भिकाऱ्यांचा डॉक्टर

 *भिकाऱ्यांचा ...भिक्षेकरांचा डॉक्टर...डॉ अभिजीत सोनावणे*

राहुल लाळे






काल एका अवलियाशी भेट झाली.. आमच्या रोटरी क्लबमध्ये वक्ता म्हणून बोलावलेल्या डॉ अभिजीत सोनावणेंशी. 


त्यांच्याशी बोलताना कळालं की माणूस कसा बदलू शकतो. अभिजीत लहानपणापासून जरा दबंग वृत्तीचा.  दहावीत एकदा नापास झालेला, बारावीत कमी मार्क्स..घरातली प्रतिकूल परिस्थिती ..त्यातून मार्ग काढून हा माणूस डॉक्टर झाला, दवाखाना काढणं शक्य नव्हतं..गावोगावी घरोघरी जाऊन औषधे द्यावी उपचार करावा असं कुणी सुचवलं...पण अंगात चांगले कपडे नाहीत, जे होते ते वडलांचे जुने .. त्यामुळे कोणाकडे गेले तर हा माणूस डॉक्टर आहे यावर कोणी विश्वासंच ठेवायचं नाही. पैसे, मानसन्मान तर राहिलंच पण एखाद्या घरी जाऊन तपासून औषधे दिलीच तर तपासणी साठी माफक ५₹ ही मिळायचे नाहीत. मनात काही बाही विचार यायचे...


 एके दिवशी अभिजीतला एका गावात एक म्हातारा भिकारी भेटला, त्याला औषध देताना अभिजीतने त्या भिकाऱ्याला काही देऊ केलं तर त्यानंच याला आपली २७₹ ची चिल्लर दिली ..पुढे बोलता बोलता कळालं की म्हातारा कर्नाटकातून आलेला, घरचा धंदा असूनही मुलांनी हाकलून दिलेला... याला कळालं की माणसाचं आंब्यासारखं आहे..आंब्याची किंमत  गर , रस असेपर्यंत... ते संपलं की आंब्याची कोय बिनकामाची ... तसंच माणसाची रग, पैसाअडका संपल्यावर होणारी भिकारी अवस्था !!


इतर मित्र सांपत्तिक सुबत्ता मिळवायचे ...मी का नाही हा प्रश्न अभिजीतला पडायचा

 अनेक जण सल्ले द्यायचे....

 पोटात भुकेचे कावळे ओरडत असताना सल्ले पचायचे जाऊ दे डोक्यात तरी कसे शिरतील?

अशा वेळी भीक मागणारा म्हातारा डॉक्टर ला फी देतो... २७रु ...श्रीमंत माणूस ५ ₹ देत

 नव्हते....मग खरा श्रीमंत कोण? हा प्रश्न अभिजीतला पडला. दोघेही समदुःखी...एकाला मुलांनी घराबाहेर काढलं...एकाला स्वतःच्या घरात आसरा नव्हता..

या आजोबाकडून  अभिजीतला शिकवण मिळाली... कोयीचा आंबा करायला हवा याची


पुढे परिस्थिती बदलली, चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळत गेल्या , पैसा मिळू लागला... एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून देशविदेशात भटकंती झाली... स्थैर्य येतंय असं वाटत असतानाच अभिजीतला त्या आजोबांची आठवण आली आणि त्या गावाकडे एकदा तो गेला.. चौकशी केल्यावर कळालं की ते आजोबा गेले, बेवारसपणे त्यांची विल्हेवाट लावली गेली... आणि डॉ अभिजीत हलला...माणूस आणि बॉडी यामध्ये फक्त एक श्वास असतो याची खरी  जाणीव त्याला झाली.


जन्माला येताना प्रत्येक जण दगड असतो, अनावश्यक भाग काढून दगडाची मूर्ती होते तसंच काहीसं झालं अन् त्या दिवसापासून डॉ अभिजीत सोनावणे भिकाऱ्यांचा, भिक्षेकरांचा डॉक्टर झाला...


 अनेक बरी पार्श्वभूमी असलेले लोक भिकारी बनतात काही बनवले जातात. पण त्यांनाही वेदना असतात, आयुष्य असतं, जगणं असतं. 


 देवळात लोक देवाकडे भीक मागतात आणि बाहेर भिकाऱ्यांना भीक घालतात. हा डॉक्टर गेली ७-८ वर्षे देवळात जात नाही पण देवळाच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांत बसतो, त्यांना तपासतो, औषधे देतो..जखमांना मलम लावतो, देतो. पुण्यात सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर तर मंगळवारी गणपती मंदिराबाहेर, शुक्रवारी मशीदीबाहेर तर रविवारी चर्चबाहेर तुम्हाला हा डॉक्टर  भेटू शकेल. औषध देता देता  भिकारी भीक मागणं सोडून काही काम करेल का यासाठी अभिजीत प्रयत्न करु लागला आणि भेटलेल्या ११०० भिकाऱ्यांपैकी १६० जणांना भीक मागणं सोडून देऊन छोट्या मोठ्या कामात गुंतवण्यात यशस्वी झाला.


 त्यांच्यातील ५२ मुलांना शिक्षण घ्यायला प्रवृत्त करू शकला. त्यापैकी एक लवकरच पीएसआय होतोय, एक(हिची आई दिवसा भीक मागते...रात्री...) कॉमर्स शिकतेय.

ऐकून डोळे भरून आले आणि नकळतच हात जोडले गेले.


आज शनिवारी सकाळी शनवारवाड्याजवळ शनीमंदिरापाशी मुद्दामच गेलो...काही वस्तू डॉक्टर अभिजीत ला द्यायला.. पण सारा अभिमान गळून पडला. हा गडी देवळाच्या बाहेर रस्त्यावर भिकाऱ्यांच्या गराड्यात बसून त्यांच्या दुखण्याखुपण्यावर फुंकर घालत होता.. औषधे देत होता... जखमांवर बँडेज बांधत होता. एकाचा पाय रात्री कुत्र्यानं खाल्लेला, तर एकाला हाताला काहीतरी लागलेलं. एका म्हातारीला कंबरेला पट्टा बांधतोय तर एकीला इंजेक्शन. एकाला दारू पिऊ नको म्हणून झापतोय तर एकीला कमी खा म्हणून दटावतोय. या भिकाऱ्यांची पण या अवलिया डॉक्टरवर माया दिसली.. दुपार झाली जेवलास का म्हणून भक्तांनी त्यांना दिलेले पॅकबंद अन्न ते याला देत होते... अशाच एका घरातून हाकलून लावलेल्या म्हातारीने याची कानाभोवती बोटं मोडून  दृष्ट काढून लाडू भरवला ...सगळं पाहून थक्क झालो..


एवढं करुनही भिकाऱ्यांना भीक घालू नका, काम द्या असं डॉक्टर अभिजीत सांगतात.. त्यांच्या कामात पत्नी डॉ मनिषा प्रत्यक्ष सहभागी आहेत आणि घरासाठी अर्थाजनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामुळे अभिजीत त्यांचं काम करु शकतात.


दोघांना सलाम...चालताना दिसतात ती पावलं, धरावीशी वाटतात ते चरण हे पटलं.


खरंच आयुष्याच्या पुस्तकाची तीन पानांपैकी जन्म, मरण ही दोन पानं आपल्या हातात नाहीत पण मधलं पान आयुष्याचं ..ते असं दुसऱ्या साठी जगता येईल का?


सर्वांनाच ऍलोपथी, होमिओपथी शिकता येणार नाही पण सिंपथी, एंपथी या पथी शिकायला काय हरकत आहे?


आपल्या सावलीचा आधार देऊन तिची  छाया करणं काही प्रमाणात तरी जमवता येईल का?


११०० नाही कमीतकमी एकाचा आधार आपण बनू शकू का?


हे प्रश्न स्वतःलाच विचारत  शनीमंदिरापाशी आपलं काम निपटून दुसरीकडे निघालेल्या डॉ अभिजीतचा निरोप घेतला.


डॉ अभिजीत काम करतोय ते शब्दातीत आहे, देवदूताचं काम आहे हे. 


असं दुसऱ्यासाठी मागणं- करणं ही प्रार्थना मनात बाळगणं हेच पसायदान ज्ञानेश्वरांनी सांगितलंय...नाही का?


आपल्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करु या 🙏🏻


©राहुल लाळे






Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका