तुम्हारे बिना
https://youtu.be/kVHNQvqROM0
*तुम्हारे बिना... तुझ्याशिवाय*
राहुल लाळे
जगता अभी भी अलार्म ये
लेता है दिन क्यूँ उबासियां
रिटायर हो जाती है श्याम ये
ड्युटी पे रहती है उदासीयां
राते भी एक रंग, बाते भी एक रंग
तुम्हारे बिना सब एक रंग है
सब एक रंग है
आपल्या आयुष्यात-दैनंदिन व्यवहारात अनेक जण आपल्या संपर्कात असतात - काही जवळचे काही दूरचे - अगदी सकाळच्या दूधवाला-पेपरवाला -स्वच्छता कर्मचारी- ऑफिसमधले सहकारी - अगदी रोज टेबलवर चहावर आणून देणारा ऑफिसबॉय - आपले ठराविक वेळेला दिसणारे शेजारी, अगदी सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड्स सुद्धा. या सर्वांची आपल्याला सवय झालेली असते . यातला एखादा आपल्याला एखाद्या दिवशी किंवा काही दिवसांत दिसला नाही की चुटुपुट लागते. मग आपल्या जवळचाच घरातला सभासद - अगदी आपला जोडीदार अचानक आपल्या आयुष्यातून कायमचा दूर निघून गेला तर आपली काय अवस्था होईल ? त्या व्यक्तीशिवाय आपण आपलं आयुष्य कसं व्यतीत करू शकू ?
हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे काल पाहिलेली " तुम्हारे बिना " ही एक शॉर्ट फिल्म. शैलेंद्र कुमार झा यांनी निर्मित व दिग्दर्शित केलेली ही शॉर्टफिल्म खरंच मनाला चटका लावून गेली.
स्त्री किंवा पुरुष कोणीही असो - त्याची / तिची आपापल्या जोडीदाराशी घट्ट वीण जोडली गेलेली असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेकांशी ते जोडले गेलेले असतात आणि जसजसं आयुष्य पुढं सरकत जातं तसतशी ही वीण अधिकंच घट्ट होत जाते. काही बाबतीत स्त्री आपल्या नवऱ्यावर अवलंबून असते - घराबाहेरच्या - शक्यतो आर्थिक -व्यावहारिक गोष्टींसाठी ... तर बहुतेक पुरुष घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी पत्नीवर अवलंबून असतात - त्यांची प्रत्येक वस्तू , प्रत्येक गोष्ट अगदी सकाळच्या चहापासून ते जेवणखाण -कपडे आणि सर्वच बाबतीत !
अनेकदा आपसांत वाद होतात.. अगदी " रे तुझ्यावाचून काही येथले अडणार नाही , रे तुझ्यावाचून दुनिया दीन ही होणार नाही ॥" इथपर्यंत परिस्थिती जाते .. पण असं असूनही पुन्हा " तुझं माझं जमेना ... तुझ्याशिवाय करमेना " अशी स्थिती नवरा टूरवर गेला की बायकोची तर पत्नी माहेरी गेली की नवऱ्याची होतेच.
काही दिवस दुरावा झाला तर तो तात्पुरता आहे हे माहिती असतं त्यामुळे सुरुवातीचा मोकळेपणाचा आनंद सरल्यावर नंतर आपल्या माणसाची उणीव आणि ओढ लागू लागतेच. !!
पण हा दुरावा जर कायमचा घडला तर ? विचारही करवत नाही ना ? जोडी जमलीये तर जोडीनेच जावं असंही वाटू शकतं !! पण ते आपल्या हातात थोडंच आहे ? कोणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही ... आणि आपल्या माणसाचं आसपास न असणं आणि ते आता कायमचंच नसणारं असणं हे पचवणं किती अवघड आहे .. नाही ?
अनेक जण म्हणतात की पुरुषाला हे पचवणं जास्त अवघड जातं . स्त्री अशा अवस्थेत लवकर सावरते - संसारात- रोजच्या धावपळीत गुरफटलेली असल्याने तिला या दुःखाचा काही काळ विसर पडतो ... आणि त्यातून ती परत स्वतःला - घराला परत आधार देते - हे खरंच आहे - पण हे सहज म्हणणं तिला गृहित धरण्यासारखं वाटत नाही का ? तिलाही क्षणोक्षणी आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेल्या कडू- गोड प्रसंगांची, मोहरवून टाकणाऱ्या क्षणांची आठवण येऊन वेदना होत असतीलच की !!!
पण प्रत्यक्षात हीच स्थिती अनेकदा पाहायला मिळते - पुरुष बाहेरून कितीही कणखर वाटला तरी तो आपल्या पत्नीचा कायमचा विरह सहन करू शकत नाही - तो कोलमडून पडतो .
" तुम्हांरे बिना" या शॉर्टफिल्ममध्ये अशाच एका व्यक्तीची व्यथा दाखवण्याचा प्रयत्न लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर दाखवला आहे. फिल्मच्या सुरवातीलाच स्क्रीन वर दिसणाऱ्या होमहवनाच्या ज्वाला , उच्चारले जाणारे मंत्र आणि हार घातलेल्या स्त्रीच्या फोटोसमोर हात जोडून बसलेला एक साधारण वृद्ध पाहूनच कथेचा अंदाज येतो आणि - लॅपटॉप व मोबाईल वरून अंतिम विधींत ऑनलाईन सहभागी झालेल्या मुलांना पाहून त्याच्या एकटेपणाची जाणीव आपल्यालाही होते. घरातल्या वस्तू शोधताना - चहा करताना - तो गाळताना - घरातल्या वस्तू आणताना त्याची उडालेली धांदल ते एकटेपण आणखीनच सामोरं आणते. फोनवर गोष्टी होत असल्या लॉकडाउनमुळे मुलं लवकर आपल्याकडे लवकर येऊ शकणार नाहीत याची जाणीव आणखीनच अस्वस्थ करणारी. झोपताना शेजारी अंथरुणावर कायम पत्नीचं अस्तित्व शोधू पहाताना झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप न येणं आणि हातातल्या वस्तू रस्त्यावर पडल्यावर कडेला कचऱ्यात बसलेली एक तशीच एकटी स्त्री पाहणं ही दृश्य मन हेलावतात. मुलगी भेटायला आल्यावर तिच्याशी बोलणं आणि झोप न येण्यावर त्यांनी शोधलेल्या उपायावर तिचं वडलांवर चिडणं साहजिकच वाटतं . पण त्यांनी दिलेलं उत्तर ही मनाला भिडतं .
त्यामुळे फिल्मच्या शेवटी गायली गेलेली कविता पटते -
चाय की प्याली - बिस्तर का कोना
परदो की आहट ये मेरा भी होना
सब एक रंग है तुम्हारे बिना
यादे भी एक रंग
मौसम भी एक रंग
तुम्हारे बिना तुम्हारे बिना
जोडीदाराशिवाय सगळे रंग बेरंग वाटायला लागतात - सगळेच ऋतू सारखे वाटायला लागतात- मन रमत नाही - प्रत्येक गोष्टीत आपल्या मधलं तिचं अस्तित्व शोधूनही ती समोर नसल्यामुळे जगणं अवघड होऊन जातं ही भावना निर्माण होते.
वस्तू न सापडणे, चहा करणं - स्वयंपाक बनवणं या गोष्टी प्रातिनिधिक आहेत - बहुतेक पुरुषांनी त्या गोष्टी , बायको हयात असताना कधीच न केल्यानं त्यांना परावलंबी झाल्यासारखं वाटत असेलही - पण त्यासाठी तेच जबाबदार आहेत ना ? आणि काही प्रमाणात त्यांना घरकामाला हातभार लावण्यापासून दूर ठेवणाऱ्या त्यांच्या बायकाही तेवढ्याच जबाबदार- तो एकटेपणा एकवेळ हळू हळू दूर होईल - पण आपल्या माणसांचं न असणंच स्वीकारणं कधी आणि कसं जमेल - हा प्रश्न आहे - तो आपला आपणच सोडवायचा -
आणि जोपर्यंत ती व्यक्ती बरोबर आहे तोपर्यंत तिला जपण्याचा आणि नातं सुदृढ करण्याचा प्रयत्न करायचा...
आणि असा की ती प्रत्यक्षात जरी जवळ नसली तरी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर साथ द्यायला असलेच .
मग असंही गुणगुणून आपल्या माणसाला साद घालता येईल आणि नसतानाही बरोबर राखता येईल
नसशील जरी जवळ तू
असशील सदा मनीच तू
प्रत्येक कृतीतून माझ्या
उतरशील फक्त तूच तू
जोपर्यंत जगेन मी
माझ्यातूनच जगशील तू
©राहुल लाळे
२३-०१-२०२३
https://youtu.be/kVHNQvqROM0
(वडील दवाखान्यात ऍडमिट आहेत त्यामुळे ऑफिस - घर सांभाळून दवाखान्यात एकांत वेळ मिळतोय - युट्यूब - OTT - वाचन सुरु आहे - आज थोडं लिहायलाही जमलं)


Comments
Post a Comment