यशवंत देव...अशी पाखरे येती

 

*अशी पाखरे येतीssss...यशवंत देव*

राहुल लाळे



अशी पाखरे येती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

दोन दिसांची रंगत-संगत

दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची नाती

अशी पाखरे येती


चंद्र कोवळा पहिला वहिला

चंद्र कोवळा पहिला वहिला

झाडामागे उभा राहिला

झाडामागे उभा राहिला

जरा लाजुनी जाय उजळुनी

जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती


अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती

फुलून येता फूल बोलले

मी मरणावर हृदय तोलले

फुलून येता फूल बोलले


मी मरणावर हृदय तोलले

नव्हते नंतर परि निरंतर

नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती


हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला

हात एक तो हळु थरथरला पाठीवर मायेने फिरला

देवघरातिल समईमधुनी

देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती


कुठे कुणाच्या घडल्या भेटी

गीत एक मोहरले ओठी

कुठे कुणाच्या घडल्या भेटी

गीत एक मोहरले ओठी

त्या जुळल्या हृदयांची गाथा

त्या जुळल्या हृदयांची गाथा

सूर अजुनही गाती

अशी पाखरे येती


अशी पाखरे येती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

दोन दिसांची रंगत-संगत

दोन दिसांची रंगत-संगत दोन दिसांची नाती

अशी पाखरे येती


मंगेश पाडगांवकर ह्यांनी लिहिलेल्या आणि पं. यशवंत देव ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या या "अशी पाखरे येती" हे बाबूजींनी गायलेलं गीत कधीही कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.


माझा एक इचलकरंजीतला स्नेही आणि उदयोन्मुख गायक सौरभ पाणदरेने या गाण्यातल्या दुसऱ्या कडव्या बद्द्ल फारच छान लिहिलंय...


तो म्हणतो, "आपल्या आयुष्यात कित्येक लोक येत असतात आणि काहीतरी आठवणी मागे ठेवून जात असतात. त्यांच्यासोबतचा थोडया दिवसांचा सहवास एक नातं देखील मागे ठेऊन जातो. ह्याचेच उदाहरण देतांना कवी म्हणतात की, संपूर्ण फुलल्यानंतर एखाद्या फुलाच्या भावना काय असाव्यात?? तर त्या अश्या,….माझं आता फुलून झालं आहे. ज्या रोपट्यावर माझं सारं आयुष्य घडलं त्याला आता कायमचं सोडून जाण्याची वेळ आली. आता माझं मरण मला समोर दिसत आहे. कुणीतरी मला तोडून तरी नेईल किंवा माझं मीच वाऱ्याच्या एखाद्या झुळकेसरशी तुटून पडेन. पण माझ्या मरणानंतरही माझं अस्तित्व क्षणोक्षणी जाणवलं पाहिजे ह्याकरता ते फूल ज्या मातीत लहानाचं मोठ्ठं झालं त्याच मातीत स्वतःला गाडून घेतं जेणेकरून त्या मातीमध्ये त्याचा सुवास अखंडपणे दरवळत राहील."  ( इति सौरभ)


किती खरंय नाही?...


कोण कुठं कधी  भेटतो, मनं जुळतात- तुटतात- काही परत जुळतात कायमची  - काही कायमची तुटतात...हृदयाच्या तारा जुळतात.. सुंदर काव्य-गीत तयार होते. कथा बनतात..जुळलेल्या मनांतून..दोन जीवांच्या भेटीतून ..नवीन  रोपं..मनं बनतात..नवीन भेटी नवीन गीतं तयार होतात...दोन दिवसांच्या भेटीत जिवाभावाची नाती जुळतात...कालांतराने एखादा पक्षी घरटं सोडून जातो... नवीन घरटं नवीन झाड नवीन आभाळ शोधतो...एखादा नवीन जगच शोधतो...


छानशा या अशा गीतात किती अर्थ सामावलाय. आणि अशी असंख्य गाणी  यशवंत देवांनी आम्हां रसिकांना दिली आहेत. 


शब्द भांडारानी "यशवंत" असलेल्या देवांनी फक्त शब्दांना स्वरात गुंफलं नाही तर स्वतःही अजरामर गीते लिहिली आहेत.  - कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे..,जीवनात ही घडी अशीच राहू दे..,तू नजरेने हो म्हटले.,श्रीरामाचे चरण धरावे...,प्रिया आज माझी नसे साथ द्याया....,स्वर आले दुरुनी आणि अशी अनेक त्यांनी शब्दबद्ध  केलेली गाणी  त्यांच्या असामान्य प्रतिभेची साक्ष देतात. "विसरशील खास मला.. , मन पिसाट माझे.. ,अशी पाखरे येती आणिक..,जनविजन झाले आम्हां..,कामापुरता मामा..,काही बोलायाचे आहे...,कुठे शोधिसी रामेश्वर..,कुणि जाल का..,केळीचे सुकले बाग" ही आणि अनेक सुमधुर शब्दप्रचुर गाणी या " संगीताच्या देवांनी"  संगीतबद्ध करून स्वररसिकांना मंत्रमुग्ध केलंय


मराठी भावगीतांची -सुगम संगीतात जी.एन. जोशी. गजाननराव वाटवे, बाबूजी, श्रीनिवास खळे ,दत्त डावजेकर, पं  हृदयनाथ, दशरथ पुजारी यांची कामगिरी उत्तुंग आहे, पण शब्दप्रधान गायकीचे खंदे  पुरस्कर्ते असलेल्या शब्दप्रभू यशवंत देवांचं  नाव घेतल्याशिवाय सुगम संगीताची माळ पूर्णच होऊ शकत नाही.


अरुण दाते , बाबूजी सुधीर फडके, पं वसंतराव देशपांडे , लता मंगेशकर ,आशा भोसले,सुमन कल्याणपूर, रामदास कामत, उषा मंगेशकर ,मधुबाला जव्हेरी यांच्याबरोबरच पुढील पिढीतील  श्रीधर फडके पद्मजा फेणाणी जोगळेकर ,रंजना जोगळेकर, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि अनेक गायकांकडून त्यांनी एकाहून एक सरस  गीते गाऊन घेतली. खरं  तर बाबूजी ही एक मोठे संगीतकार पण देव साहेबांकडे त्यांनी गायलेली अशी पाखरे येती , आज राणी पूर्वीची ती प्रीत .., कुठे शोधिशी रामेश्वर.., तुझे गीत गाण्यासाठी ..अशी कर्णमधुर गीतं  आपल्याला अजूनही भारावून टाकतात आणि या महान कलाकारांच्या प्रतिभेपुढे आपण नतमस्तक होतो.


कळायला लागल्यापासून ही सर्व गाणी  जाता येता ऐकत-गुणगुणत आलोय , रेडिओवर टीव्हीवर - टेप रेकॉर्डवर आणि नंतर सीडी आणि आता मोबाईलवरही ती ऐकतोय. तेव्हाही भारावून जायचो आणि आताही परिस्थिती फारशी वेगळी नाही. नवीन पिढीतला माझा मुलगाही जेव्हा "काही बोलायचे आहे "  गुणगुणतो तेव्हा  मला प्रश्न पडतो - का आवडतात ही गाणी आपल्याला ? त्यांच्या गोडव्यामुळे - शब्दांमुळे - सुरांमुळे - का त्यातल्या रागमालेमुळे ? खरं तर हे प्रश्न निरर्थक आहेत असं नंतर वाटतं - कारण जेंव्हा  माझ्यासारखा एखादा सामान्य कानसेन बनण्याचा प्रयत्न करणाराही ही गाणी गुणगुणतो - माना  डोलावतो  आणि त्याच वेळेला एखादा  दर्दी संगीत-अभ्यासक - जाणकार विद्वान सुद्धा  गाणी ऐकून तृप्त होतो तेव्हा  ती निश्चितच  देवसाहेबांच्या स्वर्गीय करामतीची कमाल आहे - दुसरं काही नाही. अशी अवीट गोडीची , अर्थपूर्ण शब्दांनी ओथंबलेली गाणी पिढ्यान पिढ्या रिझवत राहतील, गुणगुणली जातील यात शंकाच नाही.


आता देवसाहेबांच्या जाण्याने भावगीतातला शुक्रताराच निखळला ...


जीवनात ही घडी अशीच राहू दे  ...असं आपल्यासारख्या रसिकांना वाटणं साहजिकच आहे..


  काही बोलायचं आहे .. बरंच  ऐकायचं आहे ... पण


आता अखेरचे येतिल हेच शब्द ओठी...


अशी पाखरे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती ....


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका