समिधा



*समिधा*


 राहुल


समिधा....


ती लाकडाची समिधा किती नशीबवान

आहुती होते तिची यज्ञात ...


कधी सर्वकार्यसिद्धीसाठी , तर कधी रोगनाशासाठी

कधी संततीप्राप्तीसाठी , तर कधी दीर्घायुष्यासाठी

कधी मोक्षप्राप्तीसाठी तर कधी पाप मुक्तीसाठी


मग

सर्व मनोरथ पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या

माझ्या सारख्या अगणित समिधांचं काय ?


दोन गोष्टी लिहि  किंवा छान कविता कर

माझ्या मनाची भाषा कोणाला  समजणार ?


जिने आपल्या पदरात विश्वाला सांभाळलं

तिला तू  तुझ्याच  इच्छेप्रमाणे वाकवलंस


कधी सन्मानानं डोक्यावर बसवलंस

कधी केरसुणीसारखं  कोपऱ्यात ढकललंस 


आईचा मान देऊन पूजा केलीस 

कधी वासनांध होऊन पीडित केलंस


कधी  बहीण- मैत्रीण , कधी  प्रेमिका -पत्नी

हर एक रूपात मी सखी होते


अंगणात पहाटेचा पहिला किरण झाले

तुझ्या व्यक्ततेची  कल्पनाही बनले

माझे तेज घरादाराला देऊन मी मात्र विजून गेले


कधी घनघोर अंधार , कधी डोळ्यात अश्रूंची धार

कधी पेटता अंगार  तर कधी फुलांचा शृंगार


कितीही विचार केलास तरी रहस्य माझे सापडणार नाही

माझ्या ओटीपोटातील गर्भ तू वाढवू शकणार नाहीस


भरभरून वाहणाऱ्या भावनांची  नदी मी

पानोपानी शब्द तुझे -मला बांध घालू शकणार नाहीत


कोऱ्या पुस्तकात माझ्या , कोरे शब्द बनून राहीन

तू कायमच पुरुषोत्तम,  मी सर्वोत्तम कधीच ठरणार नाही


तुझ्या अहंकाराची मी समिधा - कायम समर्पित होत राहीन

स्वतःला पुन्हा पुन्हा  नवतेजाने प्रज्वलित करत राहीन


 

© राहुल लाळे

०८-०१- २०२०

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका