हर हर महादेव

 

#
# HarHarMahadev

*हर हर महादेव ..   हर हर ..*
राहुल लाळे





इतिहास हा आवडता विषय , त्यामुळे ऐतिहासिक पुस्तकं वाचण्याचा नाद लहानपणापासून - शिवाजी
महाराज , मराठ्यांचा इतिहास तर जिव्हाळ्याचा विषय . बाबासाहेब पुरंदऱ्यांची शिवछत्रपतींवरची
व्याख्यानमाला कमीत कमी दहावेळा  ऐकलीये आणि त्यांचं राजा शिवछत्रपतीं व रणजित देसाईंचं श्रीमान हा ग्रंथ अगणित वेळा वाचलाय
अजूनही वाचतो.

लहानपणी टीव्हीवर ( आता का लागत नाहीत ?) भालजी पेंढारकरांचे शिवकालीन सिनेमे आवर्जून
पाहायचो - राजा शिवछत्रपतीं, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, मराठा तितुका मिळवावा, थोरातांची कमळा, धन्य ते संताजी धनाजी ... अनेक .. अगदी दादा कोंडकेंचा गनिमी कावा सुद्धा ..

मध्ये अनेक वर्षे ऐतिहासिक सिनेमे निघालेच नाहीत . पण गेल्या काही वर्षात संजय लीला भन्साळी
आणि आशुतोष गोवारीकर यांनी हिंदीत,आणि दिगपाल लांजेकरचे फर्जंद , फतेशिकस्त, पावनखिंड आणि शेरशिवराज, पानिपत, प्रसाद ओक चा हिरकणी, अजय देवगणचा तानाजी, नुकतेच प्रदर्शित झालेले प्रवीण तरडेंचा सरसेनापती हंबीरराव ,अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप,  आणि अगदी ताजा  अभिजित शिरीष देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव अशी ऐतिहासिक चित्रपटांची मांदियाळीच मागील काही वर्षांत उभी राहिली आहे.

खरंच हा प्रयत्न करणाऱ्यांचे  कौतुक आणि अभिनंदन. भन्साळीचा बाजीराव- मस्तानी गाजला पण पाहिला नाही ( बाजीराव "दुश्मनची वाट लावली"; म्हणताना आणि काशीबाई व मस्तानी एकत्र पिंगा घालताना बघायचं धाडस नाही झालं ), जोधा अकबर ही नाही पाहिला - नंतर टीव्हीवर लागला तेव्हा थोडा पाहिला - पण सलग पूर्ण बघितला नाही गेला. देवगणचा तानाजी टीव्हीवर मधून मधून पाहिला आणि थक्क (?) झालो आणि बरं झालं थिएटरमध्ये जाऊन पाहिला नाही असं नक्कीच वाटलं.  फतेशिकस्त, पावनखिंड , आणि पानिपत पाहिले. हे सारे चित्रपट म्हणून आवडले , पण भावले नाहीत... ऐतिहासिक म्हणून मनाला भिडले नाहीत...कारण लहानपणापासून मनात ठसलेले प्रसंग पुर्वीच्या चित्रपटातून जसे सामोरे यायचे, तसे ते हे चित्रपट पहाताना समोर नाही आले. मग ते  फत्तेशिकस्त पहाताना शाहिस्तेखानावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तयारी असो वा पानिपतातली दत्ताजी शिंदेंच्या तोंडच्या "बचेंगे तो और भी लडेंगे"  ही गर्जनाही. ऐतिहासिक प्रसंग पहाताना त्यातील कृत्रिमता जाणवली. पटापट प्रसंग समोर येतात, कधीतरी ओढूनताणून आणल्यासारखेही, त्यांच्यात कुठे कंटिन्युइटी जाणवली नाही, ठिगळं लावल्यासारखे एका मागे एक प्रसंग येत गेले (पानिपतमधे पण तसेच). बोलण्यात त्यावेळच्या भाषेचा लहेजा विशेष जाणवला नाही. अनेकदा जरी प्रेक्षकांना काय होणार हे माहिती असलं तरी ते नाट्य पडद्यावर रंगलंच पाहिजे ते थरारनाट्य रंगलंच नाही. काही सिनेमांत मुख्य पात्रांची प्रेमप्रकरणं, गाणी दाखवण्यात वेळ खर्च झालाय. ऐतिहासिक चित्रपटात गाणी असायला हरकत नाही पण ती कथेला पुढे नेणारी ,अभिरुचिपूर्ण असावीत.....जुने चित्रपट आठवा...मराठी पाऊल पडते पुढे,.अखेरचा तुला हा दंडवत, शूर आम्ही सरदार आम्हाला, बाई बाई मन मोराचा, इत्यादि .... " पिंगा" "वाट लावली" असली गाणी ऐतिहासिक चित्रपटात पाहतानाच्या वेदना निर्माता-दिग्दर्शकांना कधी कळणार ? असे चित्रपट पाहताना पूर्ण रिसर्च करून कथेशी प्रामाणिक राहून इतिहासप्रेमी रसिकांसमोर चित्र उभे करण्यात अजूनही आपण कुठे तरी कमी पडतो, असे हे चित्रपट पाहताना वाटतं खरं !!!

असो...  हा सर्व पंक्तीप्रपंच करण्याचं कारण म्हणजे काल पाहिलेला  सुबोध भावे, शरद केळकर,अमृता खानविलकर, सायली संजीव,निशिगंधा वाड व अन्य  अभिनित  आणि अभिजित शिरीष देशपांडे दिग्दर्शित " हर हर महादेव " हा चित्रपट. या वर्षातच  आलेला  अजय पुरकरांनी  साकारलेला बाजीप्रभू दिगपाल लांजेकरच्या  पावनखिंडमध्ये पाहून आणि एवढं सगळं लिहूनही  हर हर महादेव    हा सिनेमा पहायचं पहिलं कारण म्हणजे वरील सर्व चित्रपटांत, आणि "हर हर  महादेव " यात  आधी उल्लेखलेल्या चित्रपटांपेक्षा काय वेगळं - काय विशेष आहे हे शोधणं ...  दुसरं कारण म्हणजे सुबोध भावे  शिवाजी म्हणून कसा शोभतो हे पाहण्याची उत्सुकता ... आणि तिसरं कारण म्हणजे गोलियोंकी  रासलीला रामलीला,  तानाजी (मधला शिवाजी),  टीव्ही  आणि OTT वर अनेक मालिकांत काम करून आपल्या प्रभावी आवाजाने छाप पाडणाऱ्या शरद केळकरला बाजीप्रभूंच्या भूमिकेत पहाणं ...  शरद -  बायकोचा मामेआत्तेभाऊ असं देशस्थी बादरायण नातं …हे ही महत्वाचं कारण !!!

या चित्रपटात वेगळं काय ? - याचं  उत्तर थोडंसं होकारार्थी - काहीसं नकारार्थीही .

होकारार्थी एवढ्यासाठी की इतर ऐतिहासिक सिनेमात न पाहिलेल्या काही गोष्टी या सिनेमांत पहायला मिळाल्या  -

१. मराठी किंवा भारतीय इतिहासात एक कायम पाहायला मिळणारी गोष्ट म्हणजे मराठी वतनदारांची एक्मेकांतली दुश्मनी  - देशमुख, मोरे, जेधे , नाईक निंबाळकर, जाधव - भोसले - सगळे वतनदार  जरी शूर, पराक्रमी होते तरी त्यांचा पराक्रम आपली वतनं शाबूत ठेवण्यापुरताच होता -  आपली वतनं  शाबूत ठेवताना बहामनी- आदिलशाही, निजामशाही कोठल्याही बादशहांकडे चाकरी करायला  त्यांना लाज वाटली नाही आणि त्यांची मर्जी सांभाळत गुलामगिरी करत  एकमेकांत लढण्यातच त्यांना धन्यता वाटायची.  सगळे वतनदार जरी शिवाजीमहाराजांच्या बाजूने  स्वराज्यासाठी लढायला  सामील झाले नसले तरी सवंगडी -साथी  जमा करताना अशाच वतनदारांना कधी समजावून - कधी मैत्री करून - कधी धमकावून - कधी विनवणी करून तर  कधी लढूनही महाराजांना त्यांना आपल्याबरोबर घ्यावे लागले होते ...  बाजीप्रभूंचे लहानपण, नंतरचं  त्यांचं आयुष्य आणि शिवाजीराजांबरोबरच्या त्यांच्या सुरवातीच्या भेटी आणि त्यांचा सुरवातीचा संघर्ष व नंतर हळूहळू एका वेगळया उद्देशातून स्वराज्यासाठी - महाराजांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना रुजेपर्यंत होणारा  प्रवास प्रातिनिधिक स्वरूपात का होईना  या चित्रपटात पाहायला मिळाला . स्वराज्यासाठी एकेक मावळा जोडायला महाराजांना किती कष्ट घ्यायला लागले असतील याची कल्पना येऊ शकते.
आत्तापर्यंतच्या  नवीन ऐतिहासिक चित्रपटात हा संघर्ष पहायला  मिळाला नव्हता.

२. चित्रपटात गाणी असली तरी  प्रेम कहाण्या आणि  प्रेमगीतं पेरायचा मोह निर्माता-दिग्दर्शकाने  टाळलाय, ही स्वागतार्ह गोष्ट !!

३. "हर हर महादेव" ही बाजीप्रभूंची गोष्ट आहे, त्यामुळे महाराजांपेक्षा बाजींच्या  भूमिकेला जास्त प्राधान्य  दिलं गेलंय. बाजींच्या भूमिकेत शरद केळकरची देहबोली एकदम भारदस्त . एकदम भाव खाऊन जाणारा पूर्ण सिनेमा भर त्याचा वावर एकदम झक्कास ...  देहयष्टी आणि ऍटीट्युड अगदी बाजी प्रभू साक्षात दिसावेत अशी. शेवटचा पावनखिंडीतल्या  युद्धाच्या  प्रसंगात  त्यानं अक्षरशः आग ओकली आहे .

सुबोधने महाराजांची भूमिका अगदी प्रामाणिकपणे केलीय. हळव्या प्रसंगात त्याचा अभिनय खूप काही बोलून जातो. त्याची संवादाची पद्धत उत्तम, उगाच नाटकी ऐतिहासिक बोलणं वाटत नाही. सुबोध या चित्रपटात फ्रेशही दिसतो. सईबाईंच्या भूमिकेतील सायली संजीव, जिजाऊंच्या भूमिकेतील निशिगंधा वाड,  आबाजी विश्वनाथाच्या  भूमिकेतला हार्दिक जोशी, धोंडिबाच्या भूमिकेतले मोहन जोशी, देशपांडे बाईंच्या भूमिकेतली अमृता खानविलकर,  बांदल देशमुखांच्या भूमिकेतले शरद पोंक्षे , बाजींचे  थोरले बंधूं दानोजीच्या भूमिकेत अशोक शिंदे व सिद्दी जोहरच्या भूमिकेतले मिलिंद शिंदेंबरोबर फितुराच्या भूमिकेतला श्रीकांत यादव  आणि सर्वच  कलाकारांच्या भूमिका छान !!!.

४. सिनेमा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केला आहे. “कहाणीचा हिस्सा नाही तर कहाणी बनाल ", "देवळातली देवी आणि घरातल्या आईबहिणी सुरक्षित राहण्यासाठी घाम व रक्त गाळायला लागतं !!", "प्रत्येकानं फक्त आपलंच घर सांभाळलं तर समाज-देश कोण सांभाळणार ?", " रणातलं युद्ध जिंकण्याआधी मनातलं युद्ध जिंकणं  महत्वाचं "
अशा काही भारदस्त संवादांबरोबर काही हलक्याफुलक्या संवादांची रेलचेल चित्रपटभर आहे.. सिनेमाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत  सह्याद्री म्हणून राज ठाकरेंचा भारदस्त आवाज  कथा पुढे नेण्यासाठी वापरलाय हे या सिनेमाचं वेगळं वैशिष्ट्य.

ऐतिहासिक चित्रपटाचे - लेखक- निर्माते किंवा  दिग्दर्शक मंडळी एक तर प्रेक्षकांना हा इतिहास माहीतच नाही किंवा आपण सांगू तोच इतिहास असं मनात बांधून चित्रपट बनवतात.  इथेही तीच कहाणी . हर हर महादेवमधल्या अनेक खटकणाऱ्या गोष्टी   हा चित्रपट इतर ऐतिहासिक सिनेमांच्याच रांगेतला आहे असं वाटावं अशा आहेत -

हिरडस मावळातले बाजीप्रभू हे त्यावेळचं दरारा असणारं  व्यक्तिमत्व - पण मध्यंतर आणि त्याहूनही पुढे काही काळ त्यांचं कॅरॅक्टर संभ्रमित अवस्थेतच दाखवलं गेलंय. सख्ख्या भावाने दिलेला दगा - ज्यानं वडिलांना मारलं त्यानंच वाचवलं त्यामुळे त्याच्याशी पटत नसूनही प्रामाणिक राहावं लागण्यामुळे होणारी घुसमट एकवेळ समजू शकते पण बायका-मुलींची इज्जत लुटली जात असताना केवळ आपली गुरं -ढोरं वाचवणं आणि मुलाच्या नजरेत सन्मान मिळवण्यासाठी छत्रपतींकडे जाणं हे पटत नाही. सुरवातीला शिवाजी भोसलेंशी युद्ध करायला निघालेले बाजीप्रभू - नंतर त्यांना शिवबा - शिवाजी महाराज अधूनमधून म्हणतात - "मी काय म्हणतोय तुम्हाला कळत नाही काय ?" असंही महाराजांना म्हणतात, हे बाजीप्रभूंच्या संभ्रमापेक्षा सादरकर्त्यांचंच गोंधळेपण दाखवतं .

शरदने बाजीप्रभूंचा बाज पडद्यावर खास उतरवलाय पण त्याच्या संवादातील हिंदी बाज अनेकदा खटकतो. थोडा जास्त प्रयत्न करून डबिंगमध्ये ही उणीव भरून काढता आली असती.

" मस्त", “घंटा” " आयला- च्यायला" असे शब्द संवादातून गाळले असते तर बरं झालं असतं . मोहन जोशींच्या तोंडचे संवाद पानचट वाटले - त्यांचं, शरद पोंक्षे , किशोर कदम आणि श्रीकांत यादवांच्या भूमिकेला काही शेंडा-बुडखा आहे असं जाणवलं नाही -त्यांची कॅरॅक्टर्स अंदाजानी समजून घ्यायला लागली.

गोसाव्याच्या वेशातील महाराज आणि बाजी यातील शाब्दिक संवाद खडाजंगी झालेत पण त्यांच्यातली तलवारबाजी पाहताना एकाच्या वाराने शिवलिंगावर अभिषेक  सुरु होतो आणि दुसऱ्याच्या वाराने फूल वाहिलं  जातं हे पाहणं म्हणजे जरा जास्तचं आणि अशी काही खडाजंगी झाली होती किंवा कसं हेही अलाहिदाचं !!!

“ " हे स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा " असं  वाक्य लहानपणापासून ऐकत आलोय पण  "आमची इच्छा हीच श्रींची इच्छा" असं महाराजांच्या तोंडून दोन-तीन वेळेला ऐकायला लागतं .

देवगणच्या तानाजीमध्ये उदे भानू सिंहगडाकडे जहाजातून जातो - तेव्हाही डोक्यावर हात मारून घेतला होता - हर हर महादेवमध्येही वेगळं नाही - शिरवळला मराठी स्त्रियांच्या बाजारात इंग्रजांना बळजबरीने स्त्रियांना जहाजातून नेताना दाखवलंय -  शिरवळच्या नीरा  नदीतून भीमा-कृष्णा  करत बंगालच्या उपसागरातून हिंदी महासागराद्वारे इंग्लंडला रवाना  करणार होते बहुतेक. तिथेही पाण्यात आग लावणे वगैरे हास्यास्पद.

"माझ्या नरसिंहाने हिरण्यकश्यपू  फाडिला , राजियाने खासा अफझल जाया  केला...." असं  #शिवप्रतापात प्रतीकात्मक लिहिलंय ,चित्रपटात ते अक्षरशः - अवाढव्य अफझलला मांडीवर घेऊन त्याचा कोथळा नरसिंहाप्रमाणे बाहेर काढताना दाखवणं हास्यास्पद वाटतं. महाराजांनी वाघनखं पोटात खुपसून अफझुल्याला अर्धमेला केला इतपत ठीक पण त्याचा हिरण्यकश्यपू करणं हे त्याचं  मुंडकं उडवणाऱ्या संभाजी कावजीवर व सय्यद बंडाला यमसदनाला पाठवणाऱ्या जिवा महालावर अन्याय करणारं आहे. अफजलखानाचा वध झाल्यावर कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव, पिलाजी गोळे, नेताजी पालकर प्रभुतींनी आदिलशाही फौजेची वाताहत केली होती याचा कुठेच उल्लेख चित्रपटात झाला नाही.. अफझलला बोकील वकिलांनी गोड  बोलून महाराज घाबरले आहेत असं वारंवार ऐकवून भुलवलं  हॉट  आणि जावळीच्या खोऱ्यात आणण्यास राजी केलं होतं  पण बाजीप्रभूंनी खोटी मंदिरं बांधून जावळीपर्यंत आणलं हे कसं ? हे आधी कुठे वाचण्यात आलं नव्हतं !!

जिजाऊ -सईबाई -महाराज यांच्या भेटीतले त्यागाचे - विरहाचे - त्यातून भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे दाखवतानाचे प्रसंग अजूनही प्रभावी करता आले असते.

मिलिंद कांबळे यांचा सिद्दी जोहर पडद्यावर दिसतो प्रभावी पण भूमिका विनोदी अंगाने घ्यायची गरज नव्हती - तसंच वेढ्यातून सुटका होण्याआधी बाजी व सिद्दी भेटतात आणि बाजी सिद्दीला चुकीचे संकेत दाखवतात हेही पहिल्यांदाच समजलं.

पावनखिंडीत गेल्या ३-४ वर्षात दोनदा जाऊन आलोय - अनेक जणांनी आज ती प्रत्यक्षात बघितली आहे - त्यामुळे चित्रपटात जी पावनखिंड दाखवलीय आणि तेथली लढाई याबद्दल काय बोलायचं ? उंच कडे आणि सपाट जमीन असलेली आणि अफाट पाऊस असताना अंधारलेली दिसायला हवी असताना लख्ख उजेडातली पावनखिंड पडद्यावर पाहताना थक्क व्हायला होतं . तीच गोष्ट लढाईची - बाजीप्रभू हे जरी महाप्रतापी योद्धे होते तरी आपल्यासारखेच हाडामासाचे माणूस होते , सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन वगैरे नव्हते, हे चित्रपटकर्ते विसरले होते बहुतेक - लढाई करताना पंधरा वीस मीटर उंच छलांग बाजीप्रभूंना  मारताना पाहून अचंबित व्हायला होतं. जरी महाराज खेळणा -विशाळगडावर पोचल्यावर तोफ डागणार  होते आणि तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवणार हे माहिती असलं तरी तोफ ऐकल्यावर  तोपर्यंत त्वेषाने लढणारे बाजीप्रभू लगेच शस्त्र  हातातून सोडून देतात हे पटत नाही .  त्यांच्या  अंगावरच्या जखमा  मधूनच गायब कशा होतात हेही रहस्यंच

विशाळगडाच्या पायथ्याशी  मावळ्यांबरोबर सुर्वे आणि इतरांशी लढून त्यांना पराभूत केल्यावर महाराज एकटेच घोड्यावरून गडावर जातात आणि भर पावसात मशाल हातात घेऊन स्वतः तोफेला बत्ती देतात हे किती जणांना पटलं असेल?

टेक्निकलीही अनेक चुका सिनेमात जाणवतात - व्हीएफक्सचं  तंत्र वापरण्याचा प्रयत्न झालाय , पण मंत्र  चुकल्यामुळे त्याचा प्रभाव पडत नाही.
सिनेमॅटिक लिबर्टी  घेणं हा चित्रपटकर्त्यांचा हक्क असला तरी ऐतिहासिक सिनेमा हा ऐतिहासिकच वाटायला हवा !!  त्यातली तथ्य, तत्कालीन परिस्थिती , भाषा आणि मुख्य म्हणजे ऐतिहासिक गोष्टींबद्दल असणारे सामान्य जनतेचे प्रेम. जरी पाहणारे सगळे इतिहासाचे अभ्यासक नसले आणि अगदी दुसऱ्या टोकाला नवीन पिढी आणि जगातील अनेक भागात राहणारे रसिक प्रेक्षक इतिहासाशी एवढे परिचित नसले तरी सिनेमा पाहणाऱ्यांमधील ३०-४० टक्के लोक तरी इतिहासाशी परिचित असतात हे या निर्मात्यांनी लक्षात ठेवावं हे उत्तम !!!

हल्लीच्या पिढीत वाचनसंस्कृती जवळपास लोप पावत असताना, इतिहासाबद्दल अनेकांना जवळपास माहिती नाही, त्यात हा सिनेमा चार-पाच भाषांत काढला जातोय..त्यामुळे आपण इतिहास म्हणून महाराष्ट्राबरोबरच बाहेरही काय दाखवतोय हेही जाणून घ्यायला हवं...चुकीचे संदेश, प्रतिमादर्शन होऊन घेतलेल्या प्रयत्नांना दूषणं लागू नयेत एवढंच.

याचसाठी मला दाक्षिणात्य निर्मात्यांचं कौतुक वाटतं  - बाहुबली -पी एस १ वगैरे चित्रपट ऐतिहासिक किंवा काल्पनिक ऐतिहासिक असले तरी त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या भोवतालची पात्रं -त्यांच्या भाव-भावनांबरोबरच उत्तम चित्रीकरण, रंगसंगती साहस दृश्ये आपल्याला खिळवून ठेवतात. आणि त्यातलं वेगळेपण-भव्यता - व्यावसायिकपणा - घट्ट पटकथा - उत्तम तंत्रज्ञान आणि भव्यतेबरोबर विषयाशी प्रामाणिकपणा यामुळे हे चित्रपट यशस्वी आणि विश्वासु वाटतात.

लॉकडाऊन आणि त्याआधीपासून मराठी चित्रपटांना जरा बरे दिवस आले आहेत - त्यातून अनेक ऐतिहासिक चित्रपट काढायचे धाडसही निर्माते करत आहेत, प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला मिळतोय .

पण जर दाक्षिणात्य सिनेमांचा विचार करून किंवा आपल्याच जुन्या भालजी पेंढारकर प्रभुतींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ इतर काढतात म्हणून आपणही ऐतिहासिक चित्रपट काढण्यापेक्षा आपल्या मातीतील - मनात  रुजलेल्या गोष्टींना साद घालून चित्रपटनिर्मिती झाली तर असे अनेक घोळ टाळता येतील

मग कोणालाच थिएटर मध्ये येऊन चित्रपट पाडायला  यायची हिम्मत होणार नाही !!!

हर हर महादेव !!
छत्रपती शिवाजी महाराज की जय  !!!
हर हर !!!

©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका