देऊळ ... कुणाचं ... कुणासाठी?


देऊळ ... कुणाचं ... कुणासाठी?

राहुल लाळे



 

"शोधू कुठं ?... देवा तुला शोधू कुठं ?"  हा प्रश्न सर्वच देवभक्तांना असतोच, पण तसाच तो अनेक अभ्यासक, चिकित्सक , आस्तिक-नास्तिकांनाही असतो. याच प्रश्नाचं  उत्तर शोधण्यासाठी " देऊळ" हा चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि देविशा फिल्म्सचे  निर्माता अभिजित घोलप यांनी काढला असावा.- सिनेमा ते उत्तर देतो का नाही - हे सिनेमा पाहूनच प्रत्येकानं ठरवावं.  कथा -पटकथा लेखक आणि या चित्रपटाचा नायक गिरीश कुलकर्णी आणि इतर कलाकार व सर्वच टीम हे उत्तर शोधायला आपल्याला मदत करतात .


 


नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह[ आणि गिरीश व इतर कलाकारांची नावं ऐकूनच सिनेमा पाहायचं नक्की केलं होतं. आणि तो पाहून झाल्यावर काही उत्तरं  मिळाली आणि बरेचसे प्रश्न ही मागे लागले...


सिनेमा सुरु होतो तो -  एका मंगरूळ गावातलया केशव- केश्या (गिरीश कुलकर्णी)  त्याच्या हरवलेल्या गाईला  (करडीला  ) हाका देत शोधत असतानाच्या दृश्याने. उन्हातान्हात करडीला शोधताना औदुंबराच्या  झाडाखाली दमून ग्लानीत पडलेल्या केश्याला दत्ताचं दर्शन झाल्याचा भास होतो. योगायोगाने तिथून जाणारा एक सुतार मोबाईलवरून बोलताना  त्या झाडावर काही खुणा करतो . भानावर आल्यानंतर या खुणा पाहून  केश्याला त्या झाडात दत्त दिसतात याची मनाशीच खात्री पटते आणि गावात दत्त अवतीर्ण झाले असा एकंच बोभाटा होतो.  गावातला एकेकजण आपल्या परीने झाडात सापडलेले  खरंच दत्तच आहेत का नाही याची चर्चा करू लागतो.


गावातल्या टवाळकी करणाऱ्या तरुणांना  एक नवीनच उद्योग मिळतो . भाऊ गलांडे(नाना ) हे गावातले मोठे पुढारी . गावात  विकासकाम करण्याच्या उद्देशाने राहणाऱ्या अण्णा कुलकर्णींसोबत भाऊ  ग्रामीण हॉस्पिटलची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत असतात. पण टवाळांमधला आणि युवा नेता होऊ पाहणारा भाऊंचा पुतण्या अप्पा ( श्रीकांत यादव ) व त्याचे मित्र - पोयट्या ( कविता करणारा ) , टॉम्या , वगैरे (हृषीकेश जोशी,ओम भुतकर , शशांक शेंडे,  शिरसाट , इ .)  मात्र आता दत्त आणि त्याचे मंदिर उभारून  काहीतरी करून दाखवून द्यायचं या इरेला पेटतात. त्यांना फूस लावणारा  असतो पत्रकार ( किशोर कदम)  आणि त्याच्या पेपरच नाव " महासंग्राम " म्हणून त्याचंही नाव तेचं !!  केश्याला मंगरूळ गावात दत्त सापडले हे पेपरमध्ये येतं आणि मंगरूळ गाव एक्दम चर्चेत येतं .  आमदारसाहेबांच्या राजकारणामुळे आणि गावातलं आपलं स्थान-मान टिकवण्यासाठी भाऊ हॉस्पिटलचा मार्ग सोडून देऊळ बांधायच्या कामात या सर्व पोरांचे लीडर बनतात .


आता  गावकऱ्यांबरोबरच राजकीय पाठिंबाही  मिळाल्यामुळे देवळाचं सूप जोरात वाजतं.  मग काय ? देवळाच्या बांधकामासाठी , आसपासच्या विविध  दुकानांसाठी , रस्त्यांसाठी निविदा - आणि  प्रत्यक्ष झालेल्या कामातून बघता बघता छोट्याश्या मंगरुळाचं  रूपांतर गजबजल्या  तीर्थक्षेत्रात होतं . ज्या वीज , पाणी , रस्ते येण्याची वाट वर्षांनुवर्षे पाहणाऱ्या गावात हे सर्व देऊळ उभारण्याच्या प्रक्रियेत लगेच येतं.  गावातल्या  सर्वांचा  आपापला व्यवसाय जोरात चालू होतो - मग  तो फुला-नारळाचा देवपूजेची साधनांचा असेल , दत्ताच्या अगदी “शीलाकी जवानीच्या” चालीतलया भजनांच्या कॅसेट्सचा असेल, हॉटेल असेल, कपडे -खेळण्याची दुकानं  असेल  सर्व बरकत होऊन जाते - भाऊ आता कॅबिनेटदर्जाचे अधिकारी होतात - अप्पा आणि बाकीचे गाड्या फिरवतात .  यात किश्याची आईही मागं  रहात  नाही - आणि इतकं की देवाच्या नावाने हे सर्व करताना देवाचं दर्शन  बाकीचेच काय अगदी किश्याची आईही १५-२० दिवसांत घेत नाही.


सुरवातीला आपला दत्त आता एवढा मोठा झाला हे पाहून हुरळलेला किश्या आपलं आईचंही वागणं बघून हलतो.  त्याची ज्यांच्यावर श्रद्धा असतात ते अण्णाही देवाचा हा असा होणारा व्यवसाय आणि त्यामुळे होणारे गैरव्यवहार पाहून निराश होऊन मुलाकडे बंगलोरला निघून जातात आणि तेही भाऊंना " देवाचं नाव संकटात बळ  यावं , उत्साह यावा म्हणून घ्यावा पण ही अशी  गैरकामं करून नाही " असं बजावुनच. किश्याची लाडकी  करडी आता " श्रीदत्तांची गाय " होऊन पूजेची वस्तू झाल्यामुळे  त्याच्यापासून दूर जाते आणि भाबड्या भक्तांच्या अतिउत्साही भक्तीला बळी पडते . आणि त्या आपल्या लाडक्या करडीला  वाचवायला गेलेल्या किश्याला तिला भेटूनही दिलं जात नाही आणि ज्याच्यामुळे हे दत्त गावात आले त्याला त्या दत्तासमोरच विश्वस्तांकडून मार खावा लागतो. या सर्व गोष्टींनी विदीर्ण अवस्थेत भटकणाऱ्या किश्याला एक अनोळखी माणूस -   दरोडेखोर भेटतो आणि त्याच्याकडून देवस्थानाला आणि सर्वानाच धक्का बसेल अशी एक गोष्ट घडते . यातून किश्याला - त्याच्या दत्ताला शांतता मिळते का ? देवस्थानाचं पुढं त्याचे विश्वस्त राजकारणी काय करतात हे प्रत्यक्ष पाहणंच  योग्य.


चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत हा वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला गुंगवून ठेवतो. सुरवातीची  टायटल्स सॅण्ड ड्रॉईंग मधून सामोरी येत असताना मंगरुळात सुरु असलेल्या पुरातत्व विभागाच्या कामातले  कर्मचारी दगडांवरची धूळ साफ करत  कथेची सुरवात करून देतात. चित्रपटातील प्रत्येक  कॅरॅक्टर एका वेगळ्या आणि लक्षात राहणाऱ्या ढंगात सादर केलं आहे . भाऊसाहेब गलांडेंच्या  भूमिकेत नाना झक्कास - त्याचं सगळं कसं   " शून्य मिनिटात करतो" हे वाक्य प्रत्येक वेळा हशा पिकवणारा. बायकोबरोबर ( सोनाली कुलकर्णी Sr )चे काही सीन्स गमतीदार - आमदार भाऊंना जेव्हा म्हणतात तुम्ही राजकारणात मोठ्या उड्या  मारणार तेव्हा नाना खरोखरंच  बायकोच्या पायांवरून उड्या मारताना पाहून मुरकुंडी वळते. त्याचे अण्णांबरोबरचे ( दिलीप प्रभावळकर) संवाद गावातील बदलती परिस्थिती फार कमी शब्दात सांगतात. वर्षानुवर्षे चढलेला चढलेला आळस दूर करण्यासाठी, शहरातला  विकास खेड्यात आणण्यासाठी धार्मिक मार्गाने का होईना होणारा विकास महत्वाचा आहे आणि जरी काही गैरमार्गाचा वापर झाला असला तरी कायद्याला आमच्यापर्यंत पोचायला भक्तिमार्ग आड येईल असं बेरकीपणाने म्हणणारा , आमदारापुढे लाचारी आणि गावापुढे पुढारीगिरी करणारा  भाऊ नानाने नेहमीप्रमाणे सहज साकारलाय. उभरत्या युवा नेत्याच्या अप्पाच्या भूमिकेत श्रीकांत यादव मस्त - त्याचा " ऍज अ गावकरी, ऍज अ उपाध्यक्ष , ऍज अ .. करत डायलॉग डिलिव्हरी करणं मस्त . गावातले बाकीचे टवाळ हृषीकेश जोशी, ओम भुतकर, सुहास शिरसाट, शशांक शेंडे इत्यादींनी सहजतेने सामोरे आणलेत. गावातली बाकीची कॅरेक्टर्स ही नेमकी उभी केली आहेत -  बळजबरीने बाहुल्यावर बसवलेली सरपंच आणि तिचीखाष्ट सासू ( आतिशा  नाईक व उषा नाडकर्णी),  केश्याची आई ( ज्योती सुभाष), केश्याची मैत्रीण पिंकी (ज्योती मालशे), गावातल्या इतर स्त्रियांची काम करणाऱ्या विभावरी देशपांडे व प्रभूती लक्षात राहतात . केश्याला ताप आल्यावर या बायका त्याला पाहायला येतानाचा सीन मस्त जमलाय .  दिलीप प्रभावळकरांनी सुरवातीला गावात हॉस्पिटल बनवण्यासाठी दाखवलेला आदर्शवाद आणि देवळाच्या धंद्यामुळे आलेली विफलता नेहमीच्या सहजतेने दाखवलीय. डॉ मोहन आगाशे आपल्या मोठ्या नेत्याच्या छोट्या भूमिकेत छाप सोडून जातात. शेवटी नासिरुद्दीन ही एक छोटीशी झलक दाखवून जातो . पण सर्वात कमाल केली आहे ती केश्याच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णीने . गाईला शोधताना दत्त दर्शनाने भारावलेला, अण्णांना गुरु मानणारा  आणि आपल्या दत्ताला मोठा झालेला पहाणारा  भाबडा केश्या ते दत्ताची , करडीची झालेली दयनीय अवस्था - बाजारूपण पाहून अस्वस्थ झालेला आणि पेटून उठलेला आणि शेवटी एक आत्मिक आनंद  मिळालेला केश्या गिरीशने मनापासून साकारलाय .


गावात मोबाईल, केबल टीव्ही , या माध्यमातून येऊन पाहणारा बेगमी विकास - आणि पैशानं आलेल्या बरकतीत पूर्वीचा  बेरकी भाबडेपणा  विसरून बेरकी व्यावसायिकता सहज अंगिकारलेल्या आजकालच्या बहुतेक ग्रामीण भागाचे दर्शन हा सिनेमा घडवतो. या माध्यमांचा वापर अगदी लहान मुलं - तरणी पोरं  -प्रौढ आणि अगदी म्हातारी मंडळी सुद्धा त्यांच्यापरीने कसाकसा करतात हे पाहणं मजेशीर आहे आणि डोळे उघडवणारंही.


गावाचं बदललेलं दर्शन सुरवातीच्या " देवा तुला शोधू  कुठं" या गाण्यापासून " दत्त दत्त दत्ताची गाय " या स्वानंद किरकिरे आणि सुधीर मोघेंच्या  रचनांना मंगेश धाकडेनी संगीत दिलेल्या गाण्यामधून सुरेख घडतं.


देव मग नक्की कोणाचा ? भाबड्या केश्याचा, का लबाड राजकारण्यांचा ?  विकास -धर्म - राजकारण यांचा काय संबंध ? देव ही  मनाला उभारी आणि शांती देणारी आपल्या अंतरातली शक्ती असेल तर त्याचे बाजारीकरण , व्यापारीकरण करणे किती योग्य ? " ज्या गावात पत्र चिठ्ठी येत नाही त्या गावात दत्त आणि एक देऊळ किती सुबत्ता आणतात आणि खऱ्या भक्ताची कशी वाट लावतात " हे फार खुबीने आणि मार्मिकतेने , खुसखुशीतपणे  चिमटे काढत सर्वच चमूने सादर केलंय . सर्व कलाकार चित्रपटातल्या आपापल्या भूमिकांत- पात्रात चपखल बसली आहेत- त्यामुळे कलाकार कोण आहे त्यापेक्षा तो काय सादर करतोय याच्याकडे पूर्ण वेळ लक्ष राहतं


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली छोटीशी रेघ किती मोठा विश्वासक -विधायक का विघातक  बदल घडवू शकते - हे पाहायला आणि तो निर्णय प्रेक्षकांवर सोडून विचार करायला लावणारा हा चित्रपट एकदा तरी पहाच !!!!


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका