सेवाधाम
*सेवाधाम वृद्धाश्रम... जगायचं तर गुणगुणत*
राहुल
आज सकाळी सेवाधामला भेट देऊन तेथील संचालिका प्रतिभाताई पायगुडे यांचा 75 वा वाढदिवस साजरा करून , त्यांना शुभेच्छा देऊन आणि वृद्धाश्रमातील इनमेट्स ना भेटून खूप सारे समाधान मिळवून परत आलो🙏🏻
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या सेवाधाम वृद्धाश्रमात साधारण ८-१० वर्षांपूर्वी माझ्या कंपनीतल्या सहकाऱ्यांबरोबर पहिल्यांदा गेलो आणि नंतर जातच राहिलो . सौ प्रतिभाताई पायगुडे ज्या सेवाधामच्या संस्थापिका, चालिका आणि सर्वेसर्वा आहेत - त्यांची एकांडी तपश्चर्या गेली अनेक वर्षं पाहतोय आणि आम्ही सारेच मित्र काही ना काही कारणांनी त्यांच्याशी जुळलो गेलोय. मेडिकल चेकअप , स्वच्छता , सोलर प्लांट , मॅट्रेसेस , ईझी ड्रायिंग, अर्थसहाय्य अशी अनेक कामं करून सेवाधामशी संपर्कात आहोतच. श्रावण, गणपती, भजन-गाण्याचे कार्यक्रम करून तेथील वृद्धांचे मनोरंजन पण काही वेळा केलं आहे. गेल्या काही वर्षांत तिथले बरचसे चेहरे बदलले आहेत - आश्रमातले रहिवासी आणि काम करणारेही (काळाआड गेलेत😞)
- पण प्रतिभाताई चिकाटीने - श्रद्धेनं - मनापासून हसतमुख चेहऱ्याने सर्व करतात - अगदी स्वयंपाक -वृद्धांना अंघोळ घालण्यापासून निरनिराळ्या संस्थांशी,आमच्यासारख्या लोकांशी संपर्कात राहून सेवाधामचा घेतलेला वसा नेटानं पुढे नेत आहेत. हे सर्व करताना हे काम किती मोठं आहे आणि आपण फक्त ठिगळं लावतो आहे असं मला कायमच वाटतं .
समाजात अशा अनेक प्रतिभाताई आहेत- ज्या एकट्या किंवा तुटपुंज्या मदतीनेही आकाशालाही ठेंगणं करतील अशी कामं करतायत. त्यांना आणि प्रतिभाताईंनाही मानाचा मुजरा
अशी कामं पाहून एकंच धडा घ्यावासा वाटतो ....
(मंगेश पाडगावकरांची माफी मागून)
जगायचं तर गुणगुणत- हसत खेळत
ना की रडत खडत
का वाट पहायची कोणाची दिव्यासाठी
आपल्यासाठी प्रकाश आपणच व्हायचं
अर्ध्या पेल्याला अर्धा भरलेला म्हणूच
पण तो भरलेला कसा राहील ते पण पाहू
कोणी तरी कायम आठवण काढेल असेच काम करू
नको कोणाचे शाप नको कोणाला शाप
पण दुवा मिळतील असेच काम करू
माहितीये आम्हालाही काटे लागुनच गुलाब मिळतात
गुलाबाच्या काट्यांतून बागा फुलवू
जगायचं तर गुणगुणत- हसत खेळत
ना की रडत खडत
©राहुल लाळे











Comments
Post a Comment