जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
राहुल लाळे
परवा महाबळेश्वरला संध्याकाळची वेण्णा लेकपर्यंतची पायपीट संपवून मार्केटमध्ये शॉपिंग / विंडो-शॉपिंग करत हिंडत होतो.. वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेली दुकानं, करोना च्या विळख्यातून, लॉकडाऊनच्या सावटातून बाहेर पडू पाहणारे पर्यटक-त्यांचा उत्साह पाहताना मजा येत होती. आम्हीही थोडीशी खरेदी करत मार्केट रोडवर भटकंती करत पुढे सरकत होतो. तेवढ्यात माझं लक्ष आमच्या थोडंसं पुढे चालत असलेल्या एका वृद्ध जोडप्याकडे गेलं. छान जरासे नवीन जमान्यातले पण आपल्याला शोभतील असे कपडे परिधान केलेले गप्पा मारत, हातात खरेदीच्या पिशव्या सांभाळत , हसत खेळत आणि मुख्य उत्साही निवांतपणे चालत होते ते. मी तारिणीचं(बायको) लक्ष त्यांच्याकडे वळवलं आणि आणखी १५-२० वर्षांनी आपणही असेच हिंडू या असं म्हणालो आणि पुढे गेलो.
रात्री दिना हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये पलीकडच्या टेबलवर त्याच आनंदी जोडीला डिनर करताना पाहिले - मार्केटमध्ये पाहिले होते तसेच - जे काही थोडे बोलतानाचे शब्द कानांवर पडले त्यावरून मंडळी मराठी आहेत हे कळले - थोडी जिज्ञासाही जागृत झाली. पण बोललो नाही - बायकोनंही दटावलंच - कुठली ओळख काढू नको म्हणून.
दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक करून आलो तेव्हा तेच जोडपं गार्डनमध्ये ऊन खात बसलं होतं . काकांनी गुड मॉर्निंग केलं - आम्हीही रिस्पॉन्ड केलं आणि हॉटेल परिसरातील बागेत फेरफटका मारायला गेलो. परत आलो तेंव्हा त्यांना तिथं असलेलं पाहून परत गुड मॉर्निंग करून त्यांच्याजवळच बसलो. नाव गाव सांगितलं. त्यांनीही सांगितलं - आनंद आणि सविता करंदीकर .. तारिणीला त्या काकूंना पाहून काहीतरी आठवलेचं - तिनं लगेच विचारलं की तुम्हांला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय. तेंव्हा त्यांनी त्यांची आम्हांला परिचित असलेली ओळख सांगितली - त्या सविता आवाड होत्या - ज्यांचं "ज्येष्ठांचं लिव्ह-इन " हे सदर वर्षभर लोकसत्ताच्या शनिवारच्या लोकरंग पुरवणीत वर्षभर वाचत होतो त्या सरिता आवाड. आणि त्यांच्याबरोबर होते ते आनंद करंदीकर - आयआयटी पवईचे मेटॅलर्जीस्ट आणि आयआयएम कलकत्त्याहून व्यवस्थापन क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मॅट्रिक कन्सल्टन्सीचे चेअरमन - त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत - आम्ही दोघंही त्या दोघांच्या पाया पडलो. काकांची आणखी एक ओळख सरिताताईंनी सांगितली आणि आम्ही पुन्हा त्यांच्या पाया पडलो - आनंदजी म्हणजे माझ्यासकट सर्व मराठी साहित्याचे प्रेमी असलेल्या सर्वांचे आवडते ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांचे चिरंजीव .
मग काय गप्पांमध्ये अर्धा पाऊण तास कसा निघून गेला कळलंच नाही . एवढी मोठी मंडळी असूनही दिलखुलास बोलली. सरिताताईंचे ज्येष्ठांचे लिव्ह इन वरचे लेख वाचले होतेच पण ते लिहिताना करोना काळातही वेगवेगळ्या लोकांशी केलेले संवाद, मिळालेली विलक्षण माहिती - स्त्री आणि पुरुष यांचा दोघांचाही या विषयाकडे पाहायचा आणि अशा नात्यात शिरण्याविषयी आपापल्या परीने वेगळा असलेला दृष्टिकोन वाचला होताच पण काही उदाहरणं त्यांच्याकडून ऐकताना एक वेगळाच अनुभव आला. बोलण्याच्या भरात मी पटकन बोलून गेलो की " पुरुष स्वार्थी असतात - त्यांना साथीदार हवा असतो त्यांची बडदास्त ठेवायला - हवं नको ते पहाणारी मिळवायला - पण स्त्रीला त्याच बंधनातून एकदा दुःखद तऱ्हेने का होईना पण मोकळीक मिळाल्यावर परत तेच सर्व परत करायची इच्छा , विचार करणं धाडसाचंच - जरी सोबत, सुरक्षितता वाटली तरी ". ... पण पटकन मला जाणवलं की अरे मी हे तर ७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहून आता लाईफ पार्टनर झालेल्या त्याच जोडप्यासमोर बोललो आणि जीभ चावली आणि आनंदजीची माफी मागितली पण ते दिलखुलासपणे तेही म्हणाले अरे मी का वाईट वाटून घेऊ - तुही पुरुषचं की - मग ती तर प्रातिनिधिक भावना आहे ना !!
अनेक चांगले वाईट अनुभव ऐकले - एका आजोबांनी साथीदार मिळवण्यासाठी आपल्या घराचा कौतुकाने काढलेला पण एक प्रूफ म्हणून काढलेला व्हिडीओ - एका अशाच स्त्रीने कृतज्ञेतेने पाठवलेली कविता तर सविताजींनी वाचून दाखवली. आनंदजींनी विंदांचे, वसंत बापटांचे अनुभव सांगितले.
बोलण्याच्या नादात मीही कविता करतो - लिहितो हे कळल्यावर त्यांनी माझी एक कविताही आवडीने ऐकली आणि कौतुक केलं - गप्पांच्या नादात ब्रेकफास्टला उशीर होतोय आणि आम्हाला परतीच्या प्रवासालाही निघायचं होतं म्हणून थोडयाश्या नाइलाजास्तवच उठलो आणि फोन नंबरांच आदण प्रदान करून निरोप घेतला
या आगळ्या भेटीनं मन प्रसन्न झालंच पण दोन दिवसांच्या सहलीचं चीज ही झाल्यासारखं वाटलं.
लग्न संस्था महत्त्वाचीच पण काही कारणानं एकटे राहिलेले किंवा एकटे पडलेले ज्येष्ठ ज्यांना फक्त शारीरिक आधार म्हणून नाही तर मानसिक बळ देणारी, जीवनाचा आनंद बरोबर आयुष्य जगून साथ देणारी-दुःख समजून हलकं करणारी व्यक्ती साथीदार म्हणून मिळाली, तर लिव्ह इन हा ऑप्शन नीट समजून, साथीदाराचा योग्य आदर करून राहणं हे गैर नाही हे पटलं. समाजानं - त्या व्यक्तींच्या कुटुंबानं याला सहर्ष, प्रामाणिक आणि मनापासून पाठिंबा द्यायला हवा
नुसता जोडी तुझी माझी नाही तर साथ तुझी माझी - एका वेगळयाच नात्यात - हेही स्वीकारार्ह व्हावं हे अपेक्षा
जीवनात अनेक सुख दुःख पचवून जीवनाच्या उत्तरार्धात रडतगाणं गाण्यापेक्षा उत्साहात नवीन इनिंग चालू करणाऱ्या आणि असं जगायला इतरांना प्रोत्साहित-सामर्थ्य देणाऱ्या सविताताई- आनंदजींना पाहून एवढंच म्हणावंसं वाटतं -
*जोडी तुझी माझी*
जोडी तुझी माझी
जरा जगावेगळी
सांभाळत एकमेकां
सफर करतो मुलखावेगळी
जोडी तुझी माझी
आयुष्याच्या नव्या वळणाची
नका म्हणू राजा राणीची
म्हणा जोडी सखा सखीची
जोडी तुझी माझी
पर्वा बेपर्वा जगाशी
एकमेकांची घेऊ काळजी
आणि राहू आनंदी
जोडी तुझी माझी
नसेना का जन्मोजन्मी
उरलेलं आयुष्य आता
जगू आपण मनोमनी
जोडी तुझी माझी
जोडी तुझी माझी
©राहुल लाळे
२६/१२/२०२१

Comments
Post a Comment