12th Fail...हारा वही जो लडा नहीं
#CinemaGully
*12th Fail ... हारा वही जो लडा नहीं*
राहुल लाळे
मागच्या महिन्यात माझा कट्टा वर IPS मनोज शर्मा आणि त्यांची पत्नी IRS श्रद्धा यांची मुलाखत पाहिली - त्यांची मुलाखतीतून चंबळ खोऱ्यातल्या बिलग्राम या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या बारावी नापास तरुणाचा नानाविध संकटातून तावून सुलाखून निघत अशक्यप्राय वाटणाऱ्या UPSC ची परीक्षा शेवटच्या प्रयत्नात पास करण्याचा आणि पुढेही एक IPS अधिकारी म्हणून सचोटीने सुरु असणारा प्रवास आणि त्यातल्या विलक्षण गोष्टी कळाल्या. त्यांच्या पत्नीने त्यांना UPSC च्या आणि नंतरच्या प्रवासात दिलेली साथ ( त्यांनी गेल्या सतरा अठरा वर्षात सराफाच्या दुकानाची पायरी चढलेली नाही - हे सिनेमात नाही ) हे ऐकून 12th Fail हा विधू विनोद चोप्राचा सिनेमा पहायचं ठरवलं आणि पाहिलाच - परवा OTT वर परत पाहिला.
कोणत्याही परीक्षेत नापास झालेल्या माणसाकडे पुण्या -मुंबईत कोणत्या नजरेने पाहतात - हे आपण जाणतो. गंमतीची गोष्ट अशी की दहावी-बारावी होऊन ३५ हून अधिक वर्ष उलटून गेल्यावर आणि आता आपल्या आयुष्यात मस्तपणे स्थिरस्थावर झालेल्या काही मित्रांकडे हे तेंव्हा नापास झाले होते असं म्हणणारे काही महाभाग मी पाहतो तेंव्हा हसायला येते. कॉपी करून फर्स्ट क्लासमध्ये पास होण्याची सोय असताना - एका कर्तव्यनिष्ठ डीएसपीची सत्यप्रियता पाहून त्याच्यासारखं बनू पाहणाऱ्या आणि बारावीची परीक्षा कॉपी न करता सेकंड मध्ये पास होऊन पुढे BA करून मनोज MPPSC ची परीक्षा द्यायला जातो पण पुढे UPSC मधला U ही माहीत नसताना IPS कसा बनतो हा अथक प्रयत्नांचा प्रवास अनुभवण्यासाठी 12th Fail जरूर पाहायला हवा.
सिनेमाचा गाभा ही जरी सत्यकथा असली तरी story telling - screenplay मधून तसंच योग्य पात्रांच्या निवडीतून सादरीकरणातून ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात विधू विनोद चोप्रा यशस्वी झाला आहे. सिनेमाचं premising चपखल झालंय - मग ते सुरवातीचा टॉप डाऊन कॅमेरा घेऊन चित्रित केलेला मनोजचा बारावीच्या परीक्षेच्या तयारीचा ( कॉपीच्या चिट्स बनवतानाचा ) पहिला सीन असो किंवा तो ग्वाल्हेर -दिल्लीला स्पर्धापरीक्षेसाठी - क्लासरूम - गौरीभैय्याचं घर आणि चहाचं दुकान ज्या ज्या ठिकाणी जातो ती ठिकाणं असोत - उत्तराखंड मध्ये श्रद्धाला भेटायला जातायेतानाची दृश्य असोत - किंवा UPSC मधली आणि मनोजच्या मुरैना गावातली दृश्य असोत - प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक पात्राचा जिवंत वावर यामुळे आपणही मनोज शर्माच्या प्रवासाचा एक भाग होऊन जातो. सिनेमाचे डायलॉग - प्रसंगांची गुंफण - पात्रांचं स्क्रीन वर येण्याचं टाईमिंग याबरोबरच या सर्वांसाठी आवश्यक असण्याचा ठिकाणांचा जिवंतपणा विधुविनोदने फार छान साधलाय.
काही सिनेमांचं एखादं थीम सॉंग किंवा टॅग लाईन असते - राजेश खन्नाच्या दो रास्ते मधली " इक बंगला बने न्यारा ", मी वसंतराव मधली "राम नाम जप करी सदा", तशीच एक इथे दिसते - " हार नहीं मानूंगा मैं , रार नई ठानूंगा मैं " . चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनमध्ये मनोजचे वडील ही कविता त्याच्या बहिणीला शिकवत असतात. आणि ही कविता नंतर सिनेमात मनोजवर येणाऱ्या प्रत्येक आव्हानात्मक प्रसंगात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे येते - मग तो प्रसंग त्याच्या आजीच्या मृत्यूच्या वेळी खचून जाणाऱ्या वडलांना अन्यायाविरुद्धचा लढा चालू ठेवण्यासाठी धीर देतानाचा असो किंवा UPSC च्या interviewच्या वेळी “तू जर सिलेक्ट झाला नाहीस तर” हा प्रश्न जेंव्हा परीक्षक विचारतात तेंव्हाचा असो किंवा UPSC च्या रिझल्टची वेळ असो - " हार नहीं मानूंगा मैं ' आणि गौरीभैय्याच्या दुकानात काचेवर लिहिलेलं "हारा वही जो लडा नहीं", हे वाक्य जणू ब्रीदवाक्यच बनून मनोजचं पात्र ,त्याच्या मनाची दृढता , त्याच्या मित्राच्या भाषेत त्याचं "अडियल " असणं हे अधोरेखित करायला मदत करतं .
पूर्ण सिनेमा हा मनोजचा मित्र प्रीतम पांडे याच्या निवेदनाने पुढे सरकतो आणि निवेदनानुसार समोर येणाऱ्या प्रसंगदृश्यांचं छान रोपण विधुविनोदनं पूर्ण सिनेमात केलंय .
मनोजच्या कष्टाचं महत्व आयआयटी च्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं कसं? हे सांगताना " एव्हरेस्ट शिखर पार करताना एडमंड हिलरी आणि ऑक्सिजन शिवाय एव्हरेस्ट सर केलेले शेर्पा " हे उदाहरण वापरणं म्हणजे रुपकाचा (metaphor) वापर. हा तर सिनेमात अनेकदा आढळतो. “ If I cannot be the Sun that shines the earth, I can be a lamp lighting up my street” हे रुपक तर IPS नाही झालो तर गावाकडे शाळेत शिक्षक होऊन पिढी घडवेन म्हणून सांगणं यासाठीच. तसंच यातलं "Restart" हे गाणंही.
काही सिनेमे चांगल्या दिग्दर्शनामुळे, मोठ्या कलाकारांच्या नावामुळे किंवा त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे, काही तंत्रज्ञान-सिनेमॅटॊग्राफीमुळे,काही गाणी-संगीतामुळे, कथेचा विषय-पटकथा यांच्यामुळे तर काही हे सर्व एकत्र आल्यामुळे आवडतात - व्यावसायिकरित्या यशस्वी होतात. काही हे सर्व जुळूनही चालत नाहीत - आवडतही नाहीत. विक्रांत बरोबरच श्रद्धा झालेली मेधा शंकर, गौरीभैय्या झालेला अंशुमन पुष्कर(जामतारा फेम) , पांडे-अनंत जोशी आणि सर्वांनीच आपापली पात्रं जीव ओतून जगवली आहेत. विक्रम मेस्सीसारखा एकमेव माहिती असलेला अभिनेता असूनही "12th Fail" सारखा एखादा सिनेमा आवडायचं कारण म्हणजे पडद्यावर अडीच तास अनुभवायला मिळणारी मनाला भिडणारी... एक अशक्यप्राय वाटणारी फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेणाऱ्या, चंबळ खोऱ्यातल्या एका तळागाळातल्या तरुणाची , यशस्वी संघर्षाची कथा. आणि त्यामुळेच सिनेमाचे इतर प्रभाग तेवढेच प्रभावी असूनही त्यांच्याकडे फारसं लक्ष न जाता आपण भारावून, त्या जिद्दीला सलाम ठोकून थिएटरच्या बाहेर पडतो.
इथं एक नमूद करायला हवं की जरी हासिनेमा एका अतिसामान्य पार्श्वभूमीतून येऊनही UPSC पास होणाऱ्या मनोज शर्माच्या कथेवर असला तरी तो UPSC कशी crack करावी हे सांगत नाही. वेळोवेळी इथं सांगितलं जातं की ही स्पर्धा परीक्षा पास होऊन IAS होणं हा साधा प्रवास नाही कारण या स्पर्धेचा १ टक्क्याहून कमी असलेला सक्सेस रेट. ज्या परीक्षेच्या प्रवासात दहा लाखाहून अधिक जण सुरुवात करतात आणि जास्तीत जास्त ८००-१००० पर्यंत शेवटी यशस्वी होतात. हे सत्य ही या सिनेमात वेळोवेळी उजागर केलंय . ही स्पर्धापरीक्षा म्हणजे एक सापशिडीचा खेळ आहे हे गौरीभैया सांगतो ते याचमुळे. हा प्रवास दुर्दैवाने यशस्वी होऊ शकला नाही तर प्लॅन B असणं महत्वाचं हेही हा सिनेमा अधोरेखित करतोच. पण हा UPSC चा प्रवास असो किंवा इतरही कुठल्या ध्येयाचा प्रवास धैर्याने चालू ठेवण्यासाठी - " जजबा आता है उम्मीदसे और मनोज जैसा एक भी बंदा UPSC पास होता है तो हजारोंकी उम्मीद जिंदा रहेगी", "कुर्सीसे आपकी नहीं तो आपसे कुर्सीकी किंमत बढे", "बाहर के अंधेरेसे नहीं अंदरकी अंधेरेसे लडो" असे संवाद हा विश्वास दृढ करण्यासाठीच.
"Journey To Destination is More Beautiful than the Destination " असं म्हणतात खरं, पण या विलक्षण यशाला गवसणी घालताना जो खडतर प्रवास मनोज शर्मांनी जिद्दीने,प्रामाणिकपणाने अविरत कष्ट घेऊन पूर्ण केला, जणू काही आपणंच तो करत आहोत असं वाटत राहातं.
12th fail फार चालणार नाही हे सुरुवातीचा प्रतिसाद पाहून वाटलं होतं. पण मुखप्रसिद्धीतून महिन्याहून अधिक काळ हा थिएटरमध्ये टिकून राहिला आणि आता OTT वरही चांगला रिस्पॉन्स मिळतोय बघून आनंद वाटला. IMDB वर मिळालेलं ९.२ रेटिंग उगाच नक्कीच नाही. जवान ,पठाण - ऍनिमल यांची बरोबरी करण्याची गरजही नाही कारण फक्त २० कोटीच्या आसपास निर्मितीखर्च असलेल्या चित्रपटाने ८०-९० कोटी कमावले असतील तर निश्चितच कौतुकास्पद आहे.
उडायला शिकताना पक्षी पंख फडफडवतात, छोट्या मोठ्या भराऱ्या मारतात , जिद्द न सोडता प्रयत्न करत रहातात , अपेक्षित आभाळ गाठता आलं तर चांगलंच... पण दुसरा मार्ग निवडण्याच्या प्रवासासाठी पंख तर मजबूत होतील, हा विश्वास अनुभवण्यासाठी आणि " हारा वही जो लडा नहीं" हा संदेश मनात रुजवण्यासाठी हा सिनेमा पहा आणि आपल्या लहान-तरुण मित्रांना पाहायला उद्युक्त करा.
©राहुल लाळे


Comments
Post a Comment