संजू
*संजू …. कुछ तो लोग कहेंगे*
राहुल
गेले काही दिवस सोशल / प्रिंट मीडियावर बरंच उलट सुलट चर्चिला गेलेला "संजू" शेवटी पाहिलाच.
तसं पाहिलं तर मी रणबीर कपूरचा फॅन - अगदी रॉकस्टार - अजब प्रेम कि गजब कहानी, ये जवानी है दिवानी , राजनीती, बॉंबे वेल्व्हेट, ऐ दिल है मुश्किल सगळेच सिनेमे पहिले होते - काही आपटले असतीलही पण त्याचा पडद्यावरील वावर- त्याचे बोलणारे डोळे मला कायमच भावले.
राजकुमार हिरानीचेही बहुतेक सर्वच सिनेमे म्हणजे मिशन काश्मीर ( एडिटिंग), मुन्नाभाई १-२, ३ इडियट्स ,पीके मी पाहिले होते आणि आवडले होते. त्यामुळे संजय दत्तसाठी नाही तरी या दोघांसाठी संजू पाहायचा असं मनात होतं. लहानपणापासून मुन्नाभाई वगळता संजय दत्तचा एकही चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहिला नव्हता- अगदी शाळेत असताना रॉकीचे / विधाताचे मोठे मोठे होर्डिंग घराजवळील वसंत टॉकीजवर लावलेले बघूनही....कारण या महाराजांचे प्रताप ऐकून तिडीक मनात भरलेली. पण मुन्नाभाई खरंच आवडले होते - हिरानींच्या कौशल्यामुळे - अर्शद वारसी आणि बोमन इराणीमुळे आणि कथेच्या वेगळेपणामुळे बहुधा - जास्त.
प्रोमोजमधील रणबीरच्या लूक्समुळे आणि संजय दत्तच्या माहित असलेल्या स्टोरीमुळे हिरानी संजू मध्ये काय दाखवतो याची उत्सुकता होती . पण या माणसावर - ज्याचे सर्व प्रताप जगजाहीर आहेत - अशी टॅलेंटेड माणसं सिनेमे काढतात याच आश्चर्यहि होतं .
खरं सांगू - सिनेमा म्हणून संजू खूपच आवडला.
सिनेमाचा मुख्य उल्लेख करायचा म्हणाला तर रणबीर कपूरच्या कामाचा. अगदी पहिली फ्रेम सोडली तर (कारण माहित होतं की रणबीर संजूचं काम करतोय) शेवटपर्यंत आपण संजूबाबालाच समोर बघतोय असं वाटत राहतं आणि हेच रणबीरचं यश आहे. कमाsल काम केलंय - वडलांच्या दिग्दर्शनाखाली काम करणारा उदयोन्मुख अभिनेता, आईच्या आजारपणाची - आई वडिलांच्या प्रतिष्ठेची तमा ना बाळगता अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला व्यसनी मुलगा आणि व्यसनापुढे प्रेम -प्रेमिका- तिचे आई वडीलांचाही पाणउतारा करणारा थिल्लर बेजबाबदार प्रियकर, व्यसनांतून बाहेर पडण्याची धडपड - त्यात होणारी तगमग ,आई वडील गेल्यावर झालेले दुःख, मित्राची आठवण जपणारा मित्र आणि बाहेरख्याली स्वभावापायी मित्राच्याच प्रेयसीशी संबंध ठेवणारा अय्याशी, कुटुंबाच्या सुरक्षेचे कारण सांगून शस्त्र बाळगून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा बेजबाबदार गुन्हेगारी वृत्तीचा नागरिक आणि तुरुंगात गेल्यावरची असहाय्यता आणि बाहेर आल्यावरची उमेद, वडिलांवरचं प्रेम पत्रातून व्यक्त करताना आणि वाचून न दाखवल्याची खंत आणि कुटुंबावरची माया - सिल्व्हर स्क्रीनवर टपोरी बिनधास्त असणारा हिरो प्रत्यक्षात कसा भेदरट असू शकतो - या सगळ्या वेगवेगळ्या छटा रणबीरने सहज सादर केल्यात - आणि एक अभिनेता म्हणून त्याच्या इतर समकालीन नटांपेक्षा एक खूपच उंची गाठली आहे.
रणबीर हा रणबीर न वाटता संजय दत्तच वाटण्यामागे त्याच्या लूक्ससाठी कलाभूषाकार विक्रम गायकवाड यांचे विशेष कष्ट दिसून येतात.
परेश रावलनी सुनील दत्तची भूमिका त्यांच्या सहज संयमित आणि मिश्किलपणाने सादर केलीय. बापाची असहाय्यता, मुलांवरच प्रेम , मुलाला व्यसनातून आणि त्याला सगळ्याच भानगडींतून बाहेर काढतानाची धडपड, त्याच्यावरचा भोळा विश्वास आणि अभिमान आणि त्याला बाहेर काढण्यासाठीची जिगर फार छान अभिनित केली आहे. गेटअप वरून नाही तरी कामामुळे सुनील दत्त कसे असतील याचा अंदाज त्यांच्या कामामुळे येतो.
मनीषा कोईरालाने नर्गिस दत्त यांची छोटीशी भूमिका नीटस निभावलीये.
सोनम कपूर ( संजू ची प्रेयसी- बहुतेक टिना मुनीमवर आधारलेली? ) आणि वडलांच्या भूमिकेतील बोमीन इराणीं याना फारसा वावं नाही.
सिनेमातील सरप्राईझ पॅकेज आहे संजूच्या मित्राच्या रोलमधील विकी कौशल. त्याने राज़ी मध्ये आपली चमक दाखवली होतीच, यातही त्याने आपली छाप प्रत्येक फ्रेममध्ये चांगलीच पाडलीये - विशेषतः सुनील दत्तशी संजुबद्दल बोलताना आणि शेवटी संजूचे बोलणे येरवडा जेल मधील रेडिओ ऐकताना.
अनुष्का शर्मा लेखिकेच्या भूमिकेत - संजुची आत्मकथा लिहायची का नाही असा विचार करत आणि संशोधन करत मधून मधून दिसत राहते.
संजूच्या (तिसऱ्या )बायकोच्या भूमिकेत दिया मिर्झा ठीकठाक.
सिनेमातली गाणी फारशी लक्षात रहात नाहीत आणि त्यांनी फारसा फरकही पडत नाही - शेवट क्रेडिटमधलं गाणं "बाबा बोला है अभी, बस हो गया........" संजय दत्त आणि रणबीरवर एकत्र चित्रित केलय त्यामुळे थोडं लक्षात राहतं.
एकुणात स्टोरी पॉवरफुल असल्याने आणि रणबीर- हिरानी जोडी आणि विकी कौशल- परेश रावल व कंपनीच्या एकूण कामगिरीने - सिनेमा म्हणून संजू १ नंबर !!!
पण - हा बायोपिक असल्याने आणि खऱ्या घटनांवर आधारित असल्याने अनेक प्रश्न उभे राहतात .
१. सिनेमात रिचा शर्मा ( पहिली बायको ) मुलगी त्रिशला, रिहा पिल्लै ( आणि माधुरी दीक्षित चाही ) यांचा उल्लेख कुठेही का नाही ?
२. मुळात हा सिनेमा पाहायचाच का ?
- नशेबाज, ऐय्याशी, गुन्हेगारी वृत्ती, अंडरवर्ल्ड जगाशी नातं - राष्ट्रद्रोहाच आरोप आणि मुंबई बॉम्बहल्ल्यात असलेला संशयास्पद सहभाग, पोलीस-मोठे मोठे कायदेतज्ज्ञ यांची मते,प्रिंट आणि इतर मीडियावर फुटेज, खुद्द दत्त पितापुत्रांची स्टेटमेंट्स काय खरं ? आणि हा सिनेमा पाहून आपण काय आदर्श दाखवणार आहोत ? अशा वृत्तींना खतपाणी घालतोय का ? आंबेडकर -गांधी -सावरकर-आगरकर - बुद्ध अशा प्रभूती सोडून संजू - दाऊद - हाजी मस्तान - हसीना पारकर हे आपले आदर्श होतायत का?
मग असं असेल तर ८-९ दिवसात २५०-३०० कोटी रुपयांचा धंदा मिळवून देणारे प्रेक्षकही गुन्हेगारी वृत्तीचे आहेत? का त्याला खतपाणी घालणारे आहेत ? असं तर नसणार - मग काय फक्त करमणूक - एक सिनेमा म्हणून त्यांनी पाहिला?
नाही तरी तुम्ही मुन्नाभाई सीरीजमधले सिनेमे पाहिले असतीलच की...मग हा सिनेमा पहायला काय हरकत आहे?
३. संजू म्हणतो पालक - विशेषकरून वडलांच्या मोठ्या प्रतिमेपुढे तो दबला गेला आणि त्यांचं ओझं न पेलून तो या मार्गाला लागला - पण हे मग बाकी अयशस्वी स्टारपुत्रांनी का नाही केले? उदा. कुणाल गोस्वामी, सुनील आनंद, आणि सख्खा मेव्हणा कुमार गौरव
४. चित्रपटातला संजू सरळसरळ आपल्या गैरकृत्त्यांची, ऐय्याशीची, चुकांची कबुली देतो. " मेरे चॉइसेस गलत थे " असं म्हणतो - असा दूसरा कोण माई का लाल लाखो -करोडो जनतेसमोर हे कबूल करू शकतो ? त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतो आणि मीडियाला सामोरा जातो - आणि मुलांना म्हणतो की तुमच्या बाबांप्रमाणे नाही तर माझ्या बाबांप्रमाणे व्हा फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी?
तरीदेखील गैरकृत्त्यांचा कबुलीजबाब दिला म्हणजे सगळे संपले का ? लगेच ते ऐकून जनमानसाने अशा माणसाला क्लीन चिट द्यायची का ?
५. चित्रपटात सुनील दत्त यांची प्रतिमा संताचीच दाखवलीय आणि प्रत्यक्षातही ते मोठे होतेच आणि नर्गिसजीही-आणि सिनेमातही ते तसे जॉलीच दाखवलेत - उगाच फाजील शिस्तीचे वगैरे नाही. का त्यांना त्याच्याकडे द्यायला वेळ नव्हता? त्याला का पाठीशी घातले गेले ? - आणि तसंही सुनिलजी कायम या बाळाला मजरूह - साहिर - आनंद बक्षींची गाणी उदाहरणादाखल गाऊन चांगलं राहायची दीक्षाच देत होते - मग हा गडी असा का भरकटला ?
या सिनेमामुळे जरी संजय दत्तबद्दल ना ही सहानुभूती किंवा चीड वाटली आणि या ना त्या कारणाने त्याची जरी प्रसिद्धी झाली असली तरी सिनेमात संजूचे-त्याच्या वागण्याचे समर्थन किंवा ग्लोरिफिकेशन निश्चितच केलेले नाही जे केले तेच दाखवलंय आणि कबूलही केलंय. फक्त जे केलंय ते तो म्हणतो मी निरागसपणे केलंय - अमली पदार्थांचं व्यसन मित्रानी लावलं - त्या नशेतच अय्याशी आणि बेधुंद वागलो ( अगं अगं म्हशी? ...) . शस्त्रे स्वतःच्या- कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बाळगली आणि मीडियाने टेररिस्ट ठरवलं. हा काय कुक्कुलं बाळ होता काय ? चुकांमागून चुका करताना त्याला आपल्या प्रतिष्ठित खासदार- लोकप्रिय अभिनेते आणि शिवाय सामाजिक कार्यकर्ते असलेल्या पालकांची अवस्था काय होत असेल याची पर्वा नव्हती ?
सिनेमा पाहून दहशतवादास समर्थन करणे असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचं आहे
संतांचे सिनेमे पाहून कोणी संत होत नाहीत आणि गुन्हेगाराचे सिनेमे पाहून गुन्हेगार ही होत नाहीत.
आणि हा महाभाग सुटण्यात आपली न्यायव्यवस्था, राजकारणी ही तेवढेच जबाबदार आहेत.
पुरावे आत्ता दाखवून काय उपयोग... जेव्हा दाखवायला पाहिजे होते तेव्हा फ्रूव नाही करु शकलो
आता ही सबळ पुरावे असतील तर परत कायद्याच्या चौकटीत अडकवले पाहिजे
सिनेमात स्वतः रणबीरबरोबर स्क्रीनवर शेवटच्या क्रेडिटमध्ये येऊन संजूबाबाचा सगळं खापर मीडिया- वर्तमानपत्रांवर फोडण्याचा प्रयत्न बालिश आणि केविलवाणा वाटतो - मग काय आता पेपर- टीव्ही पाहायचा नाही का? का सोईस्कर ते घ्यायचे ?
सिनेमात अनुष्का संजूच्या बायोग्राफीचं टायटल ठेवते *"कुछ तो लोग कहेंगे...."*
*"कुछ तो लोग कहेंगे...."* - आपल्या सर्वांचं आवडतं अमरप्रेममधलं आनंद बक्षींचं काका- शर्मिला चं गाणंं !
बायोग्राफीचं हे टायटल मात्र खरंच पटलं - सिनेमा २५० कोटी -५०० कोटी कितीही धंदा करो …
फिर भी....
संजूबाबा *"कुछ तो लोग जरूर कहेंगे...."* ,
©राहुल लाळे


Comments
Post a Comment