श्रद्धा आणि विश्वास
*श्रद्धा आणि विश्वास*
राहुल लाळे
०४-१२-२०२२
*श्रध्दा*
राहुल
घरी आता परत ती येणार नाही कधी
मायबापाच्या आठवणीतून मात्र जाणार नाही कधी
पणती, दिवा लावतील आता सारे तिच्यासाठी
मशाल घेऊन उठा मित्रहो अन्य बहिणींसाठी
नराधम तो सुटू नये म्हणून आवाज चला उठवूया
आसपास असतील बहिणी त्यांना सावधान करूया
गेल्या आठवड्यात श्रद्धा वालकर या तरुणीचा तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताबने खून केल्याची बातमी ऐकली , अनेक उलटसुलट भयंकर बातम्या ऐकल्या आणि अस्वस्थ झालो …
श्रद्धाच्या देहाचे ३५ तुकडे करून घरातल्या फ्रीजमध्ये ठेवून नंतर क्रूरकर्मा आफताबने दिल्लीत -मैहरोलीत वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकून विल्हेवाट लावली - आणि हे प्रकरण बाहेर आले सहा महिन्यानंतर - आणि नंतर अनेक जण आपापल्या परीने - कुवतीने -समजुतीनुसार- इच्छेनुसार - आणि भूमिकेनुसार या घटनेबद्दल वृत्तवाहिन्यांमधून - वृत्तपत्रांमधून - सोशल मीडियामधून आणि प्रत्यक्ष चर्चेतून व्यक्त होत आहेत.
एखाद्या मुलगी किंवा स्त्री विनयभंग,बलात्कार - सामूहिक बलात्कार, एकतर्फी प्रेमातून केलेली हत्या किंवा अशा अत्याचारांना बळी पडण्याची ही पहिली घटना नाही . श्रद्धाची बातमी ऐकली आणि - ३०-३२ वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून रिंकू पाटीलला दहावीची परीक्षेच्या वेळी जिवंत जाळण्याची घटना, नैना सहगलचा खून होऊन तिला तिच्या नवऱ्याने तंदूरमध्ये जाळण्याची घटना, सांगलीत लग्नाला नाही म्हणाली अमृता देशपांडेला भर रस्त्यात भोसकून मारल्याची घटना असो , दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून अनन्वित अत्याचार केली गेलेली व नंतर जीव गमावलेली निर्भया , डेहरादूनमध्ये अनुपमा गुलाटीच्या नवऱ्याने तिच्या देहाचे केलेले तुकडे , २००२ मध्ये बिल्किस बानो हिच्यावर झालेला सामूहिक अत्याचार, दोन वर्षांपूर्वी हथरस येथे एका दलित महिलेवर उच्चवर्णीयांनी केलेला बलात्कार व नंतर तिची झालेली कथित हत्या, आणि अंकिता सिंग, निकिता तोमर, अंजली आर्य, मानसी दीक्षित, प्रिया सोनी, ख़ुशी परिहार आणि अशा अनेक घटना डोळ्यासमोर उभा राहिल्या आणि आता ही श्रद्धाची घटना !!!
अशा घटनांकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिने पहातो आणि पाहत आलाय.
या ही वेळेला काही वेगळं नाही
पोलीस - तपास यंत्रणा या घटनेकडे गुन्हा म्हणून पाहतायत - कोणी लव्ह जिहाद म्हणून बघत आहेत. तर राजकीय पक्ष आपापल्या हितसंबंधांप्रमाणे - विरोधी पक्ष सरकारचा गलथान कारभार - तर सरकार याकडे आणखी एक गुन्हा म्हणून पाहील. पण त्या मुलीच्या घरी पालकांची - इतर कुटुंबियांची मनस्थिती काय असेल याचा कोणी विचार केला असेल ? किंवा त्या आफताबची हे करतानाची आणि आताची मानसिकता काय असेल? त्याच्या घरच्यांची काय धारणा असेल ? - हा प्रश्न कोणाला पडला असेल ?
समाजाची - समाजातील विविध घटकांची मानसिकता - संवेदनशीलता कशी असते - घटनेनुसार कशी बदलते याचा विचार करताना पुढील गोष्टी महत्वाच्या वाटल्या आणि व्यक्त करावाश्या वाटल्या.
*अशा घटनांकडे बघायची अलिप्तता -* हे अत्याचार फक्त त्या मुली पुरते -महिलेपुरते मर्यादित राहतात ? का फक्त त्या कुटुंबापुरती ती समस्या आहे ? अशा घटनांत फक्त पीडित स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ?, अनन्वित अत्याचार आणि कधीतरी अकाली हकनाक मृत्यूलाही सामोरं जावं लागतं ? अशा घटनांनी त्या पीडितेच्या पालकांचं , आप्तेष्टांचं पूर्ण भावविश्वच उद्धवस्त होतं आणि त्यातून बाहेर पडणं किती अवघड असू शकेल याची कल्पना तेच करू शकतात . बाकीचे फक्त काही दिवस चर्चा करतात - हळहळ करतात - त्या मुलीं - तिच्या पालकांनी असं करायला हवं होतं , नराधमांना शिक्षा व्हायला हवी - कायद्याचं राज्य राहिलं नाही वगैरे आणि नंतर विसरून जातात आणि पुढची घटना होईपर्यंत सगळं शांत . म्हणतात ना ज्यांचं जळतं त्यांनाच कळतं - इतरांना त्यांच्या वेदनांची -दुःखाची अनुभूती कधी येणार ? हा प्रश्न उद्या आपल्याही घरापर्यंत येऊ शकतो हे समाजात प्रत्येकाला कधी कळणार ? असं ऐकलं होतं की श्रद्धाने आफताब तिला त्रास देतोय- मारहाण करतोय असं तिच्या मित्रांना ,ऑफिसमधील सहकार्यांना- बॉसला सांगितलं होतं. मग त्यांनी तिला मदत का केली नाही ? त्यांनी ठरवलं असतं तर पोलिसांची , किंवा श्रद्धाच्या घरी कळवून तिला मदत मिळवून दिली असती तर ... कदाचित श्रद्धा आज जिवंत असती - अशा अनेक श्रद्धा वाचल्या असत्या ... गुन्हा करणारा गुन्हेगार आहेच त्याला शिक्षा व्हायला हवीच ... गुन्हा करणाऱ्याबरोबरच अन्याय सहन करणारी श्रद्धा , सर्व घटना मूग गिळून बघत राहणारा समाज अशा गुन्हेगाराची मदतच करत नाहीत का ? वेळच्या वेळी पीडित स्त्रीच्या मदतीला धावून जाणे , एखादी अनुचित घटना घडत असताना - होत असल्याची जाणीव होत असताना अलिप्तता सोडून अशा गुन्हेगारीला पोलिसांची वाट न पहाता प्रतिबंध करणं हे समाजाचं- प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे - असायला हवं .
*लव्ह जिहाद?* - या घृण घटनेनंतर अनेकांना पृथ्वीराज चौहान, छत्रपती संभाजी राजे, गुरुगोविंद सिंघांची मुलं , भाई मतीनदास प्रभूतींना तत्कालीन मुसलमान शहांनी जसं हाल हाल करून मारलं -किंवा अगदी अलीकडे कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याने कॅप्टन सौरभ कालियाचे केलेले अनन्वित छळ आठवले. या केसमध्ये अपराधी आफताब - मुस्लिम आणि व्हिक्टीम श्रद्धा हिंदू यामुळे सगळीकडे परत लव्ह जिहादची चर्चा सुरु झाली. यापूर्वी घडलेल्या अंकिता सिंग- शाहरुख, अंजली आर्य -यामिन, मानसी-सय्यद , तनिषा- साहिल, दीक्षा -इम्रान , प्रिया -इजाज, खुशी परिहार- अश्रफ अशी अनेक उदाहरणं पाहिली की, श्रद्धा -आफताब हे त्याच पठडीतली लव्ह जिहादची घटना आहे असं कोणी म्हणतं. असा लव्ह जिहाद होत असेल तर तो चूकच आहे - त्याचा निषेध- विरोध व्हायलाच हवा. पण मग परवाच आराधना प्रजापती या नवविवाहितेचा प्रिन्स यादव या तिच्या पूर्वप्रियकराने केलेल्या हत्येचं काय ? अनुपमा गुलाटीचा तिचा पती राजेशने हत्या करून तिच्या देहाचे केलेले तुकडे, सुशील शर्माने पत्नी नयना सहानीची हत्या करून तंदूरमध्ये जाळणं आणि अशा घटनांचं काय ? आधीच्या घटनांमध्ये आणि या घटनांमध्ये काही फरक आहे ? हा जिहाद नाही - विकृती आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून सगळं पूर्वायुष्य सोडून आपल्याबरोबर भावी आयुष्य व्यतीत करायला आलेल्या स्त्रीला निर्घृणपणे मारणारा माणूस - माणूस असतो का हैवान? खोटारडेपणा, रागीट -चिडचिडा स्वभाव, आपलंच म्हणणं खरं करण्यासाठी आपलंच म्हटलेल्या माणसाला मारहाण करणं - नंतर अमानुषपणे तिला मारून टाकणारा माणूस आणि नंतर आपलं रोजचं जीवन सामान्यपणे जगणारी अशी माणसं ही नक्कीच सामान्य नसतात. काहीतरी विकृती - पर्सनॅलिटी डिसऑर्डर निश्चितच असते. नाहीतर सामान्य माणसाच्या हातून काहीही प्रकारचं कृत्य घडलं तर तो भानावर आल्यावर लाजिरवाणा होतो - पश्चात्तापदग्ध होतो पण अशा विकृत माणसांकडे जबाबदारीची जाणीव, नैतिकता - प्रेम आणि त्यापोटी येणारी कर्तव्य यापैकी काहीच नसतं आणि हेच नेमकं ओळखायला या मुली चुकतात का ? तरुण वयातलं आंधळं प्रेम फक्त शारीरिक आकर्षण व कल्पनाविश्वातलं आयुष्य यापुरतंच त्या मर्यदित ठेवतात का ? दुःखानं हेच म्हणायला लागतं की आईवडिलांच्या छत्रछायेत सुरक्षित आयुष्य जगात असताना त्यातून ( काहीशा अंध?) आत्मविश्वासाने बाहेर पडून अशा विकृत मनोवृत्तीच्या - व्यक्तिमत्वाच्या तावडीत सापडणाऱ्या मुलींच्या अशा काळजाला पिळवटून टाकणाऱ्या दुर्देवी शेवटाचं मूळ त्या नात्याच्या सुरवातीतंच नाही का ?
*कायदा व सुरक्षा यंत्रणा* -
निर्भया आणि अनेक घटनांनंतर लोकांमध्ये जनक्षोभ उसळला होता... कॉलेज - विद्यापीठे - रस्ते - विधानसभा व इत्यादी ठिकाणी मूकमोर्चे काढले गेले - ठिकठिकाणी दिवे-पणत्या लावल्या गेल्या. अशा घटनांमुळे जनमानसात निर्माण होणारा संताप- राग - उद्रेक हा ती घटना झाल्यानंतर काही दिवस टिकतो आणि हळूहळू शमतो - या रागाचं - उद्रेकाचे रुपांतर शासनयंत्रणांवर-सरकारवर सुरक्षायंत्रणा सक्षम करण्यासाठी दबाव आणण्यासाठी शक्तिस्थळं बनण्यासाठी व्हायला हवं. अशा शक्तिस्थळांनी, प्रबळ गटांनी सरकार -पोलीस यंत्रणेवर असा दबाव आणला पाहिजे की " पोलीस यंत्रणा ही सतर्क आहे, सामान्य जनतेचीच आहे आणि ती फक्त राजकारणी - व्हीआयपी - स्टार मंडळींची दास नाही आणि कुठल्याही दबावाखाली न येता त्वरित कार्यवाही करतील "
अशा घटनांमध्ये न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा फार मोठा सहभाग असायला हवा - अशा केसेसमध्ये पोलिसयंत्रणेकडून विनाविलंब आरोपपत्र सादर होऊन ,हायस्पीड न्यायालयं स्थापन करून दोषींना त्वरित शिक्षा होईल हे पाहायला हवं. आरोपीना त्वरित शिक्षा मिळाली तर एक मेसेज पसरला जाईल आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा मिळण्याबरोबर अशा घटना घडायला प्रतिबंधही मिळू शकेल.
हे असं नाही झालं तर अशा घटना घडत रहातील जशा श्रद्धाच्या या घटनेच्या बातम्या ऐकत असताना, कायदा आणि त्याची अंमलबजावणी याबद्दल बोलत असतानाच दिल्ली आणि इतर काही ठिकाणी अशाच निर्घृण घटना घडल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या.
अशा घटनांच्यावेळी कोर्टात केस चालतात - चालत राहतात - पूर्वीच्या कुठल्यातरी केसचे दाखले दिले जातात - जुन्या कुठल्यातरी निकालाचे संदर्भ जोडले जातात - कायदा बघतो काय तर हा बलात्कार आणि तो बलात्कार हा खून आणि तो खून सारखेच होते का? का त्यात काही फरक आहे ? पण प्रत्येक केस वेगळी नसते ? हे सर्व करण्यात वेळ जातो - निर्णय - निकाल लागायला वेळ लागतो - कधी शिक्षा मिळते कधी पुराव्या अभावी सुटका किंवा जेवढी अपेक्षित कडक शिक्षा मिळायला हवी - तेवढी न मिळणं यामुळे पीडित परिवाराचा - सामान्य जनतेचा कायद्यावरचा विश्वास कधी उडू शकतो. हैद्राबादला झालेल्या अशा घटनेत आरोपी निसटत असताना त्यांचा एन्काउंटर झाला - ते अगदीच समर्थनीय नाही पण निकाल लवकर लागून गुन्हेगारांना शिक्षा लवकर मिळायलाच हवी. "Justice Delayed is Justice Denied " या उक्तीमुळे गुन्हेगारांना शिक्षा वेळेवर मिळाली नाही तर कायद्याचा धाक रहात नाही असं मला कायम वाटत राहतं. लॉर्ड कायदे मेकॉलेने १८ व्या शतकात केलेले इंडियन पिनल कोड अजून चालू आहेत आणि त्यांची अंमलबजावणी ही तशीच. असं म्हणतात "लॉ नीड्स टू बी एनफोर्स्ड" त्यामुळे जो कायदा सक्ती करत नाही तो कायदाच नाही आणि कायद्याचा धाक राहिला नाही तर असे गुन्हे वाढतात, बलात्कार --खून वाढतात, भ्रष्टाचार वाढतो-घुसखोरी वाढते - दंगे वाढतात. यासाठी जुडीशियल रिफॉर्म्स हवेत. काळानुसार आपल्या चालीरीती , राहणीमानात बदल होतोच मग कायद्यात का नको? रस्ते-रेल्वे-एअरपोर्ट वर आपण लाखो-करोडो रुपये खर्च करतो मग सरकार त्यामानाने अगदीच कमीत कमी खर्चामध्ये नवीन आणि लगेच अंमलबजावणी होणारे आणि गुन्हेगारांमध्ये दहशत बसवणारे कायदे करून देशाच्या करोडो नागरिकांना सुरक्षित समाजजीवनाची हमी देऊ शकते. यासाठीच एक सामाजिक दबाव वाढायला हवा.
तसंही सभ्य समाजामध्ये कायद्याची गरज नाही असं कुणीतरी पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे... पण जोपर्यंत पूर्ण समाज सभ्य होत नाही तोपर्यंत कायद्याचं राज्य आणि धाक हवाच !!!
*दुटप्पीपणा -विरोधाभास - मीडियाचा - राजकारण्यांचा - समाजाचाही *
निर्भया केसमध्ये एक १८ वर्ष खालील म्हणजे कायद्याने अज्ञान होता - त्याला शिक्षा काय - तर तीन वर्ष सुधारगृहात राहून सुटका . वा !!! कायदा मोडताना - असं निर्घृण कृत्य करताना तो अज्ञान बालक नव्हता ? मग शिक्षा देताना त्याच्या अज्ञान असण्याची सवलत त्याला का द्यायची? एकीकडे आपण कायद्याचं राज्य हवंय - गुन्हेगारांना शासन व्हायला हवं असं म्हणतो आणि एकीकडे कायदा मोडणाऱ्यांनाच संरक्षण का द्यायचा ? मानवतावादी संघटना एरवी काही झालं की लगेच मोर्चे-आंदोलनं करत आवाज उठवतात - पण अशा वेळीही ? जो गुन्हा करतो त्याच्यासाठी मानवतावाद मग त्याने पीडितेच्या मूळ मानवी हक्कांवर केलेल्या पायमल्लीचं काय? मुक्या जनावरावर झालेला अन्याय PETA सारख्या संस्था सहन करत नाहीत मग चालत्या बोलत्या व्यक्तीवर झालेले अन्याय आपण का सहन करतो ?
मीडियामध्ये एक राजकारणी काय बोलला म्हणून दुसऱ्याचा अपमान झाला म्हणून तिखट मीठ लावून छापतात पण अशा घटनांकडे अतिशय संवेदनाहीनतेने पाहतात किंवा त्याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न करतात. वीस वर्षांपूर्वी झालेला बिल्किस बानूवरील सामूहिक अत्याचार धिक्काराला पात्र होताच पण त्या घटनेतले आरोपी शिक्षा संपवून सुटल्यावर टीका करणारे महाभाग श्रद्धावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवेळी मूग गिळून का बसले ?
बिल्किस बानू केस मधले आरोपी सुटून बाहेर आल्यावर मिठाई वाटणारे असंवेदनशील आणि निर्लज्ज आहेतच पण मग हाथरसच्या वेळी ऐन लॉक डाऊन मध्ये आंदोलन करायला निघणारे आणि आता भारत जोडो यात्रा करताना स्वातंत्र्यवीरांवर चिखलफेक करताना श्रद्धाच्या बाबतीत चूप राहणारेही तेवढेच असंवेदनशील नाहीत? श्रद्धा ज्या मुंबईची तिथल्या मुंबईत, महाराष्ट्रात - समाजात - राजकारणांत - मीडियात काही महिन्यांपूर्वीच हिजाबवरून दंगा करणारे, टिकलीवरून वाद माजवणारे , एक स्त्री पुढाऱ्याला कुणी xxx म्हणाल्यामुळे गहजब माजवणारे - श्रद्धाच्या केसच्या बाबतीत - एकदम चूप. सत्ताधारीही चूप आणि विरोधकही शांत ... मीडिया सोईस्करपणे आपापल्या अजेंडाप्रमाणे चाललेली. सगळाच दुटप्पीपणा !!!
अशा घटनांत फक्त मुस्लिम मुलं लव्ह जिहादासाठी हिंदू मुलींचा वापर करतात म्हणणारे हिंदू पुरुषही हिंदू स्त्रियांवर आणि मुस्लिम पुरुषही मुस्लिम स्त्रियांवर अत्याचार करतात, हे का विसरतात? तुलनेनें अशिक्षित मुस्लिम मुली हिजाबमध्ये राहतात - घरातल्या लोकांचं , त्यांच्या समाजाचं- धर्माचं ऐकून घराबाहेर न पडल्यामुळे अशा घटनांना बळी पडत नाहीत, असे काही म्हणतात . मग श्रद्धा आणि अन्य हिंदू सुशिक्षित-सुसंस्कृत मुली शिकून सवरूनही आपलं भलं काय व कशात हे का ओळखू शकत नाहीत ?
हा सगळा विरोधाभासच की -
स्त्री-मुलगी , किंवा अपराधी कुठल्याही धर्मजातीचा असो - अशा गुन्ह्यांना समान दृष्टीने पहिले पाहिजे - याचसाठी नुसतं सर्वधर्मसमभाव - सेक्युलॅरिझम यावर दांभिकता न बाळगता समान नागरी कायद्याच्या दृष्टीने - समान सामाजिक चळवळीच्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत.
कायदा जर हक्क आहे तर हक्काबरोबर कर्तव्य पण आहेत - ऍसेट बरोबर लायबिलिटी पण येते हे बिंबवायला हवं -
*चित्रपट मालिका आणि असे गुन्हे व हिंसा*
कुठंतरी वाचलं की " डेक्स्टर " ही सिरीयल किलिंगवरची मालिका पाहून गुन्हा करण्याची व दडवण्याची कल्पना सुचली असं श्रद्धाचा अपराधी आफताब हा म्हणाला. त्यामुळे सिनेमा- मालिका - OTT प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन यातील मुक्त विचारसरणी, व्यसनाधीनता, सेक्स, हिंसा यांमुळे मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यामुळे अशा घटना घडतात - असं मानून सेन्सॉर कडक करा असं काही म्हणतात. त्याने काही फरक पडेल? तसं असतं तर हे सर्व व्हायच्या आधीही असे प्रकार होतच होते आणि आता न पाहणाऱ्यांकडूनही.
चित्रपट पाहून - क्राईम थ्रिलर वाचून गुन्हे घडत असतील असं सरसकट म्हणता येत नसलं तरी " डर - अंजाम - बाजीगर- खलनायक - एक व्हिलन " आणि असे अनेक सिनेमे हिट होतात - अगदी त्यातला हिरो एकतर्फी प्रेमातून हिरोईनला वाटेल तो त्रास देतात - खून- मारामाऱ्या करतात - विकृतपणे वागतात आणि हे सिनेमे सुपरडुपर हिट होतात मग तेच जर एखादा आफताब- एखादा इम्रान - एखादा राजेश गुलाटी प्रत्यक्ष जीवनात करत असेल तर मग ते अशा हिरोंचा आदर्श ठेवतात असं म्हणायचं का आफताब प्रभुतींचं उदात्तीकरण अशा चित्रपटातून होतं असं म्हणायचं ?
काहीजण म्हणतात की सिनेमा- मालिका - OTT प्लॅटफॉर्म हे पाहण्याचं - त्यातून मनोरंजनाचं रसग्रहण करायचं सामान्य ज्ञान लहानथोरांना द्यायला हवं - मग सेन्सॉरची गरज उरणार नाही - सुशिक्षित माणूसही जेंव्हा अशा गुन्ह्यात सामील होतो तेंव्हा अशा ज्ञानाचा उपयोग खरंच होईल ? आणि जरी झाला तरी असं ज्ञान घेणारे १३५ कोटींमधले किती असतील ?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे
*नात्यांतील विश्वासार्हता आणि स्वतःवरील विश्वास*
सध्या तरुणतरुणींचं लग्नाच्या आधी - कॉलेज किंवा नोकरीची वेळ संपल्यावर कुठे बागेत-थिएटरमध्ये भेटायचं - प्रेमाच्या गुजगोष्टी- आणाभाका घ्यायच्या - प्रणयाराधन करायचे आणि रात्री आपापल्या घरी जायचे - असं सुंदर आयुष्य असतं !! पण जेंव्हा नात्यात गुंतण्याचा निर्णय घेतला जातो- मग ते लग्न करायचं का लिव्ह-इनमध्ये राहायचं हे ठरवून तो निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणला गेला की काही काळातच नव्याची नवलाई काही दिवसात ओसरते - तेंव्हा आपल्या जोडीदाराची खरी ओळख तिला -त्याला होते . आणि मग खरे सूर जुळतात का रंगाचा बेरंग होऊ लागतो यात त्या जोडप्याच्या प्रेमाची - विश्वासाची - सहनशीलतेची - समजूतदारपणाची आणि नात्यातल्या जबाबदारीची कसोटी सुरु होते. या नात्यात प्रवेश करताना या दोघांच्याही घरांतून पाठिंबा असला तर उत्तमच . पण कोणा एकाच्या किंवा दोघांच्याही घरातून या नात्याला विरोध असला तर मात्र या जोडप्याला स्वतंत्रपणे राहणं आवश्यक असतं - आणि हे करताना आपला धर्म -जातपात - संस्कार-भाषा - खाण्यापिण्याच्या सवयी - आणि सर्वच जीवनशैलीत तडजोड करून - एकमेकांना सांभाळून- सावरून घेत राहायला शिकायला लागतं - स्वभावात लवचिकता आणायला लागते - आणि हे फक्त एकाने नाही तर दोघांनीही लागू आहे - असं झालं नाही - एकाकडून काही बाबतीत हट्टीपणा झाला तर दुसऱ्यावर ती जबरदस्ती होऊ शकते. यात जर त्या दोघांचा धर्म जर वेगळा असेल तर आपल्या धर्माबाबतच्या धारणा कायम ठेवून दुसऱ्याच्या त्याच धारणांचा आदर करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर ठीक - पण एकाचा धर्म दुसऱ्याने / जास्त करून स्त्रीने स्वीकारावं हा हट्ट म्हणजे लव्ह जिहादच की.
मग अशा हट्टीपणातून जबरदस्ती होऊ शकते ज्याचं रूपांतर भांडण - मारहाण आणि शेवटी जीव जाण्यातही होऊ शकतो. आता अशा बातम्या येत आहेत की आफताबचे इतर काही मुलींशीही संबंध आहेत हे श्रद्धाला कळाल्यावर त्यांच्या कुरबुरीत वाढ झाली आणि आपला जीव गमावण्याआधी श्रद्धाने तिच्या मित्रमैत्रिणींना- ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना आफताब आपल्याला त्रास देतोय - मारहाण करतोय असं सांगितलं होतं - मग तिने तेंव्हाच का त्याला सोडलं नाही? काय जबरदस्ती होती ? आणि असं नव्हतं की ते कुठल्या निर्जन भागात रहात होते ? पालकांकडे जावंसं तिला का वाटलं नाही ? का ती तिला आपली ती हार वाटली ? तिचा इगो आडवा आला ? इतका की आपला जीव जाईपर्यंत ती सहन करत राहिली ? त्यातून बाहेर न पडण्याची तिची काय अगतिकता होती ? मृत्यूच्या दारात ती आपणहूनच गेली ना ?
अशा वयात मुलं - मुली बहकतात - आपण मोठे झालो - स्वतंत्र झालो अशी भावना तयार होते - असं काय वेगळं त्या व्यक्तीत असतं की फक्त वर्ष दोन वर्षे आपण ज्यांना ओळखायला लागलो - प्रेमात पडलो ते आपल्या आईवडिलांपेक्षाही आपल्याला जवळचे वाटू लागतात ? ज्या पालकांनी जन्म देण्यापासून वयाची २०-२५ वर्षे खस्ता खाऊन वाढवलंय - मोठं केलंय - आपल्या पायावर उभं करायला ज्यांनी ताकद दिलीय - ते आपल्याला काय सांगतायत - ते कोण आपलं आयुष्याची कमान धरणारे? असं वाटू लागतं - तेच आपले शत्रू वाटू लागतात - बंडखोर वृत्ती का वाढू लागते ? असं झालं की या बाहेरच्यांना फावतं आणि पदोपदी तो तिचा फायदा घेऊ लागतो हे तिला कसं कळत नाही ? आपल्या स्वातंत्र्यावर येणारी गदा आता का ती सहन करते ? आईबाबांकडे परत जायची तिला लाज का वाटली असेल? अहंकार आईबाबांच्या प्रेमापेक्षा मोठा का झाला ? उघड्या डोळ्यांनी आपलं मरण का तिने ओढवून घेतलं ? श्रद्धा किंवा अशा पीडितांचा अशा घटना घडण्यात काहीच दोष नाही ? जरा आत्मविश्वास ठेवून - डोळे उघडे ठेवून रहात्या तर ?
एका जिवंत माणसाचे ज्याच्याबरोबर आपण सो कॉल्ड प्रेमाने एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्या - आपलं घर -नाती तोडून जी व्यक्ती आपल्याबरोबर आली -काही काळ राहिली - तिची अशी अवस्था करणाऱ्या नराधमाबद्दल काय बोलायचं? माणुसकीला काळीमा आहे.
पालकांविरुद्ध निर्णय घेऊन यशस्वी होणारेही खूप आहेत ओळखीचे... अगदी माझ्या मित्रपरिवारातले, आणि घरातलेही . एकदा निर्णय घेतलाच आहे तर
प्रेम आणि विश्वास यानं दोघांनी एकमेकांना साथ द्यायला हवी आणि पालकांनाही परत मिळवायला हवे... अशी परिस्थिती आणणं हेच तर शिक्षण- संस्कार -प्रेम यातून येणारं सामंजस्य आणि विश्वास यांचं काम !!!
* स्त्रीकडे पाहण्याची नजर आणि कौटुंबिक व्यवस्था * -**
सध्या स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. घर सांभाळूनही शिक्षण- व्यवसाय - उद्योग अनेक क्षेत्रात स्त्री पुरुषाला काही ठिकाणी मागे टाकत आहे. कर्तृत्व आणि यश तिला एक आत्मविश्वास देत आहे - तिच्या वागण्यात मोकळेपणा आला आहे. या मोकळेपणाचा गैर अर्थ, गैरफायदा सहकारी पुरुषवर्गाने घेऊ नये. पुरुषाची नजर स्त्रीला कळतेच पण आपल्या मोकळेपणाचा गैरफायदा कोणाला घेऊ न देण्याची, चुकीचे सिग्नल जाऊन न देण्याची काळजीही मुलींनी घेतली पाहिजे. प्रत्येक स्त्री ही बहीण किंवा आई नसली तरी एक चांगली मैत्रीण, चांगली व्यक्ती असू शकते . एक स्वतंत्र नागरिक म्हणून , एक व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व - तिची ओळख जाणून तिला मानलं पाहिजे. आणि हे करताना तिच्या स्त्रीत्वाचे भान ठेवून एक योग्य अंतर ठेवलं पाहिजे आणि तिच्या सुरक्षिततेची जाणीव मनात बाळगणं आणि तिला सुरक्षित वाटेल असेल असं वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे - फक्त कामाच्या ठिकाणी नाही तर सार्वजनिक प्रत्येक ठिकाणी. ही शिकवण मिळून असं भान लहानपणापासूनच आलं तर फार उत्तम.
हल्ली लहानपणापासूनच मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतंय. मागू ते हातात मिळतंय अशी परिस्थिती असते त्यामुळे नकार स्वीकारण्याची तयारी नसते आणि हातात स्वकमाईचे पैसे आले की विचार करायलाच नको. काही वेळेला कडक बंधनात वाढलेली मुले देखील हातात पैसे खुळखुळायला लागले की मोकाट सुटतात. पालकांपेक्षा ही जास्त कळायला लागतं असं वाटू लागतं . पालकही एका ठराविक वयापुढे मुलांना बांधून ठेवू शकत नाहीत. संस्कार देणे जस महत्वाचं तसं तो घेणं हेही महत्त्वाचं आणि शेवटी आपली आवडनिवड, विश्वास, माणसाची पारख हे तर शिक्षण आणि अनुभव यांची सांगड घालून करता आलं पाहिजे व नकार स्वीकारण्याची ताकद बाळगली पाहिजे
अनेकदा पालकांचे आपल्याला पटतेच असं नाही, मग विषय करियरचा असेल किंवा लग्नाचा किंवा आणि दुसरा कोणताही. चूक आणि बरोबर हे येणारा काळ ठरवतो . आणि असं असलं तरी आपला निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम याची जबाबदारी घ्यायला पाल्यांनी शिकले पाहिजे आणि
पालकही प्रत्येक वेळीच बरोबरच असतील असंही नाही.. पण त्यांची काळजी, प्रेम जेन्युईन असतं, त्यामुळे पाल्याच्या प्रत्येक निर्णयाला, यशापयशाला स्वतः चं यशापयश समजतात.
पण एका ठराविक वयानंतर मुलांना त्यांचे डिसीजन घ्यावे लागतात, त्यांनी ते जबाबदारीने घ्यावेत ...त्याची जबाबदारी पालकांची नसावी पण डोळसपणे पाल्याकडे लक्ष असायला, वेळोवेळी गरज भासल्यास हात द्यायला हरकत नाही
स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता अशी हवी.
मुलांना , मुलींना फक्त पैसे देऊन गरजा व चैनी पुरवून चालणार नाही... त्यांना वेळ देऊन त्यांची सुखदुःख, भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्यात भागीदार व्हायला हवे... प्रसंगी रागावलंही पाहिजे....संवाद वाढवायला हवा.. हा वेळ घरात मिळाला तर बाहेरची प्रलोभने, किंवा असे नराधम मुलींना सॉफ्ट टारगेट करु शकणार नाहीत.
अशी भयंकर माणसं वेळेतंच ओळखण्याची समज, ताकद मुलींना मिळावी आणि मुली व आईवडील यातील संवाद वाढोत आणि आपली सुखदुःख मुली अशा विकृत नराधमांकडे स्वाधीन न करता आपल्या माणसांकडे करावीत अशी कुटुंबव्यवस्था होण्यासाठी आपण सर्वांनी झटायला हवं.
खरंच श्रद्धा - निर्भया अशा घटनांबद्दल ऐकलं की मन विदीर्ण होतं. अशा घटना घडल्या की या सगळ्या चर्चा होतात , असे लेखप्रपंच होतात आणि काही दिवसांनी परत शांत होतं. आता आपण सगळे हे जे काय करतोय-बोलतोय ते सगळे नक्राश्रु ... मगरमच्छके आंसू ठरू नयेत म्हणजे झालं !
जातीधर्म - समाजभेद विसरून हा एक भयंकर प्रश्न सर्वसमावेशक पद्धतीनेच - साम -दाम-दंड - भेद सर्व वापरून सोडवला पाहिजे . काहीतरी कायमस्वरूपी उपाय योजले पाहिजेत
आयर्न रँड एका ठिकाणी म्हणते "सत्य आपण नाकारू शकतो पण सत्याचे परिणाम आपल्याला नाकारता येत नाहीत ते भोगायलाच लागतात" "कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही" हे ठीकच पण "सूर्य उगवला तरी डोळेच उघडे करायचे नसतील तर उजेड दिसणार कसा?" त्यामुळे फक्त "उघड डोळे बघा नीट" म्हणून चालणार नाही - तस वागायला लागेल -करायला लागेल !!!
असं झालं तरंच या सर्व श्रध्दांना खरा न्याय मिळेल आणि इतर साऱ्यांना मुक्त आनंदी सुखी आयुष्य !!!
©राहुल लाळे

विस्तृत आणि चांगलं लिहीलं आहेस.
ReplyDeleteक्रौर्य आणि पाशवी कृत्य यामागच्या मानसिकतेचा *त्याच्या* धर्माशी/जातीशी/शिक्षणाशी काहीही संबंध नसतो.
हे नोंदवलंस ते बरं केलंस..
निर्भया प्रकरणानंतर गुलझारजी म्हणाले होते..
Sirf iss liye ki woh aurat thi aur kamzor thi woh, aur woh mard the char, jo mard the bas isliye pas-e-deewar usay rape kiya.
काहीही कारण नसतं..
*पुरुष असं करतो कारण तो तसं करू शकतो.
He does because He can..*
बस्स यही सच है
————————
बळी गेलेलीची जात/धर्म आणि नराधमाची जात/धर्म यानुसार समाज निवडक त्वेष/चीड (selective outrage) दाखवतो.