काश्मीर... कलम ३७०
कालपासून काश्मीर आणि कलम ३७० च्या पुनर्गठनाबद्दल संसदेत पास झालेल्या बिलबद्दल अनेक पोस्ट्स आल्या ....काही बाजूने काही विरोधात...
माझे दोन शब्द...
राहुल
कलम३७० ,३५अ अशी कलमं देशासाठी भूषणावह निश्चितच नाहीत उलट एखादा देश एकसंघ रहाण्यासाठी ती बाधाच आणतात.
काश्मीर मध्ये गेलो तर शंकराचार्य मंदिर सोडलं तर श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, अनंतनाग काश्मीरखोऱ्यात सर्वत्र हिंडताना आपण स्वर्गीय निसर्गसौंदर्याने भारावून मोहावून गेलो तरी तेथलं वातावरण अगदी लोकांचे पेहराव, हावभाव, दुकानांवरील पाट्या पाहून आपण आपल्याच देशात आहोत का पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. अगदी जम्मू ची जनता( आमचा ड्रायव्हर जम्मू चा होता) ही आपण J&Kचे नाही तर जम्मूचे आहोत असं म्हणतो. पटनी टॉप, कटरा, उधमपूर, जम्मू या भागात मात्र आपल्याला आपण आपल्या भागात आहोत असं वाटून हायसं वाटतं.
सध्याच्या अशांत , दहशतीच्या अस्थिर वातावरणास काश्मिरी जनतेच्या चा तरी काय दोष ? जुनी पिढी जी स्वातंत्र्यासुमारास होती त्यांची नाळ हिंदुस्थान-भारताशी जोडलेली होती. पण ३७०,३५अ यांमुळे हा प्रदेश, नवीन पिढीतील जनता मुख्य प्रवाहापासून अलग दूर गेली. विशेष स्थान मिळाल्याने भारतातील इतर शहरे किंवा राज्यांप्रमाणे तिथे ना नवीन व्यवसाय तयार झाले आणि ना ही उद्योगधंदे. त्यात येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, वाढता फुटिरतावाद यामुळे इथल्या निसर्गसौंदर्याने आकर्षित होणारा पारंपरिकपर्यटन व्यवसाय, सिनेमांच्या चित्रकरणांनी तयार झालेला रोजगार हे देखील बंद पडण्याच्या मार्गावर गेले, नगण्यच झाले. कारण जरा कुठे सुरळीत चालू आहे असं म्हणतोय, तोवर अशा काही घटना घडतात की हा भाग इतर देशापासून तुटला जातो. भर म्हणून राजकीय उदासीनता आणि स्थानिक राजकारण्यांचे हितसंबंध हा वेगळेपण कायमच काश्मिरला मुख्य धारेपासून दूर करण्यात हातभार लावत आले आहेत. तेथील सर्वच स्थानिक राजकीय नेत्यांच्या भूमिका या इतक्या वादग्रस्त ठरल्या आहेत की हे काश्मिरी नेते स्वतःला भारतीय तरी समजतात का नाही हा प्रश्न पडावा.
शिक्षणाचा अभाव आणि वर उल्लेख केलेल्या गोष्टी यांमुळे कमी होत चाललेल्या रोजगाराच्या संधी यामुळे स्थानिक तरुण पिढी भरकटली जाणं साहजिकच आहे. ( तसंही बाकी ठिकाणी ही बेरोजगारी ही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला मदत करतेच हे आपण पहातो). काश्मीर मध्ये हीच बेरोजगारी फुटिरतावादाच्या प्रभावामुळे दगडफेक किंवा तत्सम राष्ट्रविरोधी कारवाया, दहशतवाद आणि आतंकवादाकडे वळली. या सर्व गोष्टींमुळे या सर्वच भागात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वाभाविकपणे लष्कर, सीमा सुरक्षा, पोलीस फोर्स या प्रदेशात वाढली. साहजिकच नवीन पिढीला भारत..हिंदूस्थान म्हणजे पोलीस, लष्कर असं वाटणंही नैसर्गिकच आहे. या दहशवादात अनेक परिवारांतील अनेक भरकटलेले तरुण, पुरुष मारले गेले, स्त्रिया विधवा झाल्या, अत्याचार झाले, संसार उध्वस्त झाले. परिस्थिती आणखीनच चिघळत गेली.
लाखो काश्मिरी पंडितांनाही स्थानिक गुंड, दहशतवाद आणि राजकीय निष्क्रियतेने विस्थापित केले गेले, त्यांच्यावरही अत्याचार झाले... घरदार लुटले गेले ...देशाच्या विविध भागात त्यांना आपली मातृभूमीला सोडून जायला लागले.. पण त्यांनी वाममार्ग स्वीकारला नाही... कारण शिक्षण.
एवढी विपरीत परिस्थिती असूनही मुख्य प्रवाहातील अधिक कदम, सारंग गोसावी, संजय नहार या मराठी तरुणांबरोबरच इतरही अनेकजण इथल्या पिडीत लोकांसाठी, स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी जिवाची पर्वा न करता काश्मीरमधे काम केलंय करतायत. काही स्थानिकही तिथे ते काम करत आहेत. पण हे सर्व ठिगळं लावल्यासारखंच..
स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली, पण काश्मीर आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न, छोट्यामोठ्या चकामकी, ४७ पासून कारगिलपर्यंतची युध्द , ऊरी , पठाणकोट, पुलवामासारख्या आतंकवादी घटना , संसदेवरील हल्ला असे अनेक प्रकार घडत आलेच.
या सर्वच घटनांमुळे काश्मीर सामाजिक, आर्थिक कुठल्याही पध्दतीने विकसित झाला नाही आणि तेथील लोकांबरोबरच भारतासाठीही काश्मीर हे एक कायमचे दुखणे झाले आहे
आज वाटतं....हैदराबाद-भोपाळ-मैसूर अशा अनेक संस्थानांच्या विलीनीकरणाप्रमाणे काश्मीरचे सहज विलीनीकरण झाले असते तर...कलम ३७०,३५अ झाले नसते तर.....
कदाचित चित्र वेगळे झाले असते...इतर विकसित भागाप्रमाणे काश्मीरलाही देशाच्या विकासाची फळे चाखता आली असती...देशाचा पैसा, लष्करी खर्च, वेळ विकासकामासाठी वापरता आला असता... भारताचे स्वित्झर्लंड म्हणून काश्मीर हे एक विकसित पर्यटनस्थळ म्हणून जगापुढे आले असते.... पण हे सर्व म्हणजे अक्काबाईला मिशा असल्यासारखं...दिवास्वप्नंच.
पण काश्मीर भारताचा भाग म्हणून आपण म्हणत असूं तर असं होणंच देशाच्या हिताचे आहे. त्यासाठी आतापर्यंत झालेल्या चुकांमधून शिकून त्यावर मार्ग काढला पाहिजे. शेंबडात पडलेल्या माशीप्रमाणे हा प्रश्न किती दिवस पुढे न्यायचा....आणि गँगरीन झालं की शरीराचा भागही बाजूला करायला लागतो..पण आपल्या सर्वांनाच काश्मीर हवाय...तो हातातून गेला तर चालेल ? विचारही करु शकत नाही.
ही कलमं कुणी आणली? कोणी चुका केल्या, कोणी अपराध केला या गोष्टींवर आतापर्यंत बराच उहापोह झालाय ...त्यावर वाद घालणं, दोषारोप करणं आता बास व्हावं, कारण ज्या लोकांना आपण यासाठी दोषी मानतो, ती माणसं जाऊन युगं उलटली.
आता पुढे पाहिले पाहिजे.
तसाही आपला देश, देशातील जनता सहिष्णू, सर्वसमावेशक आहे... काश्मिरी जनतेने जर भारतीय म्हणून भारतात रहायचं असेल तर त्यांना सामावून घेण्याची माणूसकी आपल्याकडे नक्कीच आहे. नाहीतर काश्मिरी पंडितही बाकीच्या समाजात, प्रवाहात मिसळून नसते गेले. देशाच्या सर्वच भागात सर्व जातीधर्माचे लोक अगदीच गुण्यागोविंदाने नसले तरीही समाधानाने. राहून आयुष्य जगतायत, आपल्या प्रगती बरोबरच देशातील प्रगतीला हातभार लावतायत... काश्मिरींचेही स्वागतच होईल.
लडाखच्या लोकांनाही त्यांच्या आशाअपेक्षांप्रमाणे जगता येईल, विकास करता येईल.
कोणी म्हणेल काश्मिरींकडून विरोध होईल...आमच्यावर बाहेरचं अतिक्रमण होईल अशी भीती व्यक्त होईल पण ती व्यर्थ आहे. भारतात अनेक पर्यटनस्थळे, निसर्गसौंदर्याने नटलेली अनेक स्थळे आहेत, तिथे किंवा इतरही ठिकाणी किती बाहेरचे व्यवसायी, उद्योजक जातात ? बोटावर मोजतील एवढेच. आणि जसं बाहेरचे जातील तसे तिथलेही बाहेर येतील...तशी मुभा त्यांना आधीही होतीच.
येणारे जोक्स, अतिरेकी पोस्ट्स यांच्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे.
काश्मिरचा प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नव्हतं....आताही पूर्णपणे प्रश्न सुटला असं म्हणणं धाडसाचंच आहे... अनेक कायदेशीर, सामाजिक लढाया लढल्या जातील... हे या कलमांचं पुनर्गठन आहे, उच्चाटन नाही.
पण एक धाडसी पाऊल पॉझिटिव्ह विचारसरणीने देशाचा एक ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी पुढे पडतंय त्याचं आणि भारताच्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या सर्व काश्मिरींचं निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भूमी (भूमी पूर्वी ही आपल्या कडेच होती आता माणसंही यावीत) सकट स्वागत.
राहुल लाळे

Comments
Post a Comment