छावा

 छावा... हिंदवी स्वराज्यस्थापक गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती नरसिंहाचा महापराक्रमी पुत्र









राहुल लाळे

"आळस, अज्ञान आणि अनास्था या तिघांचं प्राबल्य आमच्या जीवनातच पसरलेलं आहे. इतिहास म्हणजे अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय धनदौलत आहे, या गोष्टीचा आम्हाला अद्याप सुगावाच लागलेला नाही." हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं वाक्य पूर्वी कधी तरी वाचलं होतं . गेले दोन आठवडे देशभरातून आणि जगभरातून " छावा " या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीमहाराजांवर बेतलेल्या सिनेमावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरुन हे वाक्य आठवलं. महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत पण त्यांचा महापराक्रमी, मुत्सद्दी, धर्मवीर , कविमन बाळगणारा असा संभाजी हा सुपुत्र मात्र कोणाला माहिती नव्हता हे वाचून आश्चर्य नाही पण वाईट नक्कीच वाटलं.

छत्रपती संभाजी महाराज हा लहानपणापासूनच एक कुतूहलाचा विषय.. आईविना वाढलेलं पोर - वडलांबरोबर आग्ग्र्यात कैदेत अडकणं आणि तिथून सुटका करुन घेतल्यावर पकडलं जाण्याच्या भीतीने वडलांपासूनही वेगळं होऊन लपत छपत आणि बालपणीच जिवंतपणी मृत्यु झाल्याची अफवा पसरवली गेली असताना सुखरूप रायगडावर पोचणं आणि आजी जिजाबाई व वडील छत्रपती शिवाजीमहाराजांची छत्रछाया उडून गेल्यावर सैरभैर होऊन गेलेला युवराज - अशी काय ती ओळख होती. सावत्र आई सोयराबाईंच्या कटकारस्थानाला वैतागून संभाजी रायगडावरुन पळाले-मुघलांना जाऊन मिळाले. अशा काही वदंताही ऐकलेल्या. पण पुढे शिवाजी सावंतांची छावा वाचली आणि संभाजी म्हणजे काय ते कळू लागलं. गेल्या काही काळात टीव्हीवर छत्रपती संभाजींवरील मालिकांमधून वादही झालेले पाहिले.


लहानपणी टीव्हीवर भालजी पेंढारकरांचे पाहिलेले सिनेमे पाहिलेले आणि डोक्यात फिट बसलेले. त्यामुळे गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेले ऐतिहासिक सिनेमे फार भावले नव्हते. मराठी जरा तरी बरे, पण हिंदी म्हणजे तान्हाजी किंवा बाजीराव-मस्तानी अजिबात पटले नव्हते. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित केलेला आणि विकी कौशल अभिनित "छावा" सिनेमाबद्दल बरंच वाचलं - टीव्हीवर - सोशल मीडियावर पाहीलं, त्यामुळे काल संध्याकाळी सिनेमा पाहिलाच. छावा पाहिला आणि अनेक दिवसांनी एक खरा ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा फील आला -- त्याबद्दल दिग्दर्शक आणि सर्वच कलाकार आणि टीमचे मनापासून आभार !


बुऱ्हाणपुरावर मराठ्यांनी चढवलेला हल्ला - त्यात शंभूराजांची जोरदार एंटी- सिंहाबरोबर केलेली झटापट सेनापती हंबीरराव मोहिते आणि इतर मराठ्यांची मोगलांशी झालेल्या धुमश्चक्रीच्या प्रसंगातच प्रेक्षक रुपेरी पडद्यातून प्रत्यक्ष कथेत शिरतो. तेव्हांपासून अगदी शेवटी औरंगजेबाच्या कैदेत अमानुष छळ -हालहाल सोसूनही तेजस्वी बाणा न सोडता ताठ मानेनं आपले प्राण सोडत आपल्या आबासाहेबांच्या आणि आऊसाहेबांच्याकडे प्रवासाला निघणाऱ्या शंभुराजांच्या शेवटच्या प्रसंग पाहून डोळ्यात आसू आणि गळ्यात हुंदका दाटलेल्या अवस्थेत चित्रपटगृह सोडलं तरी तो लवकर भानावर येत नाही यातच सिनेमाचं यश आहे.


इतिहासावर आधारित असलेला सिनेमाचा विषय तसंच सादरीकरण एवढं विलक्षण असल्यामुळे आणि आता दोन-तीन आठवड्यानंतर जबरदस्त व्यावसायिक यश मिळाल्यावर छावाचं रेटिंग, मतं-विश्लेषणं-लिहून आली आहेत त्यामुळे परीक्षण किंवा विश्लेषण नाही-पण लिहावंसं मात्र जरूर वाटलं.


विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका अगदी जगलाय. पराक्रम, धैर्य, कारुण्य, हळवेपण, आईच्या आठवणीने क्षणात हळवा होणारा पुत्र ते औरंगजेबाच्या  डोळ्यात डोळे घालून निर्भीडपणे बोलणारा राजा, सर्वच उत्तम वठवलंय विकीने. आई हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील हळवा कोपरा. तो सिनेमाभर प्रकर्षाने जाणवतो. बुऱ्हाणपूरची लढाई सुरु असताना,  एका प्रसंगामुळे आईची आठवण येणं आणि धुमश्चक्रीत अडकलेल्या एका बालकाला त्याच्या आईच्या सुपूर्त करतानाचा प्रसंग काळजाला हात घालतो. आईचं प्रेम हे सगळ्यांसाठीच सर्वात महत्वाचं असतं, ज्यास ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, . बालपणात तर सर्वात जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने जर कुणाची आई हिरावून नेली तर,  ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. संभाजी महाराजांच्या मनातली ती उणीव विकी कायम डोळ्यातून दाखवतो. शंभुराजांना आपल्या पिताजींच्या सहवासाचाही पूर्ण लाभ झाला नव्हता. आपल्या थोर वडिलांविषयी असणारा आदर, असणारं  प्रेम - आज ते आपल्या सोबत नाहीत ही सतत होणारी जाणीव, व्याकुळता आणि अपरिहार्यता सारं काही विकी कौशलने फारच संवेदनशीलतेने उत्तमरित्या सादर केलं आहे


विकीने मसान -उधम - फील्ड मार्शल माणेकशा - उरी याचप्रमाणे छावामध्येही अभिनयात बाजी मारून नेली आहे. छत्रपतिपदाचा राज्याभिषेक, त्यात इंग्रजांशी केलेलं संभाषण, जगदंब, हीच श्रींची इच्छा, नमः पार्वतीपतये श्री हर हर महादेव, येसूबाईंना श्रीसखी अशी अप्रतिम संवादफेक, औरंगजेबाने पकडल्यावर अमानुष छळ करतानाही आपला बाणा न सॊडणाऱ्या मराठी राजाचे अफाट धैर्य, मरणाला सामोरे जातानाही कवी कलशाशी काव्यात्मक संवाद साधणारा कवीमनाचा राजा मित्र,  लढाईतली धाडसी आणि इतर दृश्यांतून  छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःमध्ये रुजवून घेतल्यासारखा वाटतो. ज्यांनी हा सिनेमा पहिला आहे त्यांना नंतर अनेक वर्ष संभाजी महाराजांचे नांव घेतले की हाच कलाकार डोळ्यांसमोर येईल यांत शंका नाही.


ताल, दिल चाहता है मधला सिड, आ अब लौट चले - हलचल - हंगामा - हमराज- रेस- दृश्यम अशा अनेक सिनेमातून अक्षय खन्नाला मी पाहिलंय . पण छावामधल्या अक्षय खन्नाला मी पटकन ओळखू शकलो नाही. चेहऱ्यावरचे हावभाव, डोळ्यातला खुनशीपणा -क्रूरता यातून सगळयांच्या  मनांत  चीड आणणारा औरंगजेब पडद्यावर  पाहताना समोर अक्षय खन्नाला पाहतोय हे आपण विसरुन जातो. अभिनय - ऍक्टिंग म्हणजे फक्त संवाद किंवा ऍक्शन नसतो तर चेहऱ्यावरचे निर्दयी भाव - थंड रक्ताचे निर्विकार भाव व्यक्त करणारे भेदक नजरेचे डोळे आणि चालण्यातून दिसणारी मग्रुरी -खुनशीपणा आणि हालहाल करुनही शरण न येणाऱ्या शंभुराजांना पाहून येणारी हतबलता दाखवत या गुणी कलाकाराने औरंगजेब कसा असावा हे दाखवताना आपण काय लेव्हलचे कलाकार आहोत हे दाखवून दिलं आहे.


सेनापती हंबीररावांच्या भूमिकेत आशुतोष राणा नेहमीप्रमाणे एकदम सफाईदार, तर कवी कलशाच्या भूमिकेत विनीतकुमारसिंह एक सरप्राईज पॅकेज आहे. शेवटच्या प्रसंगात मृत्यू सामोरा असतानाही शंभूराजेंबरोबर केलेला काव्यद्वंद्वाचा प्रसंग फार अप्रतिम जमून आलाय. येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसते चांगली पण तिच्याऐवजी शर्वरी वाघने जास्त जान आणली असती असं वाटलं. दिव्या दत्ता सोयराबाईंच्या भूमिकेत तर इतर भूमिकांत संतोष जुवेकर , डायना पेंटी  वगैरे एकदम फिट. आस्ताद काळे- किरण करमरकर यांना फार वाव नाही. धाराऊच्या भूमिकेत नीलकांती पाटेकर भाव खाऊन जातात तर सुव्रत जोशी आणि सारंग साठेना  सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांच्या शिव्या पडतात म्हणजे कामं परफेक्ट.


सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे VFXचा वापर. सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रसंग, राज्याभिषेक, धाराऊची सुवर्णतुला, त्याकाळातील रायगड  चांगला उभा केला आहे. सिनेमाच्या इतर तांत्रिक बाजू - costume design, मेकअप, एडिटिंग, cinematography एकदम मस्त. पण रेहमानचं  संगीत या भव्य सिनेमात  इतर सिनेमात जसं वेगळं  उठून दिसतं  तसं उठून येत नाही -  बाहुबली किंवा इतर दाक्षिणात्य सिनेमातल्या संगीतापेक्षा संभाजीमहाराजांच्या या भव्य बायोपिकला मराठमोळ्या संगीताचा बाज असता तर जबरदस्त अनुभव मिळाला असता - अजय-अतुल यांची उणीव भासली. पण रहमानच्या नावामुळे देशाबाहेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सिनेमाला प्रसिद्धी मिळायला मदत झाली असावी.


छावा छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट नसला तरी पराक्रमाची, धैर्याची, त्यागाची , हिंदवी स्वराज्याच्या ध्यासाची तशीच कट्टर धर्माभिमानाची कहाणी आहे. आणि ती दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी  इतिहास, भावना, उत्कटता, देशभक्ती, अँक्शन यांचा सुरेख संगम साधत प्रभावीपणे मांडली  आहे. लढाईत वापरल्या गेलेल्या हत्यारात गुरूज आणि माडू ,त्रिशूळ, धनुष्य, परशु, कुराड यांचा वापर आणि धोम-वाई- मेणवली- संगमेश्वर येथील चित्रीकरण छान वाटलं . आणखी एका  गोष्टीसाठी उतेकरांचं अभिनंदन - त्यांनी संभाजीराजांना तानाजी- बाजीरावांसारखं चित्रपटात नाचवलं नाहीये - ( लेझीम खेळतानाचे गाणं कट केलंय हे उत्तम)


छावा चित्रपटातील क्लायमॅक्सचे हे दोन डायलॉग संपूर्ण चित्रपटाचे सार आहे, “हाथी,घोडे,तोफ,तलवारे,फौज तेरी सारी है,  पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है"


आणि '” शंभू' अपनी मौत का जश्न मना के चला गया, और हमे अपनी जिंदगी का मातम मनाने के लिए छोड़ गया “


ज्या राजाचा इतिहास एवढा भव्यदिव्य आहे तो अडीच तासात दाखवणे सोपे काम नव्हते.  पण  तरीही सिनेमात पुढील गोष्टी असायला हरकत नव्हती असं वाटलं


-           सिनेमाच्या सुरवातीला अजय देवगणच्या आवाजात पार्श्वभूमी सांगितली गेली, त्याच धर्तीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढे औरंगजेबाचे काय झाले? त्याला मराठी स्वराज्य कधीच जिंकता  आलं नाही - तो या मराठी  मुलखातच कसा दफन झाला?  शंभूराजेंच्या बलिदानांतर संताजी-धनाजी  आणि इतर  मराठा कसा पेटला नी कसा लढला-  महाराणी येसूबाईंनी औरंगजेबाच्या छळ छावणीत २९ वर्ष कैदेत कशी काढली असतील? - महाराणी ताराबाईने वाढवलेले मराठा साम्राज्य, पेशव्यांनी - शिंदे- होळकरांनी अटकेपर्यंत पोचवलेला भगवा झेंडा हेही वर्णन करायला हरकत नव्हती. त्यातून संभाजी राजांचं  बलिदान व्यर्थ झालं नाही हा मेसेज दिला गेला असता.


-          संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवताना घटनाक्रम खरं तर त्यांच्या बालपणापासून सुरू व्हायला हवा.


-          संभाजी महाराजांना एकाच वेळी पाच आघाड्यांवरती संघर्ष करावा लागला. लाखोंचे सैन्य घेऊन स्वराज्यावरती चाल करून दख्खन जिंकण्यासाठी आलेला क्रूरकर्मा औरंगजेब हे दाखवलं गेलं पण त्याचबरोबर  जंजिऱ्याचा सिद्दी,  इंग्रज तसेच गोव्याचे पोर्तुगीज आणि धरणगांव लूट, जुवे बेट फतेह, कल्याण-भिवंडी लढाई, आप्तस्वकीयांबरोबरचा अंतर्गत लढा, अकबराला हाताशी ठेवून केलेलं राजकारण तसेच आदिलशाहीशी आणि कुतुबशाही औरंगजेबा विरुद्ध बांधलेले संधान, त्यावेळी संभाजीराजांनी चाचेगिरी - Human trafficking वर घातलेला निर्बंध,आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा,

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना, आधुनिक बारुदखाने तयार करून  दिलेला स्वदेशीचा महामंत्र या गोष्टी उल्लेखल्या जायला हव्या होत्या. कारण संभाजी महाराज हे फक्त युद्ध कुशल आक्रमक नेतृत्व नव्हते तर उत्तम राजकारणी सुद्धा होते.


-          सिनेमॅटिक लिबर्टी अंतर्गत उतेकरांनी बूऱ्हाणपूर लूटीची घटना प्रथम- चित्रपटाच्या सुरुवातीस आणि नंतर राज्याभिषेक दाखविला आहे, प्रत्यक्षात छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेक झाल्या नंतर पंधरा दिवसांनी राजांनी बूऱ्हाणपूर आणि औरंगाबाद वर हल्ला करून मुघलांना हादरा दिला होता.


-          बुधभूषण-राजनीती हा संस्कृत तसंच नायिकाभेद, नखशिखा, सातशतक हे ग्रंथ संभाजीराजांनी लिहिलेले होते यावरुन संभाजीराजांची साहित्य-प्रतिभाही प्रकट करता आली असती.


-          रामदासस्वामींनी छत्रपतीं संभाजीराजांना लिहिलेले पत्र - " शिवरायांचे आठवावे रुप " - आणि संभाजीराजांचे समर्थ व त्यांच्या कार्याला दिलेले पाठबळ याचा उल्लेख राहून गेला.


पण तरीही यामुळे सिनेमाचं महत्व कमी होत नाही - कारण देशाच्या कानाकोपऱ्यात - परदेशात ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत तिथं तिथं इतिहासातल्या या स्वराज्यरक्षक, देशप्रेमी,  धर्मवीर , पराक्रमी अशा मराठी राज्याच्या दुसऱ्या छ्त्रपतीचं नाव पोचवायला तो कारणीभूत ठरला हेही नसे थोडके !


"जो समाज, जे राष्ट्र आपल्या पूर्वजांचा इतिहास 'वाचत' नाही. तो समाज, ते राष्ट्र विश्वाच्या संघर्षात 'वाचत' नाही !"


इतिहासातल्या गोष्टी  आपल्याला  मागील चुकांतून सुधारत उज्ज्वल यश  आणि धैर्य मिळवायला प्रेरित करतात. आपला भूतकाळ - इतिहास हा आपला पाया असतो - तो जेवढा भक्कम - तेवढी पुढच्या भविष्यकाळात मारता येणारी झेप मोठी ... त्यामुळे इतिहास - खरा इतिहास जिवंत राहण्यासाठी छावा आणि असे  चित्रपट येत राहणं महत्वाचं !!


देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।

महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका