लता
" *ल* य आणि *ता* ल म्हणजे *लता* "
राहुल लाळे
शांत भक्तिगीते जिची ऐकून, सकाळ जागी होते ती ... लता
आश्वासक आवाजाने जिच्या दिवस उजाडू लागतो ती ... लता
मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते ती ... लता
हळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते ती ... लता
बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती ... लता
दूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते ती ... लता
झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती ... लता
नदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती ... लता
ग्रीष्मात तळपते श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते ती ... लता
थंडगार हवेत मस्त गाण्यातून पश्मीना शालीची उब देते ती ... लता
कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती ... लता
मीरेचं भजन, ज्ञानोबाचं पसायदान गाणारी ती ... लता
आईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते ती ... लता
उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते ती ... लता
आकाशाची निळाई मीनेवर चढवून हृदयनाथवर सावली धरते ती ... लता
कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी ती ... लता
ती सदा गातच रहावी, अशी कामना खुद्द गानदेवताच करेल ती ... लता
भारतरत्नांच्या मांदियाळीतील या *ल* खलखत्या ध्रुव *ता* ऱ्याला *लताला* वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!
©राहुल लाळे
२८-०९-२०२१

Comments
Post a Comment