थोडीसी बेवफाई

थोडीसी बेवफाई ... का कस्मे वादे ?

राहुल लाळे









मागच्या महिन्यात टीव्हीवर महेश भट्टचा शबाना-स्मिता पाटील - कुलभूषण खरबंदाचा  "अर्थ"  पाहिला. १९८२ साली आलेला हा सिनेमा फक्त प्रौढांसाठी असल्यामुळे पाहू शकलो नव्हतो - तेंव्हा फक्त त्यातल्या जगजीतसिंहांच्या "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो- झुकी झुकी सी नज़र- कोई ये कैसे बता दे"  अशा सदाबहार गजला ऐकायचो - पुढे मोठं होत गेलो तसं हा सिनेमा महेश भट्टने त्याच्या परवीन बाबीबरोबरच्या विवाहबाह्य संबंधांवर (एक्सट्रा मॅरिटल अफेअर) बनवला होता असं कळालं. पुढे हा सिनेमा प्रत्यक्ष पाहिला. पहिल्यांदा सिनेमा पाहिल्यानंतर त्यातल्या आपली बायको पूजाला ( शबाना) दूर करून कविताबरोबर (स्मिता) संबंध ठेवणाऱ्या इंदरचा (कुलभूषण खरबंदा) खूप राग आला होता. कविताबद्दल सहानुभूती-राग अशी मिश्र भावना आणि पूजाला कोलमडताना पाहून  सुरवातीला वाईट-कीव आणि शेवटी तिला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व बनून सावरताना पाहून एक कौतुकाची अभिमानाची भावना मनात निर्माण झाली. अशा संबंधांमुळे एका नात्यात तसंच लग्नसंबंधाबाहेरील  त्या दुसऱ्या नातेसंबंधातही अनेक प्रश्न तयार होतात - अशा विवाहबाह्य संबंधांत अडकलेल्या दोघांना तात्पुरतं सुख मिळतं. कदाचित काही उदाहरणांत आयुष्यभराचंही... पण अनेकदा बदनामी - दुःख - मनस्तापही  होतो. आणि बरेचदा तर दुःखच आणि कुठं तरी कमीपणाची भावना आणि त्यातूनही बाहेर आलं तरी आयुष्यभराचं एकाकीपण !

त्यानंतर  हा विषय असलेले अनेक सिनेमे आले - थोडी सी बेवफाई - एक ही भूल -सिलसिला - पती पत्नी और वो - सिलसिला -मर्डर - कभी अलविदा ना कहना - मस्ती - नो एंट्री - रुस्तम - हसीन दिलरुबा असे अनेक सिनेमे आले - काही विनोदी पद्धतीत - काही गंभीर - काही सस्पेन्स - यातले काही पाहिले - पण प्रत्येक वेळी अनुभव थोडा विचार करायला लावणारा - सुन्न करणारा - अंतर्मुख  करायला लावणारा.

सिनेमांत बघितलेली अशी प्रकरणं  प्रत्यक्षात बघायची / ऐकायची वेळ अनेक वर्षं  आयुष्यात आली  नव्हती. कॉलेजमध्ये असताना जवळपास राहाणाऱ्या एका कुटुंबात अशी घटना घडली आणि फक्त पुरुषच एक्सट्रा मॅरिटल अफेअर्स करतात हा गैरसमज दूर झाला - एखादी स्त्री प्रेमविवाह करून एका मुलाची आई होऊनही लग्नाआधीच्या दुसऱ्या  प्रियकराबरोबर संबंध ठेऊन  नंतर घर सोडून जाते - हे ऐकून धक्का  बसला होता. पण नंतर लक्षात आलं की शेवटी एखादा पुरुष विवाहबाह्य संबंध जिच्याशी ठेवतो ती  स्त्री स्वतः विवाहित असूच शकते की.

कायम हा प्रश्न मनात यायचा - एखादी व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष विवाह बंधनात असूनही ( काहींचा  तर प्रेमविवाह असूनही ) अशा अनैतिक समजल्या जाणाऱ्या विवाहबाह्य संबंधात का अडकतात ?

काही दिवसांपूर्वी लोकसत्तामधील चतुरंग मध्ये नीलिमा किराणे यांचा " थोडी सी बेवफाई " हा लेख वाचला. दहा पंधरा वर्ष लग्नाला झाल्यावर नव्याची नवलाई संपल्यावर - दोघांत प्रेम असतानाही डोळ्यांतली  चमक कमी का होते ? या काळात काय बदलतं ? संवाद का थांबतात ? ट्रिप्स - लॉन्ग ड्राइव्हज चालू असतात ?  आणि हे सगळं सुरु असलं तरी तरी लग्नाआधीचा उत्साह-ओलावा नंतर टिकून राहतो का ? का नुसता  एक व्यवहार उरतो असा प्रश्न त्या लेखात आहे - आणि अशा वेळी स्त्री कामाच्या किंवा इतर ठिकाणी मैत्री झालेल्या पुरुषाच्या खूप नजीक जाते आणि सावरते अशा वेळी तिच्या नवऱ्याने तिला समजावून घ्यावे व तिचं सावरणं सांभाळून घ्यावं , अशी भावना तिच्या मनात का आली ही प्रगल्भता दाखवायला हवी ,असं या लेखात व्यक्त केलं होतं .

ही प्रगल्भता येणं सोपं नाही. यासाठी हे संबंध का निर्माण होतात आणि त्याचे परिणाम - दुष्परिणाम काय हे समजून उमजून घ्यायला हवं. असे संबंध निर्माण होण्यास फक्त शारीरिक आकर्षणच कारणीभूत ठरतं ?

कारण आकर्षणं ४ प्रकारची असतात - शारीरिक, बौद्धिक, सांपत्तिक-भौतिक स्वरूपाची आणि स्वभाव-गुण विषयक. आपल्याकडे बहुतेक वेळा शारीरिक आकर्षणातून किंवा सर्वसाधारण सामाजिक प्रवाहाप्रमाणे सांपत्तिक - भौतिक परिस्थितीत आकर्षित-प्रभावित होऊन लग्न होतात -  सुरुवातीचा प्रेम-आवेगाचा भर ओसरला किंवा सवयीचा झाला की तोच तोच पणा येऊन लग्न एक केवळ बंधन म्हणून राहतं आणि मग बाहेर काही  वेगळेपणाचं सुख बघायला सुरवात होते ? पण मग असे अनैतिक संबंध बौद्धिक किंवा स्वभाव-गुणांवर भाळून झालेल्या प्रेमविवाहानंतरही झालेल्यामध्येही काही वेळा आढळतात !!!

भावना , सामाजिक-कौटुंबिक बंधनं आणि याहीपेक्षा  एकमेकांवरील प्रेम- विश्वास यांवर लग्न टिकतं. पती किंवा पत्नी लग्नाबाहेर कोणाकडे आकर्षित झाले तर सुरवातीला त्या व्यक्तीकडे भावनिक - बौद्धिक दृष्ट्या आकर्षित झालो असे ती  व्यक्ती म्हणते - प्लॅटोनिक नातं आहे असं म्हणते - पण यात हळूहळू शारीरिक जवळीक आल्यावर आपण देवब्राह्मण समाजापुढे सात फेरे घेऊन - प्रेम विश्वासाच्या आणाशपथा घेतलेल्या, कायद्याने बांधले गेलेल्या कायदेशीर साथीदाराशी फक्त शारीरिकच नाही तर मानसिक विश्वासघात करतोय हा विचार कुठं जातो? इतर वेळी संस्कार, व्हॅल्यू यावर भर असताना - तेच संस्कार आपल्या मनात दुसऱ्याबद्दल असे विचार आले किंवा दुसऱ्याशी शारीरिक संबंध झाले हे आपल्या पत्नीला किंवा पतीला मोकळेपणानं  सांगायला उद्युक्त करतात का ?

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्यामुळे आता त्याला कळल्यावर, विश्वास तुटल्यावर  पुढं ते लग्न तोडायचं का चालवायचं? चालवायचं असेल तर कसं ? शारीरिक संबंध महत्वाचे का मानसिक?  एकमेकांचा विश्वास यापुढे कसा जपायचा? हे एकेमकांशी मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे.

आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध आहेत हे कळल्यावरही त्याला / तिला  बाहेर का होईना आनंद मिळतोय ना आणि घरातली बाकीची कर्तव्य ती पार पाडतीय ना? हा विचार करून एखादा माणूस लग्न टिकवण्याचा प्रयत्न करतो - हे सांगितलं तर काय वाटेल ? अशा काही केसेस असतीलही कोणी विश्वास ठेवणार नाही...पण मी अशी केस पाहिली आहे .

माझा एक जवळचा मित्र अतुल ( नाव बदललं आहे ) - तो अगदी ज्युनिअर कॉलेजमध्ये असतानाच  त्याच्याच सोसायटीत रहात असलेली आपल्या बहिणीची मैत्रीण त्याला आवडायची - कोवळ्या वयातलं एकतर्फी प्रेम असा काही प्रकार म्हणा ना - ती त्यावेळी शाळेत आठवी -नववीला - दोघांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर पुढं बघू असा विचार अतुलनं केला आणि त्यानं इंजिनियरिंगचा अभ्यास जोमानं सुरु केला . ती ही मुलगी कॉलेजमध्ये जाऊ लागली - पण अतुलचं दुर्दैव - त्याच्या तिच्याबद्दलच्या भावना तिला सांगण्याआधीच  तिची एका परिचित मुलाबरोबर जवळीक वाढली - आणि अतुलनं  तिचा विचार सोडला . पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं . त्या मुलाचं एका अपघातात दुःखद निधन झालं - नंतर अतुल इंजिनीयर झाला - नोकरीला लागला - यथावकाश जवळच रहात असल्यामुळे त्याने त्या मुलीबरोबर प्रेम संबंध जुळवले (यात त्या मुलीनंही पुढाकार घेतला) आणि त्यांचं लग्नही झालं. लग्नाच्या वेळी दोघांच्याही घरातून काही कारणानं पूर्ण पाठिंबा नव्हता -पण अतुल ठाम होता. पुढे घरात काही कारणानं कुरबुरी सुरु झाल्या - आणि काही वर्षांनी अतुल बायको-मुलासह जवळच वेगळ्या ठिकाणी राहू लागला. नवीन घरात आल्यावर त्यानं तिला पुढचं शिक्षण-नोकरी करायला प्रोत्साहन दिलं. पण तरीही ही बायकोची चिडचिड फार कमी झाली नव्हती - काही ना काही कारणं काढून ती भांडण काढायची - काही  दिवस गेल्यावर त्याला आपल्या एका मित्राबरोबर आपल्या बायकोचं प्रकरण असल्याचा संशय आला - कारण मोबाईलवर येणारे मेसेज. त्यानी तिला विचारलं - ती  म्हणाली की तो तिला चुकून पाठवतो - त्या मित्रानेही त्याची माफी मागितली . काही वर्ष गेली - तिचा आरडा ओरडा चालूच होता - अतुल तिच्या प्रेमाखातर त्याकडे दुर्लक्ष करायचा . नंतर त्याला काही प्रसंगांनी  त्याच्या बायकोमध्ये आणि त्या मित्रांत काही संबंध आहेत असा संशय आलाच पण त्याने आता बायकोला विचारणं सोडून दिलं  - या विचाराने की मुलगा आता मोठा झालाय - तसंही  इतर बाबतीत ती मुलाचं आणि त्याच सगळं करत होती. बदनामी होईल आणि तिच्या वरच्या प्रेमामुळे तिला बाहेर का होईना सुख मिळतंय असा काहीसा मूर्ख विचार. पण तो मित्र तिला नंतर ब्लॅक मेल करू लागला - तेव्हा तिने त्याच्याशी संबंध तोडले आणि पुढे ब्लॅकमेलिंग असह्य झाल्याने तिने तिच्या आईवडलांना सांगितलं -पण अतुलला नाही. त्या मित्राने नंतर ब्लॅकमेलच्याच उद्देशाने अतुलला संबंधाबद्दल आणि तिला दिलेल्या पैशांबद्दल सांगितलं. अतुलने  त्याला पैसे दिले व चांगलं दमात घेतलं -त्या मित्राच्या स्वतःच्या संसाराच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन - पुन्हा नादाला लागलास तर पोलीस केस करेन म्हणून बजावलं आणि त्याच्याशी संबंध तोडले. पण त्याचाही संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून प्रकरण पुढं नेलं नाही. या गोष्टी निस्तरताना त्याला आपल्या बायकोचं  आणखीही कुठं प्रकरण चालू असल्याची खात्री झाली - ती त्यानं कुणाला कळून दिलं नाही -. दोघांच्याही आईवडलांना म्हाताऱ्या वयात  त्यांची बदनामी -त्रास होऊ नये आणि आपलाही संसार पुढं चालू राहावा -  समाजात बायकोची - मुलाची -आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून त्यानं तिला दूर केलं नाही.. त्यात त्याचं  तिच्यावर आंधळं का असेना पण मनापासून असलेलं प्रेम होतंच !

 आश्चर्याची आणि गंमतीची गोष्ट ही की जिला अतुलच्या एखाद्या पार्टीत किंवा कधीतरी मित्रांबरोबर पेयपानावर तीव्र आक्षेप होता, तिनं विवाहबाह्य संबंधांसाठी ज्यांना निवडलं ते तर पक्के दारूबाज होते - अतुल समाजात त्याच्या व्यावसायिक , सामाजिक , बौद्धिक - इतर कलागुणांमुळे हवाहवासा होता. त्यापुढे ते फारच किरकोळ नाही पण कुठेच नव्हते. एरवी आपल्या चोखंदळ आणि उच्च आवडी -निवडी असणाऱ्या आणि एरवी धार्मिक कर्मकांड-वाचन करणाऱ्या तिने अशा माणसांशी अनैतिक संबंध कसे ठेवले याचं अतुलला राहून राहून आश्चर्य वाटलं !  तिचं म्हणणं असं की लग्नाच्या पहिल्या काही वर्षात नणंद - सासू सासऱ्यांकडून खूप त्रास झाला  आणि त्यात अतुलकडून तिला हवा तसा आधार मिळाला नाही - लग्नाआधीही तिला तिच्या आजीपासून त्रास अन्याय सहन करावा लागला होता - आणि अशा अनुभवांमुळे ती चिडचिडी झाली होती. आणि त्यामुळे तिच्याकडून आधारासाठी हे प्रकार घडले.

आता या गोष्टीत कोणाचं चूक कोणाचं बरोबर म्हणायचं ?  नातं तुटायचं  वाचलं पण तुटलेला विश्वास परत मिळवायला किती दिवस लागतील ? 

अनेक कारणांनी घुसमट होते आणि त्यातून पर्याय शोधले जातात हे मान्य जरी केलं, तरी घुसमटीबद्दल किती बोलायचं?  घुसमट झाल्यानंतर संवाद होणे महत्त्वाचं नाही का ? आणि तो संवाद समजूतदारपणे व्हायला हवा.

समजा एखाद्या पार्टनरने - अतुलसारखं आपल्या पार्टनरला  ओपन पार्टनरशिपचा स्वीकार करण्याचे ठरवलं तरी देखील ते सहज शक्य आहे का ? कारण एकच जरी पार्टनर असेल तरी त्याच्याबरोबर - कुटुंबात प्रॉब्लेम असतात,  तर मग मल्टिपल पार्टनर झाल्यानंतर प्रॉब्लेम कमी होतील का वाढतील हा विचार का होत नाही ?  आणि जरी अतुलसारखी मूक परवानगी असली तरी आपण ज्या दुसऱ्या पार्टनरशी संबंध ठेवत आहोत त्याच्या पार्टनरला त्याची संमती आहे का हा प्रश्न उरतोच की !!!

दुसरा पार्टनर शोधताना त्या पार्टनरशी तरी आपण ओपन आहोत का -  त्याची मानसिक स्थिती  कशी आहे - ती फक्त शारीरिक ओढ आहे आणि शारीरिक जवळीक  होणारच असेल का तर तो एचआयव्ही बाधित आहे का त्याच्या आणि आपल्या फॅमिलीवर काय परिणाम होऊ शकतो?   हा विचार कुठं जातो ? माणूस एक जनावरच आहे आणि कुठलेही जनावर एका पार्टनरबरोबर नसतो पण माणसाला एक जनावरांपेक्षा वेगळी एक गोष्ट असते ती म्हणजे भावना - संस्कार - विचार करण्याची शक्ती आणि नातेसंबंध ठेवण्याची-जोपासण्याची वृत्ती. यातून आपण कसे पुढे जाणार आहोत हा ही विचार व्हायला हवा.

आपण आपल्या लीगल पार्टनरसोडून दुसऱ्या पार्टनरबरोबर असू, तर त्याचे त्याच्या लीगल पार्टनरशिप आणि आपण सोडून आणखीन किती पार्टनर आहेत आणि अशा  किती श्रृंखला आहेत याचा विचार अशा संबंधात अडकलेले लोक विचार करतात का ? अशा संबंधांमुळे कदाचित तो HIV बाधित वगैरे तर नाही ना ? अशी शंकाही का येत नाही ?

माणसाला कायम चेंज हवा असतो - एकच शर्ट / ड्रेस / साडी रोज घातला / नेसला जात नाही  - रोज एकाच प्रकारचं अन्न आपण सेवन करत नाही - व्हरायटी लागते. एखादा म्हणेल रोज घरातली भाजीपोळी- वरणभात खाऊन कंटाळा आला तर बाहेर जाऊन चिकन मासे खाल्ले - श्रीखंड - थाळी- पंजाबी खाल्लं तर कुठं बिघडलं ? पण आपण त्याच त्याच हॉटेल मध्ये नेहमी जात नाही - एखाद हॉटेल आवडतं असलं तरी अनेकदा तिथंच जाऊन एकच पदार्थ परतपरत आपण घेत नाही. विविधता लागतेच. पण वस्तू आणि माणूस यात नक्कीच फरक आहे -नाही का ? बाहेर जेवायला जाताना आपण घरातले बरोबरच जातो ना ? आणि घरातही श्रीखंड बनतं... इतर पदार्थ बनतात - थोडे कष्ट पडतात पण घरी बनवलेले पदार्थात प्रेमाची विश्वासाची चव उतरतेच !

एक दुसरी व्यक्ती म्हणून आपण आपल्या पार्टनरच्या खाण्यापिण्याच्या, पेहरावाच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा वेगळी असली तरी मान्य करतो, ऍकनॉलेज करतो. मग एखादी दुसरी व्यक्ती स्त्री -पुरुष समोर आली आणि पटकन आपल्याला आवडली आणि त्याची व्यक्तता आपण आपल्या पार्टनर समोर केली तर दुसऱ्या पार्टनरने तेही ऍकनॉलेज करायला काय हरकत आहे ? कॉलेजमधला एका जुना मित्र किंवा मैत्रीण भेटली आणि जुनं  आकर्षण मनात आलं तर गैर नाहीच पण त्या आकर्षणातून पुढं काही तरी चुकीचं पाऊल उचलणं हे मात्र नक्कीच गैर ! हे आकर्षण आपल्या पार्टनरला मोकळेपणाने सांगणं आणि त्यानं ते ऍकनॉलेज करणं हाही मोकळेपणाच - कारण हे ऍकनॉलेजमेंट , आकर्षण यांचं रूपांतर पुढच्या चुकीच्या रिलेशनशिपमध्ये -नात्यात लगेच होत नाही - त्यात विचार करून पडतो - नाहीतर अविचाराची दुःखाची दरीच !

अशी प्रगल्भता येण्यासाठी प्रेमाबरोबरच विश्वास हवा - पारदर्शकता हवी - मग नातं मजबूत बनतं - एकनिष्ठता त्याच्यातूनच येते. लग्न जरी एकदाच होत असलं तरी त्यातली इन्व्हेस्टमेंट आपल्याला रोज करायला लागते आणि ती फक्त एकाकडून  नाही तर दोघांकडून व्हायला हवी. आपण जो पार्टनर स्वीकारला आहे तो त्याच्या गुणदोषासकट - आधी माहित असलेल्या किंवा नंतर माहिती झालेल्या गुणदोषांसकट  स्वीकारलं की नात्याचं फाउंडेशन मजबूत होईल .. नातं हे वन टाइम इन्वेस्टमेंट नाही दररोज त्याला खतपाणी घालायला लागतं रोपाला जपतो तसं... कारण नात्यावरती काम करावं लागतं - घर - कोणतीही वस्तू - गाडी - इन्व्हेस्टमेंट यांचं मेंटेनन्स देखभाल करायला लागते - तसंच  ते कोणत्याही नात्याचं - त्यातल्या त्यात कुटुंबव्यववस्थेचा पाया असलेल्या नवराबायकोच्या पवित्र नात्याचीही देखभाल दोघांकडून समजूतदारपणे व्हायला हवी . 

विवाहबाह्य संबंध -  एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या  नावातच आलेले आहे ना एक्स्ट्रा... शेवटी एक्स्ट्रा असलं तरी ते एक नातंच आहे आणि तिथेही पहिल्या नात्यापेक्षा एक्सट्रा  प्रॉब्लेमच आहेत. अशा संबंधात आपण आधीच असलेल्या नात्यात प्रॉब्लेम असताना आणखीन अनेक  प्रॉब्लेम वाढवून ठेवतो.  जसं  नातं एक्स्ट्रा आणि प्रॉब्लेमही एक्स्ट्राच. आणि कोणत्याही एक्सट्रा गोष्टीची किमंत एक्सट्रा द्यायलाच लागते - अगदी पिझ्झावर घेतलेल्या एक्सट्रा चीज टॉपींगलाही काहीतरी किंमत  दयावी लागते तर अशा  एक्सट्राच्या नात्यातील किंमत कधी  कधी खूप महाग - अगदी जीवघेणी ठरू शकते.

एरवी आचारविचारांत पवित्रता बाळगताना , लपून-छपून चोरून ठेवलेले संबंध हे पवित्र कसे असू शकतील?  कोणतंही कारण असो नात्यात पटत नसेल तर सरळ बाहेर पडावं हे उत्तम आणि नसेल तर मोकळेपणाने बोलून परत येऊन पूर्णपणे मनाने स्वीकारून आयुष्य चालू ठेवावं .

आपल्या आनंदाची जबाबदारी आपण स्वतःच घ्यायला हवी ....  नाती असावीत..एकमेकांना जीव लावावा..भरभरून करावं. पण एक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं की माझ्या सुखाची माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेची जबाबदारी माझी आहे ... समोरून त्या पूर्ण झाल्या तर छानच नाहीतर त्याने माझं आयुष्य अगदी  टांगणीला लागता कामा नये...कारण आपण आपली सोडून इतर कोणाचीच खात्री घेऊन शकत नाही...  की येस, ही व्यक्ती माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल, मला नेहमी सगळं देत राहील... दुसऱ्यानं  आपल्याला हवं तस वागावं असं वाटत असेल तर आपणही दुसऱ्याला हवं तसं वागण्याचा अपेक्षविरहित प्रयत्न करायला नको का? !!!

मग "हजार राहें मुडके देखी - कहीं से कोई सदा  ना आई - बडी वफासे निभायी तुमने हमारी थोडीसी बेवफाई " असं रडत बसण्यापेक्षा "कस्मे वादे निभायेंगे हम , मिलते रहेंगे जनम जनम " असं जोडीनी गात जगत राहण्यात किती आनंद आहे !!!!

शुभास्ते पंथानः संतु  !!!

नांदा सौख्यभरे !!!


©राहुल लाळे  


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका