न्यूड
*न्यूड*- अंतर्मुख करायला लावणारा अनुभव
काल रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला न्यूड पाहिला. दोन तीन महिन्यांपूर्वी एका फिल्म महोत्सवात नावामुळे ऐनवेळेला प्रवेश न मिळालेला आणि निगेटिव्ह पब्लिसिटी मिळालेला आणि कालपरवा सर्वच वर्तमानपत्रात परीक्षकांनी उचलून घेतलेला चित्रपट म्हणून पाहायची उत्सुकता होतीच.
पहाताना बऱ्याच प्रसंगांनी अस्वथ तर झालोच आणि शेवटी सुन्नही झालो.
नग्नता, न्यूड हे शब्द आपल्या समाजात- घरात वर्ज्यच आहेत. ऐकले तरी एकदम हीन विनोदात किंवा साहित्यात- किंवा या शब्दाचा उल्लेख बातम्यात - कुठल्यातरी निषेध मोर्चात मग त्या एम एफ हुसेन यांच्या काही कलाकृतीसंदर्भात असतील किंवा मिलिंद सोमण- मधू सप्रे यांनी केलेल्या जाहिरातींबद्दल असतील - बेकर आणि त्याच्या कृष्णवर्णीय मैत्रिणीबद्दल असतील - प्रोतिमा बेदीबद्दल किंवा स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध असतील. प्रत्येक वेळेस हा शब्द आला की एक मोठे वादळ उठतेच - कारण काहीही असो - याचे मूळही न्यूड या शब्दातच आहे - एकतर काही विधिनिषेध न बाळगता सामोरे येणारे ते सत्य - शिव किंवा सुंदर असतं .
या सिनेमाचं थोडंसं तसंच. स्त्री देहाकडे फक्त एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणाऱ्या समाजाचे - - घरासाठी - कुटूंबासाठी तिने केलेल्या कष्टांचे त्यागाचे सच्चे चित्र आणि तिचे सर्व त्याग- अपमान - कष्ट -तिच्या आशा- आकांक्षा पायदळी तुडवणारे समाजातले आणि तिचेच आपले लोक यांचे मन विदीर्ण करणारे उद्विग्न रूप दिग्दर्शक आणि सर्वच कलावंतांनी जिवंत उभं केलंय.
यमुना आपल्या बदफैली नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आणि आपला मुलगा लहान्याचे शिक्षण चालू राहावे म्हणून गाव सोडून आपली मावशी चंद्राक्काकडे मुंबईला येते. मुंबईत काम मिळवण्यासाठी वणवण हिंडते- काम मिळत नसल्यामुळे होणारी तगमग, आणि त्यातून नवरा बेरोजगार असूनही नेटानं घर चालवणाऱ्या चंद्राक्काकडे ती काय काम करते यासाठी लावलेला तगादा - आणि तिचा पाठलाग करून ती नक्की काय करते हे कळाल्यावर बसलेला धक्का आणि तेच काम जेव्हा चंद्राक्का तिला करायला सांगते तेव्हा चारित्र्य- संस्कार- लाज- आणि भीती यांमुळे जीवाची झालेली तगमग - - " शिक्षण चालू राहिले पाहिजे - स्वतःच्या मुलाचंही आणि आर्ट स्कुलमधल्या मुलांचही" हे म्हणताना दाखवलेली जिगर - मुलालाही चित्रकलेत गती आहे हे कळाल्यावर त्याला प्रोत्साहनही द्यायचे आणि त्याला आपण काय करतोय हे कळू नये म्हणून आपल्यापासून दूर ठेवायचा निर्णय घेताना एका आईची होणारी तळमळ - अशी चित्रे का काढतात हा प्रश्न पडणारी निरागसता आणि हे सर्व कष्ट - दिव्य पार करूनही हातात काय पडतं हे कळल्यावर निर्माण होणारी पोकळी - हा सर्व प्रवास यमुनेच्या भूमिकेत कल्याणी मुळे यांनी जिवंत उभा केलाय. केवळ अप्रतिम.
चंद्राक्काच्या भूमिकेत छाया कदम यांनी कमालच केलीय. भंकस, भंपक आणि दांभिक समाजाला पूर्ण जोखून स्वतःचं घर चालवण्यासाठी आर्टस्कुलमध्ये न्यूड मॉडेल म्हणून काम करणं आणि तिथे सफाईकामगार आहे म्हणून घरी- बाहेर वावरणं - कधी बेदरकार तर कधी "घर चालवताना आपण जीव लावतो ना...घरासाठी पैसा कमवायला शरीर लावायचं" असं अंगावर काटा येणारं बोलणं - भाचीला काम सुरु व्हायच्या आधी कामाबद्दल - सुरक्षेबद्दल आश्वस्त करणं आणि काळजीपोटी दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यातलं काजळ लावणं - तिला मिळणारं काम आणि यश ( पैसे ) यांनी असूया न वाटता काळजीपूर्वक कौतुक वाटणं - आणि एवढं धाडसाचं काम करुनही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली असणं......अशक्य काम केलंय छाया कदमांनी.
नसरुद्दिन शहांची छोटी भूमिका एम एफ हुसेनची आठवण करून देते आणि मूळ कथेच्या बाजाला पुढेच नेते
ओम भूतकरनी एक आर्टस् स्टुडंट - त्याचे एका मॉडेलबरोबरचे तटस्थ नाते - आणि मधेच कधी एक कलाकार - आणि एक सामान्य माणूस यांच्यात अडकणारे भाव छान दाखवलंय.
मदन देवधर चे बालकलाकार या भूमिकेतून थोडी पुढची वाट दाखवणारे काम - बेदरकारपणा - टीपीकल पुरुषी अहंकार आणि बेमुवर्त उद्धटपणा सहजपणे प्रेझेंट केलंय .
नेहा जोशी आणि श्रीकांत यादव यांच्या छोट्याच भूमिका - चपखल बसल्यात - पण त्यांच्याऐवजी दुसरे कोणीही चालले असते.
कुठलाही कलाकार अभिनय करतोय असं न वाटणं हेच या चित्रपटाचं - कलाकारांचं - दिग्दर्शकाचं यश आहे.
चित्रपटातलं "दिस येती " आणि दुसरं एक गाणं कथेच्या प्रवाहात चपखल बसली आहेत आणि छान चित्रितही केली आहेत .
एक गोष्ट खटकली की चंद्राक्कांनी ती काय करते याचं १५-२० वर्ष जपून ठेवलेलं गुपित यमुनेला त्यामानाने लगेचच कळलं, पण एकूण सिनेमाच्या कथेच्या प्रवाहात ते फारसं जाणवत नाही.
हा सिनेमा प्रश्न मात्र बरेच उभे करतो -
ज्येष्ठ चित्रकाराच्या भूमिकेतला नासिर म्हणतो मी माणसात देव पाहतो आणि देवात माणूस. त्याला जेव्हा यमुना विचारते की ही अशी चित्र का काढतात - तेव्हा तो म्हणतो "मी घोड्याचं किंवा कबुतराचं पेंटिंग काढलं तर कोणी काही म्हणत नाही, मग माणसाचं काढलं तर एवढा हल्ला-गुल्ला का? मै किसी जिस्म का नहीं रुहको निखारता हूँ " - मग अशा समोरच्या - मॉडेल म्हणून बसलेल्या स्त्री- माणसाच्या वेदना- अंतरंगात चाललेल्या वादळांचा शोध लागत नाही ? का फक्त ती एक ऑब्जेक्ट आहे? मग फक्त न्यूडस् च का ? आणि तीच गोष्ट आर्ट स्कुलमधल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू होते.. त्यांना अभ्यास करायला न्यूड मॉडेल मिळत नाहीत हा एक प्रॉब्लेम आहेच पण त्याचवेळेला ज्या व्यक्तीला समोर ठेवून आपण एक कलाकृती बनवत आहोत - पुढे ती कलाकृती एक मास्टरपीस होऊन त्याला मोठा कलाकारही बनवू शकते - मग ज्याचं चित्रं काढलंय त्याचं काय ? त्याची किंमत काय - २००- ३०० रु. ? का यमुना म्हणते त्याप्रमाणे त्यांनाही " प्रसिद्धी आणि पैसे दोन्ही मिळालं पाहिजे"?
जी स्त्री आपल्याला आलेले अनुभव सोसूनही अशा समाजाला विपरीत वाटणाऱ्या वाटेवर जायला दुसऱ्या स्त्रीला धीर देते - शिक्षणाचं काम आहे म्हणते - तिला आणखी वेगळी वाट मिळायला हवी होती का ? हा ही एक प्रश्नच !!
आपण सगळेच आपण काढलेलं किंवा आपलं काढलेलं चित्रं - सेल्फी का असेना जपून ठेवतो -मिरवतो - मात्र अशा मॉडेल्सचं काय - ती स्वतःची चित्रं/ पेंटिंग्स जपून ठेवतील?
अशी पेंटिंग्स असावीत का नसावीत हा वादाचा मुद्दा होऊ शकतो - आणि सो कॉल्ड समाज-संस्कृती रक्षक तो वेळोवेळी काढतीलही. पण सिनेमा पाहताना ती नग्नता कुठेच अश्लील, बीभत्स, ओंगळवाणी वाटत नाही, उलट एका भंपक समाजाची बुरसट विचारसरणीच तो निर्वस्त्र करतो आणि बाहेर पडताना मन सुन्न करून टाकतो
जरूर पहा -
©राहुल लाळे
२-५-२०१८

Comments
Post a Comment