मी वसंतराव
*मी वसंतराव ...*
*संगीतसूर्याचे कैवल्यगान*
...राहुल लाळे
"शत जन्म शोधताना", “तेजोनिधी लोहगोल", "सुकतातची जगी या", "मधुमिलनात या", " कानडा राजा पंढरीचा", "शूरा मी वंदिले", "बगळ्यांची माळ फुले", " प्रथम तुला वंदितो", "ही कुणी छेडिली तार","रंगू बाजाराला जाते","मृगनयनी चंद्रमुखी" अशी अनेक नाट्यगीते, चित्रपटगीते शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताचा भावानुभव ज्यांच्याकडून मिळाला, त्या डॉ वसंतराव देशपांडे यांचं गारुड लहानपणापासूनच मनावर बसलंय . त्यात माझ्या वडलांचेही ते आवडते गायक. त्यामुळे लहानपणी कळत असून नसूनही त्यांचं गाणं कानावर पडत राहिलं आणि कळायला लागल्यावर मुद्दाम त्यांना ऐकत राहिलो - आणि त्यांच्यावर जेवढी माहिती मिळाली वाचत राहिलो - अगदी टीव्ही वरच्या "शाकुंतल ते मानापमान" पाहणं , तसंच वपुंनी १९८२च्या नाट्यसंमेलनात वसंतरावांची घेतलेली मुलाखत वारंवार ऐकणं म्हणजे माझ्यासाठी कायमच एक मेजवानी असते.
त्यामुळे वसंतरावांवरचा सिनेमा येतोय ऐकून तो पाहायची उत्सुकता होतीच. त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या २०२१ च्या गणेश कलाक्रीडाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात राहुल देशपांडेनी "मी वसंतराव" हा चित्रपट जरूर चित्रपटगृहात पहा या आवाहनामुळे तो पाहायचाच ही गाठ बांधून ठेवली होती - "मी वसंतराव" सिटीप्राईड कोथरूडला परवा पाहून ती गाठ सोडली - खरं तर अशा गाठी सुटत नाहीत त्या घट्टच होत जातात - आणि तेच घडलं –
जन्मापासूनच जगण्याचा - स्वतःला सिद्ध करण्याचा संघर्ष करायला लागलेल्या वसंतरावांचा काही परिचित आणि बराचसा अपरिचित असा परिचय करून देणारी ही कलाकृती निर्मित केल्याबद्दल राहुल देशपांडे, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि निर्माते व सर्वच टीमचे मनापासून आभार व कौतुक.
शेवटचं " 'कंठात आर्त ओळी, डोळ्यांत प्राण आले... आता समेवरी हे, कैवल्यगान आले" हे गाणं ऐकताना वसंतरावांच्या जुन्या चित्ररूप आठवणी पडद्यावर पहात पहात मनात साठवून ठेवत ओलेत्या डोळ्यांनी बाहेर पडलो खरा, पण नंतर अनेक विचार मनात आले - ते व्यक्त व्हायला आणि मी हा सिनेमा का पाहिला हे मी सांगितलंच पण इतरांनीही हा का पाहावा ते सांगण्यासाठी हा प्रपंच –
(याचमुळे कृपया हे लिखाण परीक्षण किंवा रिव्ह्यू म्हणून न वाचता, वसंतरावांच्याबद्दलची - या सिनेमाविषयीची प्रामाणिक व्यक्तता म्हणून वाचावं )
*१ वसंतरावांसाठी -* ज्या संगीतसाधकाने मिलिटरी अकौंट्समधली २० वर्षांची नोकरी सर्व बंधनं पाळून केली पण संगीताची आराधना करताना मात्र सर्व प्रचलित बंधनांना झुगारून दिलं , " वाटेवर काटे वेचित चाललो " म्हणत जीवनप्रवासात अनेक काटेरी वाटा अनुभवताना स्वतः मात्र " वाटले जसा फुलाफुलांत चाललो " असं प्रत्युत्तर देऊन अनेक स्वरफुले ज्यांनी बहरवली आणि मारवा- राजकल्याण -भेंडीबाजार -पतियाळा-ग्वाल्हेर-किराणा अशा अनेक घराण्यांचा अभ्यास करून स्वतःची अशी एक आगळीच गायनशैली बनवली अशा एक वेगळीच कलंदर मिजाज बाळगणाऱ्या महान संगीतसाधकाला - वसंतरावांना अनुभवणं -समजून घेणं हे प्रत्येक रसिकाचं कर्तव्यच आहे
*२. राहुल देशपांडेसाठी -* वसंतरावांच्या मुख्य भूमिकेसाठी राहुल हा खरं म्हणजे नॅचरल चॉईस.जेव्हापासून राहुलचं गाणं ऐकतोय - वसंतरावांची झलक त्यात दिसतंच आलीय पण प्रत्यक्ष वसंतराव म्हणून तो पडद्यावर शोभेल का ? हा प्रश्न होता - वसंतरावांसारखं दिसणं आणि तसा गेट-अप करणं याचा अट्टाहास न करता त्यांच्यासारखं असणं हे राहुलने पडद्यावर नक्कीच प्रामाणिकपणे पूर्ण प्रयत्नाने यशस्वीपणे सादर केलंय. आपल्या आजोबांना तो प्रत्यक्ष जगलाय . पारुताई जेजुरीकरांची लावणी ऐकल्यावर त्यांना ‘पुनव रातीचा, लखलखता केला मी शिणगार…’ ही लावणी ऐकवताना राहुलने प्रस्तुत केलेली वसंतरावांची अदा आणि गायन दोन्हीही अफलातून !!!
३. *एक खराखुरा बायोपिक पाहण्यासाठी -* कुठल्याही बायोपिकमध्ये मध्यवर्ती पात्राला लार्जर दॅन लाईफ बनवलं जातं - एक प्रकारचं दैवत्व दि,लं जातं . या सिनेमात वसंतरावांबरोबरच पुलं, दारव्हेकर,बेगम अख्तर आणि अनेक मोठी पात्रं रंगवली गेली आहेत, पण त्यांच्यातल्या कलाकाराला दाखवताना त्यांचं साधंपण, त्यांचं माणूस म्हणून वागणं- वावरणं - कक्षा विस्तारत जाऊन मोठं होत राहणं हे दाखवलंय गेलंय - ते महत्वाचं. पुलंचं मोठं होत राहाणं हे त्यांच्या कलेच्या सादरीकरणात, बोलण्याचालण्यातून दिसून येतं- वसंतराव, त्यांची आई, मामा पत्नी,मुलं -शेजारी, संपर्कात आलेली पुलं ,मा. दीनानाथ, अख्तरबाई इ. माणसं यांची एकमेकांतील नाती, संबंध अगदी आपल्या सामान्य घरातील घडत आहेत असंच वाटत राहातं -याचमुळे वसंतरावांची आई पुलंना लाटणं फेकून मारताना वावगं वाटत नाही आणि वसंतराव या आपल्यासारख्याच एका माणसाची, जो एक महान, हरहुन्नरी कलाकारही होता अशा व्यक्तीची गोष्ट समरस होऊन आपण पहात राहतो.
४. एक उत्तम नेमक्या कलाकारांचा संघ पाहण्यासाठी - सिनेमाचं कास्टिंग एकदम परफेक्ट - ७०-७५ पात्रांसाठी अचूक व नेमकी कलाकारांची निवड कास्टिंग मॅनेजर चिन्मय केळकरने व निर्मात्यांनी केलीय. किशोरवयीन वसंतरावांच्या भूमिकेत गंधार जोशीने सुंदर मन लावून काम केलंय. वसंतरावांच्या आईची करारी, बाणेदार, खंबीर व स्वाभिमानी आईचं काम अनिता दातेने जबरदस्त केलंय - मिळालेल्या संधीचं चीज - सोनं केलंय . अगदी सुरवातीच्या गर्भारपणातील गायनाच्या प्रसंगापासून ते आपल्या मुलाला ज्या घरात जीवाला धोका आहे तिथं फक्त संपत्तीसाठी न राहता - प्रसंगी नवऱ्याला सोडून देऊन मुलाला एकटं वाढवण्याची हिम्मत दाखवणाऱ्या राधाबाईंना सलाम आहेतंच पण अनिताला त्यांना आपल्यासमोर आणण्यासाठी पैकीच्या पैकी १००% !!! पुष्कराज चिरपुटकरचा पुलं एकदम झक्कास - कुठलाही कृत्रिम मेक-अप न करता फक्त अभिनयाच्या जोरावर त्यानं पुलं उभा केलाय. वसंतरावांना वेळोवेळी समजावत , त्यांना कधी पाठिंबा - तर कधी दटावणारा प्रेमळ मित्र पुष्कराजनी मस्त साकारलाय. अमेय वाघ मा. दीनानाथांच्या छोट्या भूमिकेत लहान वाटतो पण त्यानंही तो रोल अप्रतिम केलाय. वसंतरावांच्या मामाच्या भूमिकेत आलोक राजवाडे, पत्नी - कौमुदी वाळोकर, पहिले गायन गुरु शंकरराव सप्रे- सारंग साठ्ये, पीरबाबा -कुमुद मिश्रा, बेगम अख्तर - दुर्गा जसराज , पुरषोत्तम दारव्हेकरांच्या भूमिकेतले कलाकार व सर्वच सहकलाकारांनी आपापल्या भूमिका नेमक्या वटवून आपली स्वतंत्र छाप सोडली आहे. आणि हे करताना कोणताही कलाकाराचा बाज-मान सोडला जाणार नाही - कुठलाही प्रसंग वादग्रस्त होणार नाही ( भाई - मधील मदिरापानासाठी आतुर झालेले दिग्गज दाखवतानाचा प्रसंग आठवा ), - थिल्लरपणा येणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे - हे स्तुत्य !!!
*५ निर्मितीमूल्यांसाठी -* १९२० ते १९७० अशा कालखंडातल्या कथेमुळे कालानुरूप स्थळं, छायाचित्रण , रंग-वेशभूषा , पटकथा - संवाद ,नेपथ्य , कलादिग्दर्शन, सेट्स राखणं - हे सोपं काम नाही ,- गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या अनेक पिरियड सिनेमांपेक्षा याची निर्मितीमूल्य निश्चितच उच्च आहेत. अगदी मुर्तिजापूरातल्या वसंतरावांच्या जन्माचा प्रसंग असो वा नागपूरमधलं घर- संगीत विद्यालय व लाहौरमधला दर्गा - दंगलीचे - रेल्वेचे किंवा पुण्यातील त्यांच्या घरातले प्रसंग पडद्यावर पाहताना आपण प्रत्यक्ष वसंतरावांच्याच आसपास वावरत आहोत आणि त्यांना जाणून घेत आहोत असं वाटत राहणं हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य. सर्व प्रॉडक्शन टीम आणि डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी यांचे कौतुक करायलाच हवं !!!
*६. निपुण धर्माधिकारींच्या उत्तम दिग्दर्शनासाठी -* . संगीताची उपजत देणगी मिळालेले बालपणीचे वसंतराव, गुरू शोधताना स्वतःलाही शोधणारे वसंतराव, आईच्या कष्टांची जाणीव ठेवून स्वतःच्या जीव की प्राण अशा संगीतवेडाला मुरड घालून कौटुंबिक जबाबदारी पेलणारे वसंतराव, नाव-पैसा, प्रसिद्धीपेक्षाही खरी दाद श्रेष्ठ मानणारे आणि त्यासाठी भुकेले असलेले वसंतराव आणि या सर्व कष्टप्रद प्रवासात स्वतःची ओळख निर्माण करणारे वसंतराव असे वसंतरावांच्या आयुष्यातले सगळे टप्पे पाहताना प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनत जातो - यातच दिग्दर्शक म्हणून ( तसेच उपेंद्र सिधये बरोबर सहलेखन करून) निपुणचा अभ्यास व कष्ट दिसून येतात. प्रत्येक दृश्यात, प्रत्येक प्रसंगात-फ्रेम मध्ये प्रेक्षक गुंतून जातो व तीन तासात सिनेमा कुठं रेंगाळल्यासारखा वाटत नाही यातच निपुणची मेहनत आणि माध्यमावरची पकड समजते. पार्श्वसंगीत आणि सिनेमाची कथा पुढे घेऊन जाणारी गाणी यांची सुमधुर गुंफण पाहताना निपुणची संगीतातली समज आपल्याला दिसते. वसंतराव - त्यांचा कालानुरूप प्रवास -म्हणून लोकांना पडद्यावर काय पाहायला हवं हे निपुणने बरोब्बर विझ्युअलाईज केलेलं जाणवतं !!
*७ चित्रपटातील मनाला भिडणाऱ्या संवादांसाठी -* " आपल्याला गात राहावंसं वाटणं - आणि समोर ऐकायला कोणी नसणं हे दारिद्रय " हा दीनानाथांचा डायलॉग वसंतरावांप्रमाणेच आपल्याही मनात घर करून राहतो - वसंतरावांच्याच शब्दात सांगायचं झालं तर माझं गाणं ऐका टाहो फोडून गळा काढत होतो तेंव्हा ऐकायला कोणी नाही आणि आता गळ्याचं नरडं झालंय तर लोक वसंतराव काहीतरी ऐकवा म्हणून मागे लागतात " याला काय म्हणावं?
"तू आता सगळं सोडून पूर्णवेळ गाणंच कर" असं पुलंनी सांगितल्यानंतर, "मी आत्ताही चोवीस तास माझ्या मनात गाणंच म्हणत असतो, फक्त ते लोकांना ऐकू जात नाही" असं वसंतराव म्हणतात यावरून त्यांचं एकपाठीपण तसंच संगीत प्रत्यक्ष जगणं समजतं. पुलं जेंव्हा म्हणतात की " वसंताच्या आत कुठंतरी एक माकड आहे " ते खरंच कारण दीनानाथ आणि इतरांसारख्या रामाचे ते हनुमान होते आणि अनेक हुनुमानाचे रामही. "माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरु होतं " असं जेंव्हा वसंतराव म्हणतात तेंव्हा त्यांचा अहंकार नाही तर एक प्रामाणिक मिजास व मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशासारखा प्रखर आत्मविश्वास दिसून येतो, तसंच त्यांच्या "गाण्यातली मस्ती व मस्तीतलं गाणं" सामोरं येतं !! दीनानाथांचं ""असं गावं की लोकांनी शब्दच विसरावेत. स्वत:चा आवाज विसरावा. विचार करणंच विसरावं" हे वाक्य ते वसंरावांसाठीच जणू लिहिलं गेलंय - या आणि अशा अनेक संवाद टाळ्या तर मिळवतातच पण अनेकदा डोळ्यांत पाणीही आणतात चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात
*८. सुमधुर संगीतासाठी -* वसंतराव म्हणलं की संगीत आलंच - आणि त्यांचं गाणं म्हणजे विविध हरकती, प्रकार, लयताली यांची बहारदार बरसात . हा सिनेमा यात कुठंच कमी पडत नाही अंगाईगीतापासून लावणीपर्यंत, मारवा - नाट्यगीतं सर्व प्रकारच्या एकूण २२ गीतांची सुरेल मेजवानी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट देतो. त्यात वसंतरावांची गाजलेली गाणी आहेतंच आणि खास चित्रपटासाठी केलेली गाणी व वैभव जोशी प्रभुतींनी लिहिलेली गाणी ऐकत तीन तासांची कथा आपल्याला पूर्णानंद देते. सभागृहात झाकीरजींचं तबलावादन चालू आहे आणि नंतर वसंतरावांचे गाणे होणार अशा प्रसंगाने सिनेमा सुरु होतो. आणि तत्पश्चात सिनेमाभर गीतसंगीताचे असंख्य क्षण पावलोपावली भेटत रहातात. प्रत्येक गीत , प्रत्येक तान, प्रत्येक हरकत ऐकल्यावर आपण थिएटरपेक्षा प्रत्यक्ष मैफलीत बसलो आहोत असं वाटून "वाsss क्या बात " अशी दिलखुलास दाद तोंडातून किती वेळा आली हे कळतंच नाही. यात महत्वाचा वाटा राहुल बरोबरचाआनंद भाटे, विजय कोपरकर, उ. रशीद खान,, श्रेया घोषाल, प्रियांका बर्वे, उर्मिला धनगर अशा काही ज्येष्ठ व काही उगवत्या गायकवृंदाचा आहे. वसंतरावांच्या नेहमीच्या "घेई छंद- परवशता पाश दैवी,-युवती मना- मालिनी कण वाही हा वारा - राधाधर मधूमिलिन्द " इत्यादी गाण्यांबरोबरच " सूरसंगत- ललना न भेटली -ले चली तकदीर- बिंदिया ले गायी - विठ्ठला दर्शन देऊन जा पासून शेवटचं कैवल्यगान " सगळीच गाणी भन्नाट. "राम राम जप करी सदा" हे गीत सिनेमात जेंव्हा जेंव्हा वसंतरावांवर परीक्षेची वेळ येते तेंव्हा मनोधैर्य वाढवायला व कथेला पुढे न्यायला सामोरे येते. वैभव जोशींनी नव्या गीतांचा मेळ जुन्या गाण्यांशी बेमालूमपणे घालून गीतकाराच्या रुपाला एक आगळी उंची दिलीय. राहुल देशपां डेचा संगीतकार म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे असं अजिबात वाटत नाही. सर्व गीतांना संगीताचे विविध अलंकार सिनेमाच्या पटकथेला लेववून एक जिवंत राहुल -निपुण -वैभव -सर्व कलाकार -गायक व पूर्ण चमूने आपल्यासमोर उभी केली आहे.
कोणत्याही कलाकाराला आपली कला अभिमानाची असते - जीव की प्राण असते आणि आपल्या कलेला- पेशकशीला रसिकांच्या दादेला तोही भुकेला असतोच, ते नशीब वसंतरावांना फार उशिरा मिळाले - त्यांच्या गायकीविषयी त्यावेळच्या स्वयंघोषित दर्दीना कायम शंकाच होती. पण तरीही सिनेमात झाकीरच्या परफॉर्मन्सनंतर वसंतराव गाणार का ? हा प्रश्न- शंका खुद्द खांसाहेब विचारतात हे पाहताना त्रास होतो . त्यातून त्यांच्या गायकीबद्दल- क्षमतेबद्दल शंका घेतलीय का वयाबद्दल हे कळत नाही. याउलट लाहोरला असद अली साहेबांकडे वसंतरावांबरोबरच गाणं शिकणाऱ्या त्यांचे गुरुबंधू अल्लारखां यांनी त्यांच्या मुलालाच - झाकिरजींना वसंतरावांना साथ देताना सावध रहा म्हणून दिलेल्या सल्ल्याचे दृश्य दाखवले असते तर ?
वसंतरावांबद्दल जेवढं ऐकलंय, जेवढं वाचलंय, पाहिलंय त्यावरून ते एक कलंदर कलाकार व्यक्ती होते पण स्वतःच्या विचारांशी ठाम असणारे जगण्याची आरपार नजर असलेले चालता -बोलता ज्ञानकोषही होते. त्यांचे विचार स्वच्छ,परखड, तर्कशुद्ध, सडेतोड होते पण तेवढेच नम्र - ओलावा असणारेही ते असावेत असं वाटतं. या ओलाव्यामुळेच आपल्या आईवर एकटीने संसार चालवताना जे कष्ट पडले ते पाहून त्यांनी संगीताची आराधना करतानाच घर चालवण्याची जबाबदारी महत्वाची मानून मिलिटरी अकाउंट्स मध्ये नोकरी करण्याला प्राधान्य दिले. पण तरीही ते बाणेदार असावेत - आणि डोळसपणे संगीताचा अभ्यास करत अनेक गुरूंकडे विविध घराण्यांचा अभ्यास केला होता. हे सिनेमात अजून स्पष्टपणे दाखवायला हवं होतं. ते न झाल्यामुळे "माझं घराणं माझ्यापासूनच चालू होतं " हे त्यांचं व्यक्तव्य ज्यांना वसंतराव माहिती नाहीत त्यांना फारसं कळालं नसावं. आणि ते अभिमानी व्यक्तव्य करतानाचा " तुम्हाला काय करायचे ते करा " हे म्हणतानाचं वाक्यही जरा वेगळं चाललं असतं.
एका लग्नात गाणं झाल्यावर तिथला पोरसवदा यजमान मुलगा वसंतरावांना गाते रहो म्हणतो – हे पटत नाही.
तसंच पुलंबरोबरच्या पहिल्या भेटीत त्यांना तबल्यावर साथ देऊन ललना ना भेटली गाताना आपल्या गायकीची चुणूक दाखवताना तोंडात पान असणं थोडं वेगळं वाटतं - तसं सिनेमात इतर वेळी असं काही दाखवलेलं नाही
पुलंबरोबरची त्यांची कालानुरूप "समानशीले व्यसनेषु सख्यम " या उक्तीप्रमाणे बहरत गेलेली मैत्री दाखवताना पुलंच्याच गुळाच्या गणपती चित्रपटातील " इथेच टाका तंबू ", ही कुणी छेडिली तार " ही वसंतरावांनी गायलेली गाणी तसेच भीमसेनजींनी याच चित्रपटात गायलेल्या "इंद्रायणी काठी" ला वसंतरावांनी केलेली साथ यांचा उल्लेख पाहायला आवडला असता. पुलंच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी पार्श्वगायन केली माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी .
"कट्यार" मुळे जरी वसंतरावांना खूप नाव मिळालं असलं तरीही त्यापूर्वीच्या त्यांच्या इतर गायनप्रकारांचा - उदा. "इये महाराष्ट्राच्या नगरी -सावधान होई वेड्या -माझ्या कोंबड्याची शान, सप्रेम नमस्कार - राम भजन कर लेना - झांजीबार झांजीबार-- कानडा राजा " अशा अनेक चित्रपटगीतांचा उल्लेख आलेला नाही. ही बहुतेक गाणी सिनेमात दाखवलेल्या कालखंडातलीच जवळपास २०-२५ चित्रपटातील आहेत आणि गाजलेलीही.
बेगम अख्तर आणि पुलं बरोबरचे घनिष्ट संबध , तसेच पुरुषोत्तम दारव्हेकरांबरोबरचे कट्यारच्या वेळेची इंटरऍक्शन चित्रपटात छान खुलली आहे. यांच्याबरोबरच पं कुमार गंधर्वांबरोबरही वसंतरावांचे एक खास मैत्र होते - त्यांच्यामध्ये संगीताची -बंदिशींची आदान प्रदान व्हायची - दोघांची मांडणी एकमेकांपेक्षा वेगळी होती आणि जगावेगळीही. वसंतरावांच्या आवाजाचा लगाव कुमारजींपेक्षा अलग होता पण सुरेलपणा- रागाकडे ,गाण्याकडे पाहायची दृष्टी कुमारजींकडून घ्यायला वसंतरावांना आनंदच व्ह्यायचा असं वाचलंय !!! सुरेशबाबू माने , पं कुमार गंधर्व, पं भीमसेनजी जोशी, वि. हिराबाई बडोदेकर, थिरकवा साहेब ,गंगुबाई हनगल , गदिमा-बाबूजी इत्यादी प्रभुतींशी वसंतरावांचे असलेले जवळचे संबंध पाहायला आवडले असते. अष्टविनायक चित्रपटली गाणी , तसंच रंगबिरंगी मधलं " मृगनयनी " इत्यादी गाणीही मनात डोकावून गेली.
डॉ वसंतराव देशपांडे हे अनेक घराण्यांचा एकलव्याप्रमाणे अभ्यास करून स्वतःची विलक्षण गायकी निर्माण करून लय-ताल-विचारांवर स्वार होऊन आवडत्या मारवा रागाबरोबरच इतर शास्त्रीय-उपशास्त्रीय-नाट्यसंगीत-ठुमरी-लावणी-सुगम संगीत-चित्रपटसंगीत अशा अनेक आघाड्यांवर अग्रेसर होते. गायनाबरोबरच ते एक अभिनेता होते - तबलावादक होते याची झलक दिसली -तसेच ते हार्मोनियम व ऑर्गनवादकही होते. सारंगी व बीनही शिकत होते. त्यांना जिलेबी बनवताना सिनेमात पाहून त्यांचा पाककलेतला रस कळाला याचबरोबर कीर्तन,कथ्थकनृत्य,नकला ,ज्योतिष या विविध विषयांत त्यांची मुशाफिरी होती. अत्तर परीक्षण व विविध अत्तरांबद्दल त्यांच्याकडे माहितीचा खजिना होता.
सिनेमा पाहताना मला बाबूजींच्या " जगाच्या पाठीवर" या आत्मचरित्राची आठवण आली - त्यातही बाबूजींच्या कष्टप्रद आयुष्यावर खूप लिहिले गेलंय आणि नंतर मिळालेल्या अफाट यशाच्या फक्त पाऊलखुणाच दिसतात .
वसंतरावाचं गाणं लगेच सुरु होतं आणि मनाचा ठाव घेतं ( जसप्रीत बुमराच्या एकदम छोटया रन-अप सारखं ), थोडासा दरवाजा उघडतोय आणि हृदयात प्रवेश होतोय असं वाटत असतानाच हुरहूर लावत ते अनेकदा थांबतंही - तसंच काहीसं या चित्रपटाविषयी वाटलं !!
वसंतरावांच्या मागे इतर सुप्रसिद्ध गायकांप्रमाणे "पंडित - पं " असं कधी लागलं नाही पण संगीत अलंकार स्पर्धेत भारतात आलेल्या वसंतरावांनी नंतर " Transformation of Music of Tomorrow 's Khayal " हा शोधनिबंध लिहून संगीताचार्य ( Ph.D - डॉ ) मात्र झाले –
लोकांची स्मरणशक्ती क्षीण असते, तसंच सिनेमा पाहणारे सगळेच वसंतरावांना ओळखत असतील असं नाही - त्यांच्या दृष्टीने जे दाखवले गेले ते आणि तेवढेच वसंतराव असं व्हायला नको . काहीजण सिनेमा पाहून वसंतरावांबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतीलही ,
पण तरीही ...
वसंतरावांनी सहन केलेली उपेक्षा, त्यांचा संघर्ष या चित्रपट पाहायला मिळाला - आता राहुल - निपुण व टीमने त्यांच्या उत्कर्षाचा काळ व इतर अनेक आठवणीही दुसऱ्या भाग निर्माण करून आणाव्यात ही कळकळीची विनंती ..
“एखाद्या कलावंताचं, त्याच्या सगुण रूपाचं वर्णन आपण काही प्रमाणात करू शकतो पण त्याच्या कैवल्यात्मक रूपाचं वर्णन करायला आपण कायमच कुठं तरी कमी पडतो" असं काहीतरी पुलंनी कुठंतरी म्हणलेलं मी वाचलं होतं आणि त्याच कैवल्याच्या काहीश्या अपूर्ण रूपाचा अनुभव घेऊन आणि मन-डोळे पूर्णपणे भरलेले घेऊन बाहेर पडलो .
राहुल-निपुण - आणि "मी वसंतराव" च्या टीमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक कौतुक आणि आभार !!!
आयुष्यात उमेदीच्या काळात रसिकांनी आपलं गायन ऐकावं अशी आस मनात बाळगणाऱ्या कलाकाराचा प्रवास पाहायला "मी वसंतराव !" एकदा तरी पाहायलाच हवा !!
© राहुल लाळे




छान लिहिलंयस, राहुल! 👍👍
ReplyDeleteछान लिहिलंयस, राहुल!👍👍
ReplyDelete