वर्ष बदलताना
म्हणता म्हणता आणखी एक वर्ष सरलं - वेळ कसा जातो हे कळत नाही आणि वेळ मिळत नाही असं म्हणत म्हणत आपण वर्ष भरात काय काय केलं याचा हिशेब तरी आपण कुठे ठेवतो ?
२०२२ ला अलविदा !!
२०२३ चा प्रवास सुरु !!!
अखंड गर्जे समोर सागर , कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता , सजे किनारा तिज कुरवाळू
स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसता डोळे हसता हसता
उभे इथे मी पसरून बाहू , नवीन वर्षा तुझ्या स्वागता
शांताबाई शेळकेंची ही वाक्यं प्रत्येक नववर्षाच्या स्वागतावेळी कायम आठवतात आणि सरत्या वर्षाच्या आठवणी डोळ्यापुढे उभ्या राहतात. अनेक प्रसंग , अनेक कामं , अनेक इव्हेंट्स , अनेक ठिकाणांना दिलेल्या भेटीही नजरेसमोर उभ्या ठाकतात .
वर्ष सुरु होताना केलेली सिंहगडावर वारी नंतर वर्षभर ६-७ वेळा झालीच - आणि अशी भ्रमंती चालूच राहिली ...गिरनार-गुरुशिखर -सोमनाथ- स्टॅच्यू ऑफ युनिटी -गरुडेश्वर- डाकोर-बडोदा नंतर गुहागर - महाबळेश्वर - दोन चार वेळा कोल्हापूर -मुंबई तर झालंच , तसंच महेश्वर - मंडलेश्वर -ओंकारेश्वर इथं नर्मदा दर्शन झालं, तसेच मांडू -उज्जैन- भोपाळ -भोजपूर, भीमबेटका, सांची करत इंदोरला जाऊन छप्पन दुकान आणि सराफातली खादाडी झाली . अनेक दिवस मनात घर करून असलेलं रावेरखेडीही झालं - नर्मदातीरावरच्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या समाधीचं दर्शन घेताना अभिमानाने छाती बरोबरच मन व डोळेही भरून आले.
मागच्या दोन वर्षातली मरगळ झटकली जाऊन उत्साहाने ऑफिसमध्ये अनेक कामं -प्रोजेक्ट्स जोरदार मार्गी लागले - काही प्रगतीपथावर आहेत. काही प्लॅनिंगमध्ये आहेत. सर्व सहकारी आणि अधिकारी मागच्या वर्षांतले धक्के पचवून पुन्हा जोमाने एकत्र येऊन जोशात कामाला लागले. आव्हानांचे नवीन डोंगर सामोरे आहेत पण तेही पार करण्याची नवी उमेद आहे.
अनेक गाणी म्हटली - स्टार मेकर वर- मेरा गाना वर - काही स्टेजवर - काही स्टुडिओत - काही गाडीत घरी परतताना - अनेक कविता केल्या -ब्लॉग वर आर्टिकल टाकली - करंट अफेअर्स - लता बाईचं चटका लाऊन जाणं - राजकारण - सगळ्यावर काही बाही लिहिलं - स्वतःसाठी काही - फेसबुकवर -माझ्या ब्लॉगवर टाकलं - अनेक पुस्तकं वाचली - नोट्स काढल्या - गौर गोपालदास - सद्गुरुंच्या प्रवचनांपासून तोरसेकर- सुशील इत्यादींपर्यंत यु ट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहिले. अनेक सिनेमे पाहिले - OTT वर - थिएटरवर - काहींची परीक्षणं लिहिली - ग्रुपवरील चर्चांत सामील झालो. - रोटरीत बाबूजींवर " तोच चंद्रमा नभात " हा दृक्श्राव्य कार्यक्रम बायकोबरोबर सादर केला आणि एक असंही काम करता येईल याचा अंदाज आला.
सामाजिक क्षेत्रात सेक्रेटरी म्हणून रोटरीमध्ये - अनेक साप्ताहिक कार्यक्रम -काही प्रोजेक्ट्स - बुलेटिनसाठी लिहिणं- जमेल तेवढं योगदान देत आलो - स्वरूपवर्धिनीत - सेवाधाम वृद्धाश्रमात - प्रसन्न ऑटिझम सेंटर इथं जसं जमेल तसं जात राहिलो - भिकाऱ्यांचे डॉक्टर अभिजित सोनवण्याचं भाषण ऐकून - शनिवारवाड्याजवळील शनिमंदिरापाशी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर तासभर थांबून भिकाऱ्यांच्या समस्या काय असतात त्या अनुभवल्या - हा डॉक्टर आयुष्यभर यांच्याबरोबर काम करतोय ते पाहून तसंच वर्धिनीतले वर्धक - सेवाधामच्या पायगुडे मॅडम यांच्यासारखं १०% तरी काम करण्याचा मानस बांधला. विद्यार्थी सहायक समितीतल्या विद्यार्थिनींची मेंटॉरशिप सांभाळताना माझ्या शैक्षणिक जीवनातले दिवस आठवले - ज्या ठिकाणी मी कंपनीकडून प्रेझेन्टेशन करायला जायचो तिथं परीक्षक म्हणून जायचा मौका मिळाला. अभियांत्रिकी क्षेत्रात कुठली ब्रॅंच स्विकारावी, याविषयीच्या परिसंवादात झी टीव्हीवर झळकण्याची संधीही यावर्षी मिळाली.
दररोजचा मॉर्निंग वॉक - मित्र-मंडळीत सामील होऊन गप्पा टप्पा - आई-बाबा - नातेवाईक -लग्नप्रसंगात मिरवणं - फोटो काढणं सगळंच हौसेने केलं.
वर्षाच्या शेवटी चिरंजीवांचं Ms यशस्वीरीत्या पूर्ण होण्याची आनंदाची बातमी मिळाली आता त्याला भेटायची उत्सुकता
काही दुःखद प्रसंग आले त्यावर अनेक आनंदी - प्रसन्न क्षणांनी मायेचा हात फिरवला
बरंच काही करायचंय - ऑफिसमध्ये खूप काम आहेत - अनेक ठिकाणी जायचंय - अनेकांना भेटायचंय - लिहायचंय - नाटक-सिनेमे-मालिका पाहायच्यात - गाणी म्हणायची आहेत - सामाजिक क्षेत्रात थोडंसं योगदान द्यायचंय ... आईबाबांच्या तब्बेतीची काळजी आहेच.
वर्ष २०२२ संपलं म्हणून काय झालं ? २०२३ आलंय - पुढचीही येतील - येत राहतील
तोपर्यंत - प्रवास चालू ठेवायचा !!!
या वर्षातले आवडलेले काही फोटो !!!
राहुल लाळे...😊














Comments
Post a Comment