औदुंबर
१३ ऑगस्ट
आज बालकवींचा जन्मदिवस
*औदुंबर...*
बालकवींची एक अजरामर रचना
#राहुल लाळे
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर
फक्त आठ ओळींची कविता... पण मला वाटतं सर्वात जास्त वाचली-चर्चिली गेलेली- चेतनागुणोक्ती अलंकारात बांधलेली बालकवींची वरवरनं पाहिलं तर एक फारच छान निसर्ग कविता... एखाद्या रसिक चित्रकाराने त्याच्या जादुई कुंचल्यातून काही फटकाऱ्यातूनच उतरवलेलं जणू एक सुंदर चित्र...निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गर्दी, पांढरी पायवाट व काळा डोह- अशा विविध रंगांची उधळण किती विलक्षण रंगदृष्टी !!
पण फक्त एवढाच अर्थ असावा?
ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी पायवाट, झाकळुनी जळ गोड काळिमा,चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी ,जळात बसला असला औदुंबर किती गोड शब्द, सुंदर लय, छान अनुप्रास साधला आहे. एकदा सांगलीला जाताना मुद्दाम वाळव्याला डावीकडे वळून औदुंबरचे..तिथल्या छोट्या रस्त्यांचे...कृष्णेच्या डोहाचे...ऐलतटाचे पैलतटाचे ...श्री दत्तदिगंबराचे ...श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन आलो... आणि त्या कवितेचा गूढ अर्थ लागतो का पहाण्यासाठी परत दोन तीन वेळा जाऊन आलो...पण प्रत्येक वेळी पाण्यासारखं काहीतरी नकळत निसटून गेल्यासारखंच वाटलं. काय निसटतय ते काही कळलं नाही...
पहिल्या चार ओळीत रंंगांची उत्फुल्ल उधळण होत असताना पुढच्या चार ओळीत काळे पांढरे रंग, काळिमा- झाकोळून असे नैराश्याने भरलेले शब्द का आले असावेत? हिरव्यागार तजेल्या पायवाटेतून काळ्या डोहाकडे झाकोळून जाणे हे कशासाठी लिहिले असावे? ....त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीशी निगडित असावे का...परित्यक्ता- विधवा स्त्रिया ज्या आत्ता पर्यंत नवनवलाईचे भरभराटीचे आयुष्य जगत होत्या..त्यांना सद्यस्थितीत सहन कराव्या लागणाऱ्या अवहेलना सहन न होऊ काळा डोह जवळ करत होत्या हे सांगायचेय.. का बालकवींच्या पुढील आयुष्याचं ते चित्र आहे... त्यांनी प्रसिध्दीच्या उत्तुंग शिखरावर असतानाच अल्पवयात प्राणत्याग केला होता.....
असला औदुंबर म्हणजे कसला.....हा प्रश्न उलगडेस्तोवर...त्याचे उत्तर मिळेस्तोवर हे विचार असेच चालू राहतील.... आणि वेळ मिळेल तेव्हा औदुंबर वारीही....
बालकवींच्या या आवडत्या कवितेचा काही अर्थ लागतोय का पाह्यला औदुंबर ला परत जाऊन आलो (पावसाळ्यात औदुंबर महापुरामुळे पाण्याखाली जातं....त्याच्या आत)
राहुल लाळे
१३.०८

Comments
Post a Comment