ग्रेस ...वाढदिवस
*ग्रेस*.. आज जन्मदिन
राहुल लाळे
Take my wine in my own cup, friend,
It loses its wreath of foam when poured into that of others'.
असं कुठतरी वाचलंय
मर्ढेकरांची एक ओळ आठवली. 'जर तुम्हांला कविता कळली नसेल तर ती तुमच्यासाठी नाहीये'. त्यामुळे जर का कुणाला ग्रेसची कविता कळत नसेल तर ती त्याच्यासाठी नाहीये, असं समजावं आणि त्या कवितेला किंवा स्वतःच्या बुद्धीला दोष न देता फक्त त्या कवितेतल्या शब्दांचा आनंद घ्यावा आणि पुढे जावं.
भय इथले संपत नाही...ग्रेस इथं आयुष्याच्या संध्याकाळच्या आपल्या मनःस्थितीचं वर्णन करतोय. एकीकडे विरक्ती त्याला खुणावत आहे, पण विरक्तीची कल्पना त्याच्या मनात एक अनामिक भीती उत्पन्न करते आहे आणि मग त्याला त्याच्या आईच्या आठवणी व्याकूळ करून सोडताहेत.
ग्रेसची कविता अनेकांना दुर्बोध , अनाकलनीय वाटते...
भय इथले पण .... अशीच...वरवरती प्रियकराने प्रियेच्या विरहात आठवणीत गायलेलं काव्य वाटावं....पण प्रत्यक्षात एका आईवेड्या मुलाने आईच्या आठवणीत लिहिलेल्या आर्त पंक्ती.... ग्रेसचे तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही सुध्दा अशीच एक रचना... विचार करायला लावणारी..जेव्हां मी कुठंतरी वाचलं की ग्रेसच्या कविता या त्याच्या आईबद्दलच्या भावना व्यक्त करताना उतरलेल्या भावना आहेत तेव्हापासून माझा त्या रचना पहाण्याचा दृष्टिकोनच बदलला, पूर्वी केवळ मंगेशकर मंडळींनी म्हटलेली ग्रेसची सुरेख गीते एवढीच भावना होती
ग्रेसच्या कवितेत झरा, आकाश, संध्याकाळ, दगड, डोंगर, चंद्र यांसारख्या प्रतिमा सतत आढळून येतात, पण त्यांचे संदर्भ कवितेनुसार बदलत जातात. त्यांचे अर्थ बदलत जातात.
भय इथले संपत नाही, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस कधीचा पडतो, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, पाऊस कधीचा पडतो ही गाणी लहानपणापासून ऐकत आलोय. तेव्हा गाण्याचे गीतकार , संगीतकार कोण ? असे प्रश्न पडले नाहीत. थोडं कळायला लागल्यावर लता, हृदयनाथ यांनी ही गाणी म्हटलीत हे समजल्यावर त्यांची गाणी ऐकायला लागलो. पुढे कविता, लेख, इतर गाणी ऐकताना ग्रेसची गाणी वेगळी गूढ वाचली.... आणि अभ्यास नाही तरी वाचन चालू केलं...
जे न देखे रवी ते ते देखे कवी असं म्हणतात...
कधी कधी कवितेत लिहिलेलं असतं,त्यापेक्षा अनेक वेगळे अर्थ नंतर निघतात...एखादी कविता करताना त्या कवीची मनस्थिती काय होती हे लक्षात घेतलं तर नंतर एखाद्या वेगळ्या मूडमध्ये कधीतरी तो वेगळंच काही लिहिल आणि वाचणाऱ्याच्या मूडप्रमाणे आणि कल्पकतेने त्याचे अर्थही वेगवेगळे लागतील...किंवा एखाद्याला लागणारही नाही..
"कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक पद्धत आहे आणि मी आपल्याच प्रकारे जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वत: निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते. पण हे ही स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे," असे ग्रेसचं म्हणणं .
माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेसच्या 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' यात म्हटलंय
आणि तसंही शशी थरुरच्या इंग्रजीचं कौतुक करण्यापेक्षा ग्रेसच्या दुर्बोध मराठीचा अर्थ लावणं केव्हाही आवडेल..
बाकी कोणी काय वाचायचं आणि कोणाला काय आवडतं हा ज्याचा त्याचा प्रश्न
अजून एक मित्रत्त्वाचा सल्ला - ग्रेसची कविता कुणाकडूनही समजावून घेण्याचा प्रयत्न करू नका.
तो होता माणिक म्हणूनी
कवितेला ग्रेस आली
निद्रिस्त प्रतिभेसाठीही
उपमा माणिकाचीच आली
© राहुल लाळे🌈

Comments
Post a Comment