आठवणी दिवाळीच्या
आठवणी दिवाळीच्या….
राहुल लाळे,
मित्रांनो
गणपती झाले, नवरात्र-दसरा साजरे झाले की नवा उत्साह घेऊन दिवाळी येते.
काही दिवस टिव्ही वर कॅडबरी, मोठी साबण अशा अनेक खास दिवाळी स्पेशल जाहिराती सुरु होतात , त्या पाहून लहानपणी साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या अनेक प्रसंगांची मालिका डोळ्यासमोर उभी रहातेच. ………………
प्रत्येक दिवाळी ही वेगळ्या मजेची असायची , कधी आम्ही आजोळी मामाकडे जायचो किंवा कधी माझे - आते-मामे -मावस - चुलत भाऊ बहीण आमच्याकडे यायचे . आमची जागा छोटी - तर मामाकडे नाशिकला हे मोठे घर , आत्या - काकाकडे खेडेगावात जागेचा प्रश्नच नाही . जागा छोटी असो वा मोठी मजा मात्र तेवढीच असायची
पहाटे ३-३:३० ला उठून.पहिल्या आंघोळीचा (अभ्यंग स्हान ) नंबर लागावा म्हणून आम्हा भावंडात स्पर्धा लागत असे कोण पहिलं उठून अंघोळ करतंय आणी अंगणात सुतळी बॉम्ब लावून दिवाळीची सुरुवात कोण करणार यात चढाओढ असायची. दिवाळीच्या पहाटेचा माहोल सुगंधी उटण्याने अधिक मोहक होत असे . बोचणाऱ्या थंडीत चुलीवर/ गॅसवर / बंबात तापणारे पाणी , पाट्यावर वाटलेला ओल्या खोबऱ्याचा रस/ सुवासिक तेल , न्हाणी घरात लावलेला मिणमिणता दिवा ,धावती रांगोळी काढून त्यावर मांडलेला पाट , आईने / मामाने / आत्याने किंवा काकू -मामीने अंगाला घसघसून लावलेलं ऊटण , निरांजनाची ओवाळ आरती . त्या अपार थंडीत हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत गारठून न्हाणी घरात (मोरीत) धावत जात अंगावर ओतलेला गरम -गरम पाण्याचा भरला तांब्या, खास पहिल्या अंघोळीसाठी आणलेल्या महागड्या साबणाचा तो मलमली फेस आणी त्याच्या उंची सुवासात अंगभर पसरलेला तजेला अक्षरशः ओतू जात असे . आणि मग कधी एकदा फटाके वाजवायला अंगणात जातोय असं होई. सध्या केव्हाही नवे कपडे घेतले जातात - कारणं बरीच असतात - वाढदिवस सणवार आहेतच - पण आज काय सेल- उद्या काय कुठली स्कीम आणि कधी जस्ट चेंज म्हणून , पण त्यावेळी फक्त दिवाळी आणि कधीतरी वाढदिवसालाच नवीन कपडे असायचे आणि तेही त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीला परवडतील असे . आई वडील स्वतःची हौस- प्रसंगी गरजही बाजूला ठेवून आम्हाला नवनवीन कपडे शिवायचे. आज अंगावर ब्रान्डेड कपडे घालतांना जितका आनंद मनात दाटतो त्यापेक्षा कैक पटीचं समाधान तेंव्हा त्या कपड्यांत अनुभवता येई. दारातल्या त्या मोजक्या चार पणत्यांचा लखलखाट आजच्या भरगच्च पणत्यांची/ लाईटिंगच्या माळांची रोषणाई दिपवून टाकणारा होता. वडिलांनी शंभर- दीडशे रुपयात दोन पिशव्या भरून आलेले फटाके वाटून घेतांना झालेली वादावादी आणी मग सामोपचाराने वाटणी होई. माझ्याकडे जास्ती फटाके आल्याचा हर्शील तरंग सरसर करीत उंच जाणाऱ्या मोर छाप पावसा प्रमाणे दिवाळीभर जाई. .हेच फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचा. फुसक्या निघालेल्या फटाक्यांना (फुसका माल बन्सीलाल) उन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी करणं अशा एक ना अनेक युक्त्या काढत आम्ही फटाकेबाजी करत असू.
फराळाच म्हणाल तर आईने घरात केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले डबे स्वयंपाक घरातल्या फळीवर ओळीने मांडून ठेवलेले असत. आई दिवसभर ऑफिसमध्ये राबूनही एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी, सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश. आता बायको पण आईसारखीच राबून करते . पूर्वी चकली -लाडू - चिवडा - अनारसे म्हटले की फक्त दिवाळीतच , पण आता वर्षाचे बाराही महिने हे पदार्थ सगळीकडे उपलब्ध असतात !
पण विकतच्या फराळात घरगुती गोडवा नसतो ...चवीचंअसूनही त्या विकतच्या फराळात आईच्या किंवा बायकोच्या हातचा रुचकरपणा मात्र येत नाही..
दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज त्याकाळात यावेळी गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी.यांस कडून यांस.. भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण आठवतात. काळानुसार काम-धाम -शिक्षण अशा अनेक कारणांनी सगळे नातेवाईक दूर गेले - - फेसबुक - व्हॉट्सअप च्या माध्यमातून जरी संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष गाठी-भेटी एकाच शहरात असूनही दुरापास्त झाल्या. प्रत्येक सणाला सगळे भेटतीलच असं नाही. पण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतं. टेक्नॉलॉजी मुळे निदान ही सोय उपलब्ध झालीये. शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.
शेवटी रांगोळीत जितके ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंही अश्याच असंख्य ठिपक्यांनी विभागलंय. गरज आहे. त्यांना जोडणाऱ्या नात्यांच्या आणि मैत्रीच्या अंधुक रेषांची .
बाकी रंग तर आपसूकच भरले जातील, नाही का ?
ही दिवाळी तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, समृद्धी , भरभराट घेऊन येवो II
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा !!
II शुभ दिपावली !!
© राहुल लाळे


Comments
Post a Comment