The Vaccine War
द वॅक्सीन वॉर ...
जिंकलेल्या युद्धाचा दुर्लक्षित लढा
राहुल
प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपली - आपल्या देशाची एक कहाणी असावी . भारताचं चंद्रयान-३ चंद्रावर उतरलं, तेही जिथं आत्तापर्यंत कोणताही प्रगत देशाने पाऊल न ठेवलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ... आणि जगभरातल्या सर्व भारतीयांची मान उंच झाली आपलीही एक कहाणी झाली - आदित्य मिशननेही दुसऱ्या कहाणीची सुरुवात केली. आणि रविवारीच भारताने गगनयानाची यशस्वी चाचणी करून आणखी एका येऊ घातलेल्या कहाणीची घोषणा केली.
दोन -तीन वर्षांपूर्वी भारताने अशीच एक मोठी यशस्वी कहाणी घडवली होती. करोनापासून वाचवणाऱ्या कोवॅक्सीन या आपल्या देशात संपूर्णपणे विकसित झालेल्या भारतीय बनावटीच्या लशीची . कारण भारताने फक्त आपल्या देशातंच नाही तर जगातल्या १०१ देशातही वितरित करून मानवतेचं मोठं उदाहरण जगापुढे घालून दिलं होतं . तेव्हा करोनाच्या महाभयंकर संकटात त्या कहाणीला -संपूर्ण जगात आपल्या देशाला नाव मिळालं. पण ती कहाणी ज्यांच्यामुळे शक्य झाली - ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून , आपल्या जीवाची पर्वा न करता त्या अत्यंत कसोटीच्या काळात दिवस-रात्र काम करत ही लस यशस्वीरित्या तयार करणाऱ्या ICMR आणि NIV त्या शास्त्रज्ञांची - त्यांच्या पराक्रमाची कहाणी मात्र पडद्यामागेच राहिली होती . ती दुर्लक्षित कहाणी सांगण्यासाठीच विवेक अग्निहोत्री व पल्लवी जोशी या दाम्पत्याचा " द वॅक्सीन वॉर" हा सिनेमा मध्ये पाहिला.
सिनेमात नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी , रायमा सेन, पडद्यावर थोडाच वेळ दिसणारा अनुपम खेर मराठमोळी गिरीजा ओक आणि मेकअप - गेटअप मुळे ओळखू न येणारा मोहन कपूर हे सोडले तर सगळे नवीन चेहरे दिसले. सिनेमात गाणी नाहीत, रोमान्स नाही, ऍक्शन -हाणामारी - ड्रामा नाही , अगदी याच निर्मात्याच्या काश्मीर फाईल्स मध्ये अनेक वर्षे ज्वलंत असलेला , काहीसा वादग्रस्त विषय ही नाही. त्या वेळचे ICMR ( Indian Council of Medical Research ) चे माजी डायरेक्टर जनरल डॉ बलराम भार्गव यांच्या “ Go Viral : Making of Covaxin : The Inside Story” या पुस्तकावर आधारित हा सिनेमा म्हणजे फक्त “ Based on True Story” नाही तर खरच प्रत्यक्ष घडलेली एक “Acual True Story” . आहे. डॉ बलराम भार्गव, डॉ प्रिया अब्राहम , डॉ श्रीलक्ष्मी मोहनदास, डॉ निवेदिता गुप्ता, डॉ प्रज्ञा यादव, डॉ गंगाखेडकर,डॉ डोग्रा गुप्ता, डॉ श्रीवास्तव, डॉ सिमरन पांडा , द वायरची रोहिणी सिंग ही खरीखुरी ऐकलेली नावंआणि अगदी सिक्युरिटी, माळी वगैरेंचीही खरी नावं आणि त्यांच्या कामातल्या तसंच खाजगी हळुवार प्रसंगांचं सादरीकरण हा सिनेमा करतो.
सिनेमाचं नाव - वॅक्सिन वॉर हे ठेवायचं कारण म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी त्यावेळी खरोखरंच अनेक आघाडयांवर दिलेला हा लढा होता -
- पहिला लढा म्हणजे अशा जीवघेण्या संकटावर स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सांभाळत दिवसरात्र प्रचंड तणावाखाली अगदीच अनोळखी अशा करोनाप्रतिबंधक लशीची निर्मिती करण्यासाठी संशोधन करत झटत रहाणे
- दुसरा लढा हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी - सामान्य माणूस मास्क किंवा इतर PPE वापरून कंटाळला होता तर निर्जंतुक प्रयोगशाळांत घाम काढणारा अवजड असं खास PPE किट दिवसभर अंगावर बाळगायचं, तेही मनावर संकटाचं- कामाचं- संशोधनात येणाऱ्या अडचणीचं - दिवसेंदिवस काम करताना घराकडे - लहान मुलांकडे होणारे दुर्लक्ष , झोप न होणं अशा खाजगी घरातल्या प्रश्नांचं ओझं बाळगणं हा
- तिसरा लढा वेळेशी - Human ट्रायल बाजूलाच अगदी प्रयोगासाठी उंदीर -माकडं मिळवण्यासाठीही धडपडणे
- चौथा - शास्त्रीय - करोना व्हायरस आयसोलेट करणं - त्याचं नैसर्गिक किंवा अन्य पद्धतीने म्युटेशन किंवा रिव्हर्स इंजिनियरिंग करणं
हे सर्व लढे आपले शास्त्रज्ञ - त्यांच्या संस्था वैयक्तिक रित्या - एकमेकांना साथ देत - संघटनात्मक रित्या कधी सरकारी पातळीवर लढत होत्याच पण याच वेळी त्यांना आणखी एक अत्यंत अनावश्यक लढा त्यांना लढायला लागला - तो म्हणजे राजकीय किंवा मीडियाने दाखवलेल्या अविश्वासाशी - काही विघ्न संतोषी व्यक्तींनी स्वतःच्या देशातील शास्त्रज्ञांवर अविश्वास दाखवून विदेशी लसीचा वापर करण्यासाठी वापरलेलं दबावतंत्र - भारताचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर किती खराब आहे - बाहेरून लस आणली नाही तर अनर्थ होईल - ४० कोटी माणसं मरतील अशा बातम्या पसरवल्या - ही लस कोणा एका पक्षाची आहे असं म्हणण्यापर्यंत मारलेली मजल आपण ऐकलीच होती
भारतासारखा देश काय लस बनवणार ? जास्त माणसं मरतील अशी भीती परदेशी कंपन्या त्यांचा धंदा चालवण्यासाठी कदाचित करतील ही पण यात आपलाही धंदा चालावा म्हणून त्यांची बाजू घेऊन आपल्याच देशातील गुणवत्तेवर अविश्वास दाखवणारी ही अघोरी अमानवी इच्छा आपल्याला त्यावेळीही दिसली आणि सिनेमातही रोहिणी सिंगच्या रूपाने दिसते.
पण म्हणतात ना चांगली गोष्ट करत जाताना सगळं चांगलंच होतं. त्यामुळे या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही देशासाठी - आपल्या देशबांधवांबरोबरच सर्व जगातल्या नागरिकांचे प्राणांचे रक्षण व्हावे हा एक उदात्त हेतू मनात ठेवून आणि " Only Science Can Win This War" याच उद्देशाने भारावून जात
या सर्व शास्त्रज्ञांनी आपलं तन मन धन अर्पण केलं आणि लस बनवून देशाचं नाव जगात उंचावलं.
सिनेमा म्हणून अनेक त्रुटी काढता येतील - काश्मीर फाईल्स - ताशकांत फाईल्स सारखं नाट्य नव्हतं - सिनेरसिकांना आवडणाऱ्या अनेक गोष्टी नव्हत्या - मसाला नव्हता. कुठे ही मेलोड्रामा नाही... त्यावेळच्या भीषण परिस्थितीची विदारक दृश्य दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न नाही.
सिनेमाची मुख्य ताकत म्हणजे विषय " Scientific - Medical Research आणि ते करणारे भारतीय शास्त्रज्ञ " हाच या सिनेमाचा वीक पॉईंट का असं वाटतं .
ज्या मीडियानं त्यावेळी या लशींविरुद्ध धुराळा उडवला त्याच मीडियानं या विलक्षण युद्धाची विजयगाथा दाखवणाऱ्या या सिनेमाबद्दल पूर्णपणे शांतता बाळगली - प्रिंट मीडिया असो किंवा दृश्य कुठेही काही चर्चा नाही - पूर्णपणे दुर्लक्ष
पण यामुळे विवेक अग्निहोत्री - पल्लवी जोशी - नाना आणि सर्वच टीमचे प्रयत्न वाया गेलेले नाहीत त्यांनी जे काम केलंय त्याने भारताच्या यशाचं एक चालतं बोलतं TEXTBOOK तयार करून ठेवलंय - ते "Man in Hurry" डॉ बलराम भार्गव यांची " fighting till the last – leave no room for regret " वृत्ती दाखवतं -. थकलेल्या - कदाचित कंटाळलेल्या NIV च्या डायरेक्टरला आशा अजून जिवंत आहे असं आपल्या निरागस डोळ्यांनी अबोल शब्दांनी सांगून धीर देणारा माळ्याचा लहान मुलगा त्यात आहे. कुठल्याही रिझर्वेशनची अपेक्षा न करणाऱ्या एकूण शास्त्रज्ञांच्या ७० % शास्त्रज्ञ महिलांचा “ Give it your all, for That What Really Matters” हा लढाऊ बाणा हे टेक्सटबुक उलगडून दाखवतं
I .T . क्षेत्रात आपण अग्रेसर आहोतच पण आता Bio -Tech किंवा कुठल्याही क्षेत्रात आपण असंच मोठं नाव करू शकतो ही आशा - नवी उमेद हा सिनेमा देतो. *India Can Do It* हाच विश्वास प्रत्येकाच्या मनात अधोरेखित करतो.
महान काम करून देशाचं नाव यशाच्या शिखरावर कोरलं गेलंच आहे
"सामान्य माणसांचा असामान्य लढा:" Ordinary Man - Extraordinary Work" हे दर्शवणारी वॅक्सीन वॉर ही कथा म्हणजे त्या यशातल्या शिल्पकारांची चित्रित गाथा - दुर्लक्षित पण अबाधित !!!
करोना काळात आपण का वाचलो - आपण आज जिवंत आहोत तर का जिवंत आहोत? का सुदृढ आहोत, यातलं महत्वाचे हे एक कारण जाणून घेण्यासाठी तरी हा सिनेमा पाहिला हवा. अनेक जण वैद्यकीय क्षेत्रातले असतील -अत्यावश्यक सेवेतले असतील - आपल्याला ते समोर दिसत होते. आपण लस घेतली - ती लस बनवताना ते बनवणारे कोण होते, त्यासाठी त्यांना काय कष्ट पडले आणि कुठल्या कुठल्या दिव्यांना सामोरे जावे लागले , ती कथा आपण सर्वांनी पाहायला हवी. त्यांचे कष्ट अनुभवले नाहीत आणि त्यांना सलाम केला नाही तर त्यांचं काहीच बिघडणार नाही - पण कृतज्ञता हा शब्द मात्र कुठं तरी हरवला असं म्हणावं लागेल !
उद्या येणारा दसरा - येणारी प्रत्येक दिवाळी हे या सर्व देवदूतांना समर्पित
©राहुल लाळे

Comments
Post a Comment