गिरनार परिक्रमा

 *गिरनार परिक्रमा*

राहुल लाळे



























परिक्रमा म्हणलं की अनेकांना नर्मदा परिक्रमाच डोळ्यासमोर येते. यावर्षी मार्च मध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा विलक्षण अनुभव घेतला होता. गेली काही वर्ष गिरनार परिक्रमेबद्दलही बरंच ऐकलं होतं.

या वर्षी जुलै महिन्यात गुरुपौर्णिमेला गिरनारला गुरुशिखराचे दर्शन घेण्याचा योग आला होता. मागच्या वर्षी ( २०२२) मध्ये गिरनारला गेलो असताना तिथं असलेल्या स्पर्धेमुळे दुपारी चढायला लागलं होतं - आणि दुसऱ्या दिवशी परत निघायचं होतं म्हणून आम्ही रोप वे ( उडन खटोला)ने  अंबा मातेच्या देवळापर्यंत गेलो होतो आणि नंतर पुढच्या ५००० पायऱ्या चढलो. यावर्षी मात्र इतरांनीं  उडन खटोला वापरला पण आम्ही दोघे व इतर दोघे पूर्ण १०००० पायऱ्या चढलो आणि उतरलो - पावसाळी हवा आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे आणि तसंच अंबा माता - गोरक्षनाथ आणि ब्रम्हमुहूर्तावर झालेलं श्री गुरुदेवदत्तांचं प्रसन्न दर्शन व नंतर कमंडलू क्षेत्रात ग्रहण केलेला प्रसाद यामुळे थकवा जाणवलाच नाही. रात्री दहा वाजता चढायला सुरुवात केली आणि सकाळी ७:३० वाजता मुक्कामी पोचलो देखील.


 मागच्या वर्षी तारिणीने  (बायको) गिरनार परिक्रमाही पूर्ण केली आणि तिच्याकडून व इतरांकडून ऐकलेल्या वर्णनामुळे गिरनार परिक्रमा करायचं या वर्षी मनावर घेतलंच.


दरवर्षी देव दिवाळीत म्हणजे कार्तिकी एकादशी  ते कार्तिकी पौर्णिमा या काळात गिरनार परिक्रमा केली जाते. शिव-पार्वती विवाहासाठी या काळात  सर्व देव-देवता , ऋषी, नवग्रह ,अष्ट सिद्धी, अष्ट वसू, कुबेर भंडारी  सर्व गिरनार परिसरात -जंगलात राहायला आले होते आणि अजूनही येते यावेळी इथं असतात अशी धारणा आहे. त्यामुळेच दरवर्षी या काळात  लाखो जणांचा जनसमुदाय इथे जंगल भाग असूनही परिक्रमा करण्यास येतो.


यावर्षीची परिक्रमा २३ तारखेला सुरु होणार होती- सुरवातीचे दोन दिवस गर्दी जास्त असेल म्हणून आम्ही २५ तारखेला रात्री परिक्रमा करायचं ठरवलं. २४ तारखेला  संध्याकाळी पुण्यातून इंटरसिटी एक्सप्रेसने मुंबई आणि रात्री ११ च्या हापा ड्युरँटोने राजकोटला रवाना  झालो. सकाळी ठीक नऊ वाजता राजकोटला पोचलो. स्टेशनवर चहा- ढोकळ्याचा आस्वाद घेऊन पुण्याचे आम्ही नऊजण आणि मुंबईहून जॉईन झालेले १२-१३ अशा सगळ्यांनी  एका ट्रॅव्हलर ने जुनागढ कडे कूच केले. गर्दीमुळे सर्वांची राहण्याची सोय वेगवेगळ्या ठिकाणी होती त्यामुळे जुनागढला पोचल्यावर पटेल रेस्टॉरन्टमध्ये मस्तपैकी गुजराथी थाळीवर ताव मारला ( इथं एक बाहुबली थाळी मिळते - ती दहा बारा जणांना पुरेल एवढी - एकट्याने संपवली तर ५०००रु बक्षीस आहे असं कळलं ) आणि आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचते झालो. दोन तीन विश्रांती व नंतर आवरून सगळे भवनाथ - तलेठी ला पोचलो. आम्ही जुनागढला उतरलो असल्यामुळे तिथल्या एसटी स्टँडवरून खास तलेठीसाठी सोडलेल्या बसने तलेठीला गेलो. भयंकर गर्दीतून जाऊनही समोर दिसणाऱ्या गुरुशिखर व त्याच्या भाळावर असलेल्या चंद्राला पाहून मन प्रसन्न झाले.


पुण्या-मुंबईहून  आलेलो आम्ही सारे २२-२३ जण तलेठीतल्या दुधेश्वर मंदिराजवळ असलेल्या कमानीपाशी जमलो. चहा घेऊन गुरुशिखराला व भूमीला वंदन करून   एक ग्रुप फोटो काढून साधारण संध्याकाळी ७:०० वाजता परिक्रमेला  सुरवात झाली.  सगळ्यांनी बरोबर दंड ( काठी) , पूर्ण चार्ज असलेला मोबाईल - बॅटरी - पाणी - थोडा सुकामेवा - चघळायला गोळ्या आणि काहीजणांनी थोडे खाद्यपदार्थही बरोबर ठेवले होते.


गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे. परिक्रमेचा सुरुवातीचा  टप्पा - रस्ता  चांगला आहे - वाटेत दोन्ही बाजूला मोठे आश्रम दिसतात. इथं मुक्कामाची सोय असते , पण ४-५ महिने आधी  बुकिंग करावं लागतं . अंधार पडला असल्यामुळे गिरनार पर्वतावरचे दिवे - पौर्णिमा जवळ असल्यामुळे आकाशातला चंद्र फारच विलोभनीय दृश्य होते. वाटेत एक कमान लागली आणि ती पार केल्यावर  जंगल सुरु झालं . सुरवातीला पायवाटेवर मधून मधून दिव्याची सोया होती पण जसजसं जंगल सुरु झालं तसतसं दिवे विरळ होऊ लागले .  ही परिक्रमा पूर्णपणे  जंगलातून आणि तीन डोंगरातून जातो त्यामुळे सगळ्या परिक्रमा मार्गात दिवे असणं केवळ अशक्य - तरीही सुरवातीच्या आणि शेवटच्या ८-१० किमी मध्ये आणि ज्याठिकाणी थोडं मैदान - पठार आहे तिथं दिव्यांची सोय आहे. चहा-पाणी , लिंबू पाणी - खाद्यपदार्थ, शहाळं यांचेही स्टॉल्स या परिसरात आहेत. एवढ्या डोंगराळ भागात हे स्टॉल्स - सामान कसं  नेत  असतील - कमालच आहे !!   हे स्टॉल्स जिथं आहेत तिथं दिवे आहेत पण मधल्या डोंगराळ भागात मात्र पूर्ण अंधार - डोळ्यात बोट घालूनही दिसणार नाही अशी परिस्थिती- त्यामुळे मोबाईल चार्ज असणं - फ्लॅशलाईट साठी ( कारण मध्ये रेंज असेलच असं नाही ) किंवा बॅटरी बरोबर असणं  आवश्यकच . दुसरं एक कारण म्हणजे आपण ग्रुपमध्ये असलो तरी सर्वांची चालण्याची गती सारखी नसते - त्यामुळे जरी ग्रुपमध्ये असलो तरी पुढे मागे व्हायला होतंच. त्यामुळे प्रत्येकाकडे बॅटरी हवीच. मला फारसं  हळू चालता येत नाही - पाय दुखत वगैरे नाहीत पण जसं ड्रायव्हर लोक म्हणतात तसं मोशन जाते वगैरे तसं  काही तरी होतं मात्र ! 

कमान  सुटून जंगलवाटेवर लगेचच  पहिली चढण सुरु होते तिला जवानी की घोडी ( Intwa ni ghodi) म्हणतात . ही चढण चढून गेल्यावर पुढे म्हणजे भवनाथ पासून पुढे साधारण १२ किमी चालून आलो की परिक्रमेचा पहिला टप्पा लागतो - तो म्हणजे - जीनाबाबा की मढी !   गिरनार येथे जीनाबाबा नावाचे एक अवलिया मागील शतकात होऊन गेले. या जीनाबाबांची  एक चिलीम अद्याप येथे आहे  ती आम्ही पाहिली. या चिलमीतून ते आत-बाहेर करतात अशी इथल्या भक्तांत श्रद्धा आहे. बाबांच्या समाधी व धुनी यांच्याबरोबरच बाजूला हनुमान व कालिकेचेही मंदिर आहे. मढीजवळ परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. अनेक स्थानिक  व  तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात.   

या परिक्रमेत आणि मुख्य करून या भागात अनेक नागा साधू असतात. काही जण आपल्या धुनीपाशी - त्यांच्याजवळ काही भाविक विधी करतात . काही साधू हातात मोरपीस घेऊन परिक्रमा करणाऱ्याच्या अंगावरून फिरवून भिक्षा वगैरे मागतात - दान देणाऱ्याला दुवा देतात. अंगाला भस्म फासलेले असे विवस्त्र साधू बघून सवय नसल्यामुळे घाबरायला नाही पण दचकायला मात्र होतं . आपण नामस्मरण किंवा तोंडाने काही पुटपुटत चालताना दिसलो की हे फारसे मार्गात येत नाहीत. जवळच  हसनापूर हा जुनागढचा सर्वात मोठा डॅम  दिसतो म्हणतात पण आम्ही रात्री चालत असल्यामुळे आम्ही काही पाहू शकलो नाही . वाटेत चंद्रमुळेश्वर नावाचे सुंदर देऊळ आहे म्हणून ऐकलं होतं - तिथं जाण्यासाठी वनविभागाची परवानगी लागते . वा़टेत काही ओळखीचे लोक भेटले.

थोडे पुढे छोटीसी नदी लागते 'सरनो' नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही फक्त पाय ओले -पद्स्नान करून मार्गस्थ झालो. अधूनमधून पुढे ही अनेक ओढे लागत होते. इथं येईपर्यंत आम्ही साधारण पुढे मागेच होतो. हळू चालणाऱ्यांसाठी - एकमेकांसाठी थांबत - चहा-लिंबूपाणी करत बरोबर येत होतो.  नंतर मात्र चालणाऱ्यांच्या गतीप्रमाणे अंतर पडत गेले - मी व तारिणी आणि मुंबईचे काही जण थोडे पुढे होतो - बाकीचे असेच दोन तीन गटात आपापल्या वेगाप्रमाणे येत वेगवेगळे मार्गस्थ होत राहिले. विशेष म्हणजे नुकतंच एका मोठ्या आजारातून बरं  होऊन आलेला मुंबईचा पराग सर्वात शेवटी राहिला खरा, पण नेटानं त्याच्या बायको व इतरांबरोबर चालत राहिला. आणि  सारेच जण एकमेकांना मानसिक आधार देत - जय गिरनारीचा घोष करत पुढे चालत राहिलो. 

पुढचा मार्ग म्हणजे दुसरा व तिसरा डोंगर तीव्र चढ- उतारांचे. ही परिक्रमा म्हणजे नुसतं चालणं नाही तर तीन डोंगर चढणं -उतरणंही आहे आणि काही चढउतार हे तर ६०-७० अंशाचे आहेत - त्यामुळे चालण्याची सवय असल्यांनाही दमायला होऊ शकतं .

घनदाट जंगल - अवघड रस्ता आणि एकदा इथपर्यंत आलो की परतीचा मार्ग नाही पुढे चालतच राहायचं - जय गिरनारीचा नाद करत - मग माझ्यासारख्या सश्रद्ध पण कर्मकांड न मानणाऱ्यांसाठीही ही परिक्रमा केवळ जंगल ट्रेक / धार्मिक पर्यटन न राहता एक यात्रा होऊन जाते.

जीनाबाबा की मढीनंतर पुढे ८ किमीवर मालवेला  आहे -इथं आंब्याची खूप झाडे  आहेत. रानियो कुवो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात सिंह दिसतो असंही ऐकायला मिळालं. मालवेलला सारखाडीया हनुमानाचं देऊळही आहे आणि तिथं दिवसा हरणं आणि सिंह दिसतात असं ऐकण्यात आलं - दिवसा परिक्रमा करणारी मंडळी जवळच्या सुरजकुंडाला  दर्शन देतात.

  एके ठिकाणी मार्गात वाघ दिसला म्हणून अर्धा पाऊण तास एके ठिकाणी थांबायला लागलं होतं . आम्ही परिक्रमेला निघायच्या आदल्या दिवशीच एका मुलीला बिबट्यानं उचलून नेलं होतं हे कळालं होतं  - म्हणून वेळोवेळी पोलीस ठाणी जिथं जिथं होती - सगळ्यांना मोठ्या ग्रुपमधून मार्गक्रमण करा म्हणून सांगत होते. पण सर्व ठिकाणी असं ग्रुपमधून चालणं प्रत्यक्षात कधी कधी होत नव्हतं. मी, तारिणी, आणि आणखी दोन चार जण परिक्रमेच्या मध्यभागी आहे असं समजल्या जाणाऱ्या  महाकालीच्या मंदिरापाशी  मध्यरात्री १:१५ वाजता पोचलो . बाकीचे अनेक जण  हळू हळू इथं पोचेस्तोवर तास गेला - अजूनही काही जण मागेच होते. पण आता जास्त थांबलो तर झोप यायला लागेल म्हणून २:१५ च्या सुमारास पुढे कूच केले.

पुढचा रस्ता सोपा आहे असं कळलं होतं  पण तिसरा डोंगर चढणं  आणि उतरणं हे करताना बरोबरच्या काही जणांची दमछाक झालीच आणि परत काही जण पुढे - मागे झाले. वाटेत  पुणे -मुंबई - महाराष्ट्रातून आलेले अनेक जण भेटले - त्यातले काही जण दोन तीन दिवस परिक्रमेत होते. एवढं चालावं लागतं हे अनेकांना माहीतच नव्हतं. त्यामुळे काही जणांची खाण्यापिण्याची  आबाळ तर काहींची स्वच्छतागृह नसल्यामुळे आलेलं टेन्शन तर काही जण चालून चालून थकलेले.

खाली उतरताना डावीकडच्या बाजूला दुरून  गडगडाट ऐकायला यायला लागला - पावसाची चाहूल आली - आश्चर्याची गोष्ट अशी की उजव्या बाजूला गिरनारच्या बाजूला पूर्ण चंद्र दिसत होता. मैदानी  रस्त्यावर आल्यावर आम्ही काही जण एका ठेल्यावर चहा प्यायला थांबलो आणि जोरात पाऊस सुरु झाला. त्यामुळे अर्धा पाऊण तास तिथं थांबायला लागलं. गंमत अशी की त्या ठेल्यावर जाळीचं आच्छादन असल्यामुळे पाऊस अंगावर येतच होता त्यामुळे एका झाडाखाली थांबलो. मोठ्या पावसात झाडाखाली थांबणं सुरक्षित नव्हतं - त्यामुळे पाऊस थोडा कमी झाल्यावर चालायला लागलो. जंगली जनावरांचा वावर आणि पाऊस हे आत्तापर्यंत परिक्रमेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं नंतर कळालं.

अलीकडच्या भागात शहाळी, चहा लिंबू-पाणी, फळं यांचे स्टॉल्स होतेच पण आता मैदानी रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा अनेक स्टॉल्स लागलेले दिसत होते.. भजी, पापड, खारे दाणे, फुटाणे, मसाला आलू, आणखी बरंच काही . सर्वात गंमत  म्हणजे पानाचे ठेलेही होते. ठिकठिकाणी लिंबू सरबत, पाणी मोफत वाटत होते.. अनेक महाराजांचे रस्त्यात लंगर होते, ते चहा नाष्टा, जेवण वाटत होते.. जे विकत होते त्यांच्या  किंमती  नेहमी बाहेर मिळतं त्यापेक्षा खूपच कमी होत्या. एवढ्या जंगलात आत मध्ये एवढ्या वस्तू आणून स्टॉल्स उभे करणे तेही जंगली श्वापदांची भीती असताना किती जिकीरीचं  असेल याची कल्पनाही करवत नाही. जाताना अनेक स्थानिक स्त्री-पुरुषांना  डोक्यावर-खांदयावर ओझी घेऊन जाताना पाहत होतो - अनेक जण काठियावाडी भाषेत भक्तिगीतं म्हणत होती, ही मंडळी परिक्रमेच्या परिसरात ३-४ दिवस राहण्यासाठीच आलेली होती... जणूकाही लग्नाचे वऱ्हाडीच. काही धार्मिक विधी ही ते इथे पार पाडतात - शिधा आणून स्वयंपाक करतानाही पाहायला मिळालं - सगळंच अचंबित करणारं  !

पावसामुळे रस्ता अधून मधून पाण्याचे प्रवाह वाहत असल्यामुळे निसरडा व  चिखलमय झाला होता. काही जण घसरून पडलेही  - त्यामुळे चालण्याचा वेग काहीसा कमी झाला होता. दोन तीन किमी चालल्यावर एकदम गर्दी वाढली - आणि एक कमान  दिसली आणि भयंकर गर्दी झालेली दिसली. इथं मुख्य परिक्रमा संपते असं कळालं . काही जणांनी हुश्श केलं पण ते थोडा वेळच टिकलं, कारण थोडं पुढे दोन दिशादर्शिका दिसल्या - डावीकडे बोरदेवी ( १किमी ) आणि भवनाथ म्हणजे तलेठी ७ किमी. बोरदेवीकडून लोकांचे लोंढेच्या लोंढे येत होते . तिकडे पावसामुळे रस्ता / वीज  बंद आहे असं कळल्यामुळे तिकडे जाण्याचे टाळून आणि ७-८ किमी अजून चालायचं असल्यामुळे भवनाथकडे कूच केलं. हा मार्ग तसा बरा होता - पण प्रचंड गर्दी होती - स्टॉल्स होते. इथेही चढ उतार होतेच. अनेक थकलेले लोक विश्रांतीसाठी कडेला बसलेले होते. आम्ही दोघे मात्र चालतच  राहिलो. रात्रभर चालत असल्यामुळे पायही यंत्रवत झाले होते - आपली आपणंच पावले पडत होती. काठीचा आधार आधी जाणवला होताच आता आणखीनच वाटला.

शेवटच्या टप्प्यात मजल दर मजल करीत चालत असताना  खोडीयारमातेचे छोटेसे देऊळ अगदी रस्त्यातच लागलं . तिथे कळाले की बोरदेवीचे दर्शन घेतलं  नसेल  तर इथे दर्शन घेतले तरी चालते. जणू आमच्यासाठी  देवी रस्त्यावर येऊन उभी होती.  शेवटचे ७ किमी संपवून सकाळी ६:४५च्या सुमारास आता खरोखरंच भवनाथ ( तलेठी ) ला जिथं परिक्रमेच्या अंतिम कमानीजवळ व दरवाज्यापाशी पोचलो - मागे वळालो व खाली वाकून नमस्कार केला. एवढं चालून दोघेही खाली वाकू शकलो हे विशेष. संध्याकाळी पावणे सात वाजता सुरु केलेली परिक्रमा सकाळी सात वाजता म्हणजे बरोबर बारा तासात पूर्ण केली आणि अनेक जणांची वाहवा घेत कमानीबाहेर आलो.

कमानी बाहेर येताच प्रचंड पाऊस सुरु झाला - आणि तिथूनच गुरुशिखराकडे जायचा मार्ग असल्यामुळे प्रचंड गर्दीही लागली. पाऊस - विजा  यांमुळे रोपवे बंद असल्यामुळे ही गर्दी होती हे समजलं. पुढे येऊन लंबे हनुमानाचं दर्शन घेतलं. नरसी मेहताच्या दुकानात अगरबत्ती-धूप यांची खरेदी करून बाहेर चहा-नाश्ता केला. 

भयंकर गर्दी असल्यामुळे  १-२ किमी चालत  जाऊन रिक्षा मिळवली आणि मुक्कामी पोचलो.

मुक्कामी पोचून छान गरम पाण्याने स्नान केलं आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. आमच्या पैकी एक जण ऐन वेळी आजारी पडल्यामुळे परिक्रमा करू शकली नाही - त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेऊन तिच्याबरोबर मी व माझा मेव्हणा जुनागढ चे म्युझियम व जुनागढचा उपरकोट गड पाहायला गेलो . उपरकोट मधील नवगण विहीर आणि नवाबी तलाव आणि सर्वच परिसर रमणीय होता. समोर दिसत असलेल्या ढगांनी झाकलेल्या गुरुशिखराच्या दर्शनाने थकवा पूर्ण गेला.

मुक्कामी परत येऊन थोडी विश्रांती घेतली . सर्वजण थकले होते आणि दुसऱ्या दिवशी परत निघायचं असल्यामुळे आणि गर्दीमुळे गुरुशिखर सर करणं  त्याच रात्री शक्य नसल्यामुळे संध्याकाळी सोमनाथला जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. वाटेत भालका  तीर्थावर जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या अंतिम प्रवासाच्या जागेचं  दर्शन घेतलं.

या परिक्रमेने दमछाक माझी तरी झाली नसली तरी आपल्या क्षमतेचा आणि पेशन्स - सहनशीलतेचा व धीराचा अंदाज मात्र निश्चित झाला .  आणि वेळेअभावी गुरुशिखराचं दर्शन यावेळी झालं नसलं तरी तीनच महिन्यापूर्वी झालेलं दर्शन डोळ्यासमोर आणून आणि लवकरच परत दर्शनाला यायचं ठरवून जुनागढचा  निरोप घेतला.

 वीरपूरला जलाराम बापूंचं दर्शन घेऊन व थोडी खरेदी करून राजकोट विमानतळावर परतीच्या प्रवासासाठी पोचलो.

गिरनार परिक्रमेला जाऊन आल्यावर पुढील गोष्टी मात्र नमूद करावाश्या  वाटतात...

- परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा हे जरी खरं असलं तरी  मंदिरात घातली जाणारी प्रदक्षिणा आणि गिरनार परिक्रमा यात कमालीचे अंतर आहे. मुख्य परिक्रमा जरी ३६ किमीची असली तरी गर्दीमुळे परिक्रमा सुरु करायच्या आधी आणि नंतर  २-३ किमी चालावंच लागतं. त्यामुळे ती ४० किमीपेक्षा जास्त होते. तसंच  हे नुसतं चालणं  नाही - तर ३ डोंगर चढायचे आहेत आणि उतरायचे आहेत हे ही लक्षात घ्यावं

- परिक्रमेला सुरवात केल्यावर मध्ये थकलं तर परतीचा मार्ग नाही - ती  पूर्ण करावीच लागते. मध्ये काही त्रास झाला तर सुविधा नाहीच.

- परिक्रमा मार्गात स्वच्छतागृहे नाहीत - त्यामुळे आहार मर्यादित असावा .

- जास्त वजनी वस्तू जवळ बाळगू नयेत

- काही ठिकाणी प्रचंड गर्दी असते - त्यामुळे असुविधा होऊ शकते.

- परिक्रमेला आलेल्या अनेकांना वरील गोष्टींची  कल्पना नसते . अनेक खाजगी प्रवासी कंपन्या किंवा आयोजक याची कल्पना देत नाहीत त्यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो.

- आश्रमात रहाण्यासाठी पूर्वव्यवस्था करताना काळजी घ्यावी.. यावेळी अनेक जणांना ऑनलाईन बुकींग मध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आलं 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासन, वनविभाग जरी चोख व्यवस्था ठेवायचं काम करत असले तरी प्रचंड गर्दीमुळे व्यवस्थेवर ताण येतोच. आलेल्या भक्तांनी आणि जंगल पर्यटकांनी या सुंदर ठिकाणाचं  पावित्र्य आणि सौन्दर्य टिकवण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करायला  हवेत. 

परिक्रमा... अध्यात्मिक, धार्मिक, निर्मळ विचारांनी करावी त्यासाठी मनात निर्मळता हवी तशीच परिसरातही. देवाला अस्वच्छता कशी आवडेल? धार्मिक स्थळ असो वा पर्यटन स्थळ...ते स्वच्छ राखायलाच हवं !!

वाटलं तर प्रशासनाने अमरनाथसारखी प्रवेश पद्धती चालू करावी - प्रवेश कर लावावा, जेणे करून गिरनार गुरुशिखर व परिसर मंगलमय राहील .

पुढच्या वेळी कदाचित दिवसा परिक्रमा करावी अशी कामना बाळगून आता थांबतो !


जय गिरनारी !!!


©राहुल लाळे




Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका