२६ फेब्रुवारी...स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन*
*२६ फेब्रुवारी...स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन*
*सावरकर -*जयोस्तुते श्री महान्मंगले*
राहुल
जयोस्तुते श्री महान्मंगले
शिवास्पदे शुभदे ..स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे ....
किती तेजस्वी , चैतन्यदायी स्वातंत्र्यदेवीचे गीत - अजूनही कुठे ऐकू आलं की स्फुरण चढतं .
अशा तेजस्वी, तत्वनिष्ठ , विज्ञानवादी दृष्ट्या स्वातंत्र्यवीराला आज त्यांच्या स्मृतिदिनी शतशः प्रणाम 🙏🏻
१९१० साली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला सावरकर अंदमानला पोचले - एखाद्याने हाय खाल्ली असती पण त्यांना काय सुचलं तर -
" मुहिब्बाने वतन होंगे- हजारो बेवतन पहले
फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमान पहले"
म्हणजे ...
"या माझ्या देशावर प्रेम करणारे असंख्य असतील पण अगोदर त्यांना निर्वासित व्हायला लागेल - हिंदुस्थानाच्या समृद्धीची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील पण त्यासाठी अंदमान भरीला लागेल "
सागराशी एक आगळं नातं असणारा हा महापुरुष - त्यानं फक्त मार्सेलिसला जहाजातून उडी मारून कैदेतून निसटण्या साठी फक्त समुद्राची मदत नाही घेतली तर त्याच सागरास " ने मजसी ने परत मातृभूमीला ... सागरा प्राण तळमळला " ही विलक्षण प्रार्थनाही केली . त्यांची प्रतिभा अशी की विनवणी करताना , कौतुक करताना ते शेवटी त्याला अगस्ती ऋषींची भीती दाखवायलाही मागे पुढे पाहत नाहीत.
किती वेगवेगळे पैलू असणारा हा द्रष्टा देशप्रेमी - सच्चा तेजस्वी देशभक्त राष्ट्रप्रेमी , विज्ञानाची कास धरून कार्यकारण भाव वापरून जगण्याचा धर्म शिकवणारा श्रेष्ठ विचारवंत - हरिजनांसाठी - बालविधवांसाठी तळमळीनं काम करणारा समाजसुधारक आणि कधी प्रखर वाणी तर कधी हळुवार हळव्या भावना व्यक्त करणारा साहित्यिक - संन्यस्त खड्ग सारखं नाटक लिहिणारे नाटककारही !!!
भ्रांती, शांती आणि प्रीती अनुभवताना अनेकांनी काव्यरचना केल्या पण क्रांती करून काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारा हा महाकवी वेगळाच !!!
एवढं सगळं करूनही वाट्याला काय आलं तर ...स्वातंत्र्यपूर्व काळात कारावास - नजरबंदी - आणि स्वातंत्र्याआधी व नंतरही राजकीय संन्यास . आयुष्यभर खडतर आयुष्य जगून देशसेवा करणाऱ्या या महापुरुषाला नंतरही उपेक्षाच वाट्याला आली.
अजूनही काही दुर्भागी त्यांचं मोठेपण न जाणता त्यांच्या नावानं बोटं मोडतायत पण त्यामुळे केवळ या महाभागांचा मूर्खपणा व अज्ञानच समोर येतो "अनादि मी - अनंत मी - अवध्य मी" ही धारणा असणारा हा स्वातंत्र्यवीर मात्र शतकानुशतके मनोमनी पूजलाच जाईल
राहुल लाळे
वरुण (चिरंजीव) ने सावरकरांना दिलेली मानवंदना
Comments
Post a Comment