ट्रेक च्या गंमती
ट्रेक च्या गंमती
आतापर्यंत अनेक ट्रेक केले... प्रत्येक ट्रेकचे वेगळे अनुभव... अनेक गमतीजमती, काही थरार..
एसपी मध्ये असताना अकरावीत पहिला ट्रेक केला होता..कात्रज ते सिंहगड... आता याला K2S म्हणतात...मला आठवतंय मी, वाळ्या(डॉ प्रसाद वाळिंबे) प्रमोद(कनकुरे), बल्ल्या(संदीप शहा), सुमित फडणीस , बहुतेक प्रसाद (जो)आणि एक दोनजण (sorry)....आमचा लीडर शेव्या-शेवगावकर. त्यावेळी कोणाकडेच कॅमेरे नव्हते पण आठवणी ताज्या आहेत. सकाळी लवकर स्वारगेटला जाऊन एसटीने कात्रज घाटात उतरलो होतो... मजल दरमजल करत १८-२० डोंगर पार करत, एक दोन वेळा वाट चुकल्यावर डोंगरात देवासारख्या भेटलेल्या धनगराकडून मार्ग समजून घेऊन दमून भागून चारपाच तासांनी जेव्हां कोंढणपूरहून सिंहगडला जाणाऱ्या टाररोडला लागलो तेव्हा हुश्श झाले.
मध्ये जवळचे पाणी संपले, दोघांचे बूट फाटले, शेव्याचा उत्साह कायम होता.. आणि सर्वांना बोलतं ठेवून, खेचाखेची करून मूड मेनटेन करत होता. पुढचा रस्ता काटून गडावर पोचेपर्यंत २-२:३० वाजले. गडाला चक्कर मारुन मस्त पिठलं-भाकरी, भजी, दही -ताकावर ताव मारुन , देवटाकीचे थंडगार पाणी पिऊन आत्मे शांत झाले (पोटोबा अतितृप्त झाल्यामुळे पचवण्यासाठी वज्रासनंही करून झाली)आणि दमलेल्या जीवांचा डोळा कधी लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा सव्वा चार वाजले होते. पायथ्याच्या गोळेवाडीपासून शेवटची एसटी साडेचारची ...पळत पळत गड उतरायला लागलो , पण तरी निम्म्यात असतानाच डोळ्यासमोरून एसटी निघून गेली. मग काय तुटलेले बुटांनी , पाय खेचत खडकवासल्याला आयएटी पर्यंत आलो आणि पीएमटी बसने परतलो. त्यानंतर K2S अनेकदा केला, प्रत्येक वेळेची मजा वेगळी .
हा पहिला ट्रेक म्हणून लक्षात राहिला हे तर आहेच , पणप्रत्येक ट्रेकचे वेगळे अनुभव..राजगडला जाताना चुकलेली वाट-व्हर्टिकल वर रेलिंगला चढताना उडालेला थरकाप, हरिश्चंद्रगडला जाताना ओतूर ला रात्री PHC मध्ये केलेला मुक्काम , रॉकपॅच चढताना - कोकणकड्यावर मागे लागलेल्या मधमाशा, लोहगड विसापूरला जाऊन भरधाव पावसांत भाज्याच्या लेण्यात केलेला मुक्काम आणि सकाळी पुण्याला आल्यावर रिक्षाबसचा संप असल्याने शिवाजीनगरहून पायपीट करत घरी येणं आणि पेपरला दुसऱ्या दिवशी वाचणं की जोरदार पावसाने भाजाचा डोंगर खचून गावातील ३०-३५ जणांचा मृत्यू, आणि आपण चार तास आणखी तिथे असतो तर काय झाले असते याचा विचार करून उडालेला थरकाप. राजमाची ला भर पावसात केलेली पायपीट, मुसळधार पावसात आणि अंधारात वाट चुकली असं वाटून एका खडकावर ७ जणांनी डोक्यावर रेनकोट ओढून कुडकुडत काढलेली रात्र आणि सकाळी राजमाची समोरच बघून डोक्यावर मारून घेतलेला हात...प्रत्येक ट्रेकला या आणि अनेक गमती. खिचडी, मॅगी, उकडलेली अंडी, बरोबर नेलेले मारझोरीनचे सँडविच, तिखटमिठाच्या पुऱ्या, धपाटे असा फक्कड मेन्यू असायचा.
तशा कॉलेजमध्ये असताना छोट्या मोठ्या ट्रिप्सही केल्या.एकदा वीस-पंचवीस मुलामुलींचा ग्रुप बहुतेक मुळशीला गेलो होतो...मी झंपूसारखं मुकेशचं गाणं म्हणलेलं आठवतंय.अशीच एक छोटीशी ट्रिप आम्ही किर्लोस्करवाडी, ताकारीला काढली होती. राजेश दिक्षित, प्रमोद कनकुरे, मी , वाळ्या, मधुरा (हर्डीकर), अनुराधा भाटे, कौशिक छोट्या मोठ्या ट्रिप्स काढायचो.
बारावी नंतर एसपी सुटलं...पण आमचे ट्रेक चालूच राहिले.... मी, वाळ्या, अनू आणि मधुरा वर उल्लेख केलेल्या सगळ्याच ट्रेकला होतो...कौशिक काही ट्रेक ला तर COEPची वैजयंती आलूरकर, राजेश आतीतकर अधूनमधून असायचे...
पण ट्रेकची मजा सारखीच..
आज हे सर्व लिहायचं कारण हे की, लॉकडाउन मध्ये घरात 5S करताना काही जुने फोटो मिळाले... त्यात रायगडला ८८-८९ला केलेल्या ट्रेक चे फोटो मिळाले.... आणि सगळ्या आठवणी जागा झाल्या. याही ट्रेकच्या वेगळ्या गंमती... रायगड तसा सोपाच पण चालायला खूप आणि ऊंच पायऱ्या यामुळे कंटाळवाणा, फटीग आणणारा.
महाडला एसटी बदलून रायगडपायथ्यापासून दोन अडीच तासात वर पोचलो होतो. एक दिवस मुक्काम केला होता. या ट्रेकची वैशिष्ट्ये म्हणजे माझ्या जवळ रहाणारे इतिहास, गडप्रेमी चांदोरकर काका तिथे भेटले. त्यांच्या मुळे गडाच्या वेगवेगळ्या भागांची छान, आणि माहीत नसलेली माहिती मिळाली. रात्रीच्या थंडीत साजरी केलेली होळी, म्हणलेली गाणी, टकमक टोकावर खडकावर बसून आम्ही एंजॉय केलेला वाळ्याचा ब्रेकडांस यांनी या ट्रेकला मजा आली...
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात वाळ्या बरोबर दोनदा आणि वैजयंती व इतरांबरोबर एक दोनदा सिंहगड झाला...आणि नव्या जोमाने जुन्या आठवणी जाग्या केल्या
राहुल लाळे











Comments
Post a Comment