पुत्र व्हावा ऐसा गुंडा
*पुत्र व्हावा ऐसा गुंडा*
राहुल लाळे
पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा तिही लोकी झेंडा।
तुकारामांचे वडील बोल्होबा जे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते- दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायचे आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली विठोबाकडे काही तरी मागेल, म्हणून तिला बरोबर नेत नसत.
अनेक वर्ष मागं लागल्यावर एकदा बोल्होबा कणकाईला बरोबर न्यायला तयार होतात पण मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचं नाही, या अटीवरच. कारण, इतके वर्ष बोल्होबांनी विठुरायाकडे काहीच मागितलं नव्हतं, केली होती ती फक्त भक्ती. बोल्होबांच्या निरपेक्ष भक्तीसमोर प्रत्यक्ष पांडुरंगच म्हणे नतमस्तक व्हायचा.
देवळात जातेवेळी कणकाई मागे राहते आणि बोल्होबा दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर आत दर्शनाला जाते. आणि एकटक देवाकडे पाहून हात जोडते. बोल्होबा जवळ नाहीत हे पाहून विठुरायाही कणकाई काय हवे ते माग म्हणून विचारतात आणि आपण काहीच न मागता देव देतोय म्हणजे नवऱ्याची आज्ञा मोडत नाहीये हे जाणून पडत्या फळाची आज्ञा समजून कणकाई पोटी संतान नाही याची खंत व्यक्त करते आणि देव तथास्तु म्हणतात. आनंदात कणकाई देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतात. बायकोला यायला उशीर झालाय हे कळल्यानंतर बोल्होबांना अंदाज येतोच की काहीतरी मागणी झाली आहे आणि ती मागणी काय असेल ते समजून बोल्होबा पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, "याने तुला आशीर्वाद दिला ना, की मुलगा होईल मग त्याला सांग की, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा! "
“जर मला तू पुत्र देणारच असशील, तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे!”
आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला. ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय. फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच, तर ही अशी असावी मागणी !!
काय ते वडील काय तो पुत्र - सगळेच महान !!!
लहानपणी माझे वडील एकदा अशीच एक गोष्ट सांगताना एक वाक्य बोलले होते ते मला चांगलं आठवतंय - " तू माझा मुलगा आहेस हे जगाला माहिती आहेच, पण मला मात्र तुझा बाप म्हणून घ्यायला जास्त आवडेल !!!" . भारतीय संस्कृतीत आणि मला वाटतं जगातही इतरत्रही कुठलेही आईवडील आपल्या मुलाकडून यापेक्षा कुठली वेगळी अपेक्षा धरत असतील असं मला वाटत नाही.
असो - ही गोष्ट आठवायचं कारण म्हणजे नुकत्याच घडलेल्या -ऐकलेल्या दोन गोष्टी -
पहिली म्हणजे - गेला महिनाभर प्रिंट, सोशल आणि छोट्या पडद्यावरील सारा मीडिया गाजत असलेली आणि महाराष्ट्रच काय देश-विदेशात मीठमसाला लावून चर्चिली जात असेलेली सुपरस्टार शाहरुखचा २३ वर्षीय पुत्र आर्यन खानच्या अंमली पदार्थासंबंधातली अटकेची बातमी आणि त्यावरून अगदी शाळेतल्या मुलांपासून राजकारण्यापर्यंतच्या विविध समाजवर्गात होणारी चर्चा आणि वादंग !
आणि दुसरी तशी दुर्लक्षित पण मनाला भावणारी व दिलासा देणारी बातमी- आर माधवनच्या १६ वर्षाच्या मुलाची - कार्तिकची बातमी - कार्तिकने नुकत्याच झालेल्या नॅशनल जलतरण स्पर्धेत सात पदकं जिंकल्याची बातमी !!!
किती विरोधाभासी बातम्या आहेत दोन्ही - एकात फक्त २३ वर्षांचा देशविदेशात नावाजला जाणाऱ्या सुपरस्टारचा मुलगा जो पुढे काही दिवसात आपली सिनेसृष्टीतली कारकीर्द अगदी धुमधडाक्यात सुरु करण्याच्या उंबरठ्यावर आहे - तो त्याच्या मित्रांबरोबर एका क्रूझवर रेव्ह पार्टीत अंमली पदार्थासंदर्भात - बाळगणे, सेवन करणे - वितरित करणे अशा अनेक आरोपांच्या संशयावरून अटक. किती खळबळजनक बातमी !!! हा सुपरस्टार - ज्याने गेली २०-२५ वर्षे बॉलिवूडवर राज्य केलं - त्याचे सिनेमे हल्ली फारसे चालत नसतील कदाचित पण अजूनही त्याचा करिष्मा कमी झालेला नाहीये - अनेक जाहिरातीतून दिसतो - मीडियामधून चर्चेत असतो - तोही वरकरणी दाखवत नसला तरी जो काही मीडियात दिसला त्यातून हादरलेला दिसला - आपल्या "मन्नत" नावाच्या आलिशान बंगल्यात बसून त्याने नक्कीच आपल्या मुलाने असं वागावं अशी मन्नत नक्कीच मागितली नसणार ! आपल्या एवढं नाही पण नक्कीच आपल्या नावाचा फायदा घेऊन चित्रपटसृष्टीत पाय रोवेल अशी त्याची निश्चितच मनिषा असणार आणि ती योग्यच आहे. शाहरुखच्या अनेक फॅननाही तसंच वाटत असणार. ते सारे ही ही बातमी ऐकून हादरले असतील. संजय दत्त, अरमान कोहली, फरदीन खान, राहुल महाजन अशा अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलांची उदाहरणं आधीही आपण पाहिली आहेत. त्यांच्या पालकांनाही आपल्या मुलांच्या वागण्यामुळे -अशा प्रकरणात अडकल्यामुळे नक्कीच हादरा बसला असेल. त्यावेळी सुनील दत्तनी आपली राजकीय कारकीर्द सोडून देऊन मुलाला सुधारण्याचा आणि कायद्याच्या चौकटीत सोपवून आपल्या उतार वयातही मुलाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला होता. संजय दत्तने काही काळ शिक्षाही भोगली पण त्याचीही (कु) प्रसिद्धी झाली ती त्याला काही पुढच्या सिनेमात उपयोगी पडली आणि त्याच्यावर तर नंतर एक बायोपिकही आला आणि जोरात चालला. फरदीन खानच्या वेळीही फिरोझ खानने तपास यंत्रणेला पूर्ण मदत केली आणि मुलाचं समर्थन केलं नाही पण त्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर यायला मानसिक बळ दिले .
ही तर मोठी माणसं !!! त्यांची मुलांना सुधारायला - समाजात वावरायला परत एक संधी मिळाली . पण अशी संधी इतरांना मिळेलंच असं नाही- अनेक साध्या सामान्य कुटुंबातील मुलं असतील जे अशा प्रकरणांत अडकली असतील आणि सुधारगृहात -तुरुंगात खितपत असतील.
हरिवंशराय चौधरी- अमिताभ, पतौडी ज्युनिअर - सिनियर, राहुल- राजीव बजाज, दीनानाथ - मंगेशकर बंधू भगिनी, सुधीर-श्रीधर फडके, राज -ऋषी-रणबीर कपूर, योगराज -युवराज सिंग, राकेश-हृतिक रोशन , एस.डी - आर डी बर्मन अनेक सेलेब्रिटी आहेत ज्यांना त्यांच्याएवढंच किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच नाव, यश, प्रसिद्धी त्यांच्या मुलांना मिळाली.
असेच काहीसं सुनील-रोहन गावस्कर, अमिताभ-अभिषेक बच्चन, रॉजर -स्टुअर्ट बिन्नी, किशोर-अमित कुमार, जितेंद्र-शौनक अभिषेकी इत्यांदीबद्दल म्हणता येईल - यांच्या बाबतीत मुलं प्रसिद्ध झाली पण आपल्या पित्याच्या कामगिरीपुढे मोठया वृक्षाच्या छायेसारखीच राहिली पण म्हणावे तेवढे यशस्वी झाले नाहीत तरीही त्यांनी ट्रॅक सोडला नाही.
याऊलट पं . भीमसेनजी - वसंतराव, कपिल देव, सुनील गावस्कर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, नवाजुद्दीन-ओम पुरी-नसरुद्दीन , आणि अनेक अशी प्रतिभावान मंडळी आहेत की जे सामान्य कुटुंबातून खूप मेहनतीने , स्वकर्तृत्वाने पुढेआले आणि त्यांनी त्यांच्या घराण्याचं नाव मोठं केलं.
शाहरुखखान ही अशातलाच - काहीही विशेष बॅकग्राउंड नसताना फौजी , सर्कस, वागले की दुनिया अशा टीव्ही सिरियल्स आणि नंतर दिल आशना है , दिवाना --कभी हा कभी ना -बाजीगर असे सिनेमे करून पुढे हात लावू त्याचं सोनं करणारा सुपरस्टार झाला - तसा माधवनही दक्षिणेकडे सुपरस्टार आहे.
मग एकाचा मुलगा प्रयत्न करून डोकं मानेवर आणि पाय जमिनीवर ठेऊन राष्ट्रीय स्पर्धेत पदकं मिळवतो त्याचं कौतुक एकदम टीचभरआणि एकाचा मुलगा रेव्ह पार्ट्या करतो -अंमली पदार्थ आणि तत्सम प्रकरणात अडकतो आणि *बेल* वरून सुटल्यावर जणू त्याला *नोबेल* पारितोषिक मिळालंय असं फटाके -'डोल-ताशा वाजवून स्वागत केलं जातं !!
वा रे गुणगौरव !!!
हा सारा बदलत्या विचारसरणीचा - चंगळवादी मानसिकतेचा - असंवेदनशीलतेचा आणि संस्कृतीच्या ऱ्हासाचा परिणाम आहे का ?
आपल्याला नक्की काय हवंय?
एक व्यसनी - चंगळवादी- बापजाद्यांच्या पैशाची मस्ती बाळगून सर्व संस्कार झुगारून देणारी नवी पिढी? का एक चांगली सुशिक्षित - सुसंस्कृत पिढी, जी आपल्या घराचं, समाजाचं - देशाचं नाव चांगल्या रीतीने मोठं करेल आणि खऱ्या अर्थाने " *बाप से बेटा सवाई"* हे खरं करून दाखवेल ?
कुठल्याही रूपात मिळणारी प्रसिद्धी, सत्ता आणि पैसा, ? का आदर्श विचार, संस्कार आणि कष्ट यातून मिळणारी श्रीमंत समृद्धी ?
विचार आपणच करायचा आणि पुढील पिढीत पोचवायचा !
सुरवातीला लिहिलेल्या दोन ओळींपुढे आणखीही दोन ओळी आहेत -
“पुत्र व्हावा ऐसा गुंडा। त्याचा तिही लोकी झेंडा। कन्या ऐसी देई। जैसी मीरा मुक्ताबाई ।।“
मुलगा असा निपजावा की ज्याच्या अफाट,अचाट कर्तृत्वाचे झेंडे जगभर फडकले जावेत . मात्र मुलगी अशी व्हावी जी मुक्ताबाईसारखी ज्ञानी व मीरेसारखी भक्तीत संपूर्ण समर्पण करणारी असावी.
मुलाचे कर्तृत्व शक्ती, बुद्धी, वीरता ,धैर्य यात सामावलेले आहे. तर मुलींचे त्याग,भक्ती,समर्पणात आहे.
पण आजच्या बदलत्या काळात आदर्श बदलत जातात. समानतेच्या या युगात मुला,मुलीत भेद करण्यापेक्षा मुलं-मुलींचे रोल बदलूही शकतात - आणि ते मुक्ताबाई, जिजाबाई , झाशीच्या राणीपासून लता मंगेशकर, इंदिरा गांधी, पी टी उषा, इंद्रा नुयी , किरण बेदी, सिंधू-सानिया -मिताली इत्यादींनी सोदाहरण सिद्ध केले आहे
मुलगा किंवा मुलगी हे आता असं "व्हावे -देई" असे "मिळणार- होणार" नाहीत, ते पालक- कुटुंब- शिक्षणपद्धती-समाज यांच्या संस्कारातून, स्वयंशिस्त आणि आत्मभानाच्या जाणीवेची मशागत करून काळजीपूर्वक घडवावे लागतील .
मग मुलगा असो वा मुलगी - प्रत्येक पालक आपल्या पाल्यासाठी म्हणेल -
तुझे सूरज कहू या चंदा , तुझे दीप कहू या तारा
मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा !!
© राहुल लाळे
Comments
Post a Comment