पगलैट

 #CinemaGully

#spoileralert 

#पगलैट




*पगलैट*


सिनेमाचं नावआणि काही इंटरेस्टिंग  प्रतिक्रिया वाचून  "पगलैट " एकदाचा पाहिलाच . "पगलैट" या शब्दाचा - टायटलचा  पागल - वेडसर - भंपक - क्रेझी असा काहीसा  अर्थ आणि  सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये हेही एक कारण होतंच. 


सिनेमा सुरु होतानाच घरात कोणाचा तरी मृत्यू झालाय हे सर्वांच्या चेहऱ्यावरून कळतं . आणि अशा सुरवातीतून आणि गेलेला माणूस हा नायिकेचा म्हणजे संध्या गिरी(सान्या) चा नवराच - आस्तिक गिरी आहे हे कळल्यावर आता पूर्ण सिनेमा मेलोड्रामा आहे का असं वाटणं  साहजिकच होतं . 


जरी आपल्या सिनेमात मृत्यू - नंतरचे अंत्यविधी आणि इतर सोपस्कार अनेक वेळा दिसत असले तरी इथे दिग्दर्शकाने अशा वेळी घरातल्या लहान थोर माणसांच्या मनस्थितीचे अगदी पहिल्या दिवसापासून तेराव्या दिवसांपर्यंत कसे बदल होत जातात , हे फार जवळून आणि फार मेलोड्रॅमॅटिक न करता सॅटायर विनोदी ढंगाने  दाखवले आहे - ५ महिन्यांपूर्वीच लग्न झालेलया मुलाच्या मृत्यूच्या आघाताने खचलेले आई-वडील आणि घरातील वयस्कर  , नवविवाहित पण आता विधवा झालेल्या सुनेशी वागताना आलेला अवघडलेपणा - विशेष म्हणजे सुनेला कुणी  पांढऱ्या पायाची -अवदसा  अशी दूषणं दिलेली नाहीत. अगदी " वो मांगलिक नहीं  है , हमने कुंडली मॅच करवायी  थी " हे डायलॉगही आहेत. हे गिरी कुटुंब अगदीच  कर्मठ नाही पण  अगदी " उसके सामने पुरी जिंदगी पडी  है " असं म्हणत विधवा सुनेचं  लग्न लावून देण्याच्या  पुढारलेल्या विचारांचं प्रदर्शन झालं तरी तेवढं सुधारक ही हे कुटुंब नाही - जुन्या चालीरीती / सुतकातली  बंधनं  पाळणं याबद्दलचा  भंपकपणा तोही जास्त करून घरातल्या सर्वात मोठ्या व्यक्तीचा ( रघुवीर यादव) आणि त्याला लहान्यांनी दिलेला फाटा पहाताना  नक्कीच  मजा वाटते. बाहेरून आलेले नातेवाईक आणि त्यांच्या पूर्वसंबंधातील तेढआणि  मनात असलेली जवळीकही (?) छान टिपली गेलीये . जवळच्या तरुण नातेवाईकाचा अकस्मात अकाली झालेल्या मृत्यूचं दुःख , त्याचा दुखवटा हे तर आहेच पण त्याबरोबर पुरुष-स्त्रियांतील  कुजबुज -गॉसिपिंग हे ही चालू असतंच  त्यात आस्तिकने एक मोठं लोन घेतलंय - ते आता कोण व कसं  फेडणार ? हा एक प्रश्न जास्तकरून त्याचे वडील ( आशुतोष राणा ) आणि आई (शिबा  चड्ढा ) यांना त्यांच्या दुःखात भर घालतो, सलतो  आणि इतरही त्यात फोडणी टाकत असतात -  या आर्थिक आणि इतर विषयांवरील चर्चा अशा वातावरणातही कशा होतात हे पाहताना सिनेमा त्या फक्त एका मृत्यूचं सावट  प्रेक्षकांवर टाकत नाही.


आपला नवरा गेला असताना एखादी नवविवाहिता कोसळून उन्मळून पडेल असं चित्र दिसण्याऐवजी - संध्या ( सान्या  ) रडताना दिसायच्या ऐवजी कायम मोबाइल मध्ये सोशल मीडियावर - फेसबुकवर आपल्या गेलेल्या नवऱ्यावरच्या पोस्ट्स आणि कमेंट्स पाहताना दिसते . अगदी तिचे आई वडील आल्यावर जावई गेल्यामुळे हादरलेली आई गळ्यात पडून रडते तेव्हा  "बस बस मम्मी , कितना रोओगी ?" म्हणून म्हणते तेव्हा तिच्या आई वडील आणि सासू बरोबर आपणही दचकतो आणि चहाऐवजी पेप्सी आणा म्हणून सांगते तेव्हा तर हिला खरोखरच वेड लागलंय  का? असं वाटून जातं !!  


सिनेमात काही प्रसंग खरोखरंच हसावं का रडावं अशी परिस्थिती निर्माण करणारे आहेत ¸ती  दृश्येही त्यावेळच्या परिस्थितीचं गांभीर्य राखूनही त्या त्या व्यक्तीची मानसिकता दाखवत खुसखुशीतपणे प्रदर्शित केली आहेत अस्थिविसर्जनाला जाताना जेव्हां  गुरुजी म्हणतात की नाव नदीच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करू - तेव्हा आस्तिकचा भाऊ म्हणतो,"हम  यहाँ सैर करने न आये हैं !" . दहाव्या दिवशी पिंडदान होत असताना - त्याच वेळेला सान्याला पाणीपुरी खायायची हुक्की येणं - आणि पोटात दुखतंय असं सांगून डॉक्टरकडे जायला म्हणून घराबाहेर पडणं - आणि एकेक पिंड वाहिलं जात असताना सान्याचं एकेक पाणीपुरी तोंडात टाकणं  हा सीन छानच जमून आलाय ... असंच  गच्चीवर मोठ्याचं हळूच होणारं मद्यपान, मुलांचं धूम्रपान आणि छोट्यांचं  एकमेकांना अनुभवणं मजेशीर.  


आपल्याकडे एका स्त्रीने पावलोपावली कसं  वागावं - अगदी नवरा गेल्यानंतरही  हे तिच्याशिवाय बाहेरचेच ठरवतात , तिचे सगळे निर्णय ही बाकीचेच घेतात . " लडकी  लोगोंके लिये सारी दुनिया सोचती है, लेकिन लडकी  खुद क्या चाहती है ये कोई नहीं  सोचता ! " या संध्याचा वाक्याचा अर्थ तिच्या मैत्रिणीला -नाझियाला आधी कळत नाही. हिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेम्ब तर नाहीच पण  " बिलकुल रोना नहीं आ रहा है यार , और भूख भी बडी  कसके लग रही  है " हे जेव्हा नाझिया ऐकते  तेंव्हा तीही सान्या कडे तिला वेड लागल्यासारखंच पाहते .पण काही वेळानंतर तिला परिस्थितीचा थोडा अन्दाज येतो की लग्न झाल्यानंतर ५ महिने उलटूनही संध्याची  तिच्या नवऱ्याशी तारंच जुळलेली नव्हती . त्याच्याशी काही अटॅचमेंटच झालेली नव्हती - नवरा बायको हे नातंच त्यांच्यात तयार झालं नव्हतं ..


संध्या (सान्या ) स्वतः लिबरल किंवा अगदी ऑर्थडॉक्स ही नाही - टिपिकल भारतीय  मुलीप्रमाणे MA in English झाल्यामुळे आई वडलांनी निवडलेल्या चांगल्या पगाराची नोकरी , पगार असलेल्या आस्तिक गिरीशी तिनं लग्न केलंय आणि आता तो अचानक गेल्यावर तिला दुःख का होत नाही याचा ती विचार करताना दिसते 

आणि तिला उत्तरं  मिळायला लागतात.


या सगळ्या झमेल्यात  एक इन्शुरन्स एजेंट येतो आणि  "आस्तिकने ५० लाखांचा इन्शुरन्स काढलेला होता आणि आता त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या पश्चात त्याने नॉमिनी म्हणून आपल्या बायकोला संध्याला मिळणार" अशी बातमी देतो.  यानंतर घरात एक वेगळाच प्रश्न तयार होतो - " घरातले पैसे घरातच कसे राहतील ?" . या कामासाठी आस्तिकची कागदपत्रे शोधताना त्याच्या कपाटात एका मुलीचा फोटो दिसतो. आणि  सान्या- संध्याला आपलं आणि आस्तिकचं  नातं का जुळलं नाही याचा अंदाज येतो - आणि ही दिसायला सावळी आणि MA  पण असेल का नाही अशी वाटणारी मुलगी आस्तिकला का आवडली असावी हा प्रश्न तिला पडतो, तरीही  ती त्या मुलीच्या शोधाला लागते आणि अकस्मात त्याच्या ऑफिसमधले सहकारी समाचाराला घरी आल्यावर त्यांच्यात तिला ती मुलगी ( सयानी गुप्ता) दिसते आणि तिच्यामागे लागून ती तिचे आणि आपल्या नवऱ्याचे काय संबंध होते हे जाणण्याचा प्रयत्न करते . तिच्या नवऱ्याच्या  आवडीनिवडच्या वस्तू  सायनीकडून कळाल्यावर आणि तिच्याच  घरी तशाच वस्तू पाहायला मिळाल्यानंतर त्यांच्यात होणारे संवाद प्रत्यक्षच पाहायला हवेत . सयानीशी बोलताना तिला हळूहळू कळायला लागतो आणि त्याचा आवडता निळा रंग -त्याच रंगाचे फॉर्मल शर्ट्स आणि इतर  आवडी निवडीही कळायला लागतात . 


इन्शुरन्सचे पन्नास लाख घरातच कसे राहतील यासाठी केलेले नानाविध प्रयत्न , सान्याचं लग्न पुन्हा आपल्याच घरातल्या मुलाशी ( राजेश तेलंग आणि अनन्या खरे यांचा मुलगा ) लावण्याचाही प्रस्ताव येतो ... 


या प्रस्तावाला सान्या मान्यता देते का ? आपल्या नवऱ्यावरचा  राग , रोष विसरून ती त्याला माफ करते का ? मिळालेल्या पन्नास लाखाचे ती काय करते ?  हे सर्व  व्यक्त करताना सान्याचे आस्तिकच्या आजीबरोबरचे प्रसंग भावनिक तसेच तिची व्यक्त होण्याची तळमळ  दाखवणारे ... तेही पडद्यावरच पाहिले  पाहिजेत . 


हा सिनेमा अनेकदा मोठ्या माणसांची दांभिकता , नवीन पिढीतल्या मुलांना - जास्तकरून मुलींना एका विशिष्ट फ्रेममध्ये गृहीत धरण्याची मानसिकता ठळकपणे दाखवतो - पण आजकालची मुलं -मुलीही स्वतंत्नत्रपणे विचार करून वेडसर किंवा एककल्ली वाटली तरी आपल्या कुटुंबाबद्दलही  संवेदनशीलपणे विचार करू शकतात हे दाखवण्यात हा सिनेमा यशस्वी होतो. 


सिनेमाभर आस्तिकची आजी त्याच्या आईच्या नावाचा पुकारा करताना दाखवली आहे - शेवटी जेव्हा ती संध्याला (सान्या ) हाक मारते, तेव्हा इतरांचं माहीत नाही , पण मला तरी भरून आलं !!


" पगलैट" मधील सर्वच कलाकारांनीं त्यांच्या त्यांच्या भूमिका छान  चपखल वठवल्या आहेत .   कमावत्या मुलाच्या अकाली  निधनामुळे आलेली अगतिकता आस्तिकच्या  वडिलांच्या भूमिकेतल्या आशुतोष राणाने यथार्थ सादर केली आहे. मुलगा गेल्याचं दुःख आहेच पण आता घरातला एकमेव कमावता माणूस गेलाय आणि एक मोठं कर्ज मागे ठेवून याची चिंता आणि तरीही वेड्यावाकड्या मार्गाने इन्शुरन्सचे पैसे पदरात पडून न घेण्याची भूमिका नेटकी वटली  आहे. शिंबा चड्ढाही आईच्या भूमिकेत छान - एका आईचं  भरून न येणारं  दुःख आणि घर चालवणाऱ्या गृहिणीची व्यावहारिक बाजू तिने उभी केली आहे. यात दिग्दर्शकाचंही कौतुक - सिनेमातली गाणीही प्रसंगानुरूप 


... पण मेन ऍट्रॅक्शन    नक्कीच सान्या  मल्होत्रा –


 या  " पगलैट - संध्या " साठी हा "" पगलैट"  नेटफ्लिक्सवर नक्की पहा !!!


©राहुल लाळे

१२-०४-२०२१


Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका