एक मस्त वीक एंड.
एक मस्त वीक एंड...झपूर्झा.. पुणे पुस्तक महोत्सव
शनिवारी मला सुट्टी असतेच पण बायकोला नाही... सोमवारी ख्रिसमस त्यामुळे तिला यावेळी सलग तीन दिवस सुट्टी
मला मात्र सोमवारी ऑफिस आहेच..
पण शनिवार रविवारची एकत्र आलेली सुट्टी कारणी लावलीच..
शनिवारी खडकवासला धरणाच्या, पिकॉकबेच्या थोडंसं पुढे असलेल्या कुडजे येथे पीएनजी ज्वेलर्सने उभं केलेल्या "झपूर्झा" या कला व संस्कृती संग्रहालयास भेट दिली. जीवनाला समृध्द व संपन्न करण्यात कला व संस्कृती यांचा वाटा खूपच मोठा आहे आणि आपल्या देशाला तसंच महाराष्ट्रालाही विविध कलांचा तसंच संस्कृतींचा मोठा वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी सरकारबरोबर अनेक नामवंत संघटना, संग्रहालयं कार्यरत आहेत... झपूर्झामधे देखील या कलांची व संस्कृतींची ओळख करून घेतानाच त्यासोबतच आवडही निर्माण होते व एका छोट्याशा पर्यटनाचा आनंद ही मिळतो.
झपूर्झात वेगवेगळ्या विषयांवर आधारित वस्तू प्रदर्शन करणारी दहा गॅलरीज.. कलादालनं आहेत. तीत भारतातील प्रसिद्ध कलाकारांची.. रविवर्मा, रविंद्रनाथ-अबनींद्रनाथ-गगनेंद्रनाथ टागोर, चुगताई, आबालाल रहमान, प्रभाकर कोलते, बाकरे, एन एस बेंद्रे, लॅंगहॅमर, आलमेलकर, हळदणकर, बाबूराव पेंटर, धुरंधर, माधव सातवळेकर इत्यादींची चित्र व अनेक दिग्गजांची शिल्पं आहेत.. साड्या -पैठण्यांचे, सोन्याचांदीच्या दागिन्यांचे जुने विविध प्रकार, जुन्या घरगुती वस्तू, नानाविध प्रकारचे दिवे, जुने टी सेट्स अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत. निरनिराळ्या कार्यशाळांत लहानमोठे सगळेच रंगकाम , शिल्पकला , पॉटरी यात सहभाग घेता येतो. अशाच एका कार्यशाळेत तिथल्या एका कलाकाराकडून आमचं कॅरीकेचर काढताना आणि नंतर पहायला मजा आली.
इथल्या खुल्या ऍम्फी थिएटरची ६०० जणं तर मिनी थिएटरमध्ये २००जण बसू शकतात..इथं नृत्य नाट्य, संगीत, चित्रपट, तसेच अनेक विषयांवर परिसंवादही होतात . आम्ही होतो तेंव्हा जितेंद्र भुरुक यांचा ओ मेरे दिल के चैन हा किशोर कुमारच्या गाण्यांचा कार्यक्रम होता.. सात एकर जागेवर वसलेल्या झपूर्झाचं लॅंडस्केपिंग ही सुरेख केलंय. मस्त हिरवळ, खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरच्या बॅकग्राऊंडवर सर्व परिसर फारच निसर्गरम्य दिसतो. नदीच्या कडेला एक छोटंसं शिवमंदिर आहे. दर्शन घेऊन कडेच्या बाकावर बसून निळ्याशार जलाशयाकडे पहाताना डोळ्यांबरोबरंच मनही शांत झालं. झपुर्झात पूना गेस्ट हाऊस संचालित कॅफेत अस्सल मराठी खाद्यपदार्थां बरोबर इतरही अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. खमंग थालीपीठ आणि कोथिंबीर वडी व ताकाचा आस्वाद घेतला.
लवकरच झपूर्झात रिसॉर्ट प्रमाणे कॉटेजेस होणार आहेत असं कळालं आणि पुन्हा लवकरच भेट द्यायचं हे ठरवून घरी निघालो.
रविवारी पुस्तक महोत्सव
फर्ग्युसन कॉलेज ग्राउंडवर आठवडाभर चालू असलेलं पुणे पुस्तक महोत्सव आज रविवारी संपणार होतं, म्हणून दुपारी मुद्दाम फर्ग्युसन कॉलेज ग्राउंडवर गेलो. शेवटचा दिवस असूनही पुणेकरांनी भरपूर गर्दी केली होती. प्रवेशद्वारावरंच प्रसिद्ध निवेदक श्री मिलिंद कुलकर्णी यांची गाठ पडली. मिलिंदजींच्या टिप्स घेऊन पुस्तक प्रदर्शन पाहू लागलो. रसिक साहित्य, रोहन, दिलीपराज, मेहता पब्लिकेशन, साधना, मॅजेस्टिक आणि अनेक स्टॉल्सवर भरपूर पुस्तक खरेदी करून अनेक इतर पुस्तकांची नावं पुढच्या वेळच्या यादीत टाकली.
रविवारचा सुटीचा दिवस असल्याने वाचनप्रेमींची गर्दी वाढतच होती.. एकीकडे आपल्या आवडत्या साहित्य प्रकारातील पुस्तके हातात घेऊन चाळणारे, खरेदी करणारे नागरिक...
आणि मोठ्या उत्सुकतेने गोष्टींच्या पुस्तकांमध्ये रमलेले बालगोपाळ वाचक अशा वाचनास उत्सुक असणाऱ्या वाचकांचा उदंड प्रतिसाद व उत्साह आणि अलोट गर्दी पाहून...अन् पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली अलोट गर्दी पाहून वाचनसंस्कृतीचं भविष्य उज्ज्वल आहे हे मात्र जाणवलं.
राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात दुसऱ्या दिवशी जवळपास दोनशेहून अधिक स्टॉल्स होते व विविध भारतीय भाषांमधील लाखो पुस्तके येथे होती.
बाजूला असलेल्या फूड प्लाझा मध्ये पोटपूजा केली आणि पुस्तकांचं गोड ओझं सांभाळत गाडीकडे पावलं वळवली...
दोन दिवस सुट्टीचे मस्त गेल्यामुळे सोमवारी कामावर जायचा उत्साह मात्र वाढलाय.
©राहुल लाळे
२४-१२-२०२३









































Comments
Post a Comment