रंगपंचमी
*रंगपंचमी*
राहुल
काही रंग ममतेचे
मातृपितृ हृदयाचे
काही रंग वात्सल्याचे
बोबड्या बोबड्या बोलांचे
काही रंग भक्तीचे
मीरेच्या वाणीचे
काही रंग शक्तीचे
आदिमायेच्या कटाक्षाचे
काही रंग विश्वासाचे
मित्रत्वाच्या नात्याचे
काही रंग प्रीतीचे
सखीच्या भावभावनांचे
काही रंग त्यागाचे
आप्तांसाठी झोकून द्यायचे
उधळुनी हे रंग सारे
रंग खेळू जीवनाचे
©राहुल लाळे 🌈
रंगपंचमीच्या निमित्ताने रंगांची ही गाणी जरुर ऐका
सख्या चला बागामंदी ...,३:२७
अगं नाच नाच राधे...५:२८
आज गोकुळात रंग खेळतो हरी...३:४२
रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा...५:३१
अवघा रंग एक झाला...५:३५
चित्र....विकास पाटणेकर
---------------------------:
रंगपंचमी एका अस्सल मराठी सणाचा मृत्यू
एक सण जो फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो (किंवा केला जायचा ☹️)
हो, आपला एक अस्सल आणि महाराष्ट्राचा USP असलेला असा एक सण मरणाच्या दारात आहे.
90 च्या दशकात किंवा त्या पूर्वी जे मराठी शाळेत असतील त्यांना आठवत असेल की त्या सणाला शाळेला सुट्टी पण असायची जी आत्ताच्या गेल्या 15-20 वर्षांपासून मराठी मुलांना मिळत नाही त्यामुळे आजकालची मुले तो सण जवळपास विसरत चालली आहेत.
तो आपला सण म्हणजे रंगपंचमी. 😪
हिंदीबहुल लोक वाढल्यामुळे असेल किंवा बॉलीवूड मधून 'शोले' पासून होणाऱ्या होली है च्या माऱ्यामुळे असेल किंवा इतर काही कारणांमुळे असेल आपण आपला एक अस्सल मराठी सण जो फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो तो आज हरवून बसलोय.
धुलिवंदनालाच होली है म्हणत रंग खेळलो मग आता परत पाच दिवसांनी कशाला खेळायचे असं म्हणून आपला मराठी सण अडगळीत टाकला जातोय.
याला मराठी माणसाचा न्यूनगंड देखील कारणीभूत असू शकेल किंवा हिंदी इंग्रजी चे सांस्कृतिक अतिक्रमण कारणीभूत असेल....पण दुसरा सण साजरा करताना आपला एक मराठमोळा सण आपण अडगळीत का टाकावा याचे उत्तर मला मिळाले नाही.
धुलिवंदन खेळा, होळी खेळा पण आपल्या हक्काच्या रंगपंचमीला फाटा का द्यावा?
कारणे काहीही असतील पण उपाय शोधणे गरजेचे आहे. अर्थातच हे सो कोल्ड फॉरवर्ड-मॉडर्न म्हणवून घेणाऱ्या किंवा मराठी संस्कृतीला डाऊन मार्केट समजणाऱ्या घेणाऱ्या लोकांकडून अपेक्षित नाही तर ज्यांना मराठी संस्कृतीबद्दल आस्था आहे त्यांच्याकडूनच अपेक्षित आहे.
उपाय काय:
■ आपापल्या मुलांना धुळवड-होली बरोबरच रंगपंचमी खेळायला प्रवृत्त करणे.
■ मुलांच्या शाळांमध्ये रंगपंचमीच्या सुट्टीसाठी एकत्र येऊन मागणी करणे.
■ IT कंपन्या किंवा इतर अस्थापनांमध्ये सुद्धा रंगपंचमीला सुट्टीची मागणी करणे.
■ मराठी मीडिया होली है च्या नावाने उगाच नाचत असतो त्यांना आवर घालून रंगपंचमीच्या दिवशी तेवढाच उत्साह दाखवण्यास सांगणे.
असे आणखीही काही उपाय करता येतील....पण हा सण जगला पाहिजे.
यामध्ये कुठल्याही इतर सणाला बंद न करता किंवा त्यात कमी न करता आपला रंगपंचमी सण मरणाच्या दारातून परत आणणे एवढाच उद्देश आहे.
- मराठीप्रेमी



Comments
Post a Comment