याना केव्हज्

याना केव्हज्
राहुल लाळे













लहानपणी भस्मासुराची गोष्ट ऐकली होती...भस्मासूर शंकराची भक्ती करत तपश्चर्या करतो आणि शंकर जेव्हा प्रसन्न होऊन वर देतो... तेव्हा मागतो काय तर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन त्याचं भस्म होऊ दे. मग काय चालला गडी याच्या डोक्यावर हात ठेव...त्याच्या डोक्यावर हात ठेव.....नंतर तर वर देणाऱ्या दस्तुरखुद्द शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला गडी...शंकरबाप्पा काही गडबडला नाही... पण त्यानेच नेहमीच्या भोळेपणाने  वर दिला असल्याने स्वतः काहीच करु शकत नसल्याने त्याने श्रीविष्णूंना पाचारण केले...विष्णू ही आले मोहिनीरुपात भस्मासुराला मोहित करायला... मग काय मोहिनीच्या रुपाने वेड लागून करतोय भस्मासुर ती करेल तसं...ती धावतेय हा धावतोय...ती हसली का हा हसला... ती नाचायला लागली हा ही...नाचता नाचता तिनं जेंव्हा स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला तेंव्हा या गड्यानंही तेच केलं की...मग काय झालं भस्मं...काळं...राख

आता तुम्ही म्हणाल राहुलला काय झालं...ही माहिती असलेली पुराणातील गोष्ट परत काय सांगतोय...आणि वर नाव याना केव्हज्.

तर झालं असं की...कोस्टल कर्नाटकात भटकंती करायला जाताना कित्तूर.... यल्लापूरहून गोकर्ण रस्त्यावर 'याना' असं इंग्रजीत  लिहिलेला मैलाचा दगड दिसला. याना नाव जरा  आकर्षक वाटलं म्हणून एकेठिकाणी विचारलं तर फारसं काही कळते नाही...नंतर पुढं कुठंच तो बोर्ड दिसलाच नाही, दिसला नाही म्हणण्यापेक्षा येणाऱ्या सर्व खुणा, मैलाचे दगड कन्नडमधे..आणि जे काही इंग्रजीत आले त्यात उल्लेख आला नाही... जीपीएसनी पण दिशा चुकवली...मग सरळ गोकर्ण करुन मुर्डेश्वरला आल़ो..

पण 'याना' या नावाने पिच्छा सोडला नव्हता...नेट सर्च केलं तर एकदम भारी फोटो आणि वरची गोष्ट वाचायला मिळाली...की भस्मासुरानं मोहिनीरुपात आलेल्या विष्णूला भुलून डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं जे भस्म झालं ते या 'याना' च्या आसपास पडलं आणि तिथली वाळू, माती, कडे राखेच्या रंगाचे झाले.

मुर्डेश्वर बघून झाल्यावर उत्तर कर्नाटक जिल्ह्यातीलच (या भागाला उत्तर कर्नाटक का म्हणतात हा प्रश्नच पडला होता. बऱ्याच पाट्यांवर  UK असं लिहिलेलं हे UK म्हणजे उत्तर कर्नाटक हे नंतर ध्यानात आलं) 'याना'ला भटकंतीच्या प्लॅन मध्ये घेतलं.

तरीही प्रवास फारसा सुखाचा नव्हताच. इथले रस्ते म्हणजे दिव्यच होते. हायवेचे काम चाललेले...मधेच डायवर्जन..कधी डावीकडे तर कधी उजवीकडे... गंमत म्हणजे बंद केलेल्या रस्त्यावर ही डायव्हर्ट केलेल्या रस्त्यासारखे दोन्ही बाजूंनी वाहतूक. जीव मुठीत घेऊनच ड्रायव्हिंग. त्यात साईनबोर्डसची बोंब... कन्नडमधे...GPS मैत्रीणीने पण गंडवलं...मग त्यावरून गाडीत वादविवाद...कशाला GPS खिडकीची काच खाली करून विचार की...इत्यादी... पण विचारायचं काय कपाळं ...एखाद्या व्यक्तीला विचारावं तर त्याला कन्नड शिवाय भाषा येत नाही आणि ज्याला हिंदी इंग्रजी यावं त्याला  'याना' हे नावंच माहीत नाही. एका ठिकाणी एकानं सांगितलं तर कळालं की एक फाटा २०-३० किमी अलीकडेच येऊन गेला..झालं मग त्यावरून पुन्हा वादंग..

असंच विचारत विचारत शिरसीच्या रस्त्यावर एक फाटा यानाकडे जातो हे एका टेम्पोवाल्याकडून कळलं ...पण पुढे मोबाईलची रेंज गेली... हायवे सोडल्यावर मात्र रस्ता छोटा असला तरी टकटकीत आणि जवळपास बिन ट्रॅफिकचा होता

एक वनखात्याचा अडथळा २०-२५ किमीवर लागला... बोर्ड परत कानडीतच...पण तिथल्या सिक्यूरिटिनं मोडक्या हिंदीत तोच यानाकडे जाणारा रस्ता आहे हे सांगितल्यावर जीव भांड्यात पडला. . आणि यापुढचा रस्ता म्हणजे जंगलवाटच होती.... काही वस्ती नाही, घनदाट जंगल, बोर्डस नाहीत. साधारण २०-२२ किलोमीटर गेल्यावर रस्ता संपला आणि 'याना' असं इंग्रजी मध्येही लिहिलेली कमान दिसल्यावर उडी मारायचंच राहिलं होतं.

गाडी लावून पुढं आल्यावर तिथं सिक्युरिटी कम स्थानिक रहीवासी कम एक टपरीवजा दुकानमालकानं पुन्हा एक बॉम्ब टाकला. २-२.५किमी चढायला लागेल म्हणाला. एरवी चालणं, डोंगर चढणं आवडतं असलं तरीही एवढं ड्रायव्हिंग करून आल्यावर जरासा कंटाळा आला होता. पण इथवर एवढं दुरुन
आल्यावर परत फिरणंही शक्य नव्हतं.

मस्त दाट झाडी,झरे यातून तो डोंगर पायवाट, पायऱ्या चढून गेल्यावर जे दृश्य दिसले त्यामुळे पूर्ण प्रवासाचा थकवा, शिणवटा निघून गेला. भैरवेश्वरशिखर आणि मोहिनीशिखर असे कडे ज्यांचे आकार कधीच प्रत्यक्षात पाहिले नाहीत... हरीसन फोर्डच्या इंडियाना जोन्स मध्ये किंवा कुठल्याश्या इंग्लिश मूव्हीत पाहिले असावे असे कडे समोर पाहून मती गुंग झाली.

भैरवेश्वर चे दर्शन घेऊन त्याला त्याच डोंगरात...भैरवेश्वरशिखराच्या पोटातील गुहेतून एक  अर्ध्या एक  किमीची  प्रदक्षिणाही मारली. थंड पाण्याने तोंड धुऊन परतीच्या प्रवासासाठी डोंगर उतरायला सुरवात केली.

कोस्टल कर्नाटकात गेलात तर जरुर जा. गोकर्ण पासून साधारण ५० किमी अंतरावर आहे.

बाकी भस्मासूर... शंकर भगवान... मोहिनी गोष्ट काही का असेना... 'याना' ची ट्रेकट्रिप अविस्मरणीय झाली.

©राहुल लाळे
१८-११-२०१८

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका