बदला
*बदला*
राहुल लाळे...११.०३.२०१९
*‘बदला लेना हर बार सही नही होता लेकीन माफ करना भी हर बार सही नही होता’.* हा अर्जुनाला कृष्णाने महाभारतात दिलेला संदेश जेंव्हा अमिताभच्या नेहमीच्या दमदार, खोल आवाजात जेव्हा ट्रेलरमध्ये पाहिला तेव्हाच *बदला* पहायचाच हे ठरवून टाकलं. त्यातून 'कहानी' सीरीजचा दिग्दर्शक सुजय घोषचा सिनेमा, अमिताभ आणि तापसी पन्नूचा पिंक पाहिलेला आणि हे तिन्ही सिनेमे आवडले असल्याने बदला बद्दलची उत्सुकता वाढलेलीच होती. तापसी आणि अमिताभची सिनेमातली अभिनयातली जुगलबंदी आणि सरप्राईज पॅकेज मधल्या अमृता सिंगचा लक्षात रहाणारा दमदार परफॉर्मन्स एक उत्कंठावर्धक सस्पेन्स थ्रिलर म्हणून बदला नक्कीच पैसे वसूल करुन देऊन गेला.
नैना (तापसी) एक प्रतिष्ठित नुकताच महत्त्वाचा पुरस्कार प्राप्त झालेली बिझनेसवुमन एक संसारी स्त्री आहे ... ग्लासगो मध्ये एका बर्फाच्छादित रिमोट भागातील हॉटेलमध्ये, तिच्या अर्जुन ( टोनी ल्युक) नावाच्या विवाहबाह्य संबंध असणाऱ्या मित्राच्या खुनाच्या संशयावरुन नैना पकडली जाते. तिच्या म्हणण्यानुसार ती निर्दोष आहे...पण निर्जन स्थळी असलेल्या हॉटेलच्या बंद खोलीत जिच्या खिडक्याही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी थंडीमुळे आतून उघडता येणार नाहीत अशा लॉक करून ठेवल्यात, खोलीत नैना आणि अर्जुन आल्यानंतर आणि आधीही कुणी आलेलं नाही, बाहेर गेलेलं नाही. त्यामुळे संशयाच्या सर्व सुया नैनाकडेच वळलेल्या. या सर्व परिस्थितीमुळे वैतागून तिचा नवरा मुलीला घेऊन तिच्या पासून वेगळा झालाय. पण तरीही पक्का स्वभाव असलेल्या नैनाने धीर सोडलेला नाही. नैनाच्या वकीलाने जिमी(मानव कौल) बादल गुप्ता(अमिताभ) या ज्येष्ठ वकीलाला हायर केलंय. चाळीस वर्षात या बादल गुप्ताने एकही केस हरलेली नाही हा त्याचा लौकिक आहे. ही त्याची शेवटची केस.
अमिताभ अगदी एन्ट्री पासूनच आपला ताबा घेतो ते शेवटपर्यंत. 'जो भी तुम मुझे बताओगी...वही मेरे लिये सच होगा' असं म्हणत तो त्याची केस चालू करतो. पुरावे गोळा किंवा पैदा करून अशीलाला सोडवण्याचा हातखंडा असणाऱ्या बादल गुप्ताचा डायलॉग 'वो मूर्ख होता है...जो सिर्फ सच को जानता है, और सच और झूठके बीच का फर्क नहीं जानता' अमिताभच्या तोंडातून ऐकायची मजा काही औरच. त्याची आणि सत्य सांगणारी ( का लपवणारी) तापसी व अमिताभ यांचं शाब्दिक युध्द अक्षरशः खिळवून ठेवतं. तापसीला जरी टाळ्याखेच संवाद नसले तरी डोळे आणि हावभाव यांच्या जोरावर ती अमिताभला चांगलीच टक्कर देते. सत्य नक्की काय, नक्की काय घडले, काय खरं काय खोटं याची शहानिशा करताना तापसी व अमिताभ यांना जवळजवळ सिनेमाभर एकाच खोलीत चित्रित केलंय, पण कुठेही कंटाळा येत नाही. कधी नैना एक सांगते, कधी भावनाविवश होते.
तेव्हाच अमिताभबरोबरच प्रेक्षक ही म्हणू पाहतो. "तुम मुझे हर घंटे की फीज दे रही हो नैना, चाहे तो तुम ये कहकर रो बैठ सकती हो के मैने कुछ नहीं किया, या फिर मेरी मददसे अपने आप को जेल जानेसे रोक सकती हो"
केसची माहिती काढून घेतानाच, नैना अर्जुनच्या गाडीच्या धक्कयाने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यूची एक नवीन कहाणी समोर येते. अपघातात यांची कार बंद पडते आणि त्याचबरोबर गाडी दुरुस्त करण्याच्या निमित्ताने राणी कौर (अमृता सिंग) आणि तिचा कार रिपेअर करण्यात एक्सपर्ट असणारा नवरा या पात्रांची आणखी भर पडते. या सर्व प्रकारामुळे गूढता आणखीनच वाढते व बादल नैनाला शेवटी म्हणतो ,
"क्या मै वोही छह देख रहा हूँ जो तुमने मुझे दिखाया, या वो नौ जो मैने देखना चाहिये था..." आणि प्रेक्षकही साधारण क्लायमॅक्सचा अंदाज आलेला असतानाही या चक्रव्यूहात आणि बादल..नैना आणि आता राणी यांच्या उंदीरमांजराच्या खेळात अडकतात.
यापुढे खून नक्की कसा आणि कुणी केला?, नैना दोषी का निर्दोष? राणी, तिचा नवरा यांचा या केसशी काय संबंध? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आणि एक जोरदार झटका देत सिनेमा संपतो.
'कॉन्ट्राटिएम्पो ' किंवा 'द अनव्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश सिनेमावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा ज्यांनी पाहिला नाही त्यांना तो नक्कीच खिळवून ठेवेल आणि ज्यांनी तो पाहिला असेल त्यांना फ्रेम बाय फ्रेम तोच सिनेमा फक्त कॅरॅक्टर बदललेल्या स्थितीत. तसाच तो मधे मधे I knew what you did last summer आणि
Murders in the Rue morgue चीही आठवण देतो.
सिनेमा जबरदस्त आहे, पण सुजय घोषच्याच कहानीप्रमाणे तो मेमरेबल वाटत नाही. याचं कारण या सिनेमाच्या आंग्लाळलेपणात असावं. 'कहानी' मध्ये थ्रिलर सस्पेन्स असला तरी तो पूर्णपणे कलकत्त्याच्या बांगला बॅकग्राऊंडवर आणि दुर्गा पुजेच्या वातावरणात बनलेला होता , शिवाय त्याला मेट्रोत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाची व इंटेलिजन्सचीही पार्श्वभूमी होती. तीच गोष्ट 'कहानी २'ची, जिथे चाईल्ड ऍब्युजचा विषय होता. 'बदलात' विवाहबाह्य संबंधांमुळे एखादी व्यक्ती कशी अडचणीत येऊ शकते हा एक विषय मांडलाय असं थोडंफार म्हणता येऊ शकतं. हा सिनेमा पूर्णपणे थंड हवामानातील ग्लासगो व स्कॉटलंड मध्ये चित्रित झालाय. यामुळे चित्रपटाच्या कथेला गूढता मिळायला उपयोग झालाय, पण अशा विदेशी पार्श्वभूमीवर एखादं परदेशी कॅरॅक्टर सोडलं तर बाकीचे भारतीय हिंदीत डायलॉग करत सिनेमा रंगवतात. हा सिनेमा विषय तोच ठेवून लोकलाईज्ड करता आला असता तर जास्त लक्षात राहिला असता.
तरीही तापसीचा स्पॉंटँनियस अभिनय, इंम्प्रुवाईज्ड डायलॉग डीलिव्हरी आणि हावभाव यामुळे प्रेक्षकांना संभ्रमात टाकायचं काम चोख पाडलं गेलंय. अमृता सिंगचा कँमिओही लक्षात राहण्याजोगा.
या प्रकारचा सस्पेन्स थ्रिलरमधे जो एक्शन नसला तरी संवादात्मक आहे , त्यात अमिताभशिवाय पर्याय नाही हे सिध्द झालंच. फक्त बच्चनच्या माझ्यासारख्या निस्सीम चाहत्यांना शेवट जरा धक्का देणाराच होता. महानायक सिनेमात असताना त्याच्याच व्यक्तिरेखेने चित्रपट पूर्णत्वास न्यावा ही आमची भाबडी अपेक्षा.
पण शाहरुखखानच्या रेड चिली कंपनीला 'झिरो'च्या अपयशातून सावरायला अमिताभ, तापसी आणि सुजय घोषचा हा *बदला* यशस्वी हातभार लावणार हे नक्की.
राहुल लाळे

Comments
Post a Comment