*भुलेश्वर
- एक रमणीय पण अलक्षित जागा*
राहुल
दिवाळीच्या
मुहूर्तावर मात्र परवा सकाळी भुलेश्वरला जायला
निघालोच. GPS ने कात्रज-कोंढवा
-बोपदेव घाट - सासवड रस्ता सांगितलं
म्हणून तिकडून गेलो. देहूरोड-कात्रज बायपास आणि कात्रज-कोंढवा
रस्त्यावरही काम चालू असल्यामुळे
ट्रॅफिक लागला. बोपदेव घाट चढून गेल्यावर
बोपदेव माचीवर " लोणकर वाड्यावर" ब्रेकफास्टसाठी थांबलो मस्त मिसळ- इडली
- चहा झाला आणि पुढे
निघालो. या रस्त्याला ट्रॅफिक
फारसा नाही पण रस्ता
अरुंद असल्यामुळे स्पीड कमी ठेवायला लागतो.
त्यामुळे सासवडवरून माळशिरस-भुलेश्वरला जायला थोडा वेळ
लागला.
कमानीतून
आत गेल्यावर छोट्या घाटरस्त्याने कार वर जाते
- हा रस्ता नवीनच वाटला - पूर्वी पायऱ्या चढून वर यायला
लागायचे. ----
वर आल्यावर मात्र
५० किमी कार चालवून
जो थोडा फार थकवा
आला होता तो मंदिराचा
कळस आणि दगडी बांधकाम
पाहून व थंडगार हवेने
दूर झाला. एखादी
दुसरी गाडी सोडता फारशी
गर्दी नव्हती.
पायऱ्या
चढून गेल्यावर मंदिरासमोरचा सुंदर परिसर आणि टेकडीवरून खालचं
आसपासचं दृश्य खरंच विहंगम
होतं . बाहेरच्या घंटेचा नाद करून मंदिरात
प्रवेश केला. हे यादवकालीन हेमाडपंती ६००-७०० वर्षांपूर्वीच असावं.
असं वाटतं. पण इतर अशा मंदिरांच्या
तुलनेत इथली शिल्पं जास्त सुंदर व रेखीव वाटतात.
पूर्वेकडे मुख असलेल्या या देवळाबाहेर जैन
मंदिरांप्रमाणे रचना आहे आणि आसपासच्या भिंती आणि वर चढताना दिसणाऱ्या बुरुजांकडे पाहून
मराठ्यांच्या किल्ल्यांची आठवण होते. या जागेचे नाव भुलेश्वर -यवतेश्वर आहेच पण पूर्वी मंगलगड
होते असं वाचलंय. इतिहासात वाचलेला मुरार जगदेवांचा दौलतमंगल किल्ला बहुतेक
हाच असावा.
या मंदिराच्या
गाभाऱ्याला थोडी खोली आहे. गाभाऱ्यातलं शिवलिंग
फ़क्त पूजेसाठी व दर्शनासाठीच पिंडीवर ठेवलं जातं, असं पुजाऱ्यांकडून कळालं. शिवलिंगावर संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा
आहे - त्याखाली तीन कोपऱ्यांत ब्रह्मा,
विष्णू व महेश यांची प्रतीके असलेली लिंगांची तीन उंचवटे आहेत असं कळालं . एवढ्या उंचीवर
असलेल्या मंदिरात पिंडीखाली पाण्याचा
नैसर्गिक झरा असणं हे एक आश्चर्यच.
गाभाऱ्यासमोर उंच काळ्या दगडावर कोरीव काम केलेला
नंदी आहे. शंकराच्या बहुतेक देवळांत नंदीचे मुख आपण सरळ असलेलं पाहतो, पण भुलेश्वरला
हा नंदी बसला तर साल आहे पण त्याचे मुख थोडे उजवीकडे आहे आणि नंदीचा डावा डोळा सरळ रेषेत दिसतो. याचं स्पष्टीकरण मिळणं रंजक असेल. नंदीच्या उजव्या बाजूला
ओटयावर एक कासव दिसलं पण त्यावर बसलेला प्राणी भग्नावस्थेत असल्यामुळे ओळखता आला नाही.
इतर अनेक शिवमंदिरापेक्षा इथं अनेक वेगळी वैशिष्ट्ये आढळतात. उंबरठ्यांच्या मध्यभागी नक्षी नाही पण ती उंबरठ्याच्या दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या
दाराच्या वर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाची
शिल्प कोरलेली आढळली .

मंदिराच्या भिंतींवरील आणि खांबांवरील असलेल्या शिल्पांतील
आणि मूर्तींचे कोरीवकाम अप्रतिम आहे. दगडात
कोरलेल्या खिडक्या आणि ओवऱ्या या एकाआड एक आहेत. त्यात काही रिकाम्या आहेत तर काहींमध्ये
विठ्ठल-रखुमाई आणि अनेक देवदेवतांच्या मुर्त्या तर भिंतींवर दैवी मुर्त्यांबरोबर काही
मानवी शिल्पं आहेत.
आतल्या मंडपाभोवती
असलेल्या भिंतींवर सिंह, हत्ती,उंट इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील कोरलेले प्रसंग
रेखीव व उठावदार आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरांवर धारातीर्थी पडलेले भीष्म, ऐरावताला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पे अक्षरशः जिवंत वाटतात. अनेक देवी, गणपती, विष्णूंचे अवतार,
योद्धे, पक्षी , कुंभ, कमळ , पानंफुलं आणि वेलबुट्ट्या यांमुळे शिल्पं फारच सुंदर दिसतात.

निजामशाही आणि आदिलशाहीच्या आक्रमणांच्या
तडाख्यात महाराष्ट्रातील आणि भारतातीलही अनेक मंदिरांप्रमाणे इथल्याही अनेक शिल्पांची
नासधूस झाली आहे पण मुळातलं काम भक्कम व टिकाऊ असल्याने सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर गणेशाचे स्त्री- रुपातले
पद्मासनात बसलेलं दुर्मिळ शिल्प पाहिलं - मी
तरी पहिल्यांदा पाहिलं . अजंठा-वेरूळच्या लेण्यात अशी शिल्पं असली तर माहित नाही. चौसष्ट योगिनींमधील ‘वैनायकी’, लंबोदरी, गणेश्वरी’ बहुतेक
हीच.
पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित
स्थळ म्हणून घोषित केलेले आहे - पण या आणि अशा अनेक अमूल्य स्वर्गीय सौन्दर्याने आणि
भारतीय संस्कृतीच्या खुणा जपणाऱ्या स्थळांना नुसतं संरक्षित म्हणून घोषित न करता त्यांच्या
डागडुजीची - भग्न शिल्पांना नवीन शास्त्राच्या मदतीने मूळ रूप देण्याचा प्रयत्न झाला
तर?

पुण्यापासून
फक्त ५० किमी अंतरावर असलेल्या भुलेश्वरला जरूर भेट द्या.
©राहुल लाळे
19-11-2023

Comments
Post a Comment