शोलेचं गारुड


शोलेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी...१५ ऑगस्ट १९७५- १५ ऑगस्ट २०२५


शोलेचं गारुड

राहुल लाळे



मला वाटतं मी पहिलीत गेलो होतो आणि माझी बहीण मॉन्टेसरीत. माझे वडील आम्हा एका सिनेमाला घेऊन गेले होते. सिनेमाच्या सुरुवातीलाच भरधाव वेगाने जाणारी आगगाडी आणि खतरनाक पार्श्वसंगीताच्या - घोड्यांच्या टापांच्या - ट्रेनच्या भोंग्याच्या आवाजात तिचा बाजूने पाठलाग करत  हातातल्या बंदुका नाचवत घोड्यावर स्वार असलेले डाकू - असा सीन अपोलोच्या भल्या मोठ्या स्क्रीनवर ( ७० mm - म्हणजे काय तेंव्हा कुठलं कळायला?)  पहाताना डोळे सुरुवातीला जे खिळले होते ते शेवटपर्यंत. मला आठवतंय अख्खा सिनेमाभर पडद्यावर डाकू आले की माझी बहीण माझ्या वडलांच्या कुशीत चेहरा लपवत होती.


त्या वयात तेंव्हा जो सिनेमा कळला - तो म्हणजे फक्त  - अंगात धडकी भरवणारा क्रूर गब्बर, हात तुटलेला ठाकूर, " ये दोस्ती  हम  नहीं  छोडेंगे" या गाण्यात धमाल करणारे आणि डाकूंशी तुफान भन्नाट मारामारी करणारे जय आणि वीरु, 'चल धन्नो' म्हणत टांगा हाकणारी बसंती - "मेहबूबा $ मेहबूबा " हे तोंडात बसलेलं गाणं आणि त्यानंतर जय-वीरूने उडवून दिलेले डाकूंचे तंबू - एवढाच.  सिनेमाचं नाव "शोले" चा अर्थ आम्हां मराठी माध्यमातल्या बापड्यांना त्यावेळी कळला नव्हता. (छोले मात्र माहिती होते) त्यावेळी शोले म्हणजे एक भारी पिक्चर पाहिला एवढंच काय ते डोक्यात होतं.


पुढे जसजसं मोठे होत गेलो, तसतसं वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शोले पाहत गेलो आणि प्रत्येक वेळी नवीन काही तरी पाहायला मिळालं असं वाटतं. स्टोरी पाठ झाली - डायलॉग तर एवढे पाठ झाले की "कितने आदमी थे... तेरा क्या होगा कालिया... अब गोsलीs खा...ये हाथ नहीं फांसी का फंदा है... ये हाथ मुझे दे दे ठाकूर... तेरा नाम क्या है बसंती... इतना सन्नाटा क्यूँ है भाई... हम अंग्रेज के जमाने  के जेलर है... आधे इधर जाओ - आधे  उधर जाओ - लोहा गरम है मार दो हाथोडा... मुझे गब्बर चाहिये-जिंदा... कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा - खानदानका पता लगते ही आपको खबर कर देंगे - ये सुसाद क्या होता है.. अरे आप लोगोंको कुछ काम है के नहीं , दिनभर बैठे रहते हो और पच्चीस  झूठ हमसे बुलवाते हो"  हे आणि असे अनेक डायलॉग, सीन यायच्या आधीच आमच्या तोंडात प्रत्येक वेळी शोले बघताना तयार असायचे. "अरे ओ सांभा, कितना इनाम रखा है सरकार हमपर " असा प्रश्न विचारला गेल्यावर दूर उंच खडकावर बसलेल्या सांभाला "पुरे पचास हजार - सरदार " एवढ्या तीन चारच शब्दांचा डायलॉग पूर्ण सिनेमात आहे हे फार नंतर लक्षात आली. मॅकमोहनला (मोहन माखिजानी- रविना टंडनचा मामा) स्वतःलाच सुरुवातीला वाटलं नसेल की फक्त एका खडकावर बंदूक पकडून एकच डायलॉग बोलणारा आपण सादर केलेला सांभा हीच आपली आयुष्यभराची ओळख होऊन जाईल !!.


फक्त सांभाच नाही तर शोलेतलं प्रत्येक कॅरॅक्टर अजूनही जिवंतच आहे. मग ती  बसंती(हेमा मालिनी) असो वा राधा(जया भादुरी), तो अहमद (सचिन) असो वा रामलाल(सत्येन कप्पू), इमामसाहेब (ए के हंगल) असो वा मौसीजी (लीला मिश्रा), जेलर(असरानी) असो वा सूरमा भोपाली(जगदीप), कालिया ( विजू खोटे) असो वा जेलमधले कैदी (केश्तो-राजकिशोर), महबूबा गाण्यातले जलाल आगा किंवा हेलन असो वा गावातले गावकरी अशा प्रत्येक रोलसाठी जो पडद्यावर दिसतो, त्या कलाकाराशिवाय कोणा दुसऱ्याला आपण कल्पनेतही पाहू शकत नाही. पण हे कलाकार निवडतानाही म्हणे अनेक घटना घडल्या होत्या असं वाचण्यात आलं. गब्बर सिंगच्या रोलसाठी आधी म्हणे डॅनीची निवड झाली होती पण तो धर्मात्माच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. गब्बरच्या रोलसाठी संजीवकुमार आणि अमिताभला इंटरेस्ट होते तर ठाकूरच्या रोलसाठी धर्मेंद्र आग्रही होता असंही वाचण्यात आलं. जयच्या भूमिकेसाठी प्रथम शत्रुघ्न सिन्हाचा विचार झाला होता पण सलीम-जावेद आणि धर्मेंद्र यांनी अमिताभचं नाव पुढं केलं आणि नंतर रमेश सिप्पीलाही अमिताभच योग्य वाटला - . आता जर वर म्हणल्याप्रमाणे भूमिका त्या त्या कलाकाराला मिळाल्या असत्या तर आपल्याला काय पहायला मिळालं असतं, याचा विचारही करु शकत नाही. 


पडद्यावर दिसणारी कथा ही सलीम-जावेद या जोडीच्याच जुन्या चार ओळींच्या गोष्टीचा कल्पनाविस्तार केलेली होती. फक्त मूळ कल्पनेतल्या रिटायर्ड आर्मी ऑफिसर ऐवजी सिनेमात रिटायर्ड  पोलीस ऑफिसर म्हणजे - ठाकूर आला. सिनेमा चालणार याबद्दल ही लेखक द्वयी एवढी खात्री बाळगून होती की त्यांच्यामुळे दिग्दर्शक रमेश सिप्पीला त्याचे वडील आणि निर्माते जी पी सिप्पी यांनी पूर्ण पाठिंबा दिला आणि रमेश सिप्पीने जीव ओतून काम करत कोणतीही तडजोड न करता सिनेमा पूर्ण केला आणि सिनेमाला मिळालेलं अभूतपूर्व यश पाहून सलीम-जावेदची ही कथा पूर्वी नाकारलेल्या प्रकाश मेहरांनी कपाळावर हात मारून घेतला होता.


रमेश सिप्पीने शोले बनवताना कलाकार आणि कथेव्यतिरिक्तही अनेक गोष्टीत बाजी मारली होती. एरवी डाकूंचे सिनेमे बनवताना वापरल्या जाणाऱ्या चंबळच्या खोऱ्याच्या लोकेशन्स ऐवजी त्यानं डायरेक्ट कर्नाटकात मैसूरजवळ रामनगर ही जागा निवडली. टेक्निकल टीम, सिनेमॅटोग्राफी यांनीही कमाल केली होती. अगदी पहिल्या ट्रेन फाईट सीनपासून , सगळे भावनिक - कॉमेडी सीन्स, गाणी , अगदी क्लायमॅक्स पर्यंत प्रत्येक शॉटवर रमेश सिप्पीनं आपला ठसा उमटवला होता. " ये दोस्ती'  गाण्यातली धमाल,  'होली के दिन' मधली रंगांची उधळण आणि गाण्यानंतर लगेचच झालेल्या डाकूंच्या हल्ल्यात बसंतीनं जयवीरुला टांग्यात बसवून नेणं- अमिताभनं अमजदच्या पाया पडण्याचं नाटक करताना त्याच्याच डोळ्यात रंग उडवून बाजी पलटवणं,  'मेहबूबा -मेहबूबा' गाण्यातली मस्ती , 'कोई टांगेवाली' गाण्यातली धर्मेंद्रने -हेमाची केलेली मनधरणी, माऊथ ऑर्गनवर शोलेची थीम अमिताभ वाजवत असताना त्याचे आणि जयाचे नेत्रकटाक्ष, ठाकूरच्या त्वेषातली अगतिकता आणि अगतिकतेतला त्वेष,  जे नाणं "ये दोस्ती हम नहीं  छोडेंगे" गाण्यात टॉस केल्यावर उभं राहतं, तेच नाणं डाकूंशी लढताना कोण मागं थांबणार यासाठी निर्णायक ठरतं, नाण्याच्या दोन्ही बाजूंची शेवटी केलेली उलगड आणि अमिताभच्या मृत्युप्रसंगी त्याच्या व सर्वांच्याच अभिनयाने गाठलेला कळस … अशा अनेक प्रसंगांची सांगड घालताना रमेश सिप्पीने  किती मेहनत घेतली असेल हे वारंवार सिनेमा पाहणाऱ्या आम्हां  रसिकांना किती कळलं हाही एक संशोधनाचा विषय होईल.


प्रचंड हाणामारी - मारधाड अशी हवा असणाऱ्या सिनेमात धर्मेंद्र -हेमामालिनीवर चित्रित झालेला आमराईतला प्रसंग असो किंवा देवाच्या मूर्तीच्या मागं  लपून संवाद करणारा प्रसंग असो किंवा दारू पिऊन टाकीवर चढण्याचा, तुरुंगातला असरानीचा किंवा सुरमा भोपालीचा प्रसंग असो वा अमिताभ मौसीकडे वीरुसाठी  बसंतीला मागणी घालायला जातो तो सीन असो - कॉमेडीचा बाज ही जबरदस्त साधला आहे. ठाकूरचे पूर्ण कुटुंब निष्प्राण पडलेलं पाहताना, अहमदचं कलेवर गावात आल्यावर हंगलांचा टाहो ऐकताना आणि शेवटी अमिताभ गेल्यावर जयाचा चेहरा पाहताना अजूनही मनात चर्रर्र होतं .


सिनेमातली गाणी आणि पार्श्वसंगीत म्हणजे आर डी बर्मनची जबरदस्त कलाकारी आहे. " ये दोस्ती, मेहबूबा, होली के दिन , जब तक है जान , कोई हसीना जब"  त्यानं प्रत्येक गाण्याला एक वेगळा बाज दिला आहेच पण त्याशिवाय चकमकीचे प्रसंग असो , शोलेच्या ट्रेडमार्क ट्युनच्या व्हरायटीज असो , गब्बरच्या आगमनाची चाहूल देणारी एक वेगळीच धून असो , पंचमनी शोलेत पार्श्वसंगीताची एक वेगळीच उंची गाठली आहे. बसंतीच्या टांग्याचा पाठलाग डाकू करताना पं  सामताप्रसाद यांच्या तबल्याचा केलेला अप्रतिम वापर हा तर आरडीच्या कल्पकतेचा परमोच्च मानबिंदू !


 पुढच्या फिल्मफेअर अवार्डस मध्ये शोलेला सर्वात जास्त म्हणजे दहा नॉमीनेशन्स मिळाली पण मिळालं फक्त एकच ते एडिटिंगचं माधव शिंदेंना (M S Shinde). सगळी अवॉर्डस दीवार घेऊन गेला. संजीव कुमारला अवॉर्ड मिळालं पण ते आंधीसाठी... पण शोलेला फिल्मफेअरपेक्षाही एक  मोठं अवॉर्ड मिळालं ..चित्रपटरसिकांच्या मनात आपलं कायमचं गारुड बनवून रहायचं !!!


शोलेनी कोणाला काय दिलं ? असं जर कोणी विचारलं तर कोणाला काय दिलं नाही असा उलटा प्रश्न विचारावा लागेल.

 निर्माता-दिग्दर्शकांना व्यावसायिक यश दिलं - त्यांच्यासहित कलाकारांना, सिनेमाच्या सर्व टीमला नाव मिळवून दिलं. आपल्या सगळ्यांचं मनोरंजन तर केलंच, पण सिनेमा कसा पाहायचा हे शिकवलं. इमानदारी कशी टिकवायची, सर्व हरल्यावरही परत त्वेषाने कसं उभं राहायचं हे दाखवलं. मैत्री जपताना "जानपे भी खेलेंगे.. तेरे लिये ले लेंगे सबसे दुश्मनी, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे "  हा मंत्र कसा खरा करायचा हेही शिकवलं. वीरु आणि बसंतीचं यशस्वी झालेलं धुसमुसळं प्रेम आणि विधवा राधा आणि जयचं नजरेतून व्यक्त होणारी शांत संयमी प्रेमभावना अनेक प्रेमी युगुलांना आधार देऊन गेली असेल.


खरं  तर यावर गेली पन्नास वर्षं  अनेकांनी लिहिलंय , चित्रपटावर आधारित मासिकांत, ब्लॉग्सवर अनेक विशेषांकही आलेत , येत राहतील. यापुढेही कोणी विचारलं की हे 'शोलेपुराण' किती दिवस चालू राहील तर  मला वाटतं सगळ्या चित्रपट रसिकांकडून एकंच उत्तर येईल ---


" पुरे पचास हजार "


राहुल लाळे

१४-०८-२०२५

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका