आणि... डॉ काशीनाथ घाणेकर...आणखी एक भावेप्रयोग*
*आणि... डॉ काशीनाथ घाणेकर...आणखी एक भावेप्रयोग*
सुबोध भावेची *'आणि... डॉ काशीनाथ घाणेकर'* या बायोपिकची झलक दाखवणारे ट्रेलर्स, टीझर्स काही दिवस पाहून सिनेमाबद्दल एक उत्कंठा तयार झाली होती.
सुबोध भावेचे बालगंधर्व, टिळक, कट्यार या सिनेमांचा अनुभव पहाता, हाही एक वेगळा आविष्कार पहायला मिळेल ही अपेक्षा होतीच. शिवाय घाणेकरांचे लहानपणी टीव्हीवर पाहिलेले मधुचंद्र, पाठलाग, हा खेळ सावल्यांचा हे सिनेमे जरी पाहिले असले तरीही त्यांच्या नाटकातल्या अदा आणि पेशकारी प्रत्यक्ष पाहिली नव्हती. डॉक्टरांबद्दल , त्यांच्या कलाकारीबद्दल, नानाविध पैलूंबद्दल लहानपणापासून ऐकून होतोच, त्यामुळे लागल्या लागल्या सिनेमा पहायचा हे ठरवलेच होते.
नामांकित डेंटिस्ट असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाटकात काम करण्याच्या वेडाने झपाटल्यामुळे छोट्या मोठ्या नाटकात प्रॉम्पटिंग करायच्या आणि ऐनवेळेस एखादं छोटंमोठं काम करायच्या सुरवातीच्या सीन पासून ते शेवटी कमबँक करतानाच्या तयारीच्या वेळीच प्राण सोडण्याच्या सीनपर्यंतच्या साधारण पावणे तीन तासात या झपाटलेल्या कलाकाराच्या अदाकारीने थिएटर मंत्रून जातं.
दारु न पिता दारुड्याची केलेली एकच प्यालातील भूमिका दारु पिऊन केलीय असं मा दत्तारामांसारख्या मातब्बराला वाटणं हा या अफलातून नटाचा पहिला पराक्रम. रायगडाला..मधील बेदरकार संभाजी, अश्रूंची झाली फुले मधला रांगडा लाल्या, गारंबीचा अक्करमाशा बापू , आनंदी गोपाळ यातील पात्रे जेव्हा सुबोधला पडद्यावर साकारताना पहातो तेव्हा काशीनाथ घाणेकरांनी त्यावेळेस किती बेभान अभिनय केला असेल याचा प्रत्यय येतो हेच या सिनेमाचं आणि सुबोधचं यश .
सिनेमा प्रामुख्याने सुबोध (काशीनाथ), डॉ इरा घाणेकर(नंदिता पाटकर), कांचन घाणेकर( नवोदित वैदेही परशुरामी) आणि प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर) यांच्याभोवती फिरतो. त्यांच्या निवेदनातून कथा पुढे सरकते. सुबोध बरोबरच यांनी आपली कामं जीव ओतून केली आहेत. त्यांच्या एकमेकांमधील नात्यातील ओलावा.. दुरावा...तळमळ...कळकळ छान उलगडून दाखवली आहेत.
पण वसंतराव कानेटकर (आनंद इंगळे), मा दत्ताराम (सुहास पळशीकर), डॉ श्रीराम लागू (सुमित राघवन), भालजी पेंढारकर (मोहन जोशी) यांची पात्रं आणखी रंगवता आली असती....पण मिळाल्या तेवढ्या संधीत त्यांनी लक्षात राहील अशी कामं केली आहेत.
सुलोचनादीदींची भूमिका एक आई, सीनियर आर्टिस्ट म्हणून त्यांचा आब, जरब आणि मुलीची काळजी असे अनेक पैलू दाखवत सोनाली कुलकर्णीने मिळालेल्या छोट्या संधीत छान साकारलीय. सुमितनेही डॉ लागूंची छोटी भूमिका संयमितपणे साकारलीय.
अमृता खानविलकर संध्येच्या भूमिकेत "तुम्हावर केली मी मर्जी" आणि प्राजक्ता माळी "गोमू संगतीनं.." या गाण्यांतून झळकून जातात.
घाणेकर-मा.दत्ताराम-वसंतराव कानेटकर-प्रभाकर पणशीकर -डॉ लागू यांच्यातले संवाद ,द्वंद्व-प्रतिद्वंद्व दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी अफलातून चितारलेत. लागूंनी घाणेकरांच्या आणि घाणेकरांनी लागूंच्या नाटकात जाऊन एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे सीन्स म्हणजे मास्टरपीसेसच आहेत. रंगमंचावरुन समोर घाणेकरांनी डॉ लागूंना पहाताना 'मी आहे...होतो...आणि हा असणार आहे" हा भाव,वेदना, चीड सुबोधनं ज्या ताकदीने उभी केलीय...निव्वळ लाजवाब !!
त्यावेळचा काळ दाखवताना परत परत शिवाजी मंदीरचा, तिथल्या जिन्याचा सीनच दिसतो... तोचतोचपणा टाळून आणखी काही सिच्युएशन्स, जागा दाखवता आल्या असत्या.
पण घाणेकरांचे भन्नाट रुप पडद्यावर बघताना या क्षुल्लक बाबी लक्षातही येणार नाहीत.
डॉ काशीनाथ घाणेकर या हरहुन्नरी, मनस्वी , अफलातून
कलाकाराच्या ज्या विविध अदाकारी सुबोध दाखवतो....
केवळ कमाल...रायगडाला जेंव्हा जाग येतेच्या प्रयोगाला घाणेकरांचे वडील येतात तेंव्हा बेडर संभाजीचे काम करणारे घाणेकर जी भावार्तता आणून वडलांचे कौतुकाचे शब्द ऐकण्यासाठी आसुसतात तो प्रसंग असो....लाल्या साकारताना स्टाईलमध्ये कपाळावरचे केस मागं घेत 'उसमें क्या है' म्हणणं, *'एकदम.....'* नंतर ठराविक पॉज घेऊन प्रेक्षकांच्या रिस्पॉन्स नंतर *'...कडक्क'* म्हणणं असो..सगळं केवळ खल्लास. जेंव्हा घाणेकर फॅनला भेटण्यासाठी कॉलेज मध्ये जाऊन कारच्या टपावर चढून *'आपली लाल केल्याशिवाय लाल्या होत नाही'* हे म्हणतात तेंव्हा त्यावेळी ते जनमानसात किती लोकप्रिय होते हे कळून चुकतं.
मराठी नाट्यसृष्टीतील पहिला सुपरस्टार काशीनाथ घाणेकर... मराठी नाटकांच्या थिएटरमध्ये एन्ट्रीला पहिल्यांदा शिट्टी पडली, पहिली टाळी पडली त्यांच्यासाठी...श्रेयनामावलीत सर्व नावं झाल्यानंतर *'आणि....डॉ काशीनाथ घाणेकर'* ही प्रथा चालू करणारे आणि त्यावेळच्या हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार राजेश खन्नाच्या झंझावाताला खंबीरपणे टक्कर देत स्वतःच्या नावावर मराठी प्रेक्षकांना थिएटरकड खेचून आणत तिकीट बारीवर खणखणीत नाणं वाजवणारे पहिले कलंदर अभिनेतेही तेच....
हे सर्व आणि
प्रेक्षकांच्या गराड्यातून थिएटरमध्ये एन्ट्री करताना आणि नंतर बाहेर पडतानाची ऐट तसेच '*आणि... माझ्या नावाच्या आधी लागतं...नंतर नाही..* म्हणताना, जो घाणेकरांचा माज सुबोधनं दाखवलाय त्याला तोड नाही.
एखादा क्रिकेटपटू जसा वॊर्म अप करत मैदानावर एंट्री घेतो तसं रंगमंचावर एन्ट्री करताना पाहून घाणेकरांची एनर्जी लेवल काय असेल याची कल्पना येते.
काशीनाथ घाणेकर नावाचं वादळ सुबोधनं चांगलंच भिनवलंय. नुसते डोळे घारे करुनच नाही तर त्यांचे हावभाव, मस्त देहबोली त्यानं आत्मसात करण्याचा सुरेख आणि यशस्वी प्रयत्न केलाय.
मध्यांतरापर्यंत घाणेकरांचा स्ट्रगल आणि चढता काळ दाखवतानाचा वेग नंतर थोडा मंदावतो. बेमुवर्तपणा, बेफिकिरी आणि अतिआत्मविश्वास, नशाधीनतेमुळे आलेली उतरती कळा आणि पुन्हा कमबॅक करण्यासाठी सिनेमा, नाटक केलेले प्रयत्न नेमकेपणाने दाखवण्याचं काम सुबोधच्या खांद्यावर मदार ठेवून आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक अभिजीत ने छानच पार पाडलंय.
डॉ घाणेकरांच्या मस्तीची नशा आणि नंतर नशेची मस्ती दाखवण्यात हा *भावेप्रयोग* नक्कीच यशस्वी ठरलाय .
सुबोध आणि सर्वच टीमचे हे प्रयत्न आणि काशीनाथ घाणेकर हे काय रसायन होते हे अनुभवण्यासाठी एकदातरी *आणि....डॉ काशीनाथ घाणेकर* पहाच.
राहुल लाळे

Comments
Post a Comment