गुरुपौर्णिमा ...माझ्या आयुष्यातले गुरु… सुश्री मंजुश्री ओक*

 *गुरुपौर्णिमा ...माझ्या आयुष्यातले गुरु… सुश्री मंजुश्री ओक*

राहुल






गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः

 गुरुर्देवो महेश्वरः,

गुरुः साक्षात्‌ परब्रह्म,...

 तस्मै श्री गुरवे नमः॥🙏🏻

गुरुरादिरनादिश्च

गुरू: परमदैवतं ।

गुरो: परतरं नास्ति....

तस्मै श्रीगुरवे नम: ।।


गुरुतत्व हे अनादी अनंत आहे. गुरू हेच श्रेष्ठ दैवत आहे. गुरुहून श्रेष्ठ दुसरे काही नाही. गुरूंना नमस्कार करून परवा मंजुश्रीची मुलाखत सुरु केली आणि तिच्या संगीत साधनेच्या विविध टप्प्यांवर तिला लाभलेल्या अनेक महान गुरुंच्या कथा - अनुभव ऐकून खरोखर भारावून गेलो .  पं हृदयनाथ मंगेशकर, खय्यामजी , ओ पी नय्यर, अरुण दाते - सुरेश वाडकर -रवी- राम कदम - आनंदजी - गुलशन बावरा - जॉली मुकर्जी - मनोहरीसिंग - शिवकुमार शर्माजी यापैकी कोणी एक जरी आपल्या आयुष्यात एक दिवस जरी संपर्कात आला तरी तो दिवस सुवर्णमय होईल. मंजुश्रीला तर हे  एकाहून एक दिग्गज कलाकार गुरु-मार्गदर्शक म्हणून लाभले - हे कल्पनातीत आहे - जणू सर्व आयुष्याचंच सोनं झालं.


आपल्या एकेका गुरूंबद्दल बोलताना मंजुश्रीचा एकेक शब्द अभिमानाने ओथंबून वाहत होता. मंजूकडून  एकेक आठवण ऐकताना उपस्थित श्रोत्यांसाठी जणू  अलिबाबाच्या गुहेचं एकेक दालनच उघडत होतं . हृदयनाथांनी पहिल्याच  दिवशी वज्रासनात ८ तास  बसवून ठेवणं, शेतात बसून बंदिश शिकवणं ,कार्यक्रमात अप्रतिम गायल्यावर आगळ्या प्रकारे कौतुक करणं ... ओ  पी नय्यरांचा वक्तशीरपणा - दिलदारपणा - आशाबाईंचं गाणं म्हणवून घेताना त्यांच्या  गाण्यातल्या खुब्या समजावून सांगणं सगळंच विलक्षण.


खय्यामजी - जगजीत कौरजी यांच्या कडून मंजू गाण्यातली जी सच्चाई शिकली तीच सच्चाई तिने सादर केलेल्या "दिल चीज क्या है " मधून दिसली . स्वतःच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचेच  कपडे वापरण्याची  खय्यामजींची आठवण डोळयांत पाणी आणून गेली.  रवीजी, अरुण दाते, मनोहरीसिंग , राम कदम, पं  शिवकुमार शर्मा सुरेश वाडकर आनंदजी - गुलशन बावरा - जॉली मुकर्जी इत्यादी  प्रभुतींच्या प्रभावाने  मंजुची गाण्याची साधना घडली. संगीतावर श्रद्धा जडली .


आपल्याच गुरूंकडून शिकताना त्यांची नक्कल न करता आपला स्वतःचा विचार गाण्यात दिसला पाहिजे हे मंजूने आवर्जून सांगितले. त्यातूनच गीत  सादरीकरणाची सुबक मांडणी होते -विचार आणि त्यातील वैविध्य जाणून घेतलं तर  नित्य काही नवीन करण्याची प्रेरणाच गुरूंच्या शिकवणीतून मिळते हे ही तिच्या बोलण्यातून जाणवलं. आणि हे फक्त संगीतातच नाही तर आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर सर्व विषयांत लागू होते.


आपले आई वडील हेच आपले पहिले गुरु हे सांगताना मंजूनी आपल्या वडलांच्या सांगितलेल्या आठवणींनी मला माझे वडील आठवले.


या सर्व गुरूंच्या कृपेमुळे व तिच्या अपार कष्ट- रियाझ -मेहनत व लगानमुळेच  ती  तिचा सांगीतिक प्रवास एवढ्या उंचीवर नेऊ शकली व इंडिया बुक - आशिया बुक तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सवर नाव नोंदवू शकली


मंजुची मुलाखत घेताना तिने सांगितलेल्या आपल्या गुरूंच्या आठवणी -  सादर केलेल्या गाण्याच्या झलकी यांच्यात श्रोत्यांबरोबर मीही न्हाऊन निघालो आणि तासाभराचा कार्यक्रम दीड  तासांपर्यंत कसा पोचला हे कळलंच नाही - कार्यक्रम सुरूच राहावा असं मलाही रसिक श्रोत्यांप्रमाणे वाटत होतं  पण  पुन्हा कधीतरी एक ३ तासांचा पूर्ण कार्यक्रम करायचा हे ठरवूनच सर्व गुरूंना पुन्हा एकदा वंदन करून विश्रांती घेतली.


आयुष्याची वाटचाल करतांना कायम फुलांच्या पायघड्या नसतात .. कितीतरी संकटांना सामोरं जावं लागतं ..सुख दुःखाचा मेळ घालावा लागतो ... आई वडील , गुरुजनांबरोबरच भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र मैत्रीण, शेजारी - कुणी अनोळखी व्यक्ती सारे सारेच आवाज देताच येतातं ... एका हांकेवर मदतीचा द्यायला येतात -दिलासा देऊन जातात .. संकटांना  सामोरं जाण्याचं बळं  मिळतं ते ह्या आपल्या माणसांमुळे.. शुभेच्छा ..आशीर्वाद ,निस्वार्थपणे  कुणाला मदत करणं त्यांना प्रेरणा देणं ..आयुष्याची वाटचाल सुखकर करणं ... ही तर  गुरुची कार्य ना?   ही सगळी सगळी मंडळी  गुरुचं आहेत .. .


जीवन म्हणजे अखंड वाहणारा आनंदाचा स्रोत आहे. आणि हा आनंद या भौतिक जगात जगत असताना आपली कर्म कर्तव्य पार पाडत  प्राप्त करता येतो हे गुरुंच्याच शिकवणीतून आपल्या आचरणात येतं .


गुरु आपणास मनाने निर्मित केलेल्या गोष्टींच्या मागे नाही, तर मनाला आपण निर्माण केलेल्या मार्गावरती चालण्याची कला प्रदान करत असतात. मनुष्य जेंव्हा आपल्या आत्मतत्वामध्ये  स्थित होतो तेव्हा गुरु स्वतः अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडत असतात. आपल्याला फक्त ते पकडता आले पाहिजे आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग बाकी काहीच उरत नाही. सर्व गोष्टी स्वतः गुरुच मार्गी लावतात. आणि हा देह कधी ईश्वरकृपाकिंत होतो हे समजत सुद्धा नाही.


सर्व गुरुजनांना साष्टांग नमस्कार


राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका