत होती. पुढे गेल्यावर आम्ही चिलियाधामला पोचलो - राजा श्रियाळ आणि त्याची पत्नी चांगुणा आणि त्यांचं बाळ चिलिया.. ही कथा पूर्वी वाचली होती. इथं श्री विष्णू / बाळकृष्ण रूपात प्रकट झाले होते अशी वदंता आहे - तिथं एका पाळण्यात बाळकृष्णाची मूर्ती आहे - पाळण्याला झोका देऊन नमस्कार केला. इथं विष्णूंच्या मूर्तीच्या एका बाजूला राजा श्रियाळ व दुसऱ्या बाजूला चांगुणा यांच्या मुर्त्या दिसतात. त्यांच्या मागे या सर्वांबरोबर उखळातला चिलिया बाळ यांच्या ही प्रतिमा दिसतात.
बाळ एका उखळात मुसळा बरोबर दिसतो. ही उखळ व मुसळ हे दोन्हीही मूळ स्वरूपात आहेत असं समजलं जातं . या उखळात बाळ कुटून त्याचा प्रसाद देवाला दिला होता आणि प्रसन्न होऊन चिलियाला परत जिवंत केलं होतं असं म्हणतात. स्थानिक भाविक माईक लावून मोठ्यानं भजनं इथं म्हणत होते. इथंच बाजूला एक हनुमानाचंही देऊळ आहे. दर्शन घेऊन आम्ही परत जुनागढच्या भूतनाथ महादेव मंदिरापाशी येऊन प्रदक्षिणा पूर्ण केली.
मंदिरातली महादेवाची भव्य सुंदर पिंडी आहे - मंदिराच्या छतावर आतून फार सुंदर नक्षीकामातुन चित्रं साकारली आहेत. असं म्हणतात श्री दत्तगुरु जेंव्हा जुनागढला पहिल्यांदा आले होते तेव्हा त्यांचं पाहिलं वास्तव्य इथं झालं होत. या मंदिराच्या आवारात साईबाबा, हनुमंत, शास्वती,महालक्ष्मी, महाकाली अशी अनेक छोटी मंदिरं आहेत. दर्शन घेऊन जरा शांतपणे काही वेळ स्थिरावलो आणि मुक्कामाकडे निघालो.
पायी परिक्रमा यावेळी चुकली असली तरी मार्गी परिक्रमा करुनही मनाला समाधान मिळालं हे मात्र खरं !!!
हरिवंशराय बच्चन यांची एक कविता अमिताभच्या तोंडून ऐकली होती... शब्द असे होते
...
छत पर चढकर मैने सिढीको उपेक्षा से देखा...
उसने कहा... उतरना है की नही
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
९८८१४०४६९७


































Comments
Post a Comment