सिंधूताई सपकाळ

 परवा एका मित्राच्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माई सिंधूताई सपकाळ यांच्या मांजरी येथील आश्रमाची आणि माईंची भेट झाली... मन भरून आलं



माई....महान आई...सिंधूताई सपकाळ


आई-वडिलांचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं हे मी सांगायला नको. अनेकदा आपल्या आवडी निवडी, प्राधान्याच्या गोष्टी बाजूला ठेवून ते आपल्या मुलांना वाढवतात, त्यांच्या आवडीनिवडी जपतात. पण सर्व पुरुषवर्गाची माफी मागून मी असं म्हणेन की मुलगा किंवा मुलगी आपल्या वडलांपेक्षा, आपल्या आईच्या जवळ, जास्त जवळ असतो. एखादा अपवाद असू शकेल पण आपल्याला बोलता यायला लागल्यावर  तोंडातून  येणारा पहिला शब्द "आई"हाच असतो. काही लागल्यावर तोंडात येणारा शब्द ही "आईच". कोणत्याही आईला वेदना झालेली तिच्या अपत्याला सहन होत नाही. 





पण एखाद्या आईलाच स्वतःचे मूल वाढवण्यासाठी जगाची, घरातील लोकांची अवहेलना स्विकारावी लागली असेल, आपले स्वत्व टिकवण्यासाठी मुलीला वाढवण्यासाठी प्रसंगी भीक मागायला लागली असेल तर त्या अभागी स्त्रीवर काय वेळ येत असेल? एखादी बाई हार मानून आपलं आयुष्य संपवेलही. पण ही आई अशी नाही, आपल्या दुःखाला धैर्याने सामोरे जाऊन हजारो अनाथ मुलंच नाही तर वयाने मोठ्या व्यक्तिही आपल्या पदराखाली घेऊन त्यांचं पालकत्व  हिनं स्विकारलं.  समाजाशी लढली, स्वतःशी ही लढली पण हार नाही मानली. ही ती माऊली म्हणजे ...आपल्या ७२वर्षाच्या आयुष्यात ५० वर्षे संघर्ष केलेल्या आणि गेल्या काही वर्षांत ज्यांचं काम आपल्यासमोर आलं त्या श्रीमती (डॉ) सिंधूताई सपकाळ. 


माझा मित्र दिनकर पळसकर याच्या आईचा ८०वा वाढदिवस तो सिंधूताईंच्या मांजरी येथील बालनिकेतन मधे साजरा करणार आहे... असं कळल्यावर माईंना भेटायचा हा मौका सोडायचा नाही असं मी आणि तारिणीनं ठरवून टाकलं.




काल मांजरीतील त्यांच्या आश्रमात सगळे यायच्या आधी च पोचलो. दहा मिनिटात माई सामोरे आल्या... आपुलकीने त्यांनी चौकशी केली आणि डॉक्टर कडे जाऊन १० मिनिटात येते म्हणाल्या. गाडीत बसायच्या आधी वाकून त्यांना नमस्कार करायला आम्हा दोघंही एकदमच वाकलो.


सर्वजण येईपर्यंत आम्ही बालनिकेतन जेवढं शक्य आहे तेवढं पाहून घेतलं. शिस्तीत वावरणारी लहान मोठी मुलं, टापटीप ठेवलेलं ऑफिस, हॉल तसेच सर्व खोल्या आणि आवार माईंची करडी शिस्त आणि संस्कार दाखवून देत होत्या. त्यांना मिळालेले विविध पुरस्कार (७००हुन अधिक)व्यवस्थित लावून ठेवलेले. त्यांच्या भाषणात येणारी कोट्स फ्रेम करून लावलेली दिसली. 'येवढी बेचव नसावी, भूक माझी ईश्वरा,...केवढी चवदार दुःखे वाढली ताटात तु"  हे वाक्य वाचून तर मन गलबलून आलं. 

ज्या पतीने चारित्र्याचा संशय घेऊन घराबाहेर काढलं तेही नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीसोबत, ज्याच्यामुळे भीक मागावी लागली, स्मशानात रहावं लागलं अशा नवऱ्यालाही तो निराधार झाल्यावर ज्यांनी "आता तुम्ही माझे पती नाही, मुलगा आहात" असं म्हणत आपल्या पंखाखाली घेतलं, अशा महान आईंसमोर नतमस्तक न होतो तरच नवल !!


 थोड्या वेळाने माई(सिंधूताई) आल्या. वाढदिवस साजरा झाला.. आणि माईंनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दोन ठिकाणी त्या आधीच बोलून आल्या होत्या पण तरीही प्रेमाने आणि दंगा करणाऱ्या मुलांना दटावत बोलल्या.

"पुरस्काराने पोट नाही भरत....भाषणाशिवाय राशन नाही" हे वाक्य ऐकलं आणि मन पुन्हा हललं.


आपली आई ..ज्यांची आहे ते भाग्यवान... ज्यांची या जगात नाही त्यांच्या लाखो आठवणी..... एक दिवसही अस जात नसेल की आईची आठवण येत नाही...


पूर्वी मदर्स डेवेळी (मी मानत नाही तरी)... लिहिलेले माझ्या आईविषयीचे चार शब्द  ...हजारो निराधार लहानथोरांच्या आईसमोर , माई-सिंधूताईंच्या समोर उच्चारता आले.. भरुन पावलो


आई आपली पहिली गुरु... निस्वार्थ प्रेमाची...त्यागाची..


राहुल


आई कोण असते ...


आई"..."आई"...असते...

देऊळ नसते...देवळातील देव नसते...

देवाला अर्पिलेले फूल नसते...

चंद्र, चांदणे  तारा, वारा,  आभाळ नसते...

अथांग पसरलेला सागर नसते...


"आई"...म्हणजे नक्की कोण ...?

कोण सांगू शकेल?..

पण तरीही मला वाटते...

"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...

या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...

असा आत्मविश्वास देणारी...

एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते 

कितीही मोठा झालो तरी बाळा अशी हाक माणारी 

"आई"...ही "आईच"...असते...!!!!


प्रत्येक आईची, माईची हीच जीविगिषु वृत्ती मनी बाळगून 

आपले - इतरांचे जीवन आनंदी बनवणे हेच आपल्या आईच्या कष्टाचे चीज आहे


©राहुल लाळे

Comments

Popular posts from this blog

धुरंधर

द बंगाल फाईल्स

नोव्हेंबरमधील धार्मिक पर्यटन .. गिरनार - सोमनाथ - द्वारका