उत्तरवाहिनी नर्मदा

 *उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा*

राहुल लाळे

















गंगैच यमुनेचैव गोदावरी सरस्वती

नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु


आपल्या हिंदू संस्कृतीत जल म्हणजे पाण्याला अत्यंत महत्वाचं असं पवित्र स्थान आहे. हेच महत्व आपल्या जीवनात स्वार्थ आणि परमार्थ यांचा मेळ घडवतं. सुरवातीला उल्लेखलेला स्नानमंत्र निसर्ग व मानवजात यांच्यातील गहिऱ्या संबंधांची साक्ष देतंच तसंच प्रत्येक नदीची महतीही अधोरेखित करतो. गंगा ज्ञानाचं, यमुना भक्तिचं, गोदावरी ऐश्वर्याचं, सरस्वती विवेकाचं , कृष्णा कामनेचं तर ब्रम्हपुत्रा तेजाचं प्रतीक मानलं जातं. या सर्व नद्यांची निर्मळता, ओजस्वी व मंगल भाव यांमुळे या नद्या आपल्या श्रद्धास्थानी व पूजनीय आहेत. नर्मदेची वैशिष्ट्य हे की बाकी सगळ्या नद्या पूर्वेकडे वहात जाते असताना नर्मदा (व तापी..तप्ती) पश्चिम वाहिनी आहेत. नर्मदेचा जन्म तांडव करताना भगवान शंकराच्या घामातून झाला आणि म्हणूनच नर्मदेला शंकराची मुलगी मानलं जातं. "नर्मदा माँ  जेटला कंकर  एटला बडा शिवशंकर " - अर्थात नर्मदेतले सगळे गोटे हे शिवशंभूचे प्रतीक आहेत. 

नर्मदेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या विस्तीर्ण तीरावर वसलेल्या असंख्य धार्मिक स्थळं, आश्रमांमुळे नर्मदेचा वैराग्याची मूर्तिमंत अधिष्ठाती स्वरूप मानले जाते. नर्मदेचं दुसरं नाव रेवा, या नावानं पुराणातही रेवाखंडाचं मोठं महत्त्व आहे.


अमरकंटक किंवा ओंकारेश्वर किंवा उज्जैन पासून सुरू होऊन मध्य प्रदेश, गुजरात मधून विविध ठिकाणं पार करून परत जिथून सुरू केली तिथे परत येईपर्यंत नर्मदेची ३०००+ किलोमीटरची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा पूर्ण करणं हे एक फार मोठं पुण्याचं काम समजलं जातं. जो कोणी ही परिक्रमा पूर्ण करतो त्याला जीवनाचं सत्य कळतं असं म्हणतात. रहस्य, रोमांच, धारिष्ट्य आणि कष्टाची ही परिक्रमा चालत पूर्ण करण्यासाठी ३वर्षे ३ महिने १३ दिवस लागतात.काही जण ही परिक्रमा ६ महिन्यांत तर काही ३ महिन्यांत तर काही गाडी ने प्रवास करून १५ दिवसांत ही पूर्ण करतात. ज्यांना एवढी मोठी यात्रा करणं शक्य नाही, त्यांनी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा चैत्रमहिन्यात केली तरीही पूर्ण परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं असं नर्मदापुराण व स्कंद पुराणात लिहिलंय असं वाचलंय. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती असं मानलं जातं.


उत्तरवाहिनी नर्मदा म्हणजे उत्तर दिशेने वाहणारी नर्मदा. नर्मदेच्या संपूर्ण प्रवासात ती तीन ठिकाणी उत्तरेकडे वहाते ... तिलकवाडा, मंडला व  ओंकारेश्वर जवळ. 


तारिणी, सोनाली, शशांक व शशांकचे काही स्नेही यांनी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तिलकवाडा येथे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जायचं ठरवलं. नर्मदेचे दर्शन चार वर्षांपूर्वी भेडाघाट गेलो होतो तेव्हा आणि मागच्या वर्षी गिरनार गरुडेश्वर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो तेव्हा झालं होतं पण परिक्रमेला कधी गेलो नव्हतो. तसा रूढार्थानं मी धार्मिक नाही  कारण कर्मकांड- पूजाअर्चा या नियमितपणे माझ्याकडून होत नाहीत - पण मी  नास्तिकही नक्कीच नाही. पुराणातल्या गोष्टी, गीता, रामायण- महाभारत, दासबोध , ज्ञानेश्वरी  आणि इतर तत्सम साहित्य मी अभ्यास म्हणून सश्रद्धपणे नक्कीच वाचलं आहे. लहानपणच्या सांस्कारांमुळे आणि आवडीमुळेही अथर्वशीर्ष-रामरक्षा - मारुतीस्तोत्र - मनाचे श्लोक - गीताध्याय अजूनही मुखोद्गत आहेत आणि मन शांत करण्यासाठी व वाणीशुद्धीसाठी त्याचा होणारा उपयोगही इतरांपणे मलाही जाणवतो. त्यामुळेच अनेक धार्मिक स्थळांना अगदी कुठले विधी करण्यासाठी नाही तरी एक धार्मिक पर्यटन म्हणून तिथल्या पवित्र वास्तूंचा -परिसराचा अनुभव घेऊन मन प्रसन्न करायला मला मक्कीच आवडतं.  तोच  अनुभव घेण्यासाठी आणि तारिणीच्या आग्रहास्तव मार्चएंडच्या गडबडीतही मी जायचं ठरवलं.

 

२३ मार्चला सकाळी हमसफर एक्स्प्रेसने पुणं सोडण्यासाठी स्टेशनवर जमलो... आणि प्लॅटफॉर्म १ वर येणारी ट्रेन  ३नं प्लॅटफॉर्मवर येणार हे कळालं आणि बरोबरचं सामान घेऊन लगबगीनं प्लॅटफॉर्म बदलला आणि नर्मदे हर म्हणत प्रवास सुरु झाला.


गाडी संध्याकाळी वेळेत बडोद्यात पोचली आणि युवराज मधे गुजराथी पध्दतीचं स्वादिष्ट जेवण करुन सर्व तेरा जण एका ट्रॅव्हलरने मांगरोलला पावणे अकरा वाजता पोचलो. तिथल्या मंगलेश्वर महादेव मंदिराच्या आवारात सर्वजण लगेचच आडवे झाले आणि पहाटे लवकर उठायचं म्हणून तसंच थकल्यामुळे ही सर्वांचाच डोळा लगेच लागला


पहाटे साडेतीन चार वाजता उठून शूचिर्भूत होऊन पाचच्या सुमारास श्री मंगलेश्वर महादेवाची पूजारती करून उत्तरवाहिनी परिक्रमेचा संकल्प सोडला आणि शुभ्र सफेद वस्त्रं परिधान केलेल्या आम्हा तेरा जणांच्या समूहाने मांगरोल सोडून नर्मदा गाठण्यासाठी श्री रामानंद आश्रमाच्या दिशेने प्रस्थान केले. नर्मदेतीरावरच्या प्रत्येक मंदिराची वेगळी कहाणी आहे. अंधकासुर राक्षसाशी लढताना श्रीशंकराच्या घामाचा बिंदू जमिनीवर पडून उज्जैन मधे ग्रहांचा राजा मंगलाचा जन्म झाला. त्याची कर्मभूमी उत्तरवाहिनी येथे तपश्चर्या केली आणि शिवशंभूनी  प्रसन्न होऊन जिथं मंगलाला दर्शन दिलं तिथं त्यानं शिवाची स्थापना केली ते स्थान म्हणजे हे मंगलेश्वर महादेव.


मांगरोल ते रामानंद या दरम्यान तपोवन आश्रम, मारुती मंदिर, गोपारेश्वर आणि जवळच सीतारामबाबा आश्रम आहे ( आपण बसने गेल्यामुळे इथे प्रत्यक्ष जाता आलं नाही) रामानंद आश्रमापासून नर्मदेचे जाण्यासाठी छान बांधलेल्या पायऱ्या उतरून या भेटीतलं नर्मदा मैयाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर उल्हसित होऊन सर्वांनी *नर्मदे हर* चा गजर केला आणि नर्मदातीरावरून मार्गक्रमण सुरू झाले.


नर्मदेच्या दक्षिण तटावरून रामानंद आश्रमापासून आमचं पदभ्रमण सुरु झालं आणि पहाटेच्या रम्य पवित्र वातावरणात नर्मदामैय्येच्या कडेवर स्वार होऊनच चालल्याचा अनुभव  सर्वांना आला. काही अंतर चालून गेल्यावर नदीजवळ जाऊन नौकेत बसून नदी पार केली . नदी पार केल्यावर घाट चढून  तिलकवाडा येथे पोचलो . तिलकवाड्यात  नदीच्या तीरावर थोडं उंच समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेलं  मारुती मंदिर -  रामेश्वर महादेव मंदिर , गौतमेश्वर महादेव मंदिर, तिलक राजाने स्थापन केलेलं  तिलकेश्वर महादेव मंदिर , नर्मदा मंदिर आणि सप्त पितृकामंदिर यांचं दर्शन घेतलं. तसेच वासुदेवानंद सरस्वती टेम्बाई स्वामींचं समाधी मंदिराचंही  दर्शन झालं. येथील तीरावरून नर्मदेचं  विहंगम दर्शन होतं. आवारात कडूनिंब, औदुंबर व पिंपळ यांचं एकमेकांत गुंतून एकंच बनलेला  असा विलक्षण वृक्ष पाहायला मिळाला. तिलकवाड्यात मंदिरात आरती करताना देवळात  साथ देण्यासाठी झान्ज - ताशा-घंटा यांना एकत्र घेऊन  बनवलेलं आणि वाजवणार  एक छान यंत्र पाहिलं - पुढंही ते काही ठिकाणी पाहायला मिळालं. तिलकवाडाला श्री हेमंतजींची भेट झाली ते दरवर्षी चैत्रात महिनाभरासाठी नर्मदा मातेजवळ येतात - त्यांना प्रणाम करून तिलकवाडा सोडताना थोडं उजाडलं आणि गावातून पुढे जाताना रस्त्यात तेथील लहान मुलामुलींना बरोबर आणलेला खाऊ देत देत मार्गक्रमण चालू राहिलं. रस्त्यात काही घरांवर छान चित्र रेखाटली होती - एका घराच्या दारावर तर हत्ती , हत्तीण आणि त्यांचं छोटं  पिल्लू यांचं एक गॉड शिल्पच साकारलं होत. गावात कुंभारकाम, सुतारकाम , चांभारकाम असे अनेक छोटे छोटे घरगुती व्यवसाय ही असलेलं पाहायला मिळालं. मार्गाच्या दोन्ही बाजूला शेती होती आणि ऊस, कापूस यांबरोबरच एरंडाचंही  खूप पीक पाहायला  मिळालं.


एक दोन किमी अंतर पार करून गेल्यावर मणी नागेश्वर येथे पोचलो. इथल्या मणिनागेश्वराची कथा ही कश्यप ऋषींच्या दोन पत्नी कद्रू ( सापांची माता ) व विनता ( गरुडाची माता) यांच्या वादातून - पश्चातापातून शिवशंभू प्रसन्न झाल्यावर मणिनाग म्हणून स्थापन होणं अशी आहे - असं वाचायला मिळालं. मणिनागेश्वराच्या आवारात मणिनागेश्वराबरोबर श्री गणेश व मारुती मंदिरांबरोबर श्रीकृष्णचं ही मंदिर आहे - या कृष्णाच्या मूर्तीला सुंदर  वेशभूषा केली होती आणि मनगटात छानसं  घड्याळ बांधलं होत. देवळाबाहेर लंगर मध्ये थंडगार सुगंन्धित सरबत आणि ताक प्यायला मिळालं. काही जणांनी बाहेर असलेल्या विविध सुगंधाच्या अत्तराची खरेदी केली. मणिनागेश्वर जवळ रस्त्याच्या विरुद्ध बाजूस खोडियार माता मंदिर - हे भवानी मातेचं मंदिर आहे


मणी नागेश्वर सोडल्यावर पुन्हा मध्येच रस्त्यातून तर मध्ये शेतातून पायवाटेने परिक्रमा सुरु राहिली. वाटेत अनेक स्थानिकांनी परिक्रमा करणाऱ्यांसाठी खाण्यापिण्याची - विसाव्याची सोय  करून थकवा दूर करत  आपल्या परीने नर्मदा सेवा करण्याचा प्रयत्न केला होता. एक लंगर चालवणारे तर हरयाण्यातील मसरण्यातून आलेले तरुण चालवत होते - अशा सेवाछत्रांत   चिवडा - कलिंगड-केळी किंवा आता फळं , चहा -बिस्किटं , खिचडी - ताक, लिंबू सरबत इत्यादी  पदार्थांनी नाश्त्याची व्यवस्था करून परिक्रमा करणाऱ्यांची नि:शुल्क सेवा हे महाजन करत होते. अधून मधून या प्रसादाचा स्वीकार करत आम्ही पुढं जात राहिलो. आणि मार्गक्रमण करत कपिलेश्वर मंदिराजवळ पोचलो.


कपिलेश्वराची पूजा केली , महादेवाला अभिषेक केला - तेथील राममंदिरात रामाला वंदन करून रामरक्षा म्हणली.  आणि तेथील मंडपात विसाव्याला बसलो व तेथे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या गोटाभजींचा आस्वाद घेतला. कपिलेश्वरला तेथील महाराजांना वंदन केले. तिथे एक अवलिया स्थानिक भेटला - त्याने तिथल्या एका झाडाची पानं खायला दिली - त्यानं मुखशुद्धी झालीच - त्याबरोबरचं चालण्याचा थकवाही दूर गेला - झाड तिथेच आवारात होतं  -  नाव विचारलं ते महादेव का पेड असं म्हणाला. कपिलेश्वरहून निघतानाच सावरिया म हाराज यांचं दर्शन झालं. आमचा संयोजक मिलिंदला त्यांची माहिती होती - त्यांना प्रणाम करून त्यांच्याबरोबरच परिक्रमेचा पुढचा टप्पा सुरु झाला. 


सावरिया महाराजांबद्दल या भागात अनेक वदंता - कथा आहेत. चैत्रात ते रोज उत्तरविहिणी परिक्रमा करतात - दिवसातून दोन -तीन वेळा ही असंही  ऐकायला मिळालं. आमच्यासमोरच त्यांनी ३ वेळा नर्मदास्नान केलं. त्त्यांच्याबरोबर नर्मदेच्या उत्तर तीरावरून आमचा पुढचा प्रवास सुरु राहिला. " नर्मदे हर" चा गजर आणि नर्मदा मातेचा सहवास यामुळे चालण्याचा थकवा आणि उन्हाचा त्रास अजिबात जाणवला नाही. तसाही निसर्गाने ढगांची छाया अधून मधून ठेवली होतीच. तरीही जो काही थकवा येत होता,  तो नर्मदा मातेचे निळेशार पाणी आणि रमणीय परिसर यांमुळे नाहीसा होत होता. नदीच्या तीरावर डोंगराच्या पायथ्याला अनेक छोटे मोठे मंडप होते - तिथेही लिंबू सरबत -ताक वगैरेंची स्थानिक रहिवाश्यांनी सोय केली होती. अशाच एक मांडवात  सतीश कांबळे हे मराठी नाव वाचलं आणि थांबलो - तिथं एक वृद्ध जोडपं होतं . मंडपात वीणा , पखवाज - ढोलकी - झांज अशी भजनाची  पूर्ण व्यवस्था पाहून आम्हीही सर्व जण थांबलो आणि भजनांचा गजर केला. भजन गाऊन - वाजवून सगळेजण भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालो. तेथील वृद्ध दाम्पत्याने आम्हाला सरबत पाजलं  - आम्हीही त्यांना भेटवस्तू देऊन व आलिंगन- नमस्कार करून पुढचा प्रवास सुरु केला . 


नर्मदा तीरावरच काही अंतरावर नंदीची एक भव्य मूर्ती दिसली आणि जवळ पोचल्यावर " श्रीसलाह कालेश्वर" हा फलक  दृष्टीक्षेपात आला . हे क्षेत्र धार्मिक पर्यटन म्हणून विकसित होतंय याचा अंदाज तेथील शिवशंभूचा आशीर्वाद देणारा हात आणि मार्गदर्शक अंगुली यांची विशाल शिल्प आणि तीरावर मांडलेल्या खुर्च्या आणि छत्र्या पाहून आला.  याठिकाणी जगातील शंकराची सर्वात विशाल मूर्ती उभी केली जाणार आहे हे कळालं , तीरावरच चाललेल्या महायागात आम्ही सर्व सामील झालो आणि "ह्रीम मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणागतम  I जन्म मृत्यु ज़रा व्याधि पीड़तं कर्मबंधनै:" हा महामृत्युंजय मंत्र तेथील पुरोहितांबरोंबर उच्चारत,  यागात  आहुती देत आम्ही  सामील झालो. 


श्रीसलाह कालेश्वराचा निरोप घेऊन परिक्रमा  नर्मदेच्या काठावरून पुन्हा सुरु झाली आणि काही अंतरावरच थंडगार लिंबू सरबताचा आस्वाद घेऊन पुन्हा नर्मदेच्या दक्षिण तटाकडे जाण्यासाठी नौकेत बसलो. नदी पार केल्यावर रामपुराच्या बाजूला तीरावर उतरलो. तीरावर उतरल्यावर लगेचच एक छोटं - किडी-मकोडी नावाचं स्मशान आहे - इथं आपल्या पितरांसाठी प्रार्थना करून श्रद्धांजली वाहायची परंपरा आहे. थोडं पुढं गेल्यावर नर्मदा स्नान करण्यासाठी सुंदर घाट बांधला आहे.  तिथं माझ्याबरोबर काहींनी नर्मदास्नान केलं तर काहींनी नर्मदेच्या पवित्र जलांनं मुखप्रक्षालन केलं. नर्मदा स्नान झाल्यावर  थोडं जलपान करून जवळच असलेल्या " श्री दशावतार रणछोडदास मंदिराकडे " कूच केलं.  तिथं रणछोडदास (श्रीकृष्णाची) अतिशय आखीव-रेखीव मूर्ती आहे - मूर्तीच्या सर्व बाजूंनी श्री विष्णूंच्या दशावताराच्या प्रतिमा कोरल्या आहेत. आणि मूर्तीची पूजा आणि सजावटही सुंदर केलेली होती. मंदिराच्या आवारात हनुमानाचंही लहानसं मंदिर होतं, त्याचं दर्शन घेऊन आणि बुंदीचा प्रसाद घेऊन परत मार्गक्रमणा  सुरु झाली. रणछोडदास मंदिराजवळच तिर्थेश्वर मंदिर आहे - नर्मदा जलाचा अभिषेक  करायची इथं प्रथा आहे.  रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उत्तरेश्वराचं मंदिर आहे. रामपुरा सोडून आम्ही धनेश्वर आश्रमाच्या दिशेनं कूच केलं.  दक्षिण तटावर होणारी बरीचशी परिक्रमा ही पक्क्या होते. ऊन चढलं होतं त्यामुळे चालताना  सर्वांनी आपापली डोकी टोप्या आणि उपरण्यांनी आच्छादून घेतली.


वाटेत एका छोट्या रसवंतीत उसाचा रस पिऊन क्षुधा शांत केली. ही रसवंती एक जोडप्यानं त्याच दिवशी सुरु केली होती - त्यांचं कौतुक करून धनेश्वर मंदिराकडे प्रयाण केलं. इथं तीन  मंदिरं आहेत  - लुककेश्वर , जटेश्वर आणि धनेश्वर . यांची नावं  अशी असायची  एक वेगळीच कथा आहे . " ज्याच्या डोक्यावर हात  ठेवशील त्याचं  भस्म होईल असा वर दिल्यावर भस्मासुर मस्तवाल होऊन ज्याने वर दिला त्या  शिवशंकरांच्याच मस्तकावरच हात ठेवायला निघाला तेव्हा शंकर लपून (लुक्काछुपी) या ठिकाणी लपले - म्हणून लुककेश्वर .  घाम आल्यावर शिवशंभूंनी आपल्या जिथं झटकल्या तिथं जे लिंग स्थापन झालं ते जटेश्वर आणि शंकराला शोधत  पार्वती इथं आल्यावर जे बनलं ते धनेश्वर. बाजूलाच कडुनिंब आणि पिंपळ यांचं एकत्र बनलेल्या झाडाखाली मुक्तेश्वर आहे आणि छोटी गोशाळा आहे - तिथं सगळ्यांनी गोमाता आणि वासरांना गोग्रास भरवलं. या आश्रमाच्या सान्निध्यातच धनेश्वर महाराजांचा आश्रम आहे जो आता  साधू जतीन चालवतात. आश्रमात गेल्यावर तिथल्या आश्रमवासींनी दिलेलं बडीशेपेचं अत्यंत मधुर सरबत पिऊन आत्मा तृप्त झाला. आश्रमात श्रीरामाचं  एक सुंदर भजन वाचलं आणि सर्वांनी ते दोनदा गायलं - दोनदा गायल्यामुळे रामाचं नाव शंभर वेळा उच्चारलं जातं. आश्रमाच्या मागे एक भला मोठा वटवृक्ष आहे - त्याचं वय शेकडो हजारो वर्षं आहे असं म्हणतात - वृक्षाच्या अवाढव्य विस्तारातून अनेक पारंब्या खाली येऊन जमिनीशी जोडल्या देऊन या महावृक्षाला आधार देण्याचं दृश्य भारावून टाकणारं  होतं . याच वृक्षात एक फांदीला श्रीगणेशाचे रूप आल्यामुळेच या वटवृक्षाला  बहुतेक *"सिध्दवट"* म्हणत असावेत. इथून नर्मदा मैय्येचं  अप्रतिम दर्शन झालं. तिथून आश्रमाकडे जाताना शुभशकुन व्हावा असं मोराचं दर्शन झालं.


आम्ही आश्रम सोडतोय असं सांगितल्यावर जतीनमहाराजांनी आदेश दिला की भोजन समय झाला आहे आणि त्यामुळे प्रसाद घेऊन व थोडा विराम करूनच जावं. त्यांचा आग्रहसदृश आदेश मोडू शकलो नाही. महाप्रसाद ( भात ), भाजी , एक पोळी , आमटी , शिरा असं साधं जेवण प्रसादात होतं . या भागात अन्नपदार्थांच्या नावातही राम जोडलेलं आहे - उदाहरणार्थ  भाजीला सब्जीराम, वरणाला दालराम, पोळीला रोटीराम , मिठाला रामरस , गॉड पदार्थाला महाभोग , चटणीला चटणी राम , लोणच्याला आचरराम आणि तिखट पदार्थाला रावण , सकाळच्या नाश्त्याला बालभोग. असं केल्यामुळे प्रत्येक घासाला रामनाम मुखी येतंच . किती ही भक्ती आणि रामनामाला  महत्व !!


प्रसाद ग्रहण करून थोड्या विश्रांतीनंतर परिक्रमा परत  सुरु झाली आणि काही वेळानंतर आम्ही २१ किमीची ही अद्भुत परिक्रमा पूर्ण करून परत मांगरोल ला मंगलेश्वर महादेव मंदिरात जिथं संकल्प सोडला होता तिथं परत आलो. मंदिरात कन्यापूजेसाठी गावातल्या मुलींना बोलावून त्यांचं विविध कन्यापूजन केलं आणि त्यांना भेट वस्तू दिल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा चालण्याचा सारा शीण निघून गेला.


कन्यापूजन झाल्यावर चहा घेऊन व मंगलेश्वर येथील पुजाऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही रामानंद आश्रमाकडे मुक्कामाला गेलो. 


आश्रमात आमची स्त्रिया व पुरुष अशी वेगवेगळ्या खोलीत व्यवस्था झाली. थोडे ताजेतवाने होऊन रामानंद आश्रमाजवळ नर्मदेच्या तीरावर जाऊन नर्मदा स्नान करून खऱ्या अर्थानं परिक्रमा पूर्ण केली.


नर्मदेच्या तीरावर बसून सर्वानी  मारुतीस्तोत्र, रामरक्षा, अथर्वशीर्ष ,विष्णुसहस्रनाम म्हणलं..  नर्मदेच्या पात्रात दूरवर विहारणाऱ्या नौकेचे आणि नंतर सूर्यास्ताचं विहंगम दृश्य डोळ्यांनी आणि मोबाईल  कॅमेरात टिपून आश्रमात परतलो. आश्रमात गेल्यावर तिथल्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छ  आणि शांत अशा मंदिरात दर्शनाला गेलो. श्रीस्वामी अभिरामदासजी त्यागी यांनी स्थापन केलेल्या रामानंद आश्रमातल्या या मंदिरात श्रीराम -सीता , नर्मदा माता -वैष्णव देवी, मारुती, शिवशंकर आणि स्वामींच्या रेखीव मूर्तीचं दर्शन घेतलं आणि डोळे मिटून रामरक्षा व मारुतीस्तोत्र म्हणलं. याच मजल्यावरच्या गॅलरीत मधमाशांची दोन मोठी पोळी पाहायला मिळाली. इथं संध्याकाळचा प्रसाद लवकर म्हणजे ७ वाजताच होता. आम्ही आळीपाळीने प्रसादाच्या वेळी आम्ही सेवा केली - म्हणजे जेवायला वाढणं , पाणी देणं - नंतरची साफ सफाई करणं  वगैरे. आश्रमात प्रसादाच्या वेळी आपली ताट - वाटी- भांडं  आपलं आपण घ्यायचं आणि प्रसादानंतर आपलं आपण धुऊन जागेवर ठेवायचं हा नियम आहे. प्रसाद घेऊन रात्री झोपायला जाताना चंद्र आणि शुक्राची पिधान युती पाहायला मिळाली. 


रामानंद आश्रमाच्या केदारनाथ, हृषीकेश, राम टेकडी आणि गुवार म्हणजे आम्ही होतो तेथे शाखा आहेत.  स्वामी अभिरामजी या आश्रमात नव्हते ते हरिद्वारच्या आश्रमात होते असं तेथील व्यवस्था पाहणाऱ्या अमिताबेन यांनी सांगितलं.  अमिताबेन स्वतः IPCL मधली  नोकरी सोडून आश्रमाचा  कारभार - सेवा करत  होत्या. त्यांच्या पुस्तकाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला हेही कळालं . अमिताबेन करारी आणि कडक वाटत होत्या - सकाळी अग्निहोत्र करतानाही आमचा आवाज मोठा येतोय म्हणून त्यांची सूचना तेच दर्शवत होती.  पण शनिवारी  सकाळी त्यांची पुस्तकं घेताना त्यांच्याशी बातचीत करताना मात्र त्यांचा मृदू स्वभावही दिसून आला. मी व अविनाशजींनी सकाळी परत नर्मेदेत जाऊन स्नान केलं आणि रामानंद आश्रम सोडला.


रामानंद आश्रम सोडून वडवाळा येथील श्रीदेव गंभीर आश्रमाकडे जाण्यासाठी आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर ने निघालो. तेथील गजानंद महाराज  बालभोगासाठी ( नाश्ता) आमची वाट पाहत होते. जाताना वाटेत  कुबेर भंडारी या कर्नाळी गावातल्या प्राचीन अशा मंदिराचे दर्शन घेतले. शिवशंभोच्या कुबेर भंडारी मंदिराच्या आवारात शंकराबरोबरच गणपती, शेषनाग, रणछोडदास, अंगारेश्वर महादेव, नर्मदेश्वर महादेव अशी मंदिरे आहेत. देवळाच्या बाहेर काहींनी थोडी खरेदी केली आणि देवगंभीर आश्रमाकडे प्रवास सुरु झाला. वाटेत GPS नी थोडं गंडवलं त्यामुळे रस्ता थोडा चुकला पण १५-२० मिनिटे  उशीर होऊन आम्ही देवबाभळीला पोचलो. तिथं गजानंद महाराजांनी आमचं स्वागत केलं - आवरून आणि बालभोग - पोहे चहा यांचा स्वाद घेऊन आंही गरुडेश्वरला जायला निघालो. गरुडेश्वरला श्री दत्तमहाराज आणि श्री वासुदेवानंद सरस्वती -  टेंबे स्वामीमहाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आरती मध्ये सामील झालो. गरुडेश्वरात ही औदुंबर आणि पिंपळाचं एकत्र असं झाड आहे. नर्मदेचं पाणी घरी नेण्यासाठी प्रत्येकानं बाटल्या , कॅन वगैरे आणले होते - गरुडेश्वरला पायऱ्या उतरून पाणी आणायला उतरलो - आम्ही काही जण अनवाणीच पात्राकडे दगड -गोट्यातून गेलो त्यामुळे जाताना पाय चांगलेच पोळले . कष्टाशिवाय पुण्य मिळत नाही हे खोटं नाही.  पुढच्यावेळी मात्र रामानंद येथूनच नर्मदा जल घ्यायचं ठरलं कारण पात्र वाहतं  आणि नितळ आहे. 


गरुडेश्वरला प्रसाद ग्रहण करून नारेश्वरला जाण्यासाठी निघालो. आमचा ड्रायव्हर जितूभाई स्थानिक होता - रस्ता माहित आहे म्हणाला पण कन्फर्म करण्यासाठी GPS लावलं  तर दिशा उलटीच दाखवली - पुन्हा उलट फिरून GPS ने दाखवल्याप्रमाणे गेलो व नारेश्वरला पोचलो. नारेश्वर मध्ये मुख्य मंदिर पुंज श्रीरंग अवधूत महाराज यांचं आहे आणि त्यांच्यासमोर त्यांच्या माताजी रुक्मबा यांचं मंदिर आहे . मंदिराच्या आवारात नर्मदा मैया, नारेश्वर महादेव, स्वामींचं विश्रांती स्थान आणि त्यांचं चर्चा स्थानाचेही मंदिर आहे.


नारेश्वरला अत्तरं , धूप, अगरबत्त्या अशा सुगंधी वस्तूंची खरेदी करून आणि काहींनी चहा - तर काहींनी उसाचा रस पिऊन नारेश्वर सोडलं आणि देवगंभीरचा रस्ता पकडला. 


जाताना रस्त्यात एका बाजूला कालवा आणि दुसऱ्या बाजूला गुलाबाची विस्तीर्ण शेती पाहायला मिळाली. कालवा संपल्यावर तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलाब आणि इतर फुलांची शेती पसरलेली पाहून या भागात सुगंधी अत्तरं  व धूप का बनतात हे कळालं. 


रस्त्यात देवगंभीरच्या जवळच आमची गाडी पंक्चर झाली आणि परत थोडंसं  पदभ्रमण  करत आम्ही आश्रमात पोचलो . आवरून  झाल्यावर सवाष्णेची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला व सारे जण नर्मदा पूजनासाठी गजानंद महाराजांबरोबर तीरावर उतरलो आणि त्या अतिशय नीरव शांत असलेल्या नदीकाठावर नर्मदेचे पूजन व आरती केली. सर्वांनी नर्मदेत दिवे सोडले. तिन्हीसांज संपून रात्र होत असताना नदीच्या पात्रात सोडलेले दिवे पाहताना डोळे दिपून गेले. 

नर्मदापूजन झाल्यावर आश्रमात पुजारती झाली व स्वादिष्ट प्रसादाचे सेवन झाले. महाभोग म्हणून मोहनथाळ होता आणि बाकीचा महाप्रसाद होताच.


रात्री गजानंद महाराजांनी त्यांची कच्छ मधून येऊन इथं वसण्याची कहाणी सांगितली .. .त्यांनी घेतलेले कष्ट आणि परिक्रमावासियांची  अनेक वर्षं  केलेली त्यांनी सेवा याची कहाणी थक्क करून टाकणारी आहे.   आश्रमसमोरच शेवग्याची झाडं दिसतात आणि  विस्तीर्ण असा नर्मदेचा प्रवाह दिसतो - या आश्रमात कुठेही दरवाजे नाहीत आणि नर्मदेच्या अगदी तीरावर असल्यामुळे प्रसन्न , थंड असे निसर्गरम्य अशी ही जागा आहे. 


रात्री छान झोप लागली आणि रविवारी सकाळी लवकर उठून आवरून  नर्मदेच्या तीरावर सूर्योदयाचे दर्शन घेतले आणि छान गरम गरम धिरड्यांचा  बालभोग ग्रहण करून व  गजानंद महाराजांचा आशीर्वाद घेऊन बडोद्याकडे परतीच्या  प्रवासासाठी प्रयाण केलं. 


बडोद्याला रेल्वे स्टेशनवर जायच्या आधी तेथील प्रसिद्ध जगदीशमध्ये  मिठाई घेतली व खमण ढोकळा, कचोरी, सुरळीवडी , जिलेबी इत्यादी पदार्थांवर ताव मारून स्टेशनवर आलो आणि राजकोट -कोईम्बतूर एक्सप्रेस मध्ये बसून पुण्याला परत निघालो. 


फक्त तीन दिवसांचा प्रवास किती अनुभव देऊन गेला. प्रत्येक दिवशी रात्री वेगवेगळ्या आश्रमात मुक्काम - प्रत्येक ठिकाणची अनुभूती वेगळी पण सेवाभाव एकसारखा होता - नर्मदेचा " नर्मदे हर " गजर एकसारखा होता . प्रत्येक आश्रमातल्या महंतांचे गुरु वेगवेगळे होते पण श्रद्धास्थान एकच - नर्मदा होतं  आणि सेवा परमो धर्म हाच धर्म सगळे पाळत  होते. 


 

देशाची प्रगती होत आहे पण खेडोपाडी अजूनही विकासाची फळं पूर्णपणे पोचलेली नाहीत हे या परिक्रमेतून दिसून आलं. अशा परिक्रमांना मिळणारा  वाढता  प्रतिसाद चांगला आहे - त्यामुळे परिसराचा  विकास होईल -तो व्हायलाच हवा - धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल हेही चांगलंच . पण हे सर्व होताना या भागाचं  किंवा अशा सर्व ठिकाणांचं पावित्र्य जपून राहावं ही प्रामाणिक इच्छा . इथं दिसणारा आणि केला जाणारा सेवाभाव इथंच सोडून न येता दैनंदिन जीवनातही आचरला गेला तरंच  परिक्रमा पूर्ण झाली असं म्हणायचं. 


नर्मदा मैयानी ती ताकद आणि मनोबळ नक्कीच दिलंय - तिच्या आशीर्वादानं तो सेवाभाव रोजच आचारला जाईल याची खात्री आहे... 


नर्मदे हर !!!


©राहुल लाळे














































Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका