देवाजीचं पाणी .. निसर्गाचं दान

 देवाजीचं पाणी .. निसर्गाचं दान

राहुल

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5872541522762102&id=100000189366265


अनेक दिवसांनी काल दुपारी बाहेर उन्हातून घरी परतलो होतो आणि तहानेने आसुसलेला होऊन कधी एकदा पाणी पितो असं झालं होतं . ऑफिसमध्ये दिवसभर असल्यामुळे बाहेरच्या उन्हाची कल्पना एरवी येत नाही पण काल तो अनुभव घेतला खरा आणि फ्रीजमधून पाणी पीत बाल्कनीकडे आलो आणि एकदम जे  पाहिले  त्याने पाणी पितानाच सर्व थकवा दूर झाला. "सावलीत का कळे, उन्हामधील यातना ". . .' लतादिदींच्या स्वरातलं हे गीत नकळत ओठांवर आलं. कारण बाल्कनीत  मला एक छान दृश्य पाहायला मिळालं - बुलबुल पक्षांची एक जोडी तारिणीने कुंडीत ठेवलेल्या खाऊचा  आस्वाद घेत होती आणि तिथेच जवळ ठेवलेल्या दगडीत ठेवलेल्या  पाण्याने आपली तहान भागवत होती

बाहेरून आलो तेव्हा  आमच्या सोसायटीच्या पलीकडं रस्त्याचं काम सुरू होतं. उन्हाच्या ज्वाळांनी पेटलेल्या भर दुपारी मजूर -काही पुरुष, काही बाया  काम करत होते. सावलीत कडेला त्यांची मुलं बसलेली होती . पाहून जीव कळवळला.  मनापासून वाटलं  'आता बास व्हावा हा  उन्हाचा कहर!' . यंदा  तापमानाचा पारा वरवर छाडतोच आहे आणि तो तिथं अनेक दिवस टिकतोय . प्रत्येक वर्षी वाटतं यंदा जरा उन जास्तच आहे. लहानपणीच्या उन्हाळ्यातील रम्य आठवणीत पुणे आणि परिसर उन्हाळ्यातही आल्हाददायक  वाटायचा. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवायचा; पण गारेगार आईसक्रीम, तिखटमीठ लावलेल्या कैरीच्या फोडी, काळी मैना , आमरस,वाळा घातलेलं माठातलं  थंडगार पाणी आणि कधी बर्फाचे गोळे  यामुळं उन्हाची दाहकता  कमी होऊन जायची. आज कैरी, आमरस, काळी मैना, वाळा, आईस्क्रीम  सगळं आहे,पण  तरीही उन्हाच्या झळा काही कमी होत नाहीत. याची  कारणंही आपल्या समोर आहेत - काँक्रीटची जंगलं  वसतायंत - टेकड्या जमीनदोस्त  होत आहेत, डोंगर उघडे-बोडके झालेत, झाडं दिसे नाशी झाली आहेत, नद्या आटताहेत.  म्हणूनच   गंगाधर महांबरे यांचं लतादीदींनी गायलेलं गीत 'सावलीत का कळे उन्हामधील यातना . .'  आठवलं.  किती खरंय ना? सावलीत बसून काय कळणार हो उन्हातल्या यातना . . . एक मात्र नक्की आपल्याला सहवेदनेची भावना परमेश्वरानं दिलीय . . "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास" हा संत तुकारामांचा अभंग फक्त ऐकून कान तृप्त करण्यासाठी नाही तर हीच सहवेदना पुढे नेण्यासाठी नाही का?

तो अनुभव घेण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाता आलं तर चांगलंच , नाहीतर किमान आपल्या बाल्कनीत, टेरेसमधे, घराच्या आवारात तरी आपला असा चिमुकला निसर्ग तयार करुन तो आनंद अनुभवायला हवा.. तसा आनंद आसपासच्या पक्षांना साद घालून देता आला तर सोनेपे सुहागाच !!!


अशा उन्हाळयात सर्वांना आस असते ती पावसाची ... पावसाला - पावसाच्या पाण्याला काही ठिकाणी "देवाचं पाणी" म्हणतात - ते कधी बरसणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न !! "माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार . . . ही कविता सुंदरच .. . ना. धो. महानोरांच्या 'या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे . . .'  या शब्दातूनही  पावसाची आळवणी होतेच 

शास्त्राच्या  प्रगतीनं जीवन कितीही समृद्ध झालं तरीही पावसाचा  पर्याय अजुनतरी आपल्याकडे नाही. म्हणूनच हे देवाचं पाणी जपून वापरायचं आणि मनापासून प्रार्थना करणं  आणि आपल्या परीने सर्व प्राणिमात्रांना मदत करायचा प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात !!!

राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका